Saturday, July 7, 2018

माणूस आणि निसर्गचक्र


     माणूस प्राणी हा दिवसा काम करणारा आणि रात्री आराम करणारा आहे. पण अलिकडच्या काही वर्षात यात काही प्रमाणात बदल होत चालला आहे. माणूस रात्री एक-दोन वाजेपर्यंत जागू लागला आहे.याचा परिणाम त्याच्या सकाळी उठण्यावर होतो आहे. पहाटे उठून कामाला लागणारी माणसे आरोग्याच्यादृष्टीने फिट राहतात, असे आपण ऐकत आलो आहे. मात्र माणसाच्या या उशीरा उठण्याने त्याच्या आरोग्यावर नक्कीच विपरीत परिणाम होत असणार आहे. मुंबई,दिल्लीसारखी शहरे तर रात्रभर जागत असततात. त्यामुळे मानवाचे जीवनचक्र बदलत चालले आहे. यामागे पोटापाण्याचा प्रश्न अधिक आहे. पण आता याचाच अंगिकार प्राणी आणि पक्षी करत असल्याचे अनुभवाला येत आहे. जंगले आणि गाव-शहरे यांच्यातले अंतर आता फारसे लांब राहिलेले नाही. मानवाच्या हस्तक्षेपामुळे प्राणी,पक्षीदेखील आपली शिकार आता दिवसा नाही तर रात्री करू लागले आहेत. या अनैसर्गिक बदलाचे दुरगामी परिणाम घातक असू शकतात.

      वास्तविक, आपला अनुभव असा आहे की, प्राणी-पक्षी यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे दिवसा जागणारे आणि दुसरे रात्री जागणारे. वटवाघळे किंवा घुबड हे निशाचर आहेत. आपले भक्ष्य हे रात्री शोधतात. दिवसा हे आराम करतात. अर्थात सगळ्या पशु-पक्ष्यांना अशा वर्गीकरणामध्ये फिट बसवू शकत नाही, कारण आपल्या आजूबाजूला वावरणारे उंदीर,मांजर,कुत्रेसारखे प्राणी यांना रात्र किंवा दिवस यांचा काही फरक पडत नाही. ते आपल्याला कधीही हिंडता-फिरताना दिसतात.कधीही झोपलेली दिसतात. अर्थात कोणत्या प्राण्याची झोपण्याची-जागण्याची सवय कशी आहे, हे त्याच्या विकास क्रमाशी निगडीत आहे. तो कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या क्षमतेला सोबत घेऊन विकसित झाला आहे, यावर बरंचसं अवलंबून आहे. हे प्रकरण काही इंद्रियांच्या क्षमता आणि त्याच्या भोजन चक्राशीही जोडले गेले आहे. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी विकासक्रमामध्ये मिळालेली ही सवय आता स्थापित झाली आहे, असे शास्त्रज्ञ मानतात. पण अलिकडच्या अभ्यासानुसार यात बदल होत चालला आहे.
     पशु-पक्ष्यांनी जी जागण्या- आराम करण्याची सवय बदलली आहे, त्याला कारणीभूत मानवच आहे. शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, ज्या परिसरात मानवाची वर्दळ अधिक आहे, तिथल्या जंगली प्राण्यांनी आता त्यांची दिनचर्या बदलली आहे. त्यांच्या झोपण्या आणि आराम करण्याच्या वेळा बदलल्या आहेत. आता या परिसरातील प्राणी दिवसभर आराम करतात आणि रात्री शिकारीला जातात. याबाबतीत अधिक संशोधन कॅलिफोर्नियातल्या जंगली कुत्रे कोयोटवर करण्यात आले आहे. लांडग्याच्या चेहर्याचा हा कुत्रा खरे तर दिवसा शिकार करतो. रात्रीच्यावेळी जंगलातल्या हालचाली कमी होतात. त्यामुळे तोही रात्री आराम करत असतो.  पण आता या जंगलांमधील परिस्थिती बदलली आहे. आता माणसे या ठिकाणी पिकनिक, हायकिंग आणि सायक्लिंगसाठी येऊ लागली आहेत. त्यामुळे कोयोटसाठी आपली शिकार शोधणे कठीण बनले आहे.त्यामुळे मानववस्तीपासून दूर असलेल्या या प्राण्याने आपली सवय बदलली आहे. आता तो दिवसा दाट जंगलात झोपून जातो आणि रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो.
     कॅलिफोर्नियामध्येच नाही तर सर्वच भागात असा प्रकार सुरू आहे. वाघाला खरे तर दिवसा शिकार करायला आवडते. पण आता तो शिकार करायला मानववस्तीमध्ये रात्री घुसलेला दिसतो आहे. त्याला माहित झाले आहे, तो दिवसा मानववस्तीत शिरला तर लोक त्याच्या जीवाच्या मागे लागतील. युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेचे पर्यावरण शास्त्रज्ञ केटलिन गेनर यावर अधिक अभ्यास करत आहेत. ते आता या निर्णयावर पोहचले आहेत की, परिस्थितीनुसार प्राण्यांनी स्वत:मध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. इथे त्यांच्या पोटापाण्याचाच प्रश्न महत्त्वाचा आहे. हे प्राणी वटवाघळे किंवा घुबड बनू लागली आहेत. पोटापाण्यासाठी माणसाने जशी आपली दिनचर्या बदलली तशी प्राणी-पक्ष्यांनीही बदललली आहे. आणि या सगळ्या बदलाची आणि बर्या-वाईटाची जबाबदारी माणसानेच घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment