अमरबनातल्या एका वडाच्या झाडावर गौरी
चिमणी तिच्या आई-बाबांसोबत राहत होती.
गौरी फारच चंचल होती. दिवसभर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दंगा-मस्ती करायची. खेळायची-बागडायची. अभ्यासातही जाम
हुशार होती. शिवाय
बनात कुठलीही स्पर्धा असो,तिला कुठलं ना
कुठलं बक्षीस ठरलेलं असे. उंच उडण्याचा स्पर्धेत तर तिचा कुणीच
हात धरू शकत नसे.
गौरीला ढगांचा भारी नाद. त्यांच्याशी खेळायला आणि गप्पा मारायला तिला फार आवडे.
एके दिवशी तिला अशीच लहर आली, चला , आज ढगांची सहल करू. मग काय, आले
गौरीच्या मना,तिथे कुणाचे चालेना. मैत्रिणींना
तर उंच उडण्याची भिती. त्यांनी स्पष्ट नकार दिला. निघाली गौरी एकटीच. भूरभूर नावाचा ढग तिला वरती येताना
पाहात होता. ती जवळ आल्यावर त्याने तिचे जोरदार स्वागत केले.
“ काय कमालीच उडतेस. आमच्या राज्यात ना आजपर्यंत
एकही चिमणी आलेली नाही.तू पहिलीच आहेस.” ती तिच्या या कामगिरीवर जाम खूश होती.
दोघांची गट्टी जमायला वेळ लागला नाही. दोघांनी पकडा-पकडीचा खेळ सुरू केला.
ढगाला तिच्यासोबत खेळायला खूप मजा येत होती. तो
तिला खांद्यावर बसवून खूप उंच घेऊन जायचा,पुन्हा खाली आणायचा.
ते दोघे खेळण्यात इतके दंग झाले होते की, गौरीला
वेळेचे भानच राहिले नाही. अंधार दाटून येऊ लागला, तशी ती भानावर आली. घरची आठवण सतावू लागली. घरचे तिचे सगळेजण वाट पाहात असतील, याची जाणीव झाल्यावर
ती बिथरली. भूरभूरचा निरोप घेऊन जाऊ लागली. पण काय? तिला उडताच येईना. भूरभूरसोबत
खेळताना तिचे पंख भिजले होते. पंख जड झाले होते. गौरीला काळजी वाटू लागली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू
लागले.
भूरभूरला तिच्या डोळ्यांत पाणी पाहावलं
नाही. म्हणाला, “ काळजी करू नकोस,गौरी! उद्या तुझे पंख सुकतील तेव्हा जा. आज आमच्याकडेच राहा. माझ्या आईला तुला पाहून फार आनंद
होईल.” गौरी उदासपणे
म्हणाली,“ मी घरी गेले नाही तर सगळे माझी काळजी करतील.
मला सगळीकडे शोधतील. बिचारे! रात्रभर झोपणारसुद्धा नाहीत.मला कसल्याही परिस्थिती घरी
जावं लागेल.”
भूरभूरला गौरीची अडचण लक्षात आली. म्हणाला,“ थांब! मी आईला सांगून येतो आणि तुला सोडायला येतो.” भूरभूरला
सांगून यायला वेळ लागला नाही. मग गौरी भूरभूरच्या पाठीवर बसून
म्हणाली, “ हं चल, लवकर.पुन्हा तुला माघारी यावं लागणार आहे.”
भूरभूर उडाला. “ आता तू तुझ्या घराचा रस्ता दाखवत राहा. मी कधी इतका खाली आलेलो नाही.”
गडद अंधार पसरल्याने गौरीलाही काहीच दिसेना. तीही येडबडली. यापूर्वी कधी ती इतक्या रात्री घरट्यातून
बाहेर आलेली नव्हती.
“गौरी...गौरी...”
इतक्यात कुणाचा तरी गोड आवाज
कानांवर पडला. तेवढ्यात तिला तिच्या झाडाजवळ राहणारा चमचम काजवा
दृष्टीस पडला. त्याला पाहिल्यावर गौरीचा जीव भांड्यात पडला.
ती चमचमला म्हणाली, “ जरा पुढे हो आणि भूरभूरला
आपल्या घराचा रस्ता दाखव.”
चमचम म्हणाला,“ अगं, मी तुलाच शोधायला निघालो
होतो. तू परत न आल्याने तुझ्या घरातले सगळे काळजीत आहेत.”
थोड्याच वेळात गौरी घरी पोहचली. तिला पाहिल्यावर
सगळ्यांच्या जीवात जीव आला.
गौरीने भूरभूरची ओळख करून दिली आणि सगळे
सांगितले. सगळ्यांनी भूरभूरला मनापासून धन्यवाद दिले. भूरभूर म्हणाला,“ यात कसले धन्यवाद? मला माझे मैत्रीचे कर्तव्य पार पाडावेच लागणार होते.”
गौरी म्हणाली, “ आता पुढच्या वेळेला ना, माझ्या मैत्रिणींनाही तुझ्याकडे घेऊन येईन. त्यांना उंच
भरारी कशी घ्यायची,याचे धडे देईन. आपण सर्वजण
खूप खेळू, खूप मजा करू. आणि महत्त्वाचे
म्हणजे सूर्यदादाच्या किरणांनी आमचे पंख सुकवून लवकर माघारी येऊ.”
बाबांनी गौरीला प्रेमाने जवळ घेतले आणि
म्हणाले,“आमची गौरी, फार धाडसी आणि समजूतदार
आहे. आपल्या चुकांतून शिकते पण कशाला भित नाही.” मग सर्वांनी भूरभूरला निरोप दिला आणि पुन्हा भेटण्याचे वचन दिले.
No comments:
Post a Comment