Friday, July 6, 2018

जपान आणि आपण


     फेब्रुवारी,1897 मध्ये मद्रास ( आता चेन्नई)च्या एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्यात एकदा तरी जपानला आवश्य जाऊन यायला हवे. वरवर तरी या सल्ल्याचे प्रयोजन लक्षात येत नाही.मात्र स्वामी विवेकानंद वाचल्यावर मात्र त्यांच्या म्हणण्याचा उलगडा झाल्याशिवाय राहात नाही. गौरवशाली इतिहास आपल्या भारताला असतानादेखील तत्कालिन भारताच्या मागासलेपणाच्या कारणांचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे, त्यावरून आपली निष्क्रियता, सामाजिक-धार्मिक परंपरा आणि देशाबाबतची उदासिनता आपल्या मागासलेपणाला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जागतिक सर्वधर्मपरिषदे (शिकागो)ला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जाताना जपान प्रवासा (जुलै 1893) दरम्यान ते जपानची कार्य-संस्कृती, शिस्त, सामाजिक-नैतिक मूल्ये आणि त्यांचे देशप्रेम पाहून ते खूपच अचंबित झाले. आणि हीच गोष्ट ज्याला कुणाला पाहायची आहे, अनुभवायची आहे,त्या  प्रत्येक भारतीयाने एकदा हमखास जपानला जाऊन यायला हवे, असा सल्ला देतात.

     तिथल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाबरोबरच जपानच्या लोकांच्या कार्यशैलीमध्ये नैतिक मूल्ये सर्वोच्च स्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचायला मिळाली, ती म्हणजे तिथला एक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीपूर्वी तीन मिनिटे अगोदर बाहेर गेला. त्यामुळे त्याचा पगार कापला गेला. अशीच दुसरी घटना आहे. एका रेल्वे स्टेशन मास्तरने जाहीररित्या सर्वांची मागितली,कारण रेल्वे सत्तर सेकंद उशीरा आली होती. आपल्याकडच्या लोकांना याबाबत काहीच अप्रूप वाटत नाही. तास काय किंवा दोन तास काय, रेल्वे उशिरा आली तरी आपल्या वागण्यात काही फरक पडत नाही. ही बातमी आपल्याला शेवटी अतिशियोक्तीच वाटणार! पण आपण ज्यावेळेला जपानला जाऊ, तेव्हा या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. विमानतळ सोडले तर अन्य कुठेही तिथे आपल्याला पोलिस दिसणार नाहीत. तिथले लोक पोलिसांशिवाय रस्त्यावरचे ट्रॅफिकचे नियम स्वत: पाळतात. सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेमध्ये समयबद्धता दिसून येते. कोबे ते हिरोशिमा जाण्या-येण्यासाठी जवळपास साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या चार तासांत पूर्ण केले जाऊ शकते. शिवाय यातील एका तासात हिरोशिमा शांतता स्मारक पाहण्याचाही कार्यक्रम पार पाडला जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, ही तर तंत्रज्ञानाची कमाल आहे. पण आपण हे विसरतो आहोत की, तंत्रज्ञान संचलन करणारा आणि कोणत्या ना कोणत्या बिंदूवर कार्य करणारा हा एक माणूसच आहे. आणि तो आपल्या कार्याविषयी कमालीचा दक्ष आहे.
     जपान किंवा अशा प्रकारचा कोणताही देश आपल्या उंचच्या उंच इमारती, आधुनिक उद्योगधंदे, रुंद रस्ते आणि झगमगाट करणारे मॉल किंवा विमानतळ अशा गोष्टींनी महान बनत नाही. या सर्व गोष्टी कोणत्याही देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहेत,पण या पुरेशा नाहीत. दिल्लीतले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्याही दृष्टीने जपानच्या विमानतळांपेक्षा कमी नाही. हीच गोष्ट कनाट प्लेस बाजारच्याबाबतीतही म्हटले जाऊ शकते. पण मुद्दा नैतिक मूल्ये किंवा शिस्त यावर येऊन ठेपतो, तेव्हा आपण जपानी लोकांसमोर क्षणभरही टिकू शकत नाही. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात तिथल्या नागरिकांची कार्य-संस्कृती, मानवीय मूल्ये, सामुहिकतेची भावना आदी महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी असतात. आपल्या लोकांमध्ये आम्ही नाही तर मी ही अहंभावना रुजलेली आहे. त्यामुळे सगळा फायदा मी ला जातो. यात अन्यायग्रस्त लोक, समाज किंवा राष्ट्राला प्राधान्य कसे द्यावे, हे जपानकडून शिकायला हवे. आपण बाता तर वसुधैव कुटुंबकमच्याच मारतो,मात्र व्यवहारात आमच्या मर्यादा या इतक्या सिमित आहेत की, आम्ही पती-पत्नी किंवा मुले यांच्या बाहेर जात नाही. यामुळेच आपल्याकडे उच्च आर्थिक वृद्धी आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढलेले असतानादेखील एक सामिहिक राष्ट्र म्हणून आपण मागासलेलेच आहोत.
     एका सभ्य समाजाकडून अशी अपेक्षा ठेवली जाते की, त्याने आपला विचार आणि व्यवहार दोन्हींमध्ये सभ्यता राखायला हवी. एक दृष्टीकोन ठेवायला हवा. आपले आदर्श खूप मोठे आहेत,पण त्या आदर्शतेचे पालन करण्याची जबाबदारी आपल्यावर  येते, तेव्हा आपण मागे सरतो. जपानमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य दुकानांमध्ये काम करणार्या जवळपास 80 टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे तिथली चाळीस टक्के दुकाने चोवीस तास सुरू असतात. त्यांच्या बोलण्यावरून आणि काम करण्याच्या पद्धतीवरून आपल्याला त्यांच्यात कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना नाही, हेच आपल्याला पाहायला मिळते. याच्या उलट आम्ही यत्र नार्यस्तु पूज्यते रमंते तत्र देवता चा आदर्श पुस्तकांपुरताच मर्यादित करून ठेवला आहे. घर, कुटुंब आणि समाजात आपण मुलींना सन्मान देऊ नाही. आपल्याला वाटत असते की, आपल्या घरातील बहीण, पत्नी आणि आई यांच्यावर उपचार एकाद्या महिला डॉक्टरने करावे,पण आपल्या घरी मुलगी जन्माला येऊ नये, असेही वाटत असते. ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल एका मुलाखतीत सांगते की, तिच्या जन्मानंतर कित्येक महिने नातेवाईकांनी तिचे तोंड पाहिले नव्हते. कारण त्यांना मुलगा हवा होता. आपल्या विचारात आणि व्यवहारात असा जमीन- अस्मानाचा फरक आहे.
      1963 मध्ये ज्यावेळेला जागतिक स्तरावर विवेकानंद यांची जन्मशताब्दी साजरी केली जात होती, त्यावेळेला जपानच्या प्रमुख शहरांमध्ये आणि आठ विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण आणि उपदेश यांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आपण मात्र फक्त उपचारालाच त्यांची जयंती साजरी करतो. त्यांच्या जीवन चरित्रातून आपण काहीच घेत नाही. हा किती विरोधाभास म्हणायचा?

No comments:

Post a Comment