Sunday, July 1, 2018

अशा नौरा जन्माला याव्यात


       बालविवाह फक्त आपल्या देशाचा प्रश्न नाही तर अख्ख्या जगाची समस्या आहे. यात बिचार्या अल्पवयीन मुलींची मात्र होरपळ होत आहे. त्यांना अनंत यातनांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशात बालविवाह प्रथेला कायद्याने बंदी आहे.पण तरीही आपल्याकडे अल्पवयीन मुलींचे विवाह होतच आहेत. ज्या मुलींचे विवाह लहान वयात होतात, त्यांना नरकसमान यातना सोसाव्या लागतात. त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याच्या कहाण्या आपण ऐकतो, तेव्हा आपली मती सून्न झाल्याशिवाय राहत नाही. या जगात असे अनेक मागासलेले देश आहेत, पुढारलेले देश आहेत,पण तिथल्या मुलींच्या कहाण्याही काही आपल्या देशापेक्षा वेगळ्या नाहीत. शिकायची इच्छा असलेल्या पण जबरदस्तीने विवाहाला आणि शरीरासाठीच्या बळजबरीला सामोरे गेलेल्या सुदानमधल्या नौरा हुसेनची कथा आज जगभर गाजते आहे. बळजबरी करणार्या पतीचा खून केलेल्या नौरीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे,मात्र आंतरराष्ट्रीय दबावापुढे तिथल्या न्यायालयाला आणि सरकारला झुकावं लागलं आहे.तिच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. खरे तर तिला शिकून न्यायाधीश बनायचं होतं. आता तिला शिकायला आणि तिच्या इच्छेनुसार जगण्याची संधी मिळू शकेल, अशी आशा करायला हरकत नाही.
   
  सुदानमधल्या नील नदीच्या काठावर वसलेल्या एका गावात नौराचा जन्म झाला. हा प्रदेश दक्षिण खार्तूमपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. आठ भावा-बहिणींमध्ये तिचा दुसरा नंबर लागतो. तिच्या वडिलांचं हार्डवेअरचं दुकान होते. त्यांचा सांभाळ करायला त्यांची कमाई पुरेशी होती. नौरा शाळेला जाऊ लागली. तिच्या घराण्यात मुलींना जास्त शिकवण्याची परंपरा नव्हती. पण नौराने ठरवलं होतं की, आपण खूप शिकायचं आणि कोर्टात न्यायाधीश बनायचं.ही गोष्ट अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वीची आहे. 2015 मध्ये ती आठवीत शिकत होती. वय अवघं 14. तिच्या घरच्यांनी तिच्यापेक्षा 18 वर्षाने मोठ्या असलेल्या चुलत भावाशी म्हणजे अब्दुल रहमानशी विवाह ठरवला.
नौरा गोंधळली, घाबरली. तिने नवरा मुलग्याला सांगून टाकलं,मला आताच लग्न करायचं नाही. मला शिकायचं आहे. ही गोष्ट नातेवाईकांमध्ये पसरली. मग काय! त्यांनी गोंधळच घालायला सुरुवात केली. यापूर्वी कधीही कुठल्या मुलीने असा प्रकार केला नव्हता. अचानक एक दिवस मुलाकडंचे लोक आले आणि विवाहाची तयारी चालवली. नौरा सगळ्यांची नजर चुकवून घरातून पळाली आणि मावशीच्या घरात जाऊन थडकली. दोन दिवसांनी तिचे वडील तिला शोधत शोधत मावशीकडे आले आणि तिची कशी तरी समजूत घालून घरी घेऊन गेले. जबरदस्तीने तिचा विवाह करण्यात आला. तिने सासरी जायला नकार दिला. मामला शांत करण्यासाठी तिला माहेरी राहून शिक्षण घेण्यास परवानगी मिळाली.
       या दरम्यान तिचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले.लग्नाला दोन वर्षे झाली. समाज आणि नवर्या मुलाच्या घरच्याकडून मुलीला सासरी पाठवण्यासाठी दबाव येऊ लागला. शेवटी एप्रिल 2017 मध्ये तिला सासरी पाठवण्यात आले. नौराला शिक्षण सोडून सासरी राहणं मंजूर नव्हतं. तिने खाणं-पिणं सोडून दिलं. तिला नवर्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नव्हते.एके रात्री तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला,परंतु दरवाजाला बाहेरून कुलूप असल्याने तिला पळून जाता आले नाही. सासरी येऊन नऊ दिवस उलटले होते. त्या दिवशी अचानक नवरा तिच्या खोलीत आला. त्याच्यासोबत काही तरुणही होते. ते तिचे नातेवाईकच होते. त्यांनी तिचे कपडे फाडले. तिला जमिनीवर झोपवलं आणि त्यांच्या मदतीने नवर्याने तिच्यावर बलात्कार केला. हा तिचा सर्वात मोठा अपमान होता. नौरा सांगते की, हा अपमान मला माझ्या पुर्या आयुष्यात विसरता येणार नाही.
     नौराला नैराश्येने घेरले. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. दुसर्यादिवशी नवर्याने पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नौराने त्याला ताकीद दिली, माझ्या जवळ आलास तर मी स्वत:ला संपवून टाकीन. पण तो वेडापिसा झाला होता. त्याने बळजबरी करायला सुरुवात केली, तशी ती किचनमध्ये गेली आणि चाकू घेऊन आली. ती नवर्याला भीती घालणार होती,पण त्याने ऐकले नाही. शेवटी स्वत:च्या बचावासाठी तिने वार केले. यानंतर ती रक्ताने माखलेल्या कपड्यासह माहेरी आली. तिला अशा अवस्थेत पाहून आई-वडील दंग झाले. पोलिसांनी नौराला अटक केली. तिचे वडील हुसैन म्हणतात, आमच्याकडे मुलीचे कमी वयात लग्न ही सर्वसामान्य गोष्ट आहे.मी कधीच असे काही तरी भयंकर घडेल, असा विचार कधीच केला नव्हता.
     नौराच्या अटकेचे प्रकरण देशभर गाजले. खरे तर सुदानमध्ये कधी कुठल्या मुलीने लग्नाला विरोध केल्याची घटना घडली नव्हती. तिथे दहा वर्षाच्या मुलीच्या लग्नालादेखील मान्यता आहे. तिथे मेरिटल रेप गैरकानुनी नाही. 18 मे 2018 मध्ये तिला नवर्याच्या खूनप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नौरा न्यायालयात गळा फाडून सांगत होती की, मला खून करायचा नव्हता. मी फक्त बलात्कारापासून स्वत:ला वाचवत होती. पण तिच्या या लढाईमध्ये कोणीच तिच्या पाठीशी नव्हते.नातेवाईक, शेजारी-पाजारी तिलाच दोष देत होते. इथेच नव्हे तर तिचे आई-वडीलदेखील तिच्या मदतीला आले नाहीत. पण काही खासगी सं़घटनांनी तिला मदत केली. हॅशटॅग जस्टिस फॉर नौरा या नावाने एक ऑनलाईन अभियान राबवण्यात आले.हजारो लोक या अभियानाशी जोडले गेले. लोकांनी सरकारकडे नौराची शिक्षा रद्द करण्याची विनंती केली. काही दिवसांतच हे अभियान संपूर्ण जगभर पसरले. काही हॉलीवूड अभिनेत्रींनीदेखील नौराची शिक्षा रद्द करण्याची मागणी उचलून धरली. इतकेच नव्हे तर एमनेस्टी इंटरनॅशनलनेदेखील तिला वाचवण्यासाठी सक्रीय झाले. या संस्थेने सुदानवासियांना विनंती केली की, बहाद्दूर नौराचा बचाव करण्यासाठी त्यांच्या कायदेमंत्र्यांना संदेश पाठवावेत. हजारो लोकांनी मंत्र्यांना ई-मेल करून सांगितले की, प्रत्येक मुलीला शिकण्याचा अधिकार आहे. तिचा जबरदस्तीचा विवाह थांबवा. नौराला माफी देऊन समाजाला एक चांगला संदेश द्या.
      एमनेस्टी इंटरनॅशनल अधिकारी जोआन न्यान्यूकी म्हणतात की, सुदानमध्ये नौरासारख्या अनेक मुलींचा जबदरदस्तीने विवाह केला जातो. या मुली रोज बलात्काराचा दंश सहन करत आहेत. पण आवाज उठवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. नौराने हिंमत दाखवली. आम्हाला तिला मदत करावी लागेल. शेवटी जस्टिस फॉर नौरा अभियानाला यश आले आणि न्यायालयाने तिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आशा आहे, आता नौराला शिकायला आणि तिचे स्वप्न पूर्ण करायला संधी मिळेल. त्याचबरोबर सुदानमध्ये बालविवाह आणि मेरिटेल रेपमध्येसुद्धा बदल होईल, नक्कीच या दिशेने पावले उचलली जातील. त्यामुळे अन्य मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला स्वातंत्र्य मिळेल.

No comments:

Post a Comment