कुख्यात डॉन दाऊद, शकील, मोहम्मद सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोट्यवधीची अवैध माया जमविणाऱ्या आणि ऐशोआरामात आयुष्य जगणार्या दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दाऊद या चिंधीचोराच्या मुसक्या आवळून त्याची घरवापसी करण्याचा चंग तपास यंत्रणानी बांधला आहे, हेच यावरून दिसून येत आहे. मात्र याला कितपत यश मिळेल, हे पाहावे लागणार आहे.
टेरर फंडिंग संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. त्यानुसार मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठय़ा घटना घडवण्यासाठी मागील चार वर्षांत हवालामार्फत सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांची रसद दाऊदने भारतात पाठवली. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये पाठवले. दाऊद, शकील, मोहम्मद सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. त्याचबरोबर रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी एका 'डर्टी मनी' हा कोड वर्डचा वापर करण्यात येत होता. आरोपपत्रात म्हटले आहे की, मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठय़ा घटना घडवण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलने दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये पाठवले. एनआयएच्या आरोपपत्रानुसार हा पैसा सुरतमार्गे भारतात आला होता आणि नंतर मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना पोहोचवले. डी गँग अथवा छोटा शकीलच्या नावाने सलीम फ्रूट हा खंडणी गोळा करत असे. एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणीबाबतची तक्रार नोंदवल्यानंतर सलीमला अटक करण्यात आली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईक देखील आहे. त्याच्या माध्यमातून खंडणीचा पैसा देशाबाहेर जात असल्याचा आरोप आहे.
तसेच, एनआयएने केलेल्या दाव्यानुसार, शब्बीरने 5 लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. एनआयएने सांगितले की, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ए-2 (शब्बीर) कडून 9 मे 2022 रोजी त्याच्या घरावर करण्यात आलेल्या जप्तीदरम्यान 5 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. पैसा दोन्ही बाजूंनी भारतातून फायनान्सर्सकडे जात होता. यात विशेषत: खंडणीच्या पाच स्वतंत्र घटनांची यादी केली आहे. एकामध्ये, आरिफ आणि शब्बीर यांच्यामार्फत हवालामार्फत एका दशकात साक्षीदाराकडून सुमारे 16 कोटी रुपये उकळले गेले.दरम्यान, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून भारतात दंगल घडवण्याचा कट रचत असून त्याने दंगल सेल स्थापन केला आहे. दाऊदचे दिल्ली, मुंबई आणि देशातील मोठी शहरे आणि बडे राजकारणी लक्ष्य असल्याचे आरोपपत्रात उघड झाले आहे. तसेच दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड माफियांच्या मदतीने भारतातील तरुणांना ड्रग्जच्या माध्यमांतून पोकळ करण्याचा कट पाकिस्तान रचत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणार्या विविध यंत्रणांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
अंडरवर्ल्डच्या कारवाया टोकाला पोहोचल्या असताना दाऊदने संपूर्ण मुंबईवर आपली दहशत निर्माण केली होती. 1990 च्या दशकांत दाऊदने दक्षिण मुंबई पासून ते वसई-विरार पर्यंत आपले साम्राज्य वाढविले होते. तर तो दुबईत बसुन मुंबई चालवित होता. दक्षिण मुंबईत त्याने छोटा शकील तसेच हसिना पारकरच्या सहाय्याने कारभार पाहण्यास सुरुवात केली होती. मध्य मुंबईत रमा नाईकने दाऊदच्या वर्चस्वाखाली काम करण्यास सुरुवात केली होती. पूर्व उपनगरांत छोटा राजनने. दाऊदकरीता वर्चस्व निर्माण केले होते. पश्चिम उपनगरात भाई ठाकुरने दाऊदच्या नेतृत्वाखाली दहशत निर्माण केती होती. अशा प्रत्येक ठिकाणी आपले खास हस्तकं नेमून दाऊदने दहशत निर्माण केली होती. यावेळी दहशतीला घाबरुन अनेक सरकारी बाबु, राजकीय नेते तसेच पोलीस यंत्रणा देखील दाऊदसाठी काम करीत होते. मात्र वेळोवेळी दाऊद टोळीत फूट पडत होती. फुटलेले त्याचेच गँगस्टर त्याच्या जिवावर उठत होते. अशावेळी दाऊदने एक तर पोलिसाना त्यांची टिप देऊन त्यांचा एन्काऊंटर केला अथवा गँगवॉर घडवून आणत त्यांचा खात्मा केला. अशातच दाऊदने त्याचे खास हस्तक असलेले छोटा राजन आणि शकीलला दुबईला बोलावून घेतले.
येथुन दाऊदने पून्हा एकदा मुंबईसह संपूर्ण देशांत गुन्हेगारी वाढविण्यास सुरुवात केली. यादरम्यान, प्रत्येक समुद्री किनाऱ्यावर आणि गोदीत दाऊदसाठी काम करणारी एक फळी निर्माण झाली. त्याकाळी सागरी मार्गाने मोठ्या प्रमाणांत तस्करी होत असे. सागरी किनाऱ्यावर ज्याचे वर्चस्व त्याचे देशातील सर्व वैध-अवैध व्यवसायावर राज्य. हे माहीत असल्याने, दाऊदने देशातील सर्व समुद्र किनाऱ्यावर लँडिंग एंजट नेमले होते. या लँडिंग एजंटची यादी त्याकाळी पोलीस दलाकडे आली असताना देखील म्हणावी अशी ठोस कारवाई त्याकाळी करण्यात न आल्याने, भविष्यात 12 मार्च 1993 सालचा साखळी बॉम्बस्फोट घडून आला. रत्नागिरी, बाणकोट खाडीत बशीर अहमद करीम मांडलेकर हा दाऊदचा लँडिंग एजंट होता. रायगड, दिघी खाडी येथे माजीद मेनन, रत्नागिरी आणि मुंबई परिसरात जॉनी दाढी उर्फ जॉन पोबलस, मुंबई, रुईया पार्क, जुहु येथे बस्त्याव, गुजरात, जामनगर या ठिकाणी मामूमियॉ पंजूमियो. आणि सुजाद मियॉ, भट्टी व्हिलेज, आकसा, मुंबई येथे कोळी, मुंबई, कफ परेड, ससुन डॉक जॉन लंबु, तर मुंबई, डॉक्स आणि न्हावा-शेवा
फजल आणि मॅकबल, मुंबई, घड्याळ गोदी परिसरात मोहम्मद अली उर्फ ममद्या, कर्नाटक आणि केरळ येथे अत्ता मलबारी हे लँडिंग एजंट दाऊदसाठी काम करीत होते. या लँडिंग एजंटच्या मदतीनेच रायगड येथे सागरी मार्गाने पाकिस्तानातून आरडीएक्स अणि शस्त्रसाठा आला होता. तो शस्त्रसाठा टायरग मेमनच्या माहीम येथील गॅरेजमध्ये आणून संपूर्ण शहरात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यानंतर दाउदने पाकिस्तानात पळ काढला. आजतागायत तो पाकिस्तानात लपून बसला आहे. मात्र वेळोवेळी पाकिस्तान याला नकार . देत आहे. कारण पाकिस्तानची 80 टक्के अर्थव्यवस्था ही दाउदच्या अवैध व्यवसायावर अवलंबून आहे. दाउदने अमेरिका, ऑस्टेलिया, आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडात मोठ्या प्रमाणांत अवैध व्यवसाय सुरु केले आहेत.
शस्त्रांची तस्करी, डरॅग्जचा व्यवसाय, अवैध भंगार व्यवसाय, सुपारी किलिंग आणि रिअल इस्टेट अशा प्रकारच्या व्यवसायात दाऊदने कित्येक कोटींची माया जमविली आहे. यातील काही संपत्ती तो स्वत:च्या सुरक्षेसाठी पाकिस्तान तसेच आखाती देशांना देत आहे. तसेच तो कराची येथील ज्या क्रिप्टन एरियात राहतो त्याचा पत्ता देखील भारतीय तपास यंत्रणानी वेळोवेळी पाकिस्तान आणि युनोला दिले आहेत. मात्र सातत्याने नकारघंटेचा बुरखा पाकिस्तानने ओढून घेतला आहे. त्याला नाही म्हटले तरी अमेरिका, चीनची फूस आहे. कारण अमेरिकेला स्वत:चे आशिया खंडातील हितसंबध जपण्यासाठी पाकिस्तानची आवश्यकता आहे. मात्र ज्या दाऊदने भारतीय भूमीवर आतापर्यंत अनेक दहशतवादी संघटनांचा आधार घेत जो नरसंहार केला आहे. त्याची गणती नाही. अशाच प्रकारचा नरसंहार अमेरिकन भूमीवर झाला असता तर अमेरिका शांत बसली असती का? हे 9/11 च्या हल्ल्याच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. कारण या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या ओसामा बिन लादेन आणि अलजवाहिरी या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने किती वर्षे अफगाणिस्तानात काढली हे जगाला माहीत आहे. मात्र ज्यावेळेस दाऊदचा संबध येतो, त्यावेळेस अमेरिका देखील मुग गिळून गप्प बसत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र, आपल्या तपास यंत्रणा देखील हातावर हात ठेवून शांत बसल्या नाहीत. त्यांनी देखील. दाउदच्या मुसक्या आवळून घरवापसी करण्याचा चंग बांधला आहे. यामध्ये अग्रेसर आहे ती राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए). नुकतेच एनआयएने दाउदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर छोटा शकील दाऊदचा भाऊ अनिस यावर 20 लाख. तसेच 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला टायगर मेमन आणि अब्दुल रउफ सारख्या गँगस्टरवर 15 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत दाऊदची मुसक्या बांधुन घरवापसी करण्याची रणनिती तपास यंत्रणांनी आखली आहे. दाऊदला पाकिस्तानातून मुसक्या आवळून आणणे एवढे सोपे नाही. गेली 29 वर्षे दाउदला पकडण्यासाठी तपास यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. मात्र अद्याप त्यांना यश आले नाही. तरी देखील तपास यंत्रणा शांत बसल्या नाहीत. दाउदला पकडण्यासाठी त्या जंग जंग पछाडत आहेत. नुकतेच काही माहिन्यांपूर्वी एनआयएमध्ये दाखल झालेले महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यानी दहशतवादी संघटना तसेच दाउदच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच दाउदवर बक्षीस जाहीर करण्याचे हे त्यांच्याच रणनितीचे एक पाऊल म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दाऊद नावाची किड देशात आणुन त्याचे समुळ नष्ट केल्याशिवाय इतर गुन्हेगार अथवा गुन्हेगारी संघटनाना आळा बसणार नाही. यासाठी दाऊदच्या मुसक्या आवळून त्याची घरवापसी करणे आवश्यक आहे.