अलिकडे परदेशात वयोवृद्ध लोकांची करमणूक
करायला, त्यांना आनंद द्यायला तरुण मुलं-मुली भाड्यानं मिळत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. ही तरुण मुलं त्यांची सेवा करतात, त्यांना हवं नको ते
बघतात. दिवसभरातले चार-पाच तास ते या वयस्कर
लोकांबरोबर घालवतात. यासाठी ते मोबदला घेतात.पण आयुष्याच्या शेवटाला एकाकी जीवन जगणार्या लोकांच्या
जीवनात नवा उमंग, उत्साह ते आणत असतात. वृद्धांच्या चेहर्यावरचे हास्य आणि आनंद त्यांना पैशांपेक्षाही
बरेच काही देऊन जातो. मात्र आता याचबरोबर आणखी एक ट्रेंड पश्चिमी देशात रुळतो आहे, तो म्हणजे साठीनंतर नव्यानं आयुष्य
जगण्याचा,लग्न करण्याचा ट्रेंड! आयुष्याच्या
शेवटच्या काळात एकटेपणा खायला उठतो,ही गोष्ट खरी आहे.
परंतु, याला पाश्चात्य लोकांनी
असा उपाय शोधून काढला आहे. अरे हो,पण हा
प्रकार फक्त परदेशातच नाही तर आपल्या भारतातदेखील हळूहळू रुजत आहे.त्याची सुरुवात बर्यापैकी सुरू झाली आहे.
परदेशातल्या लाइफस्टाइल मासिकांमध्ये,नियतकालिकांमध्ये अशा लग्नांची चर्चा जोरात आहे.
एवढेच नव्हे तर अशा लग्नांना प्रोत्साहन देणार्या संस्थांच्या जाहिरातीही झळकत आहेत. या ट्रेंडनुसार
अगदी ब्रिटेनपासून अमेरिकेपर्यंत साठ वर्षांपुढील लोक आपला नवा जोडीदार निवडून नवं
आयुष्य जगताना दिसत आहेत. याला पुष्ठी देणारी ब्रिटेनची सरकारी
आकडेवारी पुरेशी आहे. साठीनंतर लग्न करणार्या तरुणांच्या टक्केवारीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यात महिलाही काही मागे नाहीत. 21 टक्क्यांसह महिलादेखील
या ट्रेंडच्या हिस्सेदारी बनल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नव्या चलनामध्ये फक्त पश्चिमी देशांची एकधिकारशाही नाही बरं का! भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात या प्रकारात आपली ओळख बनवू पाहात आहेत.
कोलकात्यातल्या माजी विंग कमांडरचीच कथा घ्या. सपन असे काही तरी त्यांचे नाव आहे. 40 वर्षांच्या सहजीवनानंतर
त्यांच्या पत्नीला ते गमावून बसले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा
एका जोडीदाराची गरज भासू लागली. त्यावेळेला त्यांचे वय 64 होते. त्यांच्यासोबत त्यांची वयोवृद्ध आई होती.
मुलं लग्नं करून अमेरिकेत सेटल झाली होती. सपन
यांची इच्छा होती की, त्यांच्या दुसर्या
लग्नाला त्यांच्या घरच्या सगळ्यांची सहमती असावी. मुले,
त्यांचे इन लॉज, त्यांची आई आणि दिवंगत पत्नीचे
भाऊ-बहीण असे सगळे. अर्थात त्यांना विरोध
कुणीच केला नाही,पण सुरुवातीला मुलं अवघडल्यासारखं वागत होती,
हे त्यांना जाणवलं. एका विवाह पोर्टलद्वारा त्यांनी
देशातल्या विविध भागातल्या काही महिलांची मुलाखत घेतली होती. बर्याच ठिकाणांहून त्यांना नकार आला. मग एके दिवशी त्यांना सुजाता भेटली. त्यावेळेला त्यांचं
वय होतं 62. त्या एका शाळेतून निवृत्त झाल्या होत्या.
त्यांनी सपन यांची प्रोफाइल पाहिली आणि त्यांच्याशी संपर्क केला.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या नवर्याचे निधन झाले
होते.
त्यांना सपन यांना कॉल करायला बरेच दिवस
लागले म्हणे! शेवटी त्यांनी हे धाडसी पाऊल उचललेच.
अर्थात त्यावेळेला म्हणजे सुरुवातीला त्यांना फक्त आपल्याशी कुणी तरी
बोलावं, असं वाटत होतं. मग सपन भेटले आणि
त्यांचे लग्न करायचे पक्के झाले. सुजाता यांनीही पहिल्यांदा ठरवले
होते की, संसार करण्याचा कसोशीने प्रयत्न करू, जर जमले नाही तर माघारी येऊ. पण आता त्यांच्या लग्नाला
सात वर्षांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत.
माझे एक स्टाफमेंबर होते. ते दोघेही शिक्षक. त्यांच्या पत्नी
रिटायर्ड झाल्यावर एक-दोन वर्षातच वारल्या. तेही रिटायर्ड होते. मुलगा नव्हता,पण एक नातू होता. मुलगी नवर्याकडे
होती. त्यामुळे त्यांच्या जेवणा-खाण्याचा
प्रश्न होता. त्यांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी एका महिलेची व्यवस्था करण्यात आली. नंतर ते तिच्यासोबतच राहू लागले. कुणी काही म्हणायचा
प्रश्न नव्हता,पण या नात्याला दुसरेच नाव
दिले गेले. सर्वांच्या संमतीने दुसरी इनिंग खेळता येते आणि तसा
प्रयत्न आपल्या देशातही सुरू आहे. एका मुलीने आपल्या आईचेच लग्न
लावून दिल्याचे वाचण्यात आले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
मुलामुलींच्या आणि नातेवाईकांच्या संमतीने आता अशी लग्ने होताना दिसत
आहेत.
गेल्या दोन-तीन दशकांपूर्वी तरी वयस्करांच्या लग्नाची गोष्ट कठीण
होती. पण अलिकडच्या काही वर्षात हा ट्रेंड वाढला आहे.
आज मेट्रोमोनियल पोर्टलवर आता आपल्याला सीनियर सिटीजन्सच्या अनेक प्रोफाइल्स
पाहायला मिळत आहेत. काही सेवा तर अशा आहेत की, त्या फक्त दुसर्या लग्नासंबंधीच काम पाहतात.
यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकडून
नोंदणी करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कंपेनियनशिप याचे
मुख्य कारण आहे. ज्यावेळेला कामातून रिटायर्डमेंट घेतल्यावर,
मुले आपापल्या कामात,कुटुंबात बिझी असल्यावर आणि
जोडीदाराचे निधन झाले असेल तर ... मग एकाकीपण खायला उठते.
कुणी तरी बोलायला, वेळ घालवायला हवं असतं.
अलिकडे वयोमर्यादा वाढली आहे. आपल्या देशाच्या
स्वातंत्र्यापूर्वी सरासरी आयुष्य 32 वर्षे होतं, आता हेच वय सरासरी 67 इतके झाले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10.38 कोटी लोक 60 वर्षांच्या वरचे आहेत. यातील बहुतांश सिंगल,घटस्फोटीत किंवा आपला जोडीदार गमावलेले आहेत. आणि ही
मंडळी आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायला आसुसलेले आहेत.
मुंबईमध्ये 15 वर्षांपूर्वी री-मॅरिजची एक साइट
सुरू करण्यात आली होती. त्याच्या संचालकाचे म्हणणे असे होते की,
सिनिरर्सच्या रजिस्ट्रेशनची संख्या सातत्याने वाढत होती. ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली होती, त्यावेळेला जवळपास
20 टक्के प्रोफाइल्स सिनियर्सची होती. असे सिनिअर
सिटीजन्स केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातील अनिवासी भारतीयदेखील रजिस्ट्रेशन करत आहेत.
तरीही वयस्करांचे लग्न लावणे तसे सोपे काम नाही. यात जोडीदार निवडताना जे मुद्दे येतात किंवा ज्या समस्या येतात, त्या युवा वर्गांपेक्षा फारच भिन्न आहेत. सर्वात महत्त्वाचे
म्हणजे मुलं,शेजारी-पाजारी, कुटुंब, नातेवाईक आणि समाजाकडून होणार्या विरोधाला अगोदर तोंड द्यावे लागते. प्रत्येकाला एकच
प्रश्न पडलेला असतो की, या वयात लग्नाची
काय आवश्यकता आहे. त्यांना का लग्न करायचे आहे? नंतर आरोग्य ही एक मोठी गंभीर समस्या असते. क्रोनिक आणि अन्य आजार हा एक चिंतेचा
विषय बनतो. आर्थिक स्थिरता ही आणखी एक समस्या आहे.
संपत्ती ही विवादाचे मुख्य कारण असते. त्यामुळे याबाबतीत फारच जागरूक आणि व्यावहारिक राहावे
लागते. मुले, नातेवाईक यांचे समाधान होणे
महत्त्वाचे असते. संपत्तीची वाटणी व्यवस्थित व्हायला हवी.
अनेक वृद्ध मुले,कुटुंब यांच्यामुळे पुनर्विवाह
करत नाहीत. जर मुलांनी दुसर्या लग्नाला
साथ दिली नाही तर त्यांना निर्णय घ्यायला आणि पुढे पाऊल टाकायला अवघड जाते.
प्रत्येकाला एकच काळजी असते,लोक काय म्हणतील?
वयस्क मुलांचे इन-लॉज काय म्हणतील? मुलांना आणखी एक नेहमी भिती वाटत असते, ती म्हणजे पैसे
किंवा एसेट्समधील त्यांचा हिस्सा कमी होईल.
यातून काही फायदेही आहेत. सिनिरर्सच्या विवाहामुळे काही चिंता आणि भेदभाव यांना
पूर्णविराम मिळतो. उदाहरणच द्यायचे म्हटले तर सिनिरर्स जातीधर्माला
आनंदाने निरोप देतात. जन्मपत्रिकेचा इथे संबंध येत नाही.
विवाह समारंभदेखील साधेपणाने आणि कमी खर्चात होतात. अलिकडील काही लग्नाची उदाहरणे पाहिली तर आजची पिढी अशा लग्नाला स्वीकारताना
दिसत आहे. काही मुलं आपल्या पालकांसाठी जोडीदार निवडण्यामागेही
आपली महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतात. मुलं फुल टाइम कामात
असतात किंवा दुसर्या शहरांमध्ये राहत असतात.त्यामुळे ही मंडळी आपल्या पालकांची सेवा करण्यास असमर्थ असतात. अर्थात हेही निश्चित की, दुसरे
लग्न करताना निर्णय घेणं कठीण जातं. घटस्फोटीत प्रकरण असेल तर
त्यामागची भूमिका जाणून घ्यायला वेळ लागतो. काही अशा लग्नांचा
अंतदेखील ब्रेकअपमध्ये होतो. सामाजिक जीवनात काहीच निश्चित नाही. पण जर दोन लोकांमध्ये लग्नामुळे कंपेनियनशिप.
आनंद आणि समाधान आयुष्याच्या उतरंडीच्या काळात मिळत असेल तर मग त्यांनी लग्न का
करू नये?
No comments:
Post a Comment