Friday, July 13, 2018

शिस्तीला पर्याय नाही


     माणसाच्या अंगी शिस्त ही असायलाच हवी. शिस्त माणसाला कधीच लाचार बनवत नाही. उलट शिस्तीमुळे माणसामध्ये आत्मविश्वास येतो. जगण्याची उर्मी येते. दुसर्याला आयुष्य कसे जगावे, याचा वस्तुपाठ देते. म्हणजे माणसाच्या अंगी शिस्त असेल तर तो जग जिंकू शकतो. शिस्तीबरोबर सर्व चांगले गुण त्याला चिकटत असल्याने त्याला पाहिजे ते ध्येय साकारता येते. म्हणजेच शिस्त हा चांगल्या आयुष्याचा पायाच आहे. मोठमोठी आव्हाने सर्मथपणे पेलायची असतील आणि यशस्वीतेचं शिखर गाठायचं असेल तर नक्कीच नियोजनबद्ध शिस्तीचा त्यातला मोठा वाटा असतो. शिस्त ही फक्त एखाद्या गोष्टीसाठीचीच असते असं नाही. वागणं, बोलणं, विचार करणं, कृती करणं अशा सगळ्या बाजूंनी ती माणसाला उन्नतीकडे नेणारीच असते.

     मुळात कोणत्याही चांगल्या गोष्टी अंगी बाळगणे ही कठीण गोष्ट तर असतेच, पण त्याचबरोबर आपली सर्वार्थानं कसोटीही लागत असते. कोणतीही चांगली गोष्ट स्वीकारण्यासाठी प्रयत्न, कष्ट, सातत्य, चिकाटी आणि जिद्द या सगळ्यांचाच समन्वय असावा लागतो. खूप प्रयत्नांती अंगातला आळस, निरुत्साह, कंटाळा आणि जुन्या हटबद्ध सवयी यांना हद्दपार करून शिस्त आत्मसात करावी लागते.
शिस्त वागण्याची असेल, तर बरचसं आयुष्य सोपं आणि सरळ जातं. जुनी माणसं आपल्या जवळच्या माणसांची आठवण काढताना त्याच्या शिस्तीवर अगदी भरभरून बोलतात. रोज लवकर कसे उठतात, सगळं कसं चोख करायचे, त्यांना जिथल्या-तिथे वस्तू हव्या असतात... वगैरे वगैरे. माझे आजोबा म्हनजे आईचे वडिल. काही शिकले नव्हते,पण त्यांच्या वागण्याचं एक सूत्र होतं. ’जिथल्या तिथे आणि जेव्हाचं तेव्हाघेतलेली कोणतीही वस्तू जागच्या जागेला ठेवली म्हणजे मिळतेही वेळेवर. हवी तेव्हा आणि शोधण्यासाठीचा वेळ वाया जात नाही. अगदी खरंच ना हे! पदोपदी प्रत्येक माणसाला याचा हरघडी अनुभव येतच असतो. आणि जेव्हाचं तेव्हा म्हणजे कोणत्याही कामात चालढकलपणा न करता ज्या त्या वेळेला केलं की आपसूकच नंतर वेळेचा होणारा अपव्यय आणि खर्चाचाही अपव्यय कमीत कमी होतो. पूर्वीच्या लोकांनी जे स्वत:च्या अनुभवानंतर मापदंड घातलेत ते अचूक तर आहेतच, पण काळाच्या कोणत्याही पट्टीवर खरे उतरणारेही आहेत. खूप माणसं भरपूर शिस्तीची असतात.
      शिस्त असली ही कुठली गोष्ट अडत नाही. वेळच्या वेळी कामे होतात. कामं चांगली होतात. कुणाची बोलणी खावी लागत नाहीत आणि कुणाला बोलायचा प्रश्न येत नाही. मात्र अलिकडे ही शिस्त पाहायला मिळत नाही. सकाळी उठल्यापासून गरजेच्या आणि महत्त्वाच्या वस्तूंची शोधाशोध करणार्यांची संख्या काही कमी नाही. काहीतरी वरचेवर गहाळ झालेलंच असतं आणि महत्त्वाचा कामाचा वेळ हरवलेल्या वस्तू हुडकण्यात फुकट चाललेला असतो. अर्थात वेळ फुकट जातोय याचं देणं-घेणं कितीजणांना असतं हाही एक विचार करायचाच मुद्दा आहे. आजच्या युवकांमध्ये तर ही गोष्ट फारच दुर्मिळ झाली आहे.
     रात्रभर जागत असतात आणि मग सकाळी लवकर उठायचे नाही. सकाळी आठ किंवा दहाला कधीही उठायचे. याने माणूस आळसावून जातो. दिवस खराब जातो. यामुळे अंगी चिडचिड येते. माणसाने नेहमी आनंदी आणि तरतरीत राहायचे असेल तर सकाळी लवकर उठायला हवे. आणि आपापल्या कामाला लागायला पाहिजे. हल्लीजाऊ दे, ’राहू देत्यात काय एवढं ?, चालायचंच’’ या शब्दांनी आपली पकड घेतली आहे. पण हे बरोबर नाही, त्याला वेळीच चाप बसवायला हवा, नाही तर अटळ नुकसान ठरलेलंच आहे.
     आपल्याकडे कुठलेच कार्यक्रम वेळेत होत नाहीत. कुठे पाहुणे वेळेवर येत नाहीत,कुठे प्रेक्षक येत नाही. लग्नाचा कार्यक्रम तर कधीच वेळेत पार पडत नाही. मग लग्नाची वेळच का ठरवायची? असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे आपली भारतीय वेळच आहे ही, असे सांगून उशीरा होणार्या कार्यक्रमांचे आपण समर्थनच करतो. त्यामुळे खरे तर आपला देश मागे पडला आहे. थोडा वेळ होणं हे आपल्या इतकं अंगवळणी पडलंय की आपल्याला त्याची चाडच उरलेली नाही. कुठेही वेळेवर जाणं आणि ज्या कार्यक्रमासाठी आपण निघालोय तेही वेळेवर होणं याचा संबंध मुळीच असत नाही. आपणही सहज म्हणतो कार्यक्रमाला पोहोचला आहे ना, मग होईल साडेपाचला सुरू, म्हणजे तो वेळ होणं हे आपल्यालासुद्धा मान्य आहे.
     फार लहानपणी शाळेची घंटा वेळेत होत असे आणि वेळेत गेट बंद होत असे, म्हणजे तेव्हाचं केव्हातरी खूप चांगला संस्कार आपल्या सगळ्यांच्यावर रुजविला होता. मग मधल्या कालखंडात आपण इतके कसे काय मुर्दांड झालो की आपण चांगला संस्कार सोडून वाईट सवयीच्या इतके आहारी गेलो. वेळ न पाळल्यानं आपलं नुकसान तर होतंयच पण जोडीला दुसर्याचेही होतेय हे निर्ढावलेल्या आपल्या मनात जाऊन पोहोचेल का? प्रत्येकाला निदान एक वर्ष सक्तीनं सैनिक प्रशिक्षण दिलं पाहिजे म्हणजे नुसतीच वेळेची नाही तर त्यांच्या शारीरिक, मानसिक कष्टांची आपल्याला थोडीशी तरी जाण येईल आणि थोडीशी तरी शिस्त समजेल, असे वाटल्यावाचून राहत नाही.

No comments:

Post a Comment