Monday, July 23, 2018

(लहानशी गोष्ट) जीव


     आज गंगारामला फार आनंद झाला होता.कारण त्याच्या गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला होता.
गंगाराम चाळीशी ओलांडलेला एक शेतकरी होता. त्याने लग्न केले नव्हते. तो गावातल्या लोकांनाच आपल्या घरच्यांसारखे मानायचा.  तो दिवसभर शेतात खपायचा आणि राहिलेला वेळ गाईसोबत घालवायचा. तिला हिंडवून आणायचा. चारा-पाणी करायचा. तिची जीवापाड काळजी घ्यायचा. त्याचा गाईवर खूप जीव होता. आज तर त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या आनंदातच त्याने गावभर लाडू आणि पेढे वाटले.

गंगाराम गाईचे दूध कधी विकायचा नाही. उलट गावातल्या मुलांना घरी बोलावून त्यांना दूध प्यायला द्यायचा. त्याला कबड्डीची मोठी हौस होती. रोज संध्याकाळी त्याच्या घरासमोर कबड्डीचे मैदान भरायचे.
आज गंगारामने रोजच्याप्रमाणे गाईला चारा-पाणी देऊन खुंट्याला बांधले. वासरालादेखील नेहमीप्रमाणे गाईभोवती खेळण्यासाठी मोकळे सोडले. आणि स्वत: रानात निघून गेला.
गाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर होते. त्याच्या घरामागूनच शहराच्या दिशेने जाणारा रस्ता गेला होता. त्यादिवशी वासरू खेळत-खेळत रस्त्यावर गेले. एका वेगात आलेल्या गाडीने त्याला जोराची धडक दिली आणि वासरू जागीच गतप्राण झाले.
कळल्यावर गंगाराम धावतच आला. त्याचा रक्तदाब वाढला होता. रस्त्यावर मरून पडलेले वासरू पाहून त्याचा हार्ट फेल झाला आणि तोही जागीच कोसळला. दोघांचे मृतदेह रस्त्यावरच पडले होते. संध्याकाळ होत आली होती. इकडे गाईचा जीव वरखाली होत आला होता. कारण आज ना मालक आला होता, ना तिचे वासरू.
अर्धी रात्र ओसरली. तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. तिने दाव्याला हिसडा द्यायला सुरुवात केली. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिचाही शेवट झाला. आज गंगाराम, गाय आणि वासरू या तिघांचा जीव उडाला होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
पोलिस चौकशी झाली.या चौकशीत स्पष्ट झाले की, गाडीचा ड्रायव्हर दारू प्यायला होता. पण त्याने या दारूच्या नशेत आपल्याबरोबरच आणखी दोघा जीवांचा जीव घेऊन गेला. वाहन सावकाश चालवायला हवे, हे कोण कुणाला सांगणार?

No comments:

Post a Comment