Saturday, July 7, 2018

देशाला अभिमान वाटला पाहिजे


     आफशां आशिक काश्मिर फुटबॉल महिला संघाची कॅप्टन आहे. तिची धडपड भारतीय संघात जाण्याची आहे. त्यासाठी ती जीवतोड मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत ती पोलिसांवर दगडफेक करताना सापडली. तिच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. तिच्याविषयी माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगली.पण तिने त्यामागचे वास्तव स्पष्टीकरण दिल्याने तिला जीवदान मिळाले. तिला देशाला अतुलनीय यश मिळवून द्यायचे आहे. आपला देशाला अभिमान वाटला पाहिजे, अशी तिला कामगिरी करायची आहे. अशा या जम्मू आणि काश्मिर राज्याच्या महिला फुटबॉलपटू आफशां आशिकची कहानी तिच्याच शब्दांत...

   
 मी मोठ्या कुटुंबात वाढलेली. सुरुवातीपासूनच कुटुंबात पारंपारिक विचारांचा पगडा होता. मुलींना शाळेला जायची परवानगी होती,परंतु घरातल्या बाकीच्या स्त्रियांप्रमाणे त्यांनाही पडद्यात राहण्याच्या सूचना होत्या. असे असले तरी उद्योगपती असलेल्या वडिलांनी कधीच आम्हाला धाकात ठेवले नाही. मी लहानाची मोठी होत असताना घरातल्या मोठ्या किंवा वृद्ध स्त्रियांना पडद्यामध्येच पाहिले आहे. घरातल्या निर्णयांवर पुरुषांची मक्तेदारी ही सामान्य गोष्ट होती. यावरून कधी महिलांनी आवाज उठवला नाही. शेजारच्या,नातेवाईकांमधल्या मुली शाळेला तर जात होत्या,पण त्यांना नोकरी वगैरे करताना काही पाहिले नाही. मी मात्र यांच्यापेक्षा वेगळी होते. शाळेमध्ये असतानाच मला फुटबॉल खेळण्याचा छंद जडला होता. मी शाळेच्या संघातून खेळत होते. घरच्यांना कळल्यावर ते नाराज झाले. या अगोदर आमच्या खानदानात कधी कुठल्या मुलीने खेळात रुची दाखवली नव्हती.
     माझ्या घरच्यांचे मत होते की, मुलीने शिकावं आणि लग्न करून आपलं घर सांभाळावं. आमच्या घरच्यांना समाजाची फार मोठी भीती होती. लोकांना कळलं तर काय म्हणतील? मुलींनी मुलांचे कपडे घालून बिनधास्त खेळावं, यावर लोकांचा आक्षेप होता. मला मात्र हे आवडलं नाही. मी ठरवलं होतं की, आपण फुटबॉलपटू व्हावं. आपल्या मुलीने फुटबॉलपटू व्हावं, हे वडिलांनाही रुचलं नव्हतं.भाऊदेखील नाराज होते. पण माझा हट्ट कायम होता. शेवटी घरच्यांना माझ्या आग्रहापुढे नमते घ्यावे लागले. त्यांनी परवानगी दिली. पण ज्याची भीती होती, तेच घडले. शेजारी-पाजारी वडिलांना आणि भावांना टोमणे मारू लागले. मी खेळू लागल्यावर भावांना लोक चिडवायचे. ते घरात रागराग करायचे. लोकांच्या बोलण्याने त्यांना शरमल्यासारखं व्हायचं.
     मला सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. घरातले नाराज होते. पण ज्यावेळेला माझी राज्याच्या संघात निवड झाली, त्यावेळेला मात्र घरच्यांचा दृष्टीकोन बदलला. मीदेखील काही कच्च्या गुरुची चेली नव्हते. मी एकापेक्षा एक सामने जिंकत होते. एवढेच नाही तर माझ्या खेळामुळे अल्पावधीतच मी जम्मू-काश्मिर राज्य संघाची कॅप्टन म्हणून निवडले गेले होते. पदके  जिंकून आणू लागल्यावर माझे कौतुक व्हायला लागले. घरच्यांना माझ्या वागण्यात काहीच वावगे वाटले नाही. आता तर घरचे सर्व माझा मनोधैय वाढवण्याचाच प्रयत्न करतात.
माझे करिअर मस्त चालले होते. मला देशाच्या संघात स्थान मिळवायचे होते. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. आणि अचानक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. 24 एप्रिल 2016 चा तो दिवस. तेव्हा मी काश्मिर वूमन कॉलेजमध्ये बी..च्या दुसर्या वर्षाला शिकत होते. त्यादिवशी मी आणि माझ्या मैत्रिणी कॉलेजमधून स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या दिशेने निघाले होते. कॉम्प्लेक्स कॉलेजपासून काही अंतरावरच होते. त्यामुळे आम्ही पायीच निघालो होतो. वाटेत पोलिसांविरोधात आंदोलन सुरू होते. पोलिस गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. समोरची गर्दी पाहून मी कॉम्प्लेक्सला दुसर्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. अचानक आंदोलक नियंत्रणाबाहेर गेले. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
     या दरम्यान लोक पोलिसांवर दगडफेक करू लागले. सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. आंदोलकांना वाटले की, पोलिस त्यांची मुस्कटदाबी करत आहेत. संतापाने मी आणि मैत्रिणींनी हातात दगड घेतले. दुसर्यादिवशी सकाळी वृत्तपत्रांत पोलिसांवर दगडफेक करणार्या मुलींचे फोटो झळकले. यात प्रामुख्याने माझेच छायाचित्र स्पष्टपणे दिसत होते. अचानक जीवन बदलले. लोक आता मला फुटबॉलपटू ऐवजी दगडफेकू म्हणू लागले. ही माझी नवी ओळख होती. लोक मात्र काहीही बोलत होते. घरातले लोक याला त्रासलेले होते. यामुळे त्यांची बदनामी होऊ लागली.
     या घटनेच्यानिमित्ताने आणखी एक बाजू समोर आली होती. प्रारंभी जम्मू-काश्मिरमध्ये महिला फुटबॉल खेळाविषयी फारशी जागरुकता नव्हती. फारच कमी लोक ओळखत होते की मी या राज्याच्या संघाची कॅप्टन आहे. या बातमीमुळे मला  संपूर्ण राज्यच ओळखू लागले. प्रशासनासमोर मी आणि माझ्या मैत्रिणींनी आमची बाजू पटवून दिली. आमचा उद्देश पोलिसांवर हल्ला करण्याचा नव्हताच मुळी! स्वत:ला वाचवण्यासाठी आम्ही असा प्रकार केला होता. मला मागे वळून पाहयचे नाही. मला असं काही करून दाखवायचं आहे, ज्यामुळे माझ्या देशाला माझा अभिमान वाटला पाहिजे. मला माझ्या देशासाठी मेडल जिंकायचं आहे.
     तत्कालिन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी माझी भेट घेतली आणि खेळावर लक्षकेंद्रित करण्याचा सल्ला दिला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माझ्या संघाला नवी दिल्लीला बोलावून महिला खेळाडूंच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. आमच्या राज्यात प्रतिभा भरून वाहत आहे. त्यांना फक्त एका संधीची गरज आहे. सरकारने आम्हाला आश्वासन दिले आहे, खोर्यातल्या महिला खेळाडूंसाठी आणखी सुविधा दिल्या जातील. सध्या बॉलीवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक माझ्यावर एक चित्रपट बनवतो आहे.

No comments:

Post a Comment