Sunday, July 29, 2018

रीयल हिरो:सोनम वांगचूक


      आपल्या देशात क्रिकेटर आणि बॉलीवूडचे नायक हेच खरे हिरो आहेत. त्यांचेच अनुकरण सध्या आपली आजची पिढी करत आहे.पण खरे हिरो तर आपल्या आजूबाजूला असतात. पण आपलं त्याकडे लक्ष जात नसतं. मात्र याच हिरोंची स्टोरी एकादा बॉलीवूड नायक पडद्यावर साकारतो, तेव्हा खर्या अर्थानं आपलं लक्ष त्या रीयल हिरोकडं जातं. असाच एक हिरो आपल्या देशातल्या  श्रीनगर राज्यात असलेल्या बर्फाच्छित लडाखमध्ये शिक्षण म्हणजे डिग्री नव्हे तर ज्ञान  समजून खर्या अर्थानं शिक्षण देण्याचं कार्य करीत आहे. निसर्गातूनच प्रेरणा घेऊन त्याचा उपयोग करून पाणीटंचाई असलेल्या लडाखमध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करणार्या अशा सोनम वांगचूक या रीयल हिरोला नुकताच प्रतिष्ठेचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा एक त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरवच म्हणावा लागेल. शिक्षण हे पुस्तकात किंवा चार भिंतीत नाही तर खुल्या नैसर्गिक वातावरणात आहे,याचा वस्तुपाठ देणार्या सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर बेतलेला अमिरखानचा थ्री एडियट या चित्रपटातील फुनसूक वांगडूपेक्षा किती तरी पटीने अधिक सोनम यांचे कार्य आहे. स्वत: सोनमसुद्धा म्हणतात की, एकाद्या चित्रपटामुळे खरी माणसे ओळखली जातात, असे व्हायला नको आहे. पण आपल्या देशात परिस्थिती वेगळीच आहे. इथे नकलाकाराचा सन्मान केला जातो आणि जे खरे खणखणीत नाणे असते,ते मात्र दुर्लक्षित राहते.

     सोनम वांगचूक यांनी शिक्षणाची दिशा बदलली. पाठांतर, पुस्तक वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिणे या कागदी शिक्षणाला छेद देण्याचा प्रयत्न केला. मुलं जे शिकतात, ते त्यांना प्रत्यक्षात करता आले पाहिजे, व्यवहारात त्याचा उपयोग झाला  पाहिजे. तरच ती गोष्ट त्याला समजली असे होईल. असे शिक्षण सोनम वांगचूक यांच्या शाळांमध्ये दिले जाते. जी मुलं नापास होतात,त्यांच्यासाठी वेगळे वर्ग सुरू केले जातात. मुलं अभ्यासात कमी पडली असे नव्हे तर आपण त्यांना शिक्षण द्यायला कमी पडलो, असा त्याचा अर्थ सोनम लावतात. आज या शिक्षण संस्थांमधील मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत. काहींनी आपला स्वत:चा बिझनेस सुरू केला आहे. म्हणजे मुलांना समजेल, अशा प्रकारचे शिक्षण दिले तर मुलं ते लवकर ग्रहण करतात. त्यामुळे आपल्याकडची शिक्षणाची पद्धती बदलण्याची गरज अधोरेखित होते.
     शिक्षणाचा उद्देश फक्त डिग्री मिळवावी, असा असू नये, असे सोनम यांना वाटते. अशा या खर्या हिरोचे बालपण आणि शिक्षण काहीसे कष्टपद आहे. त्यांचे बालपण जम्मू-काश्मिरच्या लेह जिल्ह्यातल्या नयनरम्य परिसरात गेले. लडाखपासून काहीशा दूर असलेल्या अल्ची गावात त्यांचा जन्म झाला. या गावात एकही शाळा नव्हती. त्यामुळे त्यांना नवव्या वर्षांपर्यंत शाळेत जाता आले नाही. मात्र शिकलेल्या त्यांच्या आईने त्यांना घरीच शिकवले. वडील राजकारणी होते. नऊ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबासह ते श्रीनगरला आले. आईला मुलाच्या शिक्षणाची फार काळजी होती. त्यामुळे श्रीनगरमध्ये दाखल झाल्या झाल्या सोनमचे शाळेत अॅडमिशन केले.
     वांगचूक यांचे शाळेतले दिवस वाईटच होते. शाळेतील मुलांचा त्यांच्याशी असलेला व्यवहार हा फारसा चांगला नव्हता. त्यांचा तोंडावळाही वेगळा होता,त्यामुळे तिथल्या सहकार्यांची हा आपल्यातला नाही, अशीच भावना होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषेची अडचण. आई त्यांना लेहची स्थानिक भाषा शिकवायची,पण श्रीनगरला इंग्रजी किंवा उर्दू भाषेत शिकवले जायचे. त्यांना पुस्तकातले शब्द अजिबात समजायचे नाहीत. बोलतानाही मोठी अडचण यायची. ज्या ज्या वेळेला वर्गात सोनम यांना प्रश्न विचारले जायचे, त्या त्या वेळेला ते फक्त उठून गप्पगार उभे राहायचे. त्यांना हेच समजत नव्हते की, त्यांना काय विचारले जात आहे. त्यामुळे वर्गातली मुलं सोनमची खिल्ली उडवायचे. सगळेच म्हणायचे,हा मूर्ख आहे. कुणास ठाऊक कुठून आलाय हा मुलगा? सोनम शाळेतले ते दिवस आठवल्यावर आजही भावूक होतात.
     मात्र नंतर हळूहळू परिस्थिती बदलू लागली. भाषेची अडचणदेखील दूर होऊ लागली. वर्गातले काहीजण त्यांचे खास दोस्त बनले. अभ्यासाच्याबाबतीत त्यांचा दृष्टीकोन वेगळाच होता.  ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा होती. डिग्रीसाठी नाही. बारावीनंतर त्यांना मॅकेनिकल इंजिनिअरिंग व्हायचे होते. यावरून त्यांच्यात आणि वडिलांमध्ये वाद झाले. त्यांच्या वडिलांना आपला मुलगा सिव्हिल इंजिनिअर व्हावा, असे वाटत होते. वडिलांमध्ये सोनम आपल्या विरोधात जात असल्याची भावना निर्माण झाली.पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते.
     1987 मध्ये सोनम यांनी एनआयटी (श्रीनगर)मधून बीटेक पदवी मिळवली. इथेही घरच्यांना आपला मुलगा नोकरी करावा, असे वाटत होते. पण त्यांच्या मनात वेगळेच काही खदखदत होते. त्यांना त्यांच्या गावातले जुने दिवस आठवू लागले. ते लेहच्या बर्फाळ वाळवंटात राहणार्या मुलांना शिकवायचे होते. अशी मुलं, जी सुविधा नसल्याने शिक्षणापासून वंचित होती. डिग्री मिळवल्यानंतर ते आपल्या गावी लेहला परतले. इथे त्यांनी 1988 मध्ये स्टुडेंट्स एज्युकेशन अॅन्ड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाखची स्थापना केली. त्यांनी अशा मुलांना शिकवायला सुरुवात केली, जी शिक्षणात मागे आहेत. किंवा वारंवार एकाच वर्गात नापास होतात.
     त्यांचे हे अभियान यशस्वी झाले. त्यांच्या संस्थेतील शिकलेले विद्यार्थी पुढे इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ बनले. काही विद्यार्थ्यांनी आपला स्वत:चा बिझनेस चालू केला. आज ते मोठी प्रगती करत आहेत. सोनम वांगचूक सांगतात की, मला इंजिनिअरिंगमध्ये आवड होती. त्यामुळे मी बीटेक केले. आता मी या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करू इच्छितो. मला एक असे विद्यापीठ स्थापन करायचे आहे, जिथे मुलांनी ज्ञान मिळवायला हवे.
     सोनम यांनी 1994 मध्ये ऑपरेशन न्यू होप अभियान सुरू केले. याचे ध्येय होते, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. या दरम्यान सुमारे सातशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. याचे परिणाम चांगले समोर आले. लडाखमध्ये  दहावीत पास होणार्यांची टक्केवारी वाढली. यादरम्यान त्यांची अभिनेता अमिर खान यांच्याशी भेट झाली. त्यांच्या कार्यावर ते फार प्रभावित झाले आणि थ्री इडियट चित्रपटात अमिर खान यांनी जी फुनसुक वांगडू ही भूमिका साकारली, ती सोनम यांच्या जीवनावर आधारित होती.
     आणखी एक मोठं काम सोनम यांनी लडाख परिसरात केलं आहे. बर्फाच्छादित असलेल्या या प्रदेशात उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या मोठी होती. त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत मिळून विज्ञानावर आधारित हिमस्तूप बनवले. या नव्या अविष्कारामुळे जून-जुलै महिन्यातदेखील तिथल्या लोकांना पाणी मिळू लागले. त्यामुळे शेती करता येऊ लागली. कडाक्याच्या थंडीत बर्फाचे स्तुप बनवले जात आणि उन्हाळ्यात तेच स्तुप वितळून पाणी होई आणि त्याचा उपयोग लोकांना दैनंदिन वापरात होऊ लागला. वांगचूक सांगतात की, स्तूप बनवण्याची प्रेरणा मला चवांगच्या एका ग्रामीण नॉर्फेलपासून मिळाली. त्यांनी कृत्रीम ग्लेशियर्स बनवले होते. जवळ्पास 40 मीटर उंच स्तूपपासून 10 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता येते. याशिवाय त्यांनी लेहमधला परिसर  सोलर ऊर्जेपासून उजाळून टाकला आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. 2008 मध्ये त्यांना रीयल हिरो आणि 2017 मध्ये ग्लोबल अवार्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चरने गौरवण्यात आले आहे. परवाच त्यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

1 comment:

  1. 2008 मध्ये त्यांना रीयल हिरो आणि 2017 मध्ये ग्लोबल अवार्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चरने गौरवण्यात आले आहे. आशियाचे नोबेल ही ओळख असणार्‍या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने 2018 मध्ये सोनम वांगचुक यांचा गौरव करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर सरकारने 1996मध्ये राज्यपाल पदक देऊन त्यांना सन्मानित केले. सामाजिक उद्यमशीलतेसाठी 2017मध्ये त्यांना ‘दि जीक्यू मेन ऑफ दि इयर’ पुरस्कार तर अमेरिकेत 2016मध्ये दि रोलेक्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युनेस्कोच्या अध्यासनातर्फे ‘दि टेरा अ‍ॅवॉर्ड’ त्यांना देण्यात आले. सँक्च्युरी एशिया मॅगझीन, दि विक यांनीही वांगचुक यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार दिले. सीएनएन आयबीएन वाहिनीचा ‘रिअल हिरोज्’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

    ReplyDelete