Sunday, July 22, 2018

नवरा मुलगा डोप टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच होणार लग्न!


     आजकालची तरुण पोरं फक्त पायातले बघताना दिसत आहेत. दूरचे पाहायचं त्यांनी सोडून दिलं आहे. अजून आयुष्य इतकं पडलेलं असतानाही त्याची चिंता त्यांना पडलेली दिसत नाही. नशापान करणे, गुंडागर्दी करणे यातच ही मंडळी मश्गुल आहेत. ध्येय नावाची चीज यांच्या डोक्यात शिरलेली नाही. खाणे-पिणे ऐश करणे, यालाच त्यांनी ध्येय समजून नालायकी जीवन जगत आहेत. यांना ना नोकरी, ना छोकरी, अशी गत झाली असल्याने यामुळे याचा मोठा दुष्परिणाम समाजावर होत आहे. समाज दुषित होत चालला आहे. मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांची छेड काढणे, अत्याचार करणे असे प्रकार वाढू लागले आहेत. सध्या तरुण वर्गाकडून होत असलेले गुन्हे हे फक्त आणि फक्त नशाखोरीमुळे वाढले आहेत. पुढारी लोकांची साथ अशा लोकांना त्यांच्या स्वार्थामुळे मिळत असल्याने या देशातल्या तरुणांचे काय होणार असा प्रश्न सुज्ञ लोकांना सतावत आहे.

     पंजाब आणि हरियाणा राज्यात सर्वाधिक नशेबाज असल्याचे नुकतेच एका अभ्यासात आढळून आले आहे. अन्य राज्यांमध्येही सर्व काही सुरळित आहे, असे नाही. सर्वच राज्यांमध्ये नशाखोरी बोकाळलेली आहे,मात्र या दोन राज्यांमध्ये जरा अतीच आहे. काँग्रेस नशाखोरी बंद करू असे आश्वासन देत पंजाबमध्ये सत्तेवर आली असली तरी ती नष्ट करणे किती मोठे कठीण आहे, याची कल्पना त्यांना आली आहे. अर्थात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता वेगळी योजना राबवण्याचा विचार या राज्यांमध्ये सुरू आहे. त्यातल्या त्यात चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशात तर फारच वेगळा विचार अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लग्नाअगोदर मुलाची डोप टेस्ट (नशेची तपासणी) करण्याची योजना बनवण्यात आली असून जर नवरा मुलगा या तपासणीला होकार देत असेल तर त्याची चाचणी करण्यात येईल. यासाठी डोप टेस्टसाठी सरकार उपलब्ध करून देणार आहे. यात नवरा मुलगा पास झाला तरच मुलगी त्याला पसंद करू शकते.
     पोलिस अधिकार्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. ही योजना राबवल्यास नशाखोरी थांबवण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल असेल, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने मान्य केले आहे की, बहुतांश कौटुंबिक कलहाचे कारण नवर्याची नशाखोरी आहे. यामुळेच घरात भांडणे, बायकांना मारहाण करणे, घरादाराचे नुकसान करणे, असे प्रकार होत आहेत. जर नवर्याची नशा तपासणी करण्याची व्यवस्था सरकारने केल्यास चंदीगढ हा देशातला पहिला प्रदेश असणार आहे. या केंद्रशासित प्रदेशानंतर दोन्ही राज्यात ही योजना राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारच्या एका अभ्यासानुसार चंदीगढसह पंजाबमध्ये जवळपास 9 लाख नशेखोर युवकांचा समावेश आहे. यांची वये ही साधारणत: 15 ते 35 च्या दरम्यान आहेत. यातले बहुतांश युवक ( 53 टक्के) हेरॉईनसारख्या नशेच्या पदार्थाचे सेवन करतात. या नव्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे नशापान करणार्या नवर्या मुलास लग्नास नकार देण्याचा अधिकार मुलींना मिळणार आहे. कुठल्याही मुलीला आपला नवरा दारुडा, नशा करणारा नको असतो. त्यामुळे मुलींच्या मनाविरुद्ध काही घडणार नाही.
     तरुणांच्या नशाखोरीला खरे तर पायबंद घालणे फार आवश्यक आहे. यामुळे तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातले तरुण बरबाद होताना दिसत आहेत. परिणाम आपला देश महासत्ता कसा बनू शकतो, असा प्रश्न आहे. देशात सामाजिक मूल्यांचा र्हास होत असून आपला देश मूल्यांची रुजवण करायला कमी पडत आहे. राज्याराज्यांमधील आणि देशातला शिक्षण विभाग यासाठी प्रयत्न करीत असला तरी ज्या वयात मुलांना याची गरज आहे, तिथे कुठेच मूल्यांची शिकवण दिसून येत नाही. याला खरे तर शासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया, शिक्षण संस्था कारणीभूत आहेत. आपल्या देशातल्या शिक्षणाकडे उद्योजक, व्यावसायिक बनवणारे युवक बनवण्याचा अभ्यासक्रम नाही. संशोधक तर आता बनतच नाहीत. तशी गुंतवणूक, व्यवस्था नाही. प्रसारमाध्यमेदेखील स्वत:च्या स्वार्थाखेरीज दुसरे काही दाखवण्याच्या मनस्थितीत नाही. ही प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्यासाठी गुन्हेगार आणि गुन्हेविषयक बातम्यांना अधिक स्थान देताना दिसत आहेत. वास्तविक सरकारने प्रसारमाध्यमांना काही नियम घालून देण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा घटक असला तरी त्याला काही मर्यादा आहेत, आचारसंहिता आहे. विधायक बातम्यांना, मूल्याधारित बातम्यांना अधिकाधिक स्थान देणार्या आणि त्यावर चर्चा घडवून आणणार्या प्रसारमाध्यमांना सरकारी जाहिराती व अन्य सोयीसुविधा देण्याचा विचार करायला हवा.
     आपल्या देशात राजकारणावर फार बोलले,लिहिले आणि दाखवले जाते. विज्ञान, टेक्नॉलॉजी या गोष्टींवर फारच कमी चर्चा होताना दिसते. अन्य देशात याच्या उलट परिस्थिती आहे. अन्य देश मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्यादृष्टीने हालचाल करत आहे. नवे तंत्रज्ञान शेतीसह सर्व क्षेत्रात आणले जात आहे आणि उत्पादन वाढवले जात आहे. आपल्याकडे राजकारण आणि अंधश्रद्धा कशी पसरवता येईल, अशा आधारावरच स्टोर्या बनवल्या जात आहेत. राजकारणावर आणि त्यांनी केलेल्या स्टंटबाजीवर अधिक वेळ खर्च करण्यापेक्षा प्रसारमाध्यमांनी युवकांना संशोधन,उद्योग,शेतीपुरक व्यवसाय यांच्या यशकथा यांचा भडिमार करण्याची आवश्यकता आहे. आपला देश तरुणांचा देश आहे. चीन-जपानसारखे देश म्हातारे होत चालले आहेत. याठिकाणी तरुणांची आवश्यकता आहे. आपले तरुण ही कसर भरून काढू शकतात, मात्र आमची ही पिढी नशाखोरीत बरबाद होत चालली आहे. वास्तविक आपल्या देशाकडून म्हणजेच सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून ही संधी तरुणांना परदेश नोकरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या रोजगाराच्या वाटांवर अधिक फोकस दिला जायला हवा आहे. आपल्या देशातल्या तरुणांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न झाला तरच देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहात आहोत, ते साकार होणार आहे.

No comments:

Post a Comment