Thursday, July 19, 2018

(बालकथा) गर्दीने भरलेले आकाश


     जून 2099 ची ही सकाळ फार उष्ण होती. निळाशार आकाशात तरंगणारे विशेष प्रकारच्या पदार्थांपासून बनवलेले नारंगी ढग हवा फिल्टर करत होते. आकाशात काही उंचीवर ड्रोन तथा डिस्कसारखी स्वयंचलित वाहने फिरत होती. यांमध्ये काही लोक कंबरेला आंटी ग्रेविटी बेल्ट बांधून उडत होते. पृथ्वीवर तर जागाच शिल्लक उरलेली नव्हती, त्यामुळे बहुतांशी ट्रॉफिक आकाश मार्गानेच चालू होते.
शंभराव्या मजल्यावरील आपल्या एका छोट्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभी असलेली शुभी कसल्याशा विचारात बुडाली होती. खरं तर तिला जॉगिंग करायचं होतं,पण ती तिचा व्हर्चुअल रियलिटी डिवाइस कोठे तरी ठेवून विसरून गेली होती.
आई!” तिने आवाज दिला.

तू पुन्हा विसरलीस का? तरी बरं, घरातल्या सगळ्या वस्तू कॉम्प्युटराइजड आहेत.” असे म्हणत शुभीच्या आईने मनगटावरच्या स्मार्टफोनवर कसली तरी कमांड दिली. लगेच बीप बीप असा मोठा आवाज शुभीच्या खोलीतून ऐकायला येऊ लागला.
जा, त्याचे लोकेशन तुझ्या उशीखाली दाखवतेय.”
शुभी धावतच आत गेली आणि तिच्या उशीखालचे हेअरबँडसारखे डिवाइस उचलले. बाल्कनीत येऊन तिने डोक्याला फिड केले.
डिवाइस ऑन.” असे म्हणताच भोवतालचे वातावरण एकदम बदलून गेले. गर्दीने भरलेल्या आकाशाच्या ठिकाणी आता हिरवीगार बाग अवतरली. तिथे रंगीबेरंगी फुले, छान छान फुलपाखरे आणि सुंदर पाण्याचे कारंजे दिसत होते. फुलांतून निघणारी मंद सुगंधी हवा नाकाला आल्हाददायक वाटत होती. पायांत जाणवणार्या हिरव्या गालिच्यासारख्या गवतावर जॉगिंग करायला शुभीला चांगलीच मजा येत होती.
शुभी, मी कामावर चाललेय. तू नाष्टा करून अभ्यासाला बस.”  कंबरेला एंटी ग्रेविटी बेल्ट लावले होते. अंगावरच्या ड्रेसवर ती सुंदरसे जॅकेट कसून बांधत होती. खरे तर हे विशेष प्रकारचे थर्माकंट्रोल जॅकेट होते. यात असलेली बॅटरी आणि आतल्या बाजूला पसरलेल्या पातळ तारेच्या जाळीमुळे आतले तापमान नियंत्रित केले जाऊ शकत होते. हे जॅकेट शरीराला एसीप्रमाणे थंड आणि हिटरसारखी उष्णता देऊ शकत होते.पंखे, कूलर,एसी, हीटर आणि रजई-कांबळ यांचा जमाना कधीचा सरला होता. आईने शुभीच्या मस्तकाला आपल्या ओठाने स्पर्श केला आणि बाल्कनीतल्या टेक ऑफ पॉइंटवरून उड्डाण केले.
शुभीला या खेपेला उन्हाळ्याच्या सुट्टीत चंद्रावर फिरायला जायचं होतं. आई परत आल्यावर आपला बेत सांगायचा, असा विचार करून तिने खोलीतल्या स्क्रीनसारख्या भिंतीवर न्यूज चॅनेल लावले.
स्क्रीनवर दाखवले जात होते की, पृथ्वीच्या पहिल्या ग्लोब कमांडरची निवड झाली होती. आता ते शपथग्रहणासाठी ग्लोब सेंटरच्या भव्य इमारतीच्या दिशेने निघणार होते. पृथ्वीवरच्या फ्रान्स, अमेरिका, रशिया, ब्रिटेन, भारत आणि चीन या प्रमुख सहा फारबिक देशांबरोबरच अन्य देशांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. सहा प्रमुख देशांच्या समुहाला फारबिक म्हटले जात होते. ग्लोबल वार्मिंग, पॉप्युलेशन बॉम्ब, आतंकवाद यासारख्या आव्हानांचा निपटारा करण्यासाठी या फाबरिक देशांनी मिळून एका संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा प्रमुख म्हणून ग्लोब कमांडरची निवड केली गेली होती.
जरा, माझं ऐक.” कुणी तरी शुभीच्या कानाजवळ येऊन पुटपुटलं. तिने चमकून मागे पाहिलं. मोठ्या मोठ्या हिरव्या डोळ्यांची एक सुंदर मुलगी तिच्याजवळ उभी होती. ती कुठल्या तरी होलोग्राम इमेजसारखी दिसत होती. तिने शरीराला चिकटलेला शानदार पोशाख परिधान केला होता. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर आणि इंडिकेटर चमकत होते.
कोण आहेस तू? कोणी एलियन आहेस का? आणि इथे का आलीस?”शुभीने विचारले.
 अगं, नाही! मी रोमा. तुझ्यासारखी मनुष्यच आहे. भविष्यकाळातून आली आहे. मला तू भविष्ययात्री म्हणू शकतेस.”
तू इथे का आली आहेस?” शुभीला थोडं थोडं लक्षात येत होतं.
पृथ्वीचा सर्वनाश थांबवण्यासाठी!”
काय म्हणालीस?” ऐकून शुभीला शुद्ध हरपल्यासारखे झाले.
खरे तर मी प्राचीन इतिहासावर पुस्तक लिहितेय. या संदर्भात मी पृथ्वीवरच्या विशिष्ट लोकांच्या मुलाखती घ्यायला आले होते.”
मुलाखत, आणि भूतकाळातल्या लोकांची?” शुभीला काही अर्थबोध झाला नाही.
बघ, हा थॉट स्कॅनर आहे.एकविसाव्या शतकातील प्रज्ञावंत व्यक्ती इयोन रस्क यांच्या न्यूरालिंक प्रोजेक्टची कमाल!  याच्याने लोकांचे विचार वाचले जाऊ शकतात. आम्ही आमच्या प्रश्नांची यादी तयार करतो आणि लोकांचा मेंदू वाचून त्यांचे उत्तर समजून घेतो. मी आताच पहिल्या ग्लोब कमांडरची मुलाखत घेऊन आलेय. असं कळलंय की, तो सरफिरा आतंकवादी आहे, जो संपूर्ण पृथ्वी नष्ट करायला निघाला आहे. तो खूप आनंदी आहे,कारण लवकरच त्याला ही संधी उपलब्ध होणार आहे.” रोमा काळजीच्या स्वरात म्हणाली.
शुभीला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पदाची शपथ घेतल्यावर ग्लोब कमांडरला अणूशस्त्रास्त्रांच्या कंट्रोल बटनाचा कोड सोपवला जाणार होता.
 म्हणजे हे जग काही क्षणात नष्ट होणार आहे?” असा विचार करत शुभीने शपथ घ्यायला निघालेल्या ग्लोब कमांडरकडे पाहिले. त्याच्या डाव्या कानावर छोटीसी मस दिसत होती. पण मागच्या काही दृश्यांमध्ये हे नव्हते. काही तरी गडबड होती.
माझी आई ग्लोब कमांडरच्या सुरक्षा यंत्रणेची चीफ कमांडो आहे. ती नक्कीच काही तरी करू शकते.” असा विचारत करतच तिने कापर्या हाताने आईला मनगटावरच्या स्मार्टफोनद्वारा संपर्क साधला. तिला सगळा प्रकार सांगितला.
लगेचच ग्लोब सेंटरवर गोंधळ उडाल्याचे दिसत होते. ग्लोब कमांडरला तिथून हटवण्यात आले आणि लागलीच गुप्त ठिकाणी  स्थानबद्ध करण्यात आले. शपथग्रहण सोहळा स्थगित करून शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आले.
तुला ही गोष्ट माझ्या अगोदर माझ्या आईला सांगायला हवी होती.” शुभी अजूनदेखील गोंधळलेलीच होती.
मी प्रयत्न केला,पण त्या ऐकू शकल्या नाहीत. सगळेच काही आमचे सिग्नल पकडू शकत नाहीत. पण तू ते संकेत पकडलेस.” असे म्हणून रोमा हसली.
काही तासांनी शुभी डायनिंग टेबलवर बसून बाबांनी बनवलेला रुचकर पास्ता मोठ्या चवीने खात होती.
तो कुणी तरी हमशकल बहुरुपी होता, ज्याने खर्या ग्लोब कमांडरची जागा घेतली होती.” आई सांगत होती. “वास्तविक, शपथग्रहणापूर्वी ग्लोब कमांडर वॉशरूममध्ये गेले होते. तिथे केयर टेकरच्या वेशात तो बहुरुपी उपस्थित होता. त्याने ग्लोब कमांडर यांना बेशुद्ध केले. आणि त्यांचा वेश परिधान करून बाहेर आला. अणुशस्त्रास्त्रांचा कमांड कोड मिळताच तो मोठा धमाका करणार होता. तो पकडला गेला. आता सर्व काही ठीक आहे.”
अचानक खोलीतल्या स्क्रीन- वॉलवर खर्या ग्लोब कमांडरचा हसरा चेहरा दिसू लागला. ते म्हणत होते, “आम्हां सर्वांना तुझा अभिमान आहे, शुभी. एका भव्यदिव्य समारंभात तुला सन्मानित करण्याबरोबरच चांद्रसहलीचे बक्षीसही दिले जाणार आहे.”
व्वा! मुलगी असावी तर अशी!”  आई-वडिल आनंदाने एकदम ओरडले. मनातल्या मनात रोमाला धन्यवाद देत शुभी उठून उभी राहिली. तिला आता चांद्रसहलीची तयारीसुद्धा करायची होती. (मूळ हिंदी लेखिका-कल्पना कुलश्रेष्ठ) अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment