Saturday, July 14, 2018

(बालकथा) दोन साप


     राजा देवशक्तीला एक राजपुत्र होता. त्या राजपुत्राच्या  पोटात एक साप राहत होता. त्यामुळे तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. अनेक वैद्य केले,उपचार केले,पण काही फरक पडला नाही. निराश होऊन राजपुत्राने शेवटी आपले घर सोडले. तो भटकत भटकत आणि भीक मागून खात दुसऱ्या देशात पोहचला. 
एका मंदिरात राहू लागला.

तो ज्या राज्यात गेला होता, तिथल्या राजाचे नाव होते बाली. त्याला दोन तरुण राजकन्या होत्या. त्या रोज सकाळी वडिलांना नमस्कार घालायच्या. वडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यावर त्यातली पहिली कन्या म्हणायची,"महाराजांचा विजय असो, आपण सर्वजण गुण्यागोविंदाने  राहू या."
दुसरी म्हणायची,"महाराज, आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळो."
राजा बालीला  दुसऱ्या मुलीचे बोलणे खटकायचे. शेवटी एक दिवस त्याने वैतागून त्या मुलीचा विवाह मंदिरातील त्या भिकाऱ्याशी लावून दिला. राजकन्येला असा पती मिळाला म्हणून काहीच वाईट वाटले नाही. ती आनंदाने त्याच्यासोबत मंदिरात राहू लागली. मोठ्या मनोभावे पतीची सेवा करू लागली. 
एके दिवशी राजकन्या पतीला सांगून भोजन सामानाची व्यवस्था करण्यासाठी स्वतः नगरात गेली. राजपुत्र भिंतीला टेकून झोपी गेला. तो झोपलेला पाहून त्याच्या पोटात राहत असलेला साप तोंडावाटे बाहेर आला आणि मोकळी हवा खाऊ लागला. 
याच दरम्यान जवळच असलेल्या बिळात राहत असलेला दुसरा सापही बाहेर आला. तो त्याला म्हणाला," राजकन्येला कुणी तरी जुन्या मोहरीची कांजी   पाजायला सांगितल्यास तू लागलीच मरून जाशील." 
पोटात राहणाऱ्या सापानेदेखील त्याच्या रहस्येचा भेद केलाच! म्हणाला,"तूझ्या बिळात उकळते तेल ओतल्यास तूसुद्धा पटकन मरून जाशील व बिळातले धन सगळे राजकन्येला मिळेल. " 
राजकन्या नगरातून परत आली होती आणि लपून त्यांच्यातला संवाद ऐकत होती. तिने दोघांनी सांगितलेला उपाय एकमेकांना अंगीकारला आणि दोन्ही सापांचा नायनाट केला.
पोटातला साप मेल्याने राजपुत्राची तब्येत सुधारू लागली. तर बिळातला साप मरून पडल्यावर त्यातले धन बाहेर काढले. आता ते खूप मोठे श्रीमंत झाले.  राजकन्या आता  तंदुरुस्त, देखण्या पतीसोबत ऐशोआरामात, सुखाने राहू लागली.
म्हणतात ना , एकमेकांचे भेद खोलू नये, नाही तर दोघांचेही मोठे नुकसान होते.

No comments:

Post a Comment