दहा वर्षाचा अर्णव अभ्यासात हुशार होता. शाळेतले आणि घरातले सगळेच त्याला जीव लावायचे.
आई तर त्याला जिवापाड जपायची. हादेखील आईची काळजी
घ्यायचा. आईला कुठं लागलं-खरचटलं तर लगेच
त्यावर फुंकर मारायला हजर असायचा.
सगळे आपापल्या विश्वात दंग होते. इकडे अर्णव मात्र
दिवसेंदिवस अबोल होत चालला होता. त्याचं काही तरी बिनसलं होतं.
एके दिवशी अर्णव शाळेतून घरी आल्या आल्या बाबांना म्हणाला,“ बाबा, मला लग्न करायचं आहे. माझं
लग्न लावून द्या.” बाबांनी पहिल्यांदा तर हसण्यावरीच नेले,पण त्याचा घोशा सुरूच होता. “अरे माझ्या बछड्या,
मोठा तरी हो, मग बघू.” पण
अर्णव काही ऐकायला तयार नव्हता.“बाबा,प्लिज...”
असं त्याचं चालूच होतं. शेवटी वैतागून त्याचे बाबा
त्याच्यावर जोराचे ओरडले.
अर्णव रडायला लागला. त्याची आई धावतच आली. त्याला जवळ
घेऊन मायेनं कुरवाळू लागली. बाबा रागाने म्हणाले,“ तुमच्या या लेकाला लग्न करायचं आहे म्हणे!पहिल्यांदा
तर हसून टाळण्याचा प्रयत्न केला,तर याचं चालूच... अगदी तुझ्या वळणावर गेला आहे.”
काही वेळाने बाबांचा राग शांत झाला. आपल्या मुलावर रागावल्याचा त्यांना पश्चाताप झाला. ते त्याच्या खोलीत गेले. त्याला उठवलं, त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले,
“ माझं जरा अतीच झालं.राग अनावर झाला बाबा.”
मग त्याच्याबरोबर खेळू लागले. “पण तुला लग्न का
करायचे आहे?” बाबा म्हणाले.
अर्णव म्हणाला,“ बाबा, तुम्हीच म्हणाला होतात ना
की, तुम्ही आईशी लग्न करून तिला इथं आणलं आहे. ती आल्यावर तुमची सगळी कामं आई करू लागली. तुम्हाला आराम
मिळू लागला. माझी बायकोदेखील माझी सर्व कामं करेल. माझा होमवर्क करेल. मी आराम करीन.” बाबा मोठ्यानं हसू लागले.
“आजीही म्हणते,तुझी आई आल्यापासून मीदेखील आराम करते. आई दिवस-रात्र काम करते. आईचं काही चुकलं तर तुम्ही तिला रागावता.
आजीदेखील कधी कधी आईचा रागं रागं करते. मी आईला
नेहमी म्हणतो, तू का नाहीस रागं रागं करत. कधी कधी तिचा मूड बिघडला तर ती मलाच रागावते.”
“बाबा, माझी
बायको येईल ना,तेव्हा आईलासुद्धा आराम मिळेल. कुणीच आईला कामात मदत करत नाही. म्हणून मी तिला मदत करणार
आहे.” बाबा विचारात पडले.
खरंच, सगळी चूक अर्णवची आहे की घरच्या अन्य सदस्यांची?
No comments:
Post a Comment