निशांत आणि उमा या डॉक्टर दाम्पत्यांनी
गावात राहून लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार त्यांनी गावात दुमजली इमारत उभी केली होती.
खाली दवाखाना सुरू केला होता आणि वरच्या मजल्यावर दोघे राहत होते.
गणपत पवार गावचे सरपंच होते. त्यांनी वयाची पन्नाशी
गाठली होती. एके दिवशी पहाटे पहाटेच सरपंचांना हृदयाचा झटका आला.
तिघा मुलांनी त्यांना दवाखान्यात आणलं. डॉक्टर
दाम्पत्य तात्काळ उपचाराला लागले. सरपंचांना बरे वाटू लागले.
दोन-तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यथावकाश सरपंच आणि डॉक्टर यांच्यात मैत्री
वाढली. जाणं-येणं चाललं. डॉक्टर निशांत यांची दोन्ही मुलं शहरात सेटल झाली होती. पैशांची कसलीच कमतरता नव्हती. त्यांची अजिबात इच्छा नव्हती
की, आई-बाबांनी साधी वीजही पुरेशी नसलेल्या
गावात राहावावं. पण डॉक्टर दाम्पत्यांनी ठरवलं होतं की,
शहरात खूप दवाखाने आहेत. गावाकडे नाहीत.
त्यामुळे त्यांनी आपल्या रिटायरमेंटच्या पैशांतून दवाखान्यात सर्व त्या
सुविधा उपलब्ध करून घेण्याचा बर्यापैकी प्रयत्न केला होता.
सरकारी दवाखान्यात जे सुविधा मिळत नाहीत, त्या
त्यांनी आपल्या दवाखान्यात उपलब्ध केल्या होत्या.
सरपंचांच्या थोरल्या मुलाला एक मुलगा
आणि एक मुलगी होती. दुसर्याला मात्र दोन्ही मुलीच होत्या. त्यामुळे तिसर्या वेळेला ते सुनेची गर्भ तपासणी करू इच्छित होते. एके
दिवशी त्यांनी गप्पा मारता मारता निशांत डॉक्टरांना विचारलं. डॉ. निशांतनी याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.
शिवाय त्यांची पत्नीदेखील याच्या विरोधात आहे, हेही निक्षून सांगितलं. ते म्हणाले, “ आजच्या युगात कसल्या भुरसट कल्पना घेऊन
बसला आहात? मुलगा काय मुलगी काय दोघंही एकच!”
पण सरपंच निघाले जुन्या वळणाचे.ते थोडेच ऐकणार होते. त्यांनी सुनेला
मुलगाच व्हावा म्हणून कुठल्या तरी वैद्याकडून झाडपाल्याच्या पुड्या आणून दिल्या.
सरपंचांनी कित्येकदा सुनेची सोनोग्राफी करण्याची विनंती केली.
पण डॉ. निशांत बधले नाहीत. यावर सरपंच डॉक्टरांवर कमालीचे नाराज झाले. तीन महिन्यानंतर
सुनेची तब्येत बिघडू लागली. चेकअप करण्याचा सल्ला देण्यात आला,पण सरपंचांनी ऐकलं नाही. ते म्हणू लागले,“पहिल्या दोन्ही मुलांच्या वेळेला काही झालं नाही. त्यामुळे
आताही काही होणार नाही.”
सुनेला नववा महिना लागला आणि तिच्या
शरीरावर सूज चढू लागली. डॉक्टरांनी दवाखान्यात
दाखल करायला सांगितले,तरीही सरपंचांनी ऐकले नाही. त्याच रात्री डॉ. निशांत उमाला म्हणाले,“इमरजन्सी केस आहे. सरपंचांनी सुनेला आणलं आहे.” परिस्थिती फारच गंभीर होती.
तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण तिला ते वाचवू
शकले नाहीत. त्यानंतर सरपंचांच्या समर्थकांनी उपचार व्यवस्थित
केले नाहीत, म्हणून दवाखान्याची तोडफोड केली. दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांचीदेखील फरफट झाली.
घाबरून डॉ. निशांतनी आपल्या मॅजिस्टेट मित्राला फोन केला.
अर्ध्या तासात पोलिस आले. त्यांनी निशांत आणि उमा
यांना सुखरुप बाहेर काढून घेऊन गेले. ज्या सरपंचांना हृदय विकाराचा
झटका आल्यावर दोघांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता उपचार केले.त्यातून त्यांना बरे केले. त्याच इसमाने दवाखान्याची
तोडफोड घडवून आणली. याचा मोठा धक्का डॉ. निशांतना बसला. त्यांच्या मुलांनी त्यांना गावाकडे न
जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचा नाईलाज झाला. नंतर गावातला दवाखाना विकण्यात आला.
शहरात नव्याने दवाखाना सुरू झाला.डॉक्टर दाम्पत्य
शहरात रमले. कामात व्यस्त झाले.
जवळपास आठ महिन्यांनी मॅजिस्टेट मित्राचा
डॉ.निशांतना फोन आला. सरपंच गेले.
त्यांना पुन्हा हृदय विकाराचा झटका आला. गावातल्या
सरकारी दवाखान्यात सुविधा नसल्याने त्यांना शहराकडे आणण्यात येत होते. तोवरच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. ते तुमची फार आठवण
काढत होते म्हणे! ते तुमची माफी मागून पश्चाताप करू इच्छित होते.
No comments:
Post a Comment