Saturday, January 28, 2012

पोलिस यंत्रणा आधुनिक व्हायला हवी

      आता गुन्ह्यांचे स्वरुप बदलत चालले आहे. पूर्वी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे घडत्.या गुन्ह्यातले गुन्हेगार, त्या गुन्ह्यामागील पार्श्वभूमी- कारणे स्थानिक स्वरुपाची असायची. पण अलिकडच्या काळात गुन्ह्यांच्या पद्धतीत फार मोठा बदल झाला आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा कट हद्दीच्या बाहेर रचण्यात येत आहे. शिवाय गुन्ह्यामागची कारणेसुद्धा स्थानिक राहिलेली नाहीत. समाजातील गरीब्-श्रीमंतीची दरी वाढत चालल्याने आणि चैनीची सवय लागत चालल्याने पैशासाठी वाट्टेल ते, करायला तयार झालेली तरुण पिढी आप्त-स्वकीय, मित्र ही नातीगोती विसरून कोणतेही स्तर गाठायला तयार झाला आहे. गरीब - श्रीमंत याबरोबरच बहुसंख्य आणि अल्पसंख्याक अशी दरीही वाढत चालली आहे. अनैतिक गोष्टी बळावल्या आहेत. राग-द्वेष यांना सीमा राहिलेली नाही. बदलाची भावना तीव्र झाली आहे. अशात गुन्ह्यांची संख्याही वाढत चालली आहे. गुन्हे करून नामानिराळे राहण्याच्या उद्देशाने अथवा गुन्हा यशस्वी व्हावा, यासाठी गुन्हेगारांनी गुन्ह्याचे स्वरुपच बदलून टाकले आहे.
     आधिनिक तंत्रज्ञान, हत्यारे यांचा वापर वाढला आहे. मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान ही आता गुन्ह्तातील प्रभावी साधने बनत चालली आहेत. मोठमोठ्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी तशी मोठी यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांचा वापर हो ऊ लागला आहे. बॉम्बस्फोटसारख्या घटनांचा तपास करतानाही पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. याचा अर्थ पोलिसांना ही गुन्ह्यांची नवी आव्हाने अवघड चालली आहेत, असे दिसायला लागले आहे. काही गुन्ह्यातील सूत्रे राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशातून चालवली जात आहेत. अशा वेळेला पोलिस यंत्रणा नक्कीच दुबळी ठरत आहे. अशा हद्दीपलिकडील गुन्ह्यांचा तपास आपल्याकडील पोलिस यंत्रणा कसा करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी वेगळी यंत्रणा विकसित करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
      पोलिस यंत्रणा अद्ययावत, प्रशिक्षित  करण्याची आवश्यकता आहे. केवळ पोलिसांची संख्या वाढवून चालणार नाही. स्थानिक पोलिस, शहर पोलिस, राज्य व अन्य गुप्तचर यंत्रणा यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. ग्रामीण भागातल्या पोलिस यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असायला हव्यात. कारण गुन्हेगार ग्रामीण भागात वास्तव्य करून आपले इप्सिप्त साध्य करू पाहात आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीसारख्या ठिकाणी लैला नावाच्या पाक अभिनेत्रीकडे सॅटालाईट फोन यंत्रणा मिळून आली आहे. अद्याप तिच्याबाबतचा तपास सुरू असला तरी गुन्हेगार ग्रामीण भागात येऊन पोहोचला आहे, याचे भान यायला हवे आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ याची पोलिस खात्याला नितांत गरज आहे. नव्याने भरती होणार्‍या पोलिस कर्मचारी- अधिकार्‍यांना सायबर गुन्ह्यांचा अधिक अभ्यास असणे गरजेचे आहे.
     इंटरनेट हा भविष्यातील गुन्ह्यांचा मोठा दुवा असणार आहे. त्यामुळे इंटरनेटवरून पाठविण्यात येणारे संदेश, ई-मेल्स, अन्य डाटा सामुग्री यांच्यावर गोपनीय पद्धतीने लक्ष ठेवणारी व यातील अधिकाधिक गोष्टीची जाण असणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान कौशल्यावर पोलिस विभागाची 'कमांड' असायला हवी. हद्दीपलिकडील गुन्ह्यांच्या तपासाऐवजी अशा प्रकारची गुन्हेगारी कशी रोखता येईल, यावर भर देण्याच्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली पाहिजे. सायबर गुन्ह्यातल्या अधिकाधिक गोष्टी परदेशी यंत्रणांकडून जाणून घ्यायला हवे आहे.
     पोलिस खात्यात ताणतणाव वाढला आहे. या पोलिसांचा सारा वेळ आपल्या राजकारण्यांच्या, मंत्र्या-संत्र्यांच्या संरक्षणासाठी , त्यांचे दौरे पार पाडण्यातच अधिक जात आहे.  पोलिसांकडे आधुनिक हत्यारांची कमतरता आहे. पोलिस यंत्रणा सर्वदृष्टीने सक्षम करण्याबरोबरच पोलिसांच्या आरोग्याचा, ताणतणावाचा प्रश्नही विचारात घेतला पाहिजे. या खात्यात आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणातही पोलिस कर्मचार्‍यांची पुरेसी संख्या नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. साधनेही आधुनिक नाहीत. त्यामुळे पोलिस यंत्रणा आधुनिकतेची झूल पांघरण्यात अद्याप पिछाडीवर आहे. तेव्हा वाढत चाललेले सायबर गुन्हे कशी रोखली जाणार,असा संतापजनक सवाल उपस्थित होतो. यंत्रणेत आधुनिकता आल्याशिवाय  यंत्रणा सक्षम होत नाही,  'गुन्हेगार पुढे आणि काठी घेऊन पोलिस मागे' ही जुनी ओळख पोलिसांनी घालवायला हवी आहे.   

No comments:

Post a Comment