Tuesday, July 17, 2018

भविष्यात जगावर 'सायन्सराज'


     रोबोटकरवी होत असलेली कामे,उडत्या कारची यशस्वी चाचणी,चालकविरहित कार, शेतीत वाढत चाललेले तंत्रज्ञान, ॅपच्या माध्यमातून मोबाईलचा होत असलेला विविधांगी वापर या गोष्टी पाहता भविष्यात सायन्सचे राज्य असणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. तीस वर्षांपूर्वी वर्चुअल रियलिटीच्या वस्तू फक्त चित्रपटांमध्ये पाहायला मिळायच्या. आता त्या सत्यात उतरल्या आहेत. मात्र आज जो विचार केला जात आहे, तो उद्या सत्यात उतरणार आहे. हे फक्त आणि फक्त सायन्समुळे घडत आहे. उद्याचं जग कसं असणार आहे, याची आपणा सर्वांनाच उत्सुकता आहे.

     अलिकडच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये आयर्नमन,हल्क,स्पायडरमन या सुपर हिरोंचा बोलबाला आहे. बॉलीवूडच्या क्रिशनेदेखील यात भर घातली आहे. आपण उडणार्या कार चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. एका झटक्यात एका ग्रहावरून दुसर्या ग्रहावर उड्डाण करणारे सुपर हिरोज आपण पाहात आहोत. पण आज जे आपण चित्रपटांमध्ये पाहात आहोत,त्याला शास्त्रीय आधार आहे. यामागे सायन्स आहे. यांवर संशोधन चालू आहे. त्यामुळेच आपल्याला या गोष्टी चित्रपटांमध्ये दिसत आहेत. आणखी काही वर्षांनी म्हणजे सुमारे पन्नास वर्षांत आपल्याला या गोष्टी प्रत्यक्षात साकारलेल्या दिसतील. हे एकदम काही घडणार नाही,परंतु टप्प्या-टप्प्याने या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात यातून काही चांगले परिणाम दिसतील,काही वाईटही. कारण याचा सदुपयोग आणि दुरुपयोग करणारे,याच पृथ्वीवर आहेत.
सध्याची वाढती लोकसंख्या या जगापुढे मोठा चिंतेचा विषय आहे. यामुळे अन्नधान्य आणि साधनांची कमतरता भयंकर भासणार का, असा प्रश्न असला तरी काही प्रमाणात यावर संशोधन होऊन माणूस यावरही मात करू शकेल, असे विज्ञानाच्या वाढत्या वापरावरून स्पष्ट होत आहे. मात्र कदाचित न्यूक्लियर वॉर, पाणी टंचाई, ग्रीन हाऊस गॅसचे वाढते प्रमाण यासारखी भिती भविष्यात कमी होऊ शकेल. औषधांवरचे अवलंबित्व कमी होईल, कारण शरीरात एखाद्या गोष्टीची कमतरता आढळून आल्यास नॅनो यंत्रे तिथे पाठवून ती भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. काही भू-शास्त्रज्ञांनी जी भिती व्यक्त केली आहे, ती कदाचित सत्यात उतरण्याचीही शक्यता आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास समुद्र किनारी वसलेली शहरे पाण्याखाली जाऊ शकतात, अशी भविष्यवाणी काही शास्त्रज्ञांनी केली आहे. आपण एलियन्सच्या विश्वात सैरसपाटा करू शकू. 2050 पर्यंत जगभर फक्त इलेक्ट्रिक वाहनांचाच बोलबाला असणार आहे. पेट्रोल-डिझेलची जागा बायनरी पॉवरने घेतलेली असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सध्या मलेशियासारख्या देशाने तर लोकांच्या रस्त्यावरून चालण्याने निर्माण होणार्या एनर्जीद्वारा वीज बनवण्याच्या शोधाच्या खटपटीला लागले आहेत.
मंगळावर मंगलमय वातावरण
येणार्या शतकात मंगळ ग्रहावर मंगलमय वातावरण असणार आहे. आपले अवकाश विज्ञान इतके पुढे गेले आहे की, भिती उत्पन्न करणारी अवकाश पोकळी आणि मैदाने असणार्या ग्रहांवरदेखील सध्या काम सुरू आहे. या ठिकाणी पृथ्वीवरच्या माणसांच्या वस्त्या असणार आहेत. लोक पिकनिक करायला जात असतील. शुक्रावरचे मैदान दलदलीचे आहे, त्यामुळे शास्त्रज्ञ आतापासूनच पृथ्वीपासून वर हवेत तरंगणारी अंतराळ प्रयोगशाळा बनविण्याचा विचार केला जात आहे.
पुढच्या काही दशकांचीच गोष्ट असणार आहे. मंगळावर कमीत कमी सात लाख लोक कायमस्वरुपी राहू शकतील.एवढेच नव्हे तर आतापर्यंत ज्या एस्टेरॉइड (लघुग्रह) आणि मिटियोरॉइडपासून पृथ्वी वाचवण्याचा गप्पा मारल्या जातात, त्यांच्यापासूनचा बचाव तर आपल्या डाव्या हाताचा मळ असणार आहे.त्यात लपलेले महागडे खनिज शोषून पृथ्वीवासीय आपल्यासाठी त्याला उपयोगात आणतील. आता तर आपण फक्त मंगळा आणि चंद्रापर्यंतच पोहचलो आहोत. पण नॅनो यंत्रे म्हणजेच अगदीच छोट्या आकाराची पण मोठी कामगिरी करणारी आणि सूर्यापासून सतत आपल्यासाठी ऊर्जा बनवण्यात सक्षम असणार्या यंत्रांमुळे आपल्याला पुढे आकाशगंगांमध्येदेखील प्रवेश मिळवता येणे शक्य होणार आहे.
ड्रोनमार्फत होम डिलीव्हरी
ड्रोनची उपयुक्तता आता आपल्या चांगलीच लक्षात येऊ लागली आहे. अलिकडे त्याच्या वापराबाबत आणखी संशोधन होऊ लागले आहे. शरीराच्या अवयवदानात त्यांचे वहन भविष्यात ड्रोनमुळे शक्य होणार आहे.तातडीने अवयव मिळाल्याने अनेकांना जीवनदान मिळणार आहे. शिवाय यापुढे आपल्याला दूध, अन्नपदार्थ आणायला रहदारीतून वाट काढत किंवा उन्हा-पावसात बाहेर पडावे लागणार नाही. फक्त एका फोनवर त्याची होम डिलीव्हरी होऊ शकणार आहे.
भविष्यातील शिक्षण
येणार्या काळात परीक्षा आणि रोज रोज शाळेला जाण्याची कटकट कमी होईल. विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीप्रमाणे, इयत्तेनुसार  घरीच शिक्षण दिले जाईल. त्यामुळे ना कुणाशी स्पर्धा असणार आहे, ना कसली गर्दी. -लर्निंगचा बोलबाला असणार आहे. प्रत्येक गोष्टीत वर्च्युअल रियलिटी हावी असणार आहे, तर खेळाच्या मैदानाच्या जागी वर्च्युअल वर्ल्डमध्ये राहून मुले,युवक आऊटडोर खेळ खेळू शकतील.
शेती असेल वर-खाली
जरा विचार करा, वाढत्या लोकसंख्येमुळे शेती करायला जागाच उरली नाही तर काय होईल? यावरही तोडगा निघेल.  आज जशा मजल्यांच्या इमारती आहेत, तशाच प्रकारे शेतीसुद्धा केली जाऊ शकेल. हिरवळीसाठी वर्टिकल गार्डन आणि खाण्या-पिण्यासाठी वर्टिकल शेती हा पर्याय असणार आहे. पहिल्या मजल्यावर भात पिकवला जाईल.दुसर्या मजल्यावर कडधान्ये आणि तिसर्या मजल्यावर भाजीपाला. आहे की नाही भन्नाट कल्पना! काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भोजनासाठी काही नव्या साधनांचा शोध लावला जाईल. कारण हरप्रकारचे भोजन एक तर पॅकेटबंद असेल किंवा टॅबलेटच्या स्वरुपात. नाही तर मग द्रव रुपात असू शकेल. माणूस कोणता शोध लावेल, सांगता येणार नाही.
प्रवासाची साधने
उडणार्या कारचे यशस्वी परीक्षण 2009 मध्येच झाले आहे. पण असे मानले जात आहे की, या शतकाच्या अखेरपर्यंत उडणार्या कारचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असेल. यामुळे लोक आपला प्रवास मोथ्या आनंदाने करतील. त्यांना त्याचा कंटाळा असणार नाही. कार चालवणार्या चालकाची आवश्यकता भासणार नाही. संगणक त्यांची भूमिका पार पाडतील. लांबच्या प्रवासासाठी हायपरलूप ट्रान्सपोर्टलचा उपयोग केला जाईल. सुपरसॉनिक गती असलेल्या ट्युब ट्रेनने लोक प्रवास करतील. हा प्रवास चक्क काही मिनिटांचा असेल. लवकरच रेल्वे आणि वाहने फ्रिक्शनलेस तंत्रज्ञानावर चालतील. म्हणजेच या वाहनांना चाके असणार नाहीत. त्यांच्या शानदार वेगामुळे ते हवेत तरंगत जातील.
चंद्रावर सहल
या शतकाच्या अखेरीस अंतराळात जाणं-येणं रोजचं असणार आहे. तोपर्यंत काही लाख लोकांनी चंद्रप्रवास केलेला असू शकेल. काही लोकांसाठी चंद्र हा सहलीचे ठिकाण असू शकेल. एवढेच नाही तर स्पेस टुरिझ्मप्रमाणेच स्पेस हॉटेल्सदेखील अस्तित्वात येऊ शकतील. अवकाश म्हणजे एकाद्या शहरासारखं होऊन जाईल. आतापासूनच अंतराळावर आधारित उद्योगाची पायाभरणी सुरू झाली आहे.  
मनुष्य आणि रोबोट
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात घरातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी रोबोट असणार आहेत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवाले रोबोट मानवाच्या मदतीला येतील. एक काळ असा येईल की, रोबोट हा मानवापेक्षा प्रचंड हुशार असेल. अलिकडेच निर्मित करण्यात आलेल्या सोफिया नावाच्या रोबोटने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. 2050 पर्यंत असे नव्हे त्याहून हुशार रोबोटचे अस्तित्व ही सामान्य गोष्ट असेल. शास्त्रज्ञांचे मत असे आहे की, भविष्यात मानव आणि रोबोट यांच्यात युद्धसुद्धा होऊ शकेल. हे रोबोट सैनिक, घरकाम करणार्या, कारखान्यांमध्ये, यंत्रांवर काम करणार्या माणसांची जागा घेतील. सुरक्षा गार्ड म्हणूनदेखील त्यांचीच नेमणूक केली जाईल. अर्धा माणूस आणि अर्धा रोबोटसुद्धा कदाचित अस्तित्वात येईल.त्यांना शास्त्रीय भाषेत सायबोर्ग म्हणतात. जसा रोबोकॉप चित्रपटाचा हिरो आहे तसा. हा सगळा बदल किंवा प्रगती ही फक्त विज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे येणारा काळ हा सायन्सचा असणार आहे.

No comments:

Post a Comment