अजूनही आपल्याकडे मानसिक रोगाविषयी फारसं
बोललं जात नाही. मनावर घेतलं जात नाही. नेहमी हसणारा-खिदळणारा एकदम बोलायचा बंद होतो,उदास राहतो, कुणाशी बोलत नाही, अशी माणसे कदाचित नैराश्येत गेलेली असतात. खरे तर अशा
लोकांना मानसिक आजाराची गरज असते. मात्र आपण हा असा का विचित्र
वागायला लागला आहे,म्हणून त्यालाच दोष देतो. या मानसिक रोगाविषयी आपल्याकडे अद्याप म्हणावी, अशी जागृती
झालेली नाही. फारच अती झाल्यावर मग त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे
नेले जाते. तोपर्यंत त्याच्याविषयी गैरसमजच जास्त पसरतात.
काहींना तर तो नाटकच करत आहे, असे वाटते.
त्यामुळे अशा माणसांना लवकर समजून घेतले जात नाही. कारण या आजाराविषयी फारच अज्ञान आपल्यामध्ये आहे. वास्तविक
अशा मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती फारच चिंताजनक आहे.
अशी माणसे आत्महत्येसारखे घातक पाऊल उचलतात. अशा
लोकांना मानसिक आजारातून बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. यासाठी
सरकारी पातळीसह सर्वच स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. मुळात मानसिक
आजार हाही एक आजार आहे,याविषयी समाजात जागृती होणं फार गरजेचं
आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार 2015 मध्ये भारतात पाच कोटी लोक तणावाचे, नैरश्याने ग्रासलेले रुग्ण होते. अशी माणसे तणावामुळे
आपले सामान्य जीवनदेखील धड जगू शकत नाहीत. दक्षिण आशियाई देशांमध्ये
सर्वात अधिक मानसिक तणावाचे रुग्ण भारतात आहेत. यात बहुतांश घबराहटीचे
रुग्ण आहेत. काळजीशी जोडली गेलेली भीती इतकी वाढते की,
व्यक्ती आत्महत्यादेखील करू शकतो. आपल्या देशात
नऊ कोटी लोक असे आहेत की, ते कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येला
तोंड देत आहेत. ते आपले सामान्य जीवन जगू शकत नाहीत.
अशा लोकांना समजून घेण्यापेक्षा घरातले
आणि बाहेरचे, कार्यालयातले लोक त्यांना वैतागून
जातात. त्यांच्याशी व्यवस्थित व्यवहार करत नाही. उलट काही लोक त्याला अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे लोक आत्महत्येला जवळ करतात. संपूर्ण देशात
जवळपास 32 कोटी लोक तणावाला बळी पडले आहेत. यातील पन्नास टक्के लोक भारत आणि चीनमधले आहेत. संयुक्त
राष्ट्राच्या मतानुसार 2005 ते 2015 या
कालावधीत संपूर्ण जगभरात अशा मानसिक आजाराचे रुग्ण तब्बल 19 टक्क्यांनी
वाढले आहेत. या आकडेवारीनुसार 78 टक्के
आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत. भारतदेखील एक अर्ध मध्यम उत्पन्नवाल्यांचा देश आहे. आणखी
एका अहवालानुसार 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये मानसिक आजारांच्या औषधांचे सेवन अधिक प्रमाणात झाले आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरो सायन्स च्या मतानुसार भारतात
प्रत्येक वीस व्यक्तींमधला एकजण या तणावाचा बळी ठरलेला आहे.
भारतात मानसिक आरोग्याविषयी फारशी चर्चा
होत नाही. सरकारेदेखील याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. भारतीय कुटुंबांमध्ये आपल्या मानसिक समस्यांविषयी मनमोकळेपणाने कुणी बोलत नाही.
अगदी जवळच्या माणसालादेखील काही बोललं जात नाहीत. एकाद्याने आत्महत्या केली तर त्याच्या जवळच्या मित्राला लोक विचारतात,
अरे, तुला तरी काही सांगत होता का? तुझ्याशीच तो जास्त बोलायचा... वगैरे. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट आपल्याकडे अधिक होताना दिसते,ती म्हणजे जो माणूस आपल्याकडे त्याच्या काही समस्या घेऊन येतो, त्याला आधार देऊन चांगला सल्ला देण्यापेक्षा त्याची चारचौघात टिंगलटवाळी केली
जाते.त्यामुळे तो आणखीणच बिथरतो. त्यामुळेसुद्धा
काही लोक आपल्या समस्या कुणाला सांगायला जात नाहीत. अलिकडच्या
मोबाईल आणि त्यावरील सोशल मिडियामुळे लोक आधीच एकमेकांशी बोलायचे कमी झाले आहेत.
माणसांत मिसळायचे कमी झाले आहेत. त्यात अशा आजाराने
ग्रासलेल्या माणसाची अवस्था फारच बिकट होऊन जाते.
अलिकडच्या काही वर्षात मुलांमध्ये,तरुणांमध्ये साध्या साध्या गोष्टींवर चिडचिडेपणा वाढला
आहे. ही मुलं कुणाचंही चांगलं, किंवा सल्ले
वगैरे ऐकून घ्यायला तयार नाहीत. ज्यांचा आदर करायला हवा,
अशा आई-वडील, शिक्षकांचा
ते अनादर करू लागले आहेत. इतरांची तर गोष्टच सोडून द्या.
अर्थात याला कौटुंबिक परिस्थितीदेखील कारणीभूत आहे. आज मुलांना,तरुणांना पाहिजे, त्या
गोष्टी पट्कन मिळत आहेत. त्यामुळे जर एकादी गोष्ट लवकर मिळेना
तर त्यांची चिडचिड होते. काही मनाविरुद्ध घडले आणि तिथे तो किंवा
ती काही करू शकली नाही तर यांना मानसिक धक्काच बसतो. लोकांमधील
सहनशीलता कमी झाली आहे.
या आजारातून अन्य आजारांनाही निमंत्रण
मिळते. आज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात पाच
कोटी लोक मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले असले तरी ही संख्या जास्तही असू शकते,
कारण मानसिक आजाराविषयी डॉक्टरांकडे फारसे बोलले जात नाही. बर्याच प्रकरणांमध्ये कधी कधी हे कळूनच येत नाही की,
समोरची व्यक्ती मानसिक तणावात आहे आणि याला उपचाराची गरज आहे.
भारत हा युवकांचा देश आहे. पण या युवकांवर सोशल
मिडिया हावी आहे. याचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यांच्या एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्याचे नेटवर्क मात्र कमी चालले आहे.
यामुळे कुणाच्या मनात काय चालले आहे, हे कळेनासे
झाले आहे.
अलिकडे आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकणार्या व्यक्तींना ओळखणारे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे.
फेसबूकसारख्या सोशल मिडियांची यासाठी मदत घेतली जात आहे. कृत्रीम बुद्धीच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनातल्या चलबिचलवरून हे सॉफ्टवेअर
संबंधीत व्यक्ती आत्महत्या करू शकते, असा इशारा देऊ शकते.
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार वीस लाख अशा रुग्णांचे
आकडे एकत्रित करण्यात आले आहेत, जे मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की,
किती रुग्ण आत्महत्या करू शकतील. सॉफ्टवेअर विश्लेषणानुसार जे परिणाम समोर आले आहेत, ते जवळपास
80 ते 90 टक्के खरे आले आहेत.
परंतु, नैराश्य,तणाव रोखण्यासाठी कॉम्प्युटरची
मदत घेण्यापेक्षा आपल्याला आसपासच्या लोकांची मदत घ्यायला हवी. कृत्रीम बुद्धी आणि कृत्रीम भावनांच्या जागी वास्तविक भावनांचे मोल मोठे आहे.
अर्थात तणाव हा बरा होणारा रोग आहे. याला सल्ला
आणि औषधांच्या माध्यमातून बरे केले जाऊ शकते. या उपचारात आपसांत
केलेली चर्चा सर्वात अधिक फायदेशीर ठरू शकते. आता आवश्यक कामांसाठी
थोडा तणाव शरीराला आवश्यकच आहे,पण तो जर आयुष्यावरच भारी पडणार
असेल तर मात्र त्याला सोडचिठ्ठी दिलेलीच बरी!
No comments:
Post a Comment