Monday, December 7, 2020

बरोबरीचा हक्क मिळवणार


इव्हलिना कॅब्रेरा (फुटबॉल कोच आणि मॅनेजर)

आजपासून जवळपास 34 वर्षांपूर्वी अर्जेंटीनाच्या सन फेर्नांडो शहरात एका सामान्य कुटुंबात इव्हलिना कॅब्रेराचा जन्म झाला. इव्हलिनाचे बालपण फारच खडतर गेले, कारण तिच्या आई-वडिलांमध्येच कसला ताळमेळ आणि सुसंवाद नव्हता. मुलाला जी माया,प्रेम आणि आपलेपणा मिळायला हवा, तो इव्हलिनाला मिळाला नाही. आईवडिलांचे दिवसेंदिवस बिघडत चाललेले नाते आणि कौटुंबिक कलह या कलुषित वातावरणात ती मोठी होत होती.

शेवटी ते वळणही आलंच आणि इव्हलिनाच्या आईवडिलांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती फक्त 13 वर्षांची होती. सगळ्यात क्लेशदायक गोष्ट म्हणजे दोघांपैकी कुणीही मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली नाही. खरे तर ही निष्ठुरतेची परिसीमा होती. इव्हलीनाने तर आयुष्य काय असतं, हेही ठिकपणे जाणलं नव्हतं आणि तितकं तिचं वयही नव्हतं. अशा काळात तिच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. तिने घर सोडलं. प्रश्न होता-जायचं कुठं? जन्म देणाऱ्या आई-वडिलांनीच साथ सोडली होती, तिथं मग दुसरं कोण विचारणार? साहजिकच अशा लावारिस लोकांचा आश्रयदाता म्हणजे फुटपाथ. तिने या फुटपाथचा आश्रय घेतला.

इव्हलिनाला एका विखुरलेल्या कुटुंबाचे परिणाम भोगणे भाग होते. पुढची चार वर्षे तिने अक्षरशः रस्त्यावरच काढली. या चार वर्षानं तिला बरंच काही शिकवलं. पोटात भूक असताना कसं जगायचं आणि ती कशी शेअर करायची, हे ती रस्त्यावरच शिकली. वेदनेचं नातं रक्त संबंधापेक्षा अधिक कणखर का असतं? अशा परिस्थितीत एकमेकांची काळजी कशी राखली जाते, ही सगळी शिकवण तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण ज्यांनी जन्माला घातलं होतं, त्यांनी 13 वर्षांपासून तिला ओझंच मानलं होतं आणि संधी मिळताच स्वतःपासून दूर लोटून दिलं.

आई-वडिलांनी कधी मागं वळूनही पाहिलं नाही की, इव्हलिना काय करते, कसल्या परिस्थितीत आहे. जगण्यासाठी काही तरी कामधाम करायला हवं होतं, पण एका किशोरवयीन मुलीला  कोण काम देणार? बालमजूर विरोधी कायदा यासाठी परवानगी देत नव्हता. इव्हलिना रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांची निगरानी करू लागली. गाड्या पुसू लागली. या मोबदल्यात तिला जी 'टीप' मिळायची, त्यातूनच ती तिचा गुजारा करायची. त्या दिवसांत एका मुलाने तिला खूप मदत केली. तिची काळजी घेतली. तिला एक चांगला आधार मिळाला. पुढे दोघांत चांगली मैत्री झाली. त्याचे प्रेमात रूपांतर झाले. इव्हलिना खूप आनंदी होती आणि ते स्वाभाविकही होते. ती आता एका नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत होती. पण तिच्यासाठी संकटं तयारच होती.

एक दिवस बॉयफ्रेंडशी कसल्याशा कारणाने वाद झाला आणि त्याने इव्हलिनाला खूप वाईटपणे मारहाण केली. आई-वडिलांनी सोडल्यानंतर जितका त्रास झाला नाही, त्याहून अधिक धक्का तिला बॉयफ्रेंडच्या अशा वागण्याने बसला. 13 वर्षांच्या वयात तर तिने भविष्याबाबत कसली स्वप्नंही पाहिली नव्हती,पण या खेपेला तिच्या मनात स्वप्नांचे इमले बांधले जात होते. पण या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. इव्हलिना वाईट प्रकारे मोडून पडली. तिला वाटू लागलं की, ती एक अवांछित मुलगी आहे आणि जिच्यावर कुणीच प्रेम करत नाही.निराशात तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला,पण ती त्यातून बचावली.

आयुष्य पुन्हा एकदा प्रश्न बनून उभे राहिले. आता काय? याच काळात एक दिवस तिने कुठे तरी टीव्हीवर पाहिलं की, व्हीलचेअरवर बसलेली मुलगी श्वास घेण्याच्या  मशीनबाबत विचारणा करत होती. ते दृश्य पाहून इव्हलिनाला काय झालं कुणास ठाऊक- ती हमसून हमसून रडली. स्वतःला प्रश्न केला-अखेर मी काय करायला निघाली होती? माझ्याजवळ तर सर्व काही आहे, पण त्या मुलीकडे कधीच काही असणार नाही. मग मी का आयुष्यापासून पळून जाते आहे. इव्हलिनाने त्याचवेळी निश्चय केला की, ती तिचं आयुष्य बदलणार.

तिने आपलं लक्ष्य निश्चित केलं आणि सर्वात पहिलं मोठं काम केलं, ते म्हणजे नालायक बॉयफ्रेंडला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. त्यावेळी इव्हलिना वयाच्या 17 च्या उंबरठ्यावर होती. खूप काही विचार केल्यावर ती तिच्या वडिलांच्या घरी परतली. मुलीला वाऱ्यावर सोडलेल्या बापाने क्षमा मागून तिचे स्वागत केले. 21 व्या वर्षी ती एका सोफा बनवण्याच्या कारखान्यात मॅनेजर पदावर पोहचली. तिथेच तिच्या मनात फुटबॉलविषयी आकर्षण निर्माण झाले. ती नोकरी सोडून शाळेत पोहचली. कारण पदवी घेऊन पर्सनल ट्रेनर बनता येणार होते. यानंतर काही काळानंतर ती क्लब आतलेतिको प्लॅटेंसेला पोहचली. 2012 पर्यंत ती तिथे फुटबॉल खेळाडू म्हणून जोडून राहिली. इव्हलिना जेव्हा 27 वर्षांची झाली,तेव्हा तिने 'असोसिएशन फेमेनिना द फुटबॉल अर्जेंटीनो’ या   महिला फुटबॉल क्लबची अर्जेंटिनमध्ये सुरुवात केली. पुरुषांचा दबदबा असलेल्या या खेळात इव्हलिनाच्या या प्रयत्नांमुळे मुलीही या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या आणि तिची जगभर प्रसिद्धी झाली. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्रने तिला तिचा अनुभव शेअर करण्यासाठी आमंत्रित केले. अर्जेंटीनाला जर डिएगो माराडोना आणि लियोनेल मेस्सीचा अभिमान असेल तर त्यांना इव्हलिना कॅब्रेरावर देखील नाज असायला हवा.इतकं तिने या क्षेत्रात काम केलं. महिला फुटबॉल अजून जगात मागे असले तरी इव्हलिना कॅब्रेरा म्हणते की, आमचे भविष्य जेंडरमुळे ठरणार  नाही, तर आम्ही ते निश्चित करणार आणि आम्ही तो बरोबरीचा हक्क मिळवल्या शिवाय राहणार नाही.

Sunday, December 6, 2020

संस्कृतचा तो जर्मन वेडा


मॅक्स मूलर- विख्यात संस्कृत विद्वान 

संस्कृतचा तो वेडा लंडनमध्ये लोकांच्या मेहरबानीवर टिकून होता. आर्थिक परिस्थितीही अशी नव्हती की, आरामात राहून संशोधन करावं.कसं तरी जहाजात बसून पहिल्यांदा समुद्र दर्शन करत लंडनमध्ये पोहोचला होता. त्यानं ऐकलं होतं की, लंडनमधल्या ग्रंथालयांमध्ये संस्कृत ग्रंथ पाहायला मिळतील. 1846 चं साल सुरू होतं. संस्कृतचा देश असलेल्या भारत देशावर ब्रिटिश व्यापाऱ्यांची ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती आणि युरोपमध्ये सगळ्यांना ठाऊक होतं की, ही कंपनी भारतातून बहुमूल्य वस्तू लुटून आपल्या देशात आणत होती. त्यात संस्कृतच्या जुन्या-पुराण्या ग्रंथांचाही समावेश होता. लंडनमध्ये पंधरा दिवस राहून आपल्याला हव्या त्या ग्रंथांवर अभ्यास करून परत जायचं, या इराद्याने आलेला तरुणाला महिना उलटून गेला तरी आपले ध्येय खूपच दूर आहे, याचा साक्षात्कार झाला. लीडेनहॉल स्ट्रीट स्थित लाइब्रेरीमध्ये संस्कृतचा एकादा गद्य-पद्याचा तुकडा जरी मिळाला तरी त्याला  ते समजून घ्यायला कित्येक तास लागायचे. पण त्यातून एक वेगळाच आनंद मिळायचा. आजूबाजूच्या लोकांना जे अजिबात माहीत नाही, ते आपल्याला ठाऊक आहे, याचा आनंद खरा तर वेगळाच असतो.
लंडनमध्ये पाऊल टाकले, तेव्हा त्याच्या खिशात जेमतेम फक्त पंधरा दिवस पुरतील ,एवढेच पैसे होते,पण लोकांच्या मदतीमुळे कसा तरी महिना काढता आला. आता पुढे काय? पण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी अप्रत्यक्षपणे मदत केली आहे, त्यांचे आभार तर मानावे लागणारच होते. ज्या दिवशी खायचे वांदे होतील, त्यादिवशी परत जर्मनीला जायचं,पण तोपर्यंत संस्कृतमधलं जितकं जाणून घेता येईल,तितकं घ्यायचं असा त्याचा इरादा पक्का होता. जर्मनीला माघारी परतायचा दिवस कधी येईल, सांगता येणार नव्हतं, म्हणून त्याने आपल्या मदतगारांना भेटून घेण्याचं ठरवलं. अशातलेच एक मदतगार होते, बेरोन बनसेन. ते मूळचे जर्मनचे असले तरी प्रुशियन साम्राज्याचे कुटनीतीतज्ञ होते. त्या युवकाने विचार केला की, राजदूत आहेत, मोठी असामी आहे, भेटणं सभ्यपणाचं आहे, म्हणून तो भेटायला गेला. विद्वान असलेले बेरोन बनसेन त्याच्याशी मोठ्या उत्साहाने भेटले. त्याला इतकी मोठी व्यक्ती एका सामान्य युवकाशी अशी भेट देईल,याची कल्पनाही नव्हती.बनसेन यांना ठाऊक होतं, हा तरुण संस्कृतमध्ये काहीतरी शोधतो आहे. विषय निघाला आणि ऋग्वेदची चर्चा झाली. बनसेन यांनी सांगितलं की, ते त्यांच्या तरुणपणी त्यांचं एक स्वप्न होतं-भारतात जाणं आणि ऋग्वेद पाहणं, वाचणं- समजून घेणं, पण कामाच्या व्यापात ते राहूनच गेलं. त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य युरोपातच अडकून पडलं. वय थकत गेलं आणि आता या वयात कसं जाणार भारतात आणि कसं शिकणार संस्कृत? शेवटी ते स्वप्नच राहिलं.
तो तरुण आपल्या यजमानाचं संस्कृत प्रेम पाहून चकित झाला.बनसेन यांच्याही आनंदाला पारावर उरला नव्हता की, असा कुणी तरुण ,जो आपल्यासारखाच आहे आणि संस्कृतच्या शोधासाठी आपला देश सोडून या देशात आला आहे. त्याला ऋग्वेदबाबत माहिती आहे. बनसेन अगदी मोकळ्या मनानं म्हणाले, तुला माहीत आहे का, या जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेद आहे.आणि तू ऐकलं आहेस का,त्याचा पहिला जादुई श्लोक -'ॐ अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्' आहे. (हे अग्नि स्वरूप परमात्मा,या यज्ञाद्वारा मी आपली साधना करत आहे. सृष्टी अगोदरदेखील आपणच होतात आणि आपल्या अग्निरूपामुळेच सृष्टीची रचना झाली. हे अग्निरूप परमात्मा, आपण सर्वकाही देणारे आहात. आपण प्रत्येक क्षणी आणि ऋतुमध्ये पुज्यनीय आहात. आपणच आपल्या अग्निरुपाने जगातल्या सर्व जीवांना नकळत सगळ्या वस्तू देणारे आहात...)
लंडनमध्ये दोन संस्कृतप्रेमी मोडक्या-तोडक्या श्लोक आणि त्याच्या अर्थावर खूप काळ चर्चा करत राहिले. बनसेन खास करून ऋग्वेदवर फिदा होते. त्यांची खात्री होती की, हा ज्ञानाचा खजिना जग बदलू शकतो,पण मिळायचा कुठं?बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आली की, बनसेन यांच्यापेक्षा संस्कृत साहित्याबाबत अधिक माहिती युवकाकडे आहे. दोघांच्या हृदयाच्या तारा जुळल्या. त्या तरुणासाठी बनसेन यांच्या हृदयाचाच नव्हे तर घराचा दरवाजादेखील कायमचा उघडला गेला. तो क्षण तरुणासाठी लाखमोलाचा ठरला. बनसेन यांच्या रूपाने त्याला आणखी एक वडील मिळाले. सख्ख्या वडिलांना  तो अवघा चार वर्षांचा असताना पारखा झाला होता. संपन्नता आणि प्रेम याने बनसेन यांनी त्याला आश्वाशीत केलं. परकं वाटणारं लंडन त्याचं आपलं झालं. मॅक्स मूलर (1823-1900) ने ऋग्वेदवर त्याला समजेल आणि समजावून सांगता येईल, अशा पद्धतीने  गांभीर्याने काम सुरू केलं. त्याला बनसेन यांचे भेटणं म्हणजे प्रत्यक्षात भारत भेटल्यासारखं झालं. पण खंत अशी की, मॅक्स मूलर कधीच भारतात येऊ शकले नाहीत. इंग्रजांकडून त्यांना भारतात पाठवलं गेलं नाही, कारण भारतीय ज्ञानाच्या या प्रशंसक-तपस्वीला कथित श्रेष्ठतम इंग्लंडमधून भारतात पाठवण्याचे त्यांचे काही धोके होते.
संस्कृत आणि भारतीय विद्येवर मॅक्स मूलर यांनी असं काही त्याग आणि समर्पणने काम केलं की, स्वामी विवेकानंदांनीही त्यांना ऋषितुल्य असल्याचं म्हटलं. आज संपूर्ण जग त्यांना संस्कृत उपासक म्हणून ओळखतं. असं सांगितलं जातं की,जेव्हा ग्रामोफोनचा आविष्कार झाला आणि पहिल्या रिकॉर्डिंगसाठी मॅक्स मूलर यांना काही तरी बोलायला सांगितलं गेलं, तेव्हा मूलर यांच्या मुखातून जगातल्या पहिल्या ग्रंथाचा तोच पहिला श्लोक निघाला-ॐ अग्निमीले पुरोहितं...

Saturday, December 5, 2020

शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित व्हायला हवे


शिक्षण हे पुस्तकात किंवा चार भिंतीत नाही तर खुल्या नैसर्गिक वातावरणात आहे,याचा वस्तुपाठ देणार्‍या सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर बेतलेला अमिरखानचा 'थ्री एडियट' या चित्रपटातील फुनसूक वांगडूपेक्षा किती तरी पटीने अधिक लडाख येथील सोनम वांगचूक यांचे कार्य आहे. मात्र हा चित्रपट गाजला आणि मग आपल्या देशाचे लक्ष या सोनम वांगचूक यांच्याकडे गेले. स्वत: सोनमसुद्धा म्हणतात की, एकाद्या चित्रपटामुळे खरी माणसे ओळखली जातात, असे व्हायला नको आहे. पण आपल्या देशात परिस्थिती वेगळीच आहे. इथे नकलाकाराचा सन्मान केला जातो आणि जे खरे खणखणीत नाणे असते,ते मात्र दुर्लक्षित राहते. अशीच परिस्थिती 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेले रणजितसिंह डिसले यांच्याबाबतीत घडली आहे. 

डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना ‘क्यूआर कोड’ची जोड देऊन शिक्षणात ‘डिजिटल क्रांती’ करण्याचा प्रयोग केला. ’या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. तब्बल ८३ देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.’त्याचबरोबर अस्थिर राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. याची दखल घेऊन युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांनी संयुक्त विद्यमाने डिसले यांना सात कोटींचा  ‘ग्लोबल टीचर'  पुरस्कार दिला आहे. वार्की फाऊंडेशनने म्हटलंय की, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी डिसले यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची शाळेतून गळती थांबली आणि बालविवाहाला आळा बसला.  जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या या शिक्षकाला सात कोटींचा हा पुरस्कार मिळाल्याने देशात सध्या सर्वांच्याच तोंडी त्यांचे नाव आहे, मात्र श्री. डिसले यांना देखील हीच खंत आहे. ते म्हणतात,'जगाने मोठे म्हटल्यानंतर आपणही मोठे म्हणण्याची भारतीयांची मानसिकता हे आपले अपयश आहे. शिक्षकांचे महत्त्व, त्यांचे काम, त्यांचा सामाजिक दर्जा यांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षकांची गुणग्राहकता आणि योगदानाला मान्यता मिळायला हवी.' प्राचीन काळात किंवा इतिहासात शिक्षकाला मानसन्मान होता. राजदरबारात राजा पेक्षाही त्यांना उच्च स्थान होते. पण स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे परिस्थिती बदलली. अध्यापनापेक्षा त्याला अन्य कामे देऊन शिक्षणाची वाट लावण्याची व्यवस्था निर्माण झाली. घरोघरी जाऊन जनगणना ते गावातल्या स्वच्छतागृहांची गणना करायला लावून व निवडणुकांच्या कामात गुंतवून शिक्षकाचा मानसन्मान मातीमोल केला. आता तर ग्रामपंचायत सदस्य किंवा कालचा सरपंच झालेला पोरगा शिक्षकांवर डाफरतो तेव्हा शिक्षक निर्भयपणे अध्यापन कसे करतील आणि हेच शिक्षक मुलांमध्ये धाडस कसे निर्माण करतील,असा प्रश्न आहे. 

आज शिक्षक शिक्षणात नवे तंत्रज्ञान आणून नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देतानाच शिक्षणाची प्रक्रियाही सुलभ करून टाकली आहे. पण या शिक्षकांना 'डिझिटल शिक्षण' देण्यासाठी माफक दरात वीज आणि इंटरनेट उपलब्ध करून द्यायला सरकारे तयार नाहीत. मग विद्यार्थी तरी काय नवीन शिकणार? नोकरीची दालने आता बदलली आहेत. तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये आत्मसात करण्याची काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र पूर्ण ढवळून काढण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याची अपेक्षा असली तरी आधी शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची गरज आहे.  

 भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. तशा भौतिक सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून द्यायला प्राधान्य द्यायला हवे. खरे तर परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता भारतात प्रचंड लोकसंख्या हा प्रमुख अडसर असल्याचे दिसते. परदेशात १८ ते २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते, तर भारतात हेच प्रमाण ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्त करणे कठीण आहे; परंतु अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो. हे डिसले शिक्षकांनी दाखवून दिले आहे. मात्र हे करीत असतानाही शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवण्याची गरज आहे. मंत्री, पुढाऱ्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार वा त्यात हस्तक्षेप असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. केवळ पाठय़क्रम पूर्ण करण्यापुरतेच शिक्षकांचे काम नसावे, तर उद्दिष्टे पूर्ण करताना शिक्षकांना जे प्रयोग किंवा उपक्रम राबवायचे आहेत, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

प्रयोगशील शिक्षकाला प्रोत्साहन मिळणे ही आज खरी गरज आहे. तो दिवस कधी येतो, हे आता पाहायला हवे.सध्या तरी हे चित्र लांब आहे, असेच दिसते. राज्याचा विचार केला तर अजूनही शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. राज्यातील दहा लाखांहून अधिक संख्येने असलेल्या या शिक्षकांचा उपयोग अध्यापनाव्यतिरिक्त अन्य सरकारी कामांसाठी करून घेण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. हे थांबायला हवे. अशी सरकारी कामे बिनबोभाट होण्याने, राज्यातल्या शिक्षणव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होत असेल याची काळजी कुणाला नाही, हे स्पष्टपणे दिसते.राज्यातील शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस रोडावते आहे. नव्याने शिक्षकभरती करतानाही केवळ आर्थिक कारणांमुळे अडचणी येत आहेत. अशा अवस्थेत शिक्षकांना त्यांची कल्पनाशक्ती उपयोगात आणण्यासाठी पुरेशी उसंत मिळायला हवी. त्यासाठी त्यांच्या डोक्यावर असलेली अन्य अशैक्षणिक कामांची टांगती तलवार निमूटपणे काढून घ्यायला हवी. शिक्षणावरील खर्च अनुत्पादक असल्याचा आरोप करणे सोडून ‘अत्यावश्यक’ या सदरात शिक्षणाची गणना करायला हवी. त्यासाठी सरकारने आपली मानसिकताच बदलायला हवी. कॉम्प्युटर ज्ञानाच्या जोरावर शिक्षक शिक्षणात बदल घडवत आहेत. त्यांना 'डाटा ऑपरेटर' म्हणून त्याला सरकार, प्रशासनाने भलत्याच कामात गुंतवू नका, असेही सांगावेसे वाटते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, December 1, 2020

बेरजेत नसलेले मध्यमवर्गीय


शाळेतले शिक्षक वर्गात दंगा करणाऱ्याला चांगलं ओळखतात,पण तिथेच गप्प बसणाऱ्या मुलाचे नावदेखील माहीत नसते. तशीच काहीशी अवस्था आज मध्यमवर्गीय लोकांची झाली आहे. आता इथे मध्यमवर्गीय म्हणजे नेमका कुठला वर्ग असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यासाठी पहिल्यांदाच खुलासा करतो. जे इन्कम टॅक्स भरत नाही,पण ज्याच्या घरात फ्रीज,कुलर आहे असे. अशी एकूण संख्या देशात जवळपास 45 कोटी आहे. म्हणजे यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे लोक फार कुठल्या भानगडीत पडत नाहीत. आपण भलं आणि आपलं काम भलं, या कॅटॅगिरीतील ही माणसं. यांना वाटलं तर ही मंडळी मतदान करायला जातील, नाही तर बाहेर कुठे फिरायला किंवा घरात बसून चांगलंचुंगलं करून खात बसतील. जसे हे कुणाच्या भानगडीत पडत नाहीत, तसे यांच्याकडेही कुणी फारसं लक्षही देत नाहीत. ही माणसं 'कामापुरता मामा' असतात,पण यांना ज्यांनी कुणी ओळखलेलं असतं, ते यांचा लाभ घेतल्याशिवाय (म्हणजे लुटल्याशिवाय) राहत नाहीत. कारण ही माणसं फार अडचणीतही सापडत नाहीत. मात्र अशा लोकांची अवस्था कोरोना काळात 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी झाली आहे. या लोकांना सर्वाधिक त्रास झाला आहे, मात्र यांच्या गप्प बसण्याच्या सवयीमुळे त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत  नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात गरीब लोकांना धान्य वाटले. त्याहून गरिब असलेल्या लोकांच्या खात्यावर पैसे टाकले. अर्थात याचा किती फायदा झाला, हे ज्याचे त्याला माहित,पण या मध्यमवर्गीय लोकांना यातला कसलाच लाभ झाला नाही. इतकंच काय! टाळेबंदीच्या प्रारंभी काही उदार, समाज सेवेची आस असलेल्या सामाजिक-राजकीय लोकांनी धान्य व इतर घरगुती वापराच्या वस्तू गरिबांना वाटल्या.तेही या लोकांच्या पदरात पडल्या नाहीत. कारण घरात 'फ्रीज" आहे, काहींच्या घरात 'एसी' आहे. बाहेर जाऊन कसं मागायचं? लक्ष तर कोण देणार? पण कोरोना काळात सर्वाधिक हाल आणि त्रास याच लोकांना झाला आणि अजून होतो आहे. अनेकांच्या या काळात नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाले, धंदा-व्यवसाय बुडाला. ज्यांचं वय 40-45 आहे, अशा लोकांना दुसरी नोकरी मिळणं अवघड. पण तरीही हा वर्ग शांतच!
आपल्याकडे आपलं खरं इन्कम कुणी सांगत नाही. शेतकरी तर त्याचा थांगपत्ताही लागू देत नाही. त्यामुळे आपल्या देशात गरीब-श्रीमंत या मधला आकडा शोधून काढणं, मोठं कठीण आहे. मात्र इन्कम टॅक्स न भरता (प्रामाणिक नोकरदार सोडून) मजेत जगणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, हे मात्र निश्चित. आता हे कसं ? सन 2016 मध्ये राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेक्षण या नावाने सुमारे सहा लाख घरांचा सर्व्हे करण्यात आला होता. यानुसार देशातल्या 30 टक्के लोकांकडे रेफ्रिजरेटर (फ्रीज) आणि 20 टक्के लोकांकडे एसी किंवा कुलर असल्याचं आढळून आलं होतं. शिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा पूर्वोत्तर प्रदेशात खूप कमी लोक फ्रीजचा वापर करतात. या फ्रीजचा आधार घेतला तर जवळपास 33 टक्के म्हणजे (जवळपास 45 कोटी) लोक मध्यमवर्गीय आहेत. म्हणजे बघा, इतक्या मोठ्या लोकांकडे सरकार चक्क दुर्लक्ष करतं. आणि आता सगळ्यात वाईट अवस्था या वर्गाची चालली आहे. लाखो लोकांचा रोजगार गेला आहे, कुणाच्या पगारात कपात झाली आहे. अनेक उद्योग-व्यवसायाची अवस्था खराब झाली आहे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही लोकांकडे पैशाची कमतरता नाही, पण वेतन कपातीमुळे त्यांचीही अडचण झाली आहे. या लोकांचे सुमारे 40 टक्क्यांपर्यंत पगार कपात करण्यात आली आहे. तरीही ही माणसं कुठलीही तक्रार न करता जीवन जगत आहेत. हा वर्ग 30 ते 40 वर्षे वयोगटाचा आहे. अनेकांनी आपल्या ऐपतीनुसार होम लोन,कार लोन काढलं आहे. यांना आई-वडिलांचा सांभाळ करायचा आहे. मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचंही आहे. चांगली शाळा म्हटलं की, वारेमाप फी आलीच. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे किती पैसा उरला असेल. आणि आज महागाईचं तर काय सांगायचं - ती अगदी गगनाला भिडली आहे. नित्योपयोगी जिनसांच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. शिवाय या वर्गात काही वयस्कर लोकही आहेत. अशा लोकांना पुन्हा नोकरी कशी मिळणार? या लोकांना एकादे व्हीझिटिंग कार्ड काढून त्यावर 'सल्लागार' म्हणून लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आता आरोग्य यंत्रणा पुढारली असल्याने ही माणसं आणखी 30-40 वर्षे तर आरामात जगतील. मग या लोकांनी पुढं काय करायचं? हात-पाय हलताहेत तोपर्यंत ठीक आहे, पण तिथून पुढे काय? पण ही माणसं आपली पीडा प्रदर्शित करत नाहीत. राजकीय लोक यांच्याकडे पाहातही नाहीत.कारण ही मंडळी त्यांचे 'व्होट बँक' नाहीत. सरकारी नोकरदार त्याचं ठीक चाललं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सेवा निवृत्तीनंतर जगायला साधन आहे. अलीकडे जुनी पेन्शन योजना बंद केल्याने आताच्या सरकारी बाबूला आपल्याच पगारातील काही रक्कम बाजूला ठेवून तीच निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळणार आहे. म्हणजे त्यांचीही अवस्था पुढे जाऊन अवघड आहे. सरकार बँका, सरकारी उद्योग उद्योगपतींच्या घशात घालत आहे. म्हणजे साठवलेला पैसाही आता या उद्योगपतींच्या बँकेत राहणार आहे. आणि हे लोक कधी सगळं बुडवून परदेशात जातील, सांगता येणार नाही. म्हणजे पुढचा काळ सगळा अंधकारमयच आहे. असं असताना या लोकांना आपली मुलं आपल्यापेक्षा वरचढ निघावीत, अशी अपेक्षा असते. यांच्यासाठी कुठली सरकारी योजना नाही. यांना सगळं काही आपल्या स्वतःच्या हिंमतीवर करावं लागतं. पण याच लोकांचं कोरोनानं कठीण करून ठेवलं आहे, पण तरीही ही माणसं खूश आहेत. अजिबात कुरकुर करत नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012