भ्रष्टाचाराचा मुद्दा गेले वर्षभर अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सतत चर्चेत राहिला. भ्रष्टाचार निर्मूलन हा खरे म्हणजे राजकीयदृष्ट्या दुर्लक्षितच राहिला आहे, हे त्यासंबंधीच्या ४२ वर्षे प्रलंबित बिलावरून स्पष्ट होते. ते बिल २२ डिसेंबर २०११ रोजी लोकसभेत सादर झाले. त्यासाठी प्रखर अण्णा-आंदोलन झाले; त्याला मोठ्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाईलाज म्हणून सरकारने लोकपाल बिल आणले. या आंदोलनाचे पुढे काय व्हायचे ते होवो, पण आपण तरी या नव्या वर्षाच्यानिमित्ताने काही संकल्प करू या. कदाचित लोकपाल बिलाचा कायदा झाला तरी भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन होईलच, असा कोणाचाही दावा नाही. भ्रष्टाचाराचा थेट संबंध नैतिक पतनाशी आणि विनाशकारी लोभाशी आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर मनोवृत्तीत बदल होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराची कीड समाजाची घडी विस्कटून टाकतच राहणार आहे. नववर्षाचा संकल्प यादृष्टीने स्वयंसुधारणेच्या वाटेवरचे एक पाऊल ठरू शकतो. मी लाच देणार नाही; किंबहुना लाच द्यावी लागेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, असा संकल्प सामूहिकरीत्या व्हायला हवा. हा संकल्प नक्कीच सोपा नाही. चिरीमिरीशिवाय जिणे नाही, त्याच्याशिवाय जीवन नाही. आपण सवयीचे गुलाम झालो आहोत. पण तरीही संकल्प तडीस न्यायला काहीच हरकत नाही. कुठलीही गोष्ट झटक्यात होत नाही. त्याला यथावकाश लागतो. त्यामुळे तुमच्या कामाला विलंब लागला तरी चालेल पण, हा संकल्प सोडू नका. परिस्थिती बदलयाचे आपल्याच हाती आहे. आंदोलन केले, पाठिंबा दिला, सरकारला शिव्या घातल्या म्हणजे भ्रष्टाचार संपत नाही. सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी, नाही का?
No comments:
Post a Comment