Tuesday, July 17, 2018

रोजगार हिरावून घेतोय रोबोट


     लोकसंख्या जसजशी वाढते आहे, तसतशी रोजगाराची समस्यादेखील बिकट होत चालली आहे. भारत देश हा तरुणांचा देश आहे. मात्र या तरुणांकडे कुशलतेचा मोठा अभाव आहे. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशात आहे. मानव संसाधनसंबंधीत संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅन पॉवर ग्रुप या जागतिक संघटनेच्या टॅलेंट शॉर्टेज सर्वे 2018 च्या अहवालानुसार जगभरातील 45 टक्के उद्योजक, व्यावसायिक कुशल मनुष्यबळाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना लागणार्या उपयुक्त प्रतिभावंतांच्या कमतरतेला तोंड द्यावे लागत आहे. भारतातदेखील 53 टक्के नियुक्ती देणार्यांना त्यांच्या रिक्त जागांवर योग्य असे कर्मचारी मिळेनासे झाले आहेत.

     एकिकडे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत असताना दुसरीकडे रोजगाराबाबतीत दुसरीच चिंता तज्ज्ञांना सतावत आहे. आणि ही चिंता आहे,ती रोबोट म्हणजेच यंत्रमानवांची वाढत असलेली संख्या. सध्या विख्यात लेखक मार्टिन फोर्ड यांनी लिहिलेल्या रोबोट्सचा उदय,त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि रोजगारसंबंधी भविष्यातील धोके यासंदर्भातील पुस्तक जगभरात मोठ्या गंभीरतेने वाचले जात आहे. या चर्चित पुस्तकात मार्टिन फोर्ड यांनी म्हटले आहे की, टेक्नॉलॉजीचा अविष्कार असलेला रोबोट आगामी काळात अनेकांचे रोजगार हिरावून घेणार आहे. यात सामान्यांपासून वरच्या पातळीवरच्या कुशल मनुष्यबळांचादेखील समावेश असणार आहे.
     यापूर्वी आपण कथा-गोष्टींमध्ये वाचलेला आणि सिनेमात पाहिलेला रोबोट अर्थात यंत्रमानव याची फक्त कल्पनाच केली होती.परंतु, अल्पावधीतच ते सत्यात उतरले आहे. मात्र याच रोबोटमुळे 21 व्या शतकात जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या विस्ताराबरोबरच गेल्या कित्येक शतकांपासून चालत असलेले मनुष्यबळ आणि बौद्धिक श्रेष्ठत्व नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जगातल्या काही देशांमध्ये रोबोट सामान्य जनजीवन आणि उद्योग-व्यवसाय या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. काही देशांमधल्या हॉटेलमध्ये रोबोट जेवण बनवणारा आचारी बनला आहे, तर काही ठिकाणी ताटे लावणे, जेवण वाढणे अशी वेटरची कामे करताना दिसत आहेत.
     जगभरात सर्वाधिक रोबोटची संख्या जपानमध्ये आहे. जपानमध्ये जवळपास 3.50 लाख, अमेरिकेत पावणेदोन लाख तर चीनमध्ये एक लाखांपेक्षा अधिक रोबोट कार्यरत आहेत. भारतात रोबोटची संख्या 16 हजारांपेक्षा अधिक आहे. रोबोटची उपयुक्तता कमालीची असून तो कुठल्याही क्षेत्रात सफाईदारपणे काम करू शकतो. औद्योगिक क्षेत्रात कामगार, लष्करात सैनिक, सिक्युरिटी गार्ड, हॉटेलमधला कामगार अशा अनेक क्षेत्रात रोबोटचा वावर वाढला आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर त्याचे महत्त्व आणखीणच वाढले आहे. अवघड शस्त्रक्रियेसाठी सध्याला त्याचीच मदत अधिक होत आहे. सामान्यांपासून उच्च क्षेत्रापर्यंतच्या अधिकारी वर्गापर्यंत रोबोटने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे यांच्या रोजगारांवर गंडांतर येणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशांनादेखील या पुढच्या भविष्यकाळात याचा मोठा फटका बसणार आहे. जे लोक कॉम्प्युटर प्रशिक्षित नाहीत, त्यांच्या नोकर्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रशिक्षण, शिक्षण आणि कौशल्य या आघाडीवर रोजगार गमावण्याच्या संकटाकडे सगळ्यांनीच जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment