(मच्छिंद्र ऐनापुरे)
जत तालुक्याच्या एका कोपर्यातून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णेचं पाणी सांगोल्याकडं
जातंय. 120 गावे आणि 350 वाड्या-वस्त्यांच्या या तालुक्यातील जेमतेम दहा-बारा गावांना
कृष्णेचं पाणी पोहचलं आहे. या गावांचं अर्थकारण बदललं आहे.
आता या परिसरातले शेतकरी ऊस,द्राक्षे, डाळिंब ही पीकं घेतली जात आहेत. जनावरांची संख्या वाढून
दुधाचे प्रमाणही वाढलं आहे. शेतकर्यांकडे
आर्थिक सुबत्ता येऊ लागली आहे. पण बाकीच्या गावांचं काय?
या गावांना कृष्णेचं पाणी कधी मिळणार आणि इथे सुबत्ता कधी नांदणार?
परवा सांगली जिल्ह्यातल्या टेंभू योजनेला भरघोष मदत विधानसभेत जाहीर
करण्यात आली आहे. पण या ठिकाणी जतच्या वाट्याला काहीच आल्याचं
आढळून आलं नाही. जेमतेम साडेचारशे मिलिमीटर पर्ज्यनमान असलेल्या
तालुक्याचं अर्थकारण दुष्काळ असतानाही शेतीभोवतीच फिरत आहे. कारण
या ठिकाणी कोणताही उद्योग किंवा कारखानदारी नाही. त्यामुळे इथले
कुशल आणि अकुशल मनुष्यबळ स्थलांतर करत असते. कृष्णेचं पाणी कधी
तालुक्यातून खळाळणार आणि शेतकर्यांमध्ये आर्थिक सुबत्ता कधी
येणार, असा प्रश्न तब्बल गेली पन्नास वर्षे
विचारला जात आहे. आता पुन्हा तोच प्रश्न इथल्या सर्वांच्या तोंडी आहे.
आधुनिक शेती करण्याशिवाय पर्याय नाही, अशी दृढता आपल्या शेतकर्यांमध्ये
आली असल्याने ठिबक-तुषार सिंचनाचा वापर करत शेतकरी द्राक्षे,
डाळिंब पिके घेऊन बागायतदार बनू लागला आहे. मात्र
याला कधी सुक्या दुष्काळाचा आणि दराचा फटका वारंवार बसत आला आहे, त्यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकरी वर यायला तयार नाही. पाण्यासाठी आंदोलने झाली, महाराष्ट्र सोडून कर्नाटकात
जाण्याची भाषा झाली.पण त्याचा उपयोग होताना दिसत नाही.
पाणी येईल, चर्चा सुरू आहे, अमुक एवढा निधी आला आहे. आता पाणी शिवारात खळाळणार,
अशा बातम्याच तेवढ्या ऐकायला आणि वाचायला मिळत आहेत. प्रत्यक्षात पाण्याचा पत्ताच नाही. पाणी पाणी असा टाहो
फोडत दोन पिढ्या गेल्या आहेत, तरीही कृष्णेचे पाणी येतच आहे.
अजून किती पिढ्या घालवाव्या लागणार, असा प्रश्नच आहे.
निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी ज्वारीचे
पीक मोठ्या प्रमाणात घेत आहे. इथली ज्वारी रुचकर
आहे.त्यामुळे पुण्या-मुंबईकडून या ज्वारीला
मागणी आहे.पण दर मिळत नाही. पाणी नसल्याने
इथल्या शेतकर्यांना ज्वारीशिवाय पर्याय नाही. 2 लाख 25 हजार 828 हेक्टर क्षेत्र
असलेल्या तालुक्यात लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 34 हजार 353 हेक्टर आहे. यातले खरिपाचे
क्षेत्र 45 हजार 100 हेक्टर आणि रब्बीचे
क्षेत्र 82 हजार 600 हेक्टर इतके आहे.
पैकी तब्बल 84 हजार हेक्टरवर ज्वारीचे पीक घेतले
जाते. त्यानंतर बाजरीचा क्रमांक लागतो. बाजरी 30 हजार हेक्टरवर तर त्याखालोखाल मका 5
हजार 726 हेक्टरवर घेतला जातो.
कडधान्यांमध्ये भुईमूग (2 हजार 500 हेक्टर),उडीद (3 हजार), सूर्यफूल
(2 हजार 200), मटकी (6 हजार
288) आणि तूर (5 हजार 540) घेतली जाते. डाळिंबाचे आगार समजल्या जाणार्या तालुक्यात द्राक्षपिकाचे क्षेत्र वाढू लागले आहे. ठिबकवर इथल्या पोषक जमिनीवर द्राक्षे पीक वाढत असून सध्या 6 हजार 200 हेक्टरवर घेतले जात आहे. डाळिंब 4 हजार 200 हेक्टरवर घेतले
जाते. विशेष म्हणजे यंदा प्रथम ऊसाची लागवड दुप्पट झाली आहे.
याशिवाय आंबा, चिकू, बोर
यांच्या बागाही काही प्रमाणात आहेत.पाऊसमान गेल्यावर्षी समाधानकारक
झाल्याने हा फरक आपल्याला दिसत आहे.
शेती ही जरी पावसाच्या पाण्यावर असली
तरी आणि त्यातून फायदा होवो अथवा न होवो,पण
शेतकर्यांना खरा हातभार लावत आहे, तो पशुधन
आणि दूधाचा व्यवसाय. माडग्याळ मेंढी आणि मटणासाठी येथील बोकडांना
मोठी मागणी आहे. जत आणि माडग्याळ येथे जनावरांचा मोठा आठवडी बाजार
भरतो. मोठी उलाढाल होत असते. कोल्हापूर,इचलकरंजी, इस्लामपूर, सातारा यांसह
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मांसासाठी बोकडांना मोठी मागणी आहे. याचा फायदा इथल्या शेतकर्यांना आणखी व्हावा,
यासाठी अशोक शिंदे यांनी मांस प्रक्रिया उद्योग याठिकाणी व्हावा,
अशी मागणी उचलून धरली होती,पण ती प्रत्यक्षात उतरू
शकली नाही. शासनाने याकडे लक्ष दिल्यास हा व्यवसाय भरभराटीला
येऊ शकतो. यानंतर दूध संकलनही मोठ्या होत आहे. म्हैशींबरोबरच जर्शी, गीर जातीच्या गाईंचे प्रकल्प वाढत
आहेत. जत तालुक्यात दूध संघ नाहीत,पण वारणा,वसंतदादा, राजारामबापू, चितळे,
सोलापूरचे काही दूधसंघ येथून दूध संकलन करत आहेत. काही दूध संघ जनावरांच्या संख्यात्मक वाढीसाठी अर्थसहाय्य करत आहेत.
अर्थात अलिकडच्या काळात नवी पिढी बाहेरील पाण्याची वाट न पाहता जिद्द,परिश्रम आणि काटकसरीने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करत आहे. आणि त्यांना यशही मिळत आहे. ड्रॅगनसारखे फळही घेतले जात
आहे. 800 हेक्टरच्या आसपास याची शेती आहे. शेतकर्यांना अर्थकारण कळले असले तरी पाणी या महत्त्वाच्या
घटकाची आस त्यांना लागून राहिली आहे. बँका, पतसंस्था, सोसायट्या याम्च्या माध्यमातून शेतकरी आपली
आर्थिक उन्नती करून घेत आहे. जत तालुक्यातल्या बँका आणि पतसंस्थांचे
व्यवहार काही अपवाद सोडले तर चांगल्या प्रकारे सुरू आहेत.
तालुक्यातील सहकारी संस्था
सोसायट्या- 82
पतसंस्था-65
औद्योगिक संस्था-13
मजूर सोसायट्या- 32
पगारदार संस्था-6
गृहनिर्माण संस्था-12
खरेदी-विक्री संघ-1
बँका- 1 जत अर्बन आणि इतर 9 राष्ट्रीयकृत बँका
No comments:
Post a Comment