Saturday, July 14, 2018

(बालकथा) क्रोधाचा पाठ


     एका गुरुकडे पाच शिष्य शिकायला होते. एके दिवशी गुरु त्यांना एक पाठ शिकवत होते. पाठ होता,'क्रोधाला जिंका'.  पाठ शिकवून झाल्यावर गुरुजींनी सर्वांना विचारले,"पाठ सगळ्यांना समजला का?"
एकाला सोडून सगळ्यांनी एका सुरात म्हटले,"हो गुरुजी , समजले."
पण सगळ्यांत वयाने कमी असलेल्या शिष्याने सांगितले,"गुरुजी, पाठ माझ्या काही ध्यानात आला नाही."
गुरुजींनी आश्चर्याने विचारले,"काय रे,तुला इतका साधा-सुधा पाठ समजला नाही?"
त्या शिष्याचे उत्तर होते,"नाही!"

त्यांनी त्याला पुन्हा एकदा समजून सांगितले. तरीही त्याने आपल्याला पाठ समजलाच नाही, असे सांगितले.
गुरुजीँना आता राग आला. क्रोधाने ते ओरडले," तुझ्या डोक्यात बुद्धी आहे का भुस्सा! एवढा साधा पाठ कळत नाही तुला?"
गुरुजी पुढे म्हणाले,"तुला दोन वेळा समजून सांगून ही समजत नसेल,तर मग तुझ्यापुढे अवघड आहे. उद्या एकदा समजून सांगेन.नीट लक्ष देऊन ऐकायचं."
दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुजींनी त्याला पाठ समजून सांगितला आणि विचारलं,"समजलं का?"
पुन्हा त्या शिष्याने तेच सांगितले,"मला नाही समजले." मग मात्र गुरुजींचा तोल गेला. म्हणाले,"आता तुला शिक्षाच करावी लागेल." 
गुरुजी जाग्यावरून उठले. त्यांनी त्याच्या हातावर दोन छड्या दिल्या.शिष्य गपचीप उभा राहिला. पुन्हा म्हणाले,"आता समजलं का?"
"हो,समजलं." शिष्य म्हणाला.
"तुला अगोदरच छडीने शिक्षा करायला हवी होती. म्हणजे तुला लवकर समजलं असतं."
"तसे नाही,गुरुजी!माझा माझ्यावरच विश्वास नव्हता.आपण पाठ मोठ्या प्रेमाने शिकवलात,पण जर कोणी प्रेमाने वागत असेल तर राग कसा येणार? त्यामुळे कोणी कठोर शब्दांत बोलला तर कदाचित क्रोध येईल,असे वाटले. पण तुम्ही मला तुझ्या डोक्यात भूसा भरला आहे का,असे म्हणालात,तरीही मला क्रोध आला नाही. मग मनाशी म्हटले, जर कोणी ताकदीचा उपयोग करेल तर कदाचित क्रोध येईल. आणि आता तुम्ही शिक्षा केलीत,तेव्हाही मला राग आला नाही,तेव्हा मला खऱ्या अर्थाने पाठ लक्षात आला असे वाटले म्हणून मी होय म्हणालो."
गुरुजींनी शिष्याला हृदयाशी धरले.

No comments:

Post a Comment