Saturday, January 7, 2012

विजेची बचत

गेल्या काही वर्षांत कोळसा व पाण्याची कमी उपलब्धता यामुळे औष्णिक वीजनिर्मितीचे दर भरमसाट वाढले. लोकसंख्या वाढ, बदलती जीवनशैली, कारखाने यामुळे विजेच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली. मागणी व पुरवठा यांच्यात तफावत पडू लागली. या सर्वांचा परिणाम म्हणजे दरवाढ व नियंत्रित वापर करूनही वीज बिले  वाढतच जात आहेत. उन्हाळा आला कि, पाण्याची पातळी खाली जाते., वीज संच निकामी होतात, नित्कृष्ट दर्जाच्या कोळशामुळे वीजनिर्मितीत घट होते,  अशा अनेक बातम्या चर्चेत येतात व मग आपणही अस्वस्थ होतो. आपण सगळ्यांनीच थोडा विचार करून काळजीपूर्वक कृती केल्यास पैशाची बचत तर होईलच, पण त्याचबरोबर नैसर्गिक ऊर्जास्रोतांचीही बचत होईल, जी सध्या काळाची गरज आहे.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आपण सर्वानीच ऐकली आहे. त्यानुसार काही छोटय़ा सहजसाध्य कृतींमधून महिन्याचे वीजबचतीचे उद्दिष्ट सर्वाना नक्कीच गाठता येईल. जसे :
घरातील विद्युत उपकरणे म्हणजे टी. व्ही. मिक्सर, संगणक, म्युझिक प्लेअर आदी वापरात नसताना प्लगपासून बंद करावीत.
एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिवे, पंखे बंद करण्याची सवय अवश्य लावून घ्यावी. शक्य असेल तेव्हा घरातील सर्वानी एकाच ठिकाणी बसून काम करावे.
फ्रीज वापरताना वारंवार दार उघडू नये. सर्व वस्तू एकाच वेळी बाहेर काढून घ्याव्यात. बंद करताना दार पूर्णपणे बंद झाले आहे याची शहानिशा करावी.
वॉशिंग मशीन नेहमी भरपूर कपडे धुवायला असतानाच वापरावे.
 पावसाळी वातावरण वगळता भारतासारख्या भरपूर सौर ऊर्जेच्या देशात ड्रायरची काहीच गरज नाही. कपडे उन्हात वाळवणेच श्रेयस्कर ठरते.
पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जा किंवा गॅसगीझर योग्य ठरतात. इलेक्ट्रिक गीझर भरमसाट वीज वापरतात.
फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी अन्न गरम असल्यास पूर्णपणे गार होऊ द्यावे.
पंखा बंद करून खिडक्या उघडय़ा ठेवून घरात हवा खेळती ठेवता येते.
कामातून अर्धा तास ब्रेक घेणार असाल तर टय़ुबलाईट्स, संगणक मॉनिटर बंद करून ठेवावे.
* गडद पडदे लावून घरातील उन्हाची तीव्रता कमी केल्यास कूलर किंवा ए.सी. अधिक चांगल्या प्रकारे घर थंड करू शकतात.
घरातील टंगस्टन दिवे बदलून त्याऐवजी सीएफएल वापरावेत. यामध्ये ५० ते ६० टक्के वीज बचत होते. तसेच त्यांचे आयुष्यही साधारणत: दहापट जास्त असते.
घरातील सर्व सदस्य बाहेर जात असल्यास पंखे, दिवे, उपकरणे बंद करूनच जावे.
आपल्याबरोबरच लहान मुलांनासुद्धा ऊर्जा बचतीसाठी सवय लावायला हवी. त्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. अन्यथा आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हे म्हणण्याची वेळ येईल.
मुलांनीदेखील दिवा-पंखे बंद करणे, फ्रीज नीट बंद करणे, टी. व्ही., संगणक  वापरून झाल्यावर तात्काळ पूर्णपणे बंद करणे या सवयी जबाबदारीने आत्मसात कराव्यात.
* सार्वजनिक ठिकाणी जसे कार्यालयात, शाळा-महाविद्यालयात, प्रवासात सर्व सुज्ञ नागरिकांनी ऊर्जा बचतीच्या राष्ट्रीय धोरणाची जाणीव ठेवावी.
भारतासारख्या देशात सौर उर्जेचा व इतर ऊर्जा प्रकारांचा वापर वाढायला हवा, जेणेकरून औष्णिक विजेवरील आपले अवलंबन कमी होईल.
पहिला-दुसरा मजला चढून जाताना लिफ्टची काहीच गरज नसते. उलट  पायऱ्यांचा वापर केल्यास ऊर्जेची बचतही होईल व व्यायामही आपसूकच घडेल.
शक्य असल्यास घराबाहेरील इमारतीतील दिवे सुरू-बंद करण्यात टाइमर लावून घ्यावेत. यामुळे दिवे ठरावीक वेळी सुरू-बंद होऊन विजेची हमखास बचत होईल.
आपण सर्वानीच येत्या काळात वीज बचतीच्या या सहजसाध्य कृती अमलात आणल्या तर विजेची मोठी बचत होईल, यात आपले, आपल्या देशाचेच हित आहे.

No comments:

Post a Comment