Tuesday, July 10, 2018

पाठ्यपुस्तक ते साहित्य अकादमी


     गेल्या महिन्यात जतच्या साहित्य क्षेत्राचा अभिमान तमाम तालुकावासियांना वाटावा, अशा दोन घटना घडल्या आहेत. एक म्हणजे जतचे साहित्यिक, पत्रकार आणि शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या एका लेखाचा आठवीच्या बदललेल्या बालभारती पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. आणि दुसरी घटना म्हणजे निगडी बुद्रुकसारख्या ग्रामीण भागात राहून शिकण्याची जिद्द बाळगलेल्या नवनाथ गोरे या तिशीही न ओलांडलेल्या साहित्यकाराच्या फेसाटी या आत्मकथनात्मक कादंबरीला युवा साहित्य आकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आजपावेतो अशी कामगिरी जतच्या साहित्य क्षेत्रातल्या इतिहासात कधीच पाहायला मिळाली नाही. अर्थात जत तालुका सर्वच क्षेत्रातल्या हिर्यांची खाण आहे. कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक या क्षेत्रात या तालुक्याने आटकेपार झेंडा लावला आहे. पण महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात जतच्या लेखकाचा सहभाग व्हावा, हे पहिल्यांदाच घडले आहे. आणि केंद्राच्या युवा साहित्य आकादमीच्या इतिहासात नवनाथ गोरे या नवोदित लेखकाने फेसाटीच्या निमित्ताने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. या घटना जतच्या साहित्य क्षेत्राला उभारी देणार्या आणि नवोदितांना प्रोत्साहन देणार्या आहेत, असेच म्हणायला हवे.

     मुचंडीचे भीमराव कुलकर्णीपासून ते डॉ. श्रीपाद जोशींपर्यंतचा साहित्यातला जत तालुक्याचा वावर वाखाणण्यासारखा आहे. जोशी सरांनी तर येडेमच्छिंद्र ही जन्मभूमी असली तरी जतही कर्मभूमीच मानली. त्यांची तब्बल 22 पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध कवी,लेखक लवकुमार मुळे, महादेव बुरुटे, मच्छिंद्र ऐनापुरे, श्रीकांत कोकरे, डॉ. महेश भोसले, अशोक शिंदे, मिलिंद डोंबाळे,डॉ. सरिता पट्टणशेट्टी, डॉ. सौ. सनमडीकर अशा अनेक लेखक-कवींची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन अव्याहतपणे सुरू आहे. अजूनही काही मंडळी विविध क्षेत्रात लेखन प्रपंचा चालवत आहेत. जतसारख्या दुष्काळी भागात राहून कुणाच्याही पाठिंब्याशिवाय ही मंडळी सरस्वतीदेवीची आराधना करत आहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पत्रकार दिनराज वाघमारे यांनी जतच्या डफळे संस्थानवर आणि जतच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे  पुस्तक लिहायला हाती घेतले आहे. यापूर्वी त्यांची ही लेखमाला एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती, आता त्याचे पुनर्लेखन त्यांनी केले आहे.संदर्भासाठी या पुस्तकाचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे.ते पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे.डॉ. रवींद्र आरळी यांचे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत असलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.
     मराठी साहित्य परिषदेची शाखा जतला आहे,मात्र त्याचे भरीव कार्य आपल्याला दिसले नसले तरी शेगावच्या मराठी साहित्य मंचाची कामगिरी मात्र नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. आज गेली 22 ते 23 वर्षे ही संस्था ग्रामीण साहित्य संमेलनं भरवणे, नवोदितांच्या साहित्याला बळ देतानाच त्यांची पुस्तके प्रकाशित करण्याचे काम करीत आहे. या मंचाचे आणखी एक वैशिष्ट्य न्हणजे संमेलने ही एकाच गावात होत नाहीत. तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये ही साहित्य संमेलने होत आहेत. शेगाव, जत, आवंढी, बनाळी, कुंभारी, येळवी अशा गावांमध्ये संमेलने झाली आहेत आणि इथल्या लोकांना साहित्याचीदेखील जत्रा भरते, याची अनुभुती दिली. त्यामुळे या गावांना आपल्या गावात पुन्हा पुन्हा संमेलने व्हावीत, असे वाटत असते. याशिवाय कन्नड-मराठी साहित्य परिषदेनेही वेगवेगळे उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जतचे नगर वाचनालयदेखील साहित्यासंबंधी असेच काही ना काही उपक्रम राबवत असते. त्यामुळे जतच्या साहित्य क्षेत्राला चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे.
     रामराव विद्यामंदिर, जत हायस्कूल, सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, लायन्स क्लब यासारख्या संस्थादेखील आपापल्या परीने लोकांमध्ये वाचन-लेखनाची आवड निर्माण व्हावी, चांगल्या श्रोत्यांना ऐकायला मिळावे,यासाठी व्याख्यानमाला आयोजित करतात.साहित्य सेवा मंचसह या संस्थांमुळे शिवाजी सावंत, शिवाजीराव भोसले,शंकर पाटील, .मा. मिरासदार, बाबामहाराज सातारकर, .मुं.शिंदे, आनंद यादव, विठ्ठल वाघ, इंद्रजित देशमुख अशी बरीच नावाजलेली साहित्यिक मंडळींनी यांच्या प्रयत्नांमुळे पायधूळ झाडली. प्रसिद्ध कन्नड संत सिद्धेश्वर महाराज यांचीही व्याख्याने जतमध्ये होत असतात. लोकांना भक्तीमार्गाला लावण्याचे काम किंवा चांगल्या गोष्टी ऐकवण्याचे काम शिवानुभव मंडपचे ट्रस्टी करीत असतात. साधारण वर्षभर कोठे ना कोठे साहित्य क्षेत्राशी संबंधीत कार्यक्रम होत असतात.
   
 मात्र,अजूनही याबाबतीत जत तालुका मागेच आहे, असे म्हटल्यास वावगे वाटू नये. कारण अजून बराच पल्ला गाठणे अपेक्षित आहे. मराठी साहित्य सेवा मंचने भरीव निधीची तरतूद करून साहित्य संमेलनाला कायमस्वरुपी भारदस्तपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यासाठी जतच्या राजकीय मंडळींनी,व्यापारी,व्यावसायिक,उद्योजकांनी भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. कन्नड-मराठी साहित्य परिषदेने आणखी आक्रमकपणा घेऊन मराठी साहित्य कन्नडमध्ये आणि कन्नड साहित्य मराठीमध्ये आणण्यासाठी पावले उचलायला हवीत. जतची समृद्ध साहित्य परंपरा आणखी वृद्धींगत व्हावी आणि जतचा झेंडा साहित्य क्षेत्रात सतत फडकत राहावा, यासाठी जुन्या लेखकांनी प्रयत्न करावेतच शिवाय नवोदितांनीही आपले नाव या क्षेत्रात मानाने घेतले जावे,यासाठी धडपड करायला हवी.

No comments:

Post a Comment