सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता नाही, अशी ओरड सतत होत राहते. यात तथ्यांश असल्याचेही काही गोष्टींवरून स्पष्ट होते. याला काही प्रमाणात शिक्षकांमध्ये शाळा व विद्यार्थीप्रति नसलेली आत्मियता, नसलेला एकोपा, त्याचबरोबर शिक्षकांमधला अहंगंड, एकमेकांविषयी असलेली असुया, राजकारण्यांच्या दबावाने दबलेली प्रशासन व्यवस्था आदी गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. शाळा म्हणजे एक कुटूंब आहे, याचा लवलेशसुद्धा काही शाळांमध्ये दिसून येत नाही.
एका तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेतला अनुभव पाहायला मिळाला. तिथे खटणार्या अनेक बाबी पाहावयास मिळाल्या. या शाळेतल्या शिक्षकांमध्ये विशेषतः शिक्षिकांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड असुया असल्याचे जाणवले. आपण मुलांसाठी आहोत, त्यांच्यासाठीच एका कालमर्यादेत काम करणार आहोत. शिक्षकी पेशा ही एक सामाजिक बांधिलकी आहे, याचा तिथल्या शिक्षकांना विसर पडल्याचे जाणवत होते. उलट 'ती उशीरा येते, मग मी का लवकर येऊ? तिने आज रजा भोगली , उद्या मी रजेवर जाणार... तिचा वर्ग मी का सांभाळू ? ती कुठे माझा वर्ग सांभाळते? तो नुसताच फिरतो... त्याला तुम्ही काहीच का म्हणत नाही? असे एक ना धड अनेक प्रश्न घेऊन आपल्या वरिष्ठांशी सतत तंडताना पाहिले. प्रभावी अध्यापन अथवा सर्जनशीलतेच्या प्रभावी सोज्वळ दर्पापेक्षा पैशाचा दर्प त्यात डोकावत असल्याचे जाणवायचे. पालकांशी संपर्क ठेवताना प्रसंगी त्यांच्या दारापर्यंत जाणे ओघानेच आले. पण इथे मात्र मुलाला घरी पाठवून पालकालाच शाळेत बोलावण्याचा अट्टाहास! सभोवतालच्या सामान्य व उच्च मध्यमवर्गियांच्या कुटुंबांची मुले शाळेत नाहीतच. गावाबाहेरची, झोपडपट्टीतील रोज राबून खाणार्यांची मुलं या शाळेत होती. आपल्या परिसरातील मुलं आपल्या शाळेत यावीत, असा विचारही त्यांच्या मनाला शिवत असावा की नाही कोण जाणे! खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आजूबाजूला पेव फुटले असताना शाळा अपात्र होण्याची आणि आपल्याच एखाददिवशी बोर्या-बिस्तरा दुसर्या शाळेत हलवावा लागणार, याची अजिबात भीती नसलेली मूर्दाड शिक्षक मंडळी पाहायला मिळाली.
अशी शिक्षकांची मानसिकता का झाली आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. आपले कर्तव्य न पाळणारा आणि तो पाळत नाही म्हणून मी तरी का पाळावं, अशी मतलबी मानसिकता तयार झालेल्या शिक्षकांकडून कुठली अपेक्षा करायची? असे शिक्षक रोजच्या पाट्या टाकण्यापलिकडे दुसरे ते काय करणार? त्यांच्यात मुलांप्रती मायेचा ओलावा कसा बरे येणार? त्यांच्या समस्या , त्यांच्या गुणावगुणांचा थांगपत्ता कसा लागणार? मुलांमधील सर्जनशीलता, त्याच्या सर्जनशीलतेआड येणारी परिस्थिती अथवा अन्य काही समस्यांचा उकल कशी होणार? व त्यातून मुलाला बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणताना, त्यांच्यातील कलागुणांचा विकास तो कसा साधला जाणार? आज सर्वांगिण गुणवत्ता विकास आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला जात असतानाच शिक्षणाचा अधिकार कायदा शाळांच्या उंबरठ्या आत आला आहे. असे असताना दांड्या मारणारा शिक्षक आणि त्याची असुया करत बसणार्या शिक्षकालासुद्धा शाळेत लवकर येण्याची चूक केली, असे का वाटावं? असा हा सवाल आहे.
राजकारण्यांच्या जीवावर नुसतीच शाळा करणार्या शिक्षकांमुळे खरोखरीच शाळा होईल, काय? असा प्रश्न आहे. शिक्षकांची कर्तव्ये, शिक्षणाचा अधिकार याविषयी पालक जागृत होत असताना शिक्षक मात्र स्वतःच्या मतलबात मश्गुल असावेत, हेच मोठे दुर्दैव आहे. शिक्षक स्वतःच आनंदापासून कोसो दूर असल्यावर मुलांना कुठले आनंददायी शिक्षण मिळणार? अशाने का नाही जाणार मुलं खासगी शाळांकडे? आज कामाच्या मागे धाव धाव धावणार्या पालकांना मुलांसाठी वेळ द्यायला सवड नाही. चांगली ट्यूशन, चांगली शाळा यासाठी पैसे मोजण्याची पालकांची तयारी असते. खासगी शाळांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जात असल्याने तिथे खूप चांगले शिक्षण मिळते, असा पालकांना वाटत असते. वास्तविक आजच्या घडीला अभ्यासापेक्षा विविध उपक्रमांवर भर देण्याची आवश्यकता असल्याने पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे.
प्राथमिक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानातून भौतिक सुविधा मिळाल्या आहेत. पण गुणवत्ता वाढली नाही. सरकारी शाळांमध्ये अपवाद सोडल्यास विविध उपक्रमांच्या नावाने ठणाणाच असतो. आपापसातील मतभेद, असुया , मी आणि माझा वर्ग अशा कोषात प्राथमिक शिक्षक अडकल्याने सरकारी शाळांमधील गुणवत्ता दिसत नाही. ओरडून विकणार्याच्या एरंडयाच्या बिया विकल्या जातात, मात्र गप बसणार्याचे गहूसुद्धा विकत नाहीत, असा आजचा जमाना आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये राबवलेल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळायला हवी. नव्हे प्रसिद्धीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपापसातील मतभेद विसरून, शाळा एक कुटुंब आहे, असे समजून सेवावृत्तीने काम करीत राहिल्यास सरकारी शाळा पुढे गेल्यासशिवाय राहणार नाहीत.
सगळीकडे कामे करणार्यांचा व न करणार्यांचा गट असतो. न करणार्यांकडे कानाडोळा करून आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आपल्याला कामासाठी मोबदला पगाराच्यारुपाने मिळत असतोच, पण शिक्षक म्हणून आपले आणखी एक मोठे कर्तव्य आहे, याचे भान सतत ठेवायला हवे. देशाची भावी पिढी शिक्षकाच्या हाती आहे, त्यांना चांगला, सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
राजकारणाचा शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे. त्यांना हाताशी धरून काही करता येऊ शकत असेल तर कशाला कामकरण्याची उसाभर करा, अशी मनोवृत्ती वाढली आहे. पैसे फेकले की राजकारण्यांच्या वरदहस्ताने पाहिजे तिथे सोयीस्कर अशी बदली करून घेता येते, ही मानसिकता तयार झाल्याने शाळांमध्ये निव्वळ पाट्या टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील गुणवत्ता घसरल्याची, जी ओरड सुरू आहे, ती योग्यच आहे.