Tuesday, July 10, 2018

माणसं निसर्गाचं देणं विसरली


       अलिकडे हवामान आपला वेगळाच रंग दाखवायला लागला आहे. उन्हाळ्यात ही जमीन भाजून निघत आहे. पावसाळ्यात तर काय चाललं आहे, कळायलाच मार्ग नाही. कुठे थेंब पाऊस नाही तर कुठे महापुरात शहरे वाहून जात आहे. ग्लोबल वार्मिंग, आपण विचारही करू शकणार नाही अशी नैसर्गिक आपत्ती, न बोलवताही येणारे भयंकर वायरस, उपचारालाही न जुमाणणारे आजार... सारंच कसं अनाकलनीय! वास्तविक हे सगळं आपल्या गुन्ह्याचीच शिक्षा आहे. आपल्याबरोबरच अबोध शिशु आणि जनावरंदेखील बळी पडत आहेत. खरं सांगायचं तर आपण सगळे निसर्गाचे ऋण फेडायला कंजुषीपणा करायला लागलो आहे. अर्थात आपण प्रयत्न केला तरी हे ऋण चुकते होऊ शकत नाही, पण निदान आजचे मरण तरी उद्यावर ढकलू शकतो. आपल्या परिसरात पर्यावरणसंबंधी छोटे छोटे उपक्रम राबवून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. कदाचित चमत्कारसुद्धा घडू शकतो आणि भविष्यात आपले वंशज-जनावरे,प्राणी तरी सुरक्षित राहू शकतील.

     आपण संधी मिळेल तेव्हा किंवा सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे निश्चित करतो. जंगल,पर्वत-डोंगर,झरे नद्या,समुद्र किनारी भटकंती करायला जातो. मौजमज्जा करतो. आनंदाचे काही क्षण उपभोगतो. दुर्मीळ आणि त्या क्षेत्रातील पशु-पक्षी,त्यांचे जीवन चित्रण त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून आपण त्याचा आल्बम करून मनाच्या गाभार्यात साठवून ठेवतो. छायाचित्रांचे प्रिंट काढूनही घरातला अल्बम सजवतो. आपण फिरून येतो. त्याविषयी आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगतो. का अशा खास जागा पर्यटनासाठी लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण बनतात? का लोक तिथे वारंवार जातात? याचा विचार आपण करायला हवा. त्यांचे सौंदर्य आबाधित ठेवण्याची गरज आहे. पण आता या जागादेखील आपण प्रदूषित करत आहोत.
      आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक, जीव-जंतू, हवा-पाणी आणि माती मिळून जे दृश्य दिसते, ते आपल्याला या भूमिवर व्यवस्थित राहण्यासाठी उपलब्ध असते. हा परिसर शुद्ध राहावा, स्वच्छ राहावा,यामुळे आपले तन-मनदेखील शुद्ध राहते. खरे तर या भूमीवरचे सर्व पर्यावरणीय मूल्यवान घटक आपल्याला नि:स्वार्थपणे फुकट भेटस्वरुपात मिळत असतात. जर आपले पर्यावरण आजारी नसेल तर आपणदेखील निरोगी आणि आनंदी राहू. पण आज पर्यावरणाच्या घटकांमध्ये जे संतुलन असायला हवे, ते सातत्याने बिघडत चालले आहे. हळूहळू आपल्या शहरांबरोबरच झोपडपट्ट्यांमधील पर्यावरण आणि पर्यटन स्थळांवरील वातावरण यातील अंतरदेखील कमी होत चालले आहे. आपण पर्यटनस्थळेदेखील अगदी घाण करून टाकली आहेत.
      आज मैदानी प्रदेशात वाढणारी उष्णता आता पहाडी,पर्वतीय क्षेत्रातही वाढत चालली आहे. स्वच्छता अभियान असतानादेखील समुद्र आणि नद्यांच्या काठाला आपल्याला कचर्यांचा ढीग पाहायला मिळत आहे. समुद्र-नद्यांच्या काठांवर मंदिरांमुळे केरकचरा,फुलांचे हार,प्लास्टिक पिशव्या,पूजा- साहित्य असं बरच काही विखुरलेले दिसते. सहन न होणारी दुर्गंधी या ठिकाणी श्वासाला त्रासदायक ठरत आहे. अलिकडे पर्यावरण स्वच्छतेबाबत आपल्यात थोडी फार जागरुकता येऊ लागली आहे. आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर फक्त विचार करून चालणार नाही तर आपल्याला त्यासाठी पाऊल उचलावे लागणार आहे.
     आपल्याला फुकट मिळते, त्याचे खरेच मोल नाही. त्यामुळेच आपण पर्यावरणाकडे फारसे गंभीरपणाने घ्यायला तयार नाही. विनाकष्ट, विनासायास मिळणार्या गोष्टींचा आपण दुरुपयोगही करतो. फक्त निसर्गच असा आहे की, आपल्याला जन्माबरोबरच मिळत असते. जन्माला आल्यावर पहिला श्वास घ्यायला प्राणवायू हा निसर्गच देत असतो आणि तोही न मागता. या निसर्गाचं वागणं हे आईसारखं आहे. सगळं काही देऊनही, आणि सोसूनही आपल्या मुलाचाच विचार आई करत असते, तसं हा निसर्ग हा फक्त माणसाच्या भल्याचाच विचार करत असतो.
     माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे मेंदू. जो अशक्य ते शक्य करून दाखवण्यास माहिर आहे. अनोखे अविष्कार करण्यासाठी आपण दक्ष आहोत, पण आपल्याकडून ज्या चुका होतात आणि त्यामुळे निसर्गाची हानी होते, ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करत नाही. क्षणिक सुखासाठी आपण निसर्गाच्या तत्त्वांमध्ये बदल करत आहोत. वास्तविक ते नसते तर आपले जीवनच नसते. आज आपल्याच चुकांमुळे निसर्गापासूनच आपण लपून-छपून जगत आहोत. प्रदूषण टाळण्यासाठी आपण तोंडाला मास्क लावत आहोत. जल,वायू शोधक यंत्रांचा आविष्कार केला जात आहे. कारण आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. आपण आपल्या विचार करण्याच्या जोरावर दुसर्याच्या विचारावर अतिक्रमण करत आहोत. आपण ऐशाआराम जीवन जगण्यासाठी निसर्गाची हानी करत आहोत. या भूमिवरचे अन्य प्राणी-पक्षी यांच्या जीवावर उठलो आहोत. त्यांना उघड्यावर आणत आहोत. खरे तर अन्नसाखळी, निसर्गचक्र यावरच घाला घालून आपणच आपले थडगे रचत आहोत. शेवटी ही शिक्षा आपल्याला मिळणारच आहे. आणि त्याची आता सुरुवात झालेलीही आहे.

No comments:

Post a Comment