Friday, December 30, 2011

लोभ आणि महत्त्वाकांक्षा

     लोभ आणि महत्त्वाकांक्षा समाजात मोठी विषमतेची दरी उत्पन्न करीत असते. याचा प्रत्यय देणारा हा एक प्रसंग. कुटुंब कल्याण विभागाचे कर्मचारी गावच्या सरपंचांकडे गेले. थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यातला एक कर्मचारी म्हणाला," आम्ही एका विशेष कामाच्या उद्देशाने आपल्याकडे आलो आहे. आपण गावातले एक जबाबदार व्यक्ती आहात. कुटुंब नियोजन आज व्यक्ती, समाज, राष्ट्र सर्वांसाठीच मोठी गरज बनली आहे. आम्हाला सांगितलं गेलंय की, आपल्याला सहा मुलं आहेत. त्यामुळे कुटुंब नियोजनाची सुरुवात सर्वात प्रथम  आपल्यापासूनच व्हावी, असं आम्हाला वाटतं. "
     सरपंच विचारात पडले. मग म्हणाले," तुमचं म्हणणं बरोबर आहे. मलाही ते पटतं. पण माझ्या मनाची मात्र मोठी घालमेल सुरू आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एका ज्योतिषाने  माझी कुंडली आणि भाग्यरेखा पाहून  अशी एक गोष्ट सांगितलीय की, त्या गोष्टीची मला पदोपदी आठवण येते.  त्यामुळे मी आता त्या दिवसाचीच वाट पाहण्याचं ठरवलं  आहे." 
     अधिकार्‍यांनी आश्चर्याने विचारलं," ज्योतिषाने काय सांगितलं होतं आपल्याला? तुमचं भाग्य उजळणार असेल तर फारच छान. तसं असेल तर मग त्यातलं थोडं आमच्याही वाट्याला येऊ दे. आम्हीसुद्धा वाट पाहात राहू."
     सरपंच म्हणाले," ज्योतिषाने सांगितलं आहे की, तुमचा नऊ नंबरचा मुलगा मंत्री होणार आहे. त्यामुळे मी नवव्या मुलाची वाट पाहात आहे. " कुटुंब कल्याण विभागाच्या कर्मचार्‍यांची तोंडेच बंद झाली. नवव्या मुलाच्या मंत्री होण्याच्या लालसेपोटी माणूस हित- अहित या गोष्टींकडे पाहतच नाही. तो गरिबी, दु:ख, अडचणी, संकटे सगळे सगळे झेलेल, परंतु नवव्याचा लोभ त्याला चिंतन करण्याची संधीच उपलब्ध  करून देणार नाही.

No comments:

Post a Comment