Saturday, December 30, 2017

(न्यू रिसर्च) कच्ची हळद कॅन्सर दूर करू शकते

   
 आपल्याकडे हळदीला फार महत्त्व आहे. दुखापत झाल्यावर जखमेवर हळद लावल्यास लवकर परिणाम दिसून येतो. स्वयंपाकात तर याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्न टिकण्यासाठी हळद पूड उपयोगाची आहे. आता नव्या संशोधनानुसार कच्ची हळद कॅन्सरपासून दूर ठेऊ शकते. जर्मनीच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसायन्स अँड मेडिसिननुसार कच्च्या हळदीत मिळून आलेल्या टर्मेरोन या एका तत्त्वाचा अभ्यास करण्यात आला. स्टेम सेल रिसर्च अँड थेरेपी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हळदीत मिळून येणारा टर्मेरोन मेंदूच्या कोशिकांचा विकास वाढवू शकतो. तसेच यात आणखी एक आढळून येणारा घटक सर्कुमिन शरीरावरील सूज कमी करू आणि कॅन्सरमध्येही फायद्याचे ठरू शकतो.

धुम्रपान मधुमेह वाढवतो

डायबिटीजच्या रुग्णांना धुम्रपान करण्याची सवय मृत्यूचा धोका दुप्पट ठरणार आहे. अमेरिकेच्या कोलोरोडो युनिव्हर्सिटीमध्ये लागलेल्या शोधानुसार हा अभ्यास स्मोकिंग करणार्या डायबिटीक आणि सामान्य लोकांच्या दरम्यान करण्यात आला. शोधात समोर असे आले आहे की, 13 टक्के मधुमेही लोकांची परिस्थिती अगदी गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला तर सामान्य लोकांची टक्के वारी 6.8 इतकी होती.

वायू प्रदूषण जगाला ताप
वायू प्रदूषण भारताबरोबरच जगाची समस्या बनली आहे. मागे दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती भयानक अनुभवास आली. कमी-जास्त प्रमाणात आपल्या देशातल्या अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये परिस्थिती असून त्यामुळे लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. जगातही या समस्येने मोठी उचल खाल्ली आहे. शरीर विज्ञान आपल्याला सातत्याने वायू प्रदूषणापासून बचाव करण्याचा सल्ला देत आला आहे. शास्त्रज्ञांच्या एका शोधानुसार असे आढळून आले आहे की, वायू प्रदूषणमुळे जगातील 100 लाखपेक्षाही अधिक लोक क्रॉनिक किडनी डिजीजचे बळी ठरत आहेत. अमेरिकेतल्या क्लिनिकल एपिडेमियोलोजी सेंटरच्या शास्त्रज्ञांनी वरील निष्कर्ष काढला आहे. थंडीच्या दिवसांत वायू प्रदूषणाचा स्तर वाढतो, त्यामुळे या काळात बाहेर पडताना चेहर्यावर मास्क लावणे, फायद्याचे ठरणार आहे.



मुळ्याला साधासुधा समजू नका

सध्या बाजारात मुळा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर रोज एक मुळा सॅलडच्या स्वरुपात खायला विसरू नका. मुळ्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते,त्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटामिन ए, सी आणि के चांगल्या मात्रेत असतात. त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंटदेखील पुष्कळ प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे त्वचा तजेलदार बनते. ग्लोइंग होते. यामुळे त्वचारोगापासून बचावदेखील होतो. जॉन्डिसच्या आजारात मुळ्याचा वापर फायद्याचा आहे. मुळ्यात कॅन्सरशी लढण्याची प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणदेखील असतात.काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, याच्या सेवनामुळे मधुमेहाचा फायदा होतो.



जायफळाचे फायदे

     जायफळाचा उपयोग फक्त रुचकर जेवण बनवण्यासाठी करत नाही तर त्याचा औषधी रुपातदेखील उपयोग केला जातो. एके काळी जायफळसाठी मोठी किंमत मोजावी लागत होती. त्यामुळे श्रीमंत किंवा राजे-महाराजे लोकच त्याचा वापर करू शकत होते. मात्र जायफळ सहजरित्या उपलब्ध होत आहे. हलका गोडवा आणि तीव्र सुवास असलेले जायफळ काही पाश्चिमात्य किंवा आशियाई स्वयंपाकात वापरला जातो.

     जायफळमध्ये मँगनीज,फायबर, व्हिटामिन बी-6, थियामिन, फोलेट मँग्निशियम, कॉपर आणि आणखी काही फायद्याची तत्त्वे त्यात असतात. यात मेसलीग्नॅन नावाचे इसेंशियल ऑईलदेखील असते, जे स्टीमुलेटचे काम करते. याच्या सेवनामुळे स्ट्रेसमध्ये आराम मिळतो. जायफळमध्ये एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतो. आपल्या सिडेटिव गुणामुळे याचा वापर शरीरातील दुखने, मसल्स पेन, दातदुखी यांमध्ये आराम मिळतो. याच्या सेवनामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे, कफ इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळतो. आणि शरीराचे डिटॉक्सीफिकेशनही होते.
सावधगिरी

जायफळचे सेवन मर्यादित आणि संतुलित मात्रेमध्ये करायला हवे. अधिकच्या सेवनामुळे हॅल्युसेनेशन (भ्रम) परिस्थिती ओढवू शकते. यामुळे जीव घाबरायला होणे, घाम येणे, तोंड कोरडे पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. एके काळी याचा वापर गर्भपात करण्यासाठी केला जात होता

गझल


ज्यांना स्वप्नात भाकर्या दिसू लागल्या,  

ते स्वप्नात पोट भरून खात राहिले।
कित्येक पिढ्या-पिढ्या जे मजूर आहेत,
ते डोक्यावर डोंगर वाहून घेत राहिले।
अंगरक्षकाशिवाय त्यांची घाबरगुंडी उडते,
 ते प्रत्येक रात्र जागून काढू लागले।
जे सत्तेला चिकटून आहेत, ते प्रत्येक वेळेला,
कलमवीरांना घाबरत राहिले।
अशी माणसेच वाटतात, फार कठीण,
जे वाद-विवाद लपवत राहिले।
जे हसू इच्छित नव्हते,पण
ते लाचारपणातही हसत-हसवत राहिले।
काही डाव जे आजमावावयाचे नव्हते,
ते वेळ पाहून आजमावत राहिले।

(लघुकथा) अवघड


चार महिन्याच्या रेवाचा रडण्याचा आवाज ऐकून तिला उचलून घ्यायला आजी सरस्वती धावत आली.
'थांब गं, आई!' शीतलने आपल्या आईला अडवलं. सरस्वती आश्चर्याने थबकल्या. त्या प्रश्नार्थक नजरेने आपल्या मुलीकडे शीतलकडे पाहिले.
'आई! हिला मला सांभाळू दे! मी घरातली कामं करत करतच हिलाही सांभाळण्याचा सराव करतेय. आता तू मला मदत करशील,पण तिकडे सांगलीला गेल्यावर मला  एकटीलाच हिला सांभाळावं लागणार आहे.' एवढे बोलून ती रेवाला उचलून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली.
सरस्वती कौतुक आणि ममत्वेच्या नजरेने आपल्या मुलीकडे पाहू लागली. आणि म्हणाली, 'तिथे तुला एकटीलाच घर आणि रेवा दोघांनाही सांभाळावे लागणार आहे,पण इथे आहेस तोपर्यंत तरी तुला माझी तेवढीच मदत होईल की नाही?'
'तुला कळत नाही, आई! सांगलीला मला रेवाला सांभाळायला जमलं नाही तर ते तिला सांभाळायला गावाकडून सासूबाईंना बोलावून घेतील आणि त्यांना सांभाळायला मला आणखी अवघड होऊन बसेल.' शीतल पटकन बोलून गेली.
घर सांभाळण्याबरोबरच रेवा सांभाळण्याचा सराव करण्यासाठी शीतलने जे कारण दिले ते ऐकून सरस्वती यांच्या नजरेत आपल्या मुलीविषयी जो भाव होता, तो झटक्यात उतरला.

Tuesday, December 26, 2017

(बालकथा) झाडाची व्यथा

     जंगलात एक हिरवंगार झाड होतं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत होते. झाडाचे अश्रू पाहून आकाशातून उडत निघालेला एक गरुड खाली आला. त्यानं झाडाला विचारलं, ‘अरे दोस्ता, तू असा रडतोयस का? मी काही मदत करू शकतो का तुला?’
     झाड म्हणाले, ‘मित्रा गरुड! आपल्या जंगलातल्या सगळ्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत,तिथे त्यांचा किलबिलाट चालतो. ती झाडं किती गजबलेली दिसतात, पण माझ्या फांद्यांवर मात्र एकदेखील घरटे नाही. त्यामुळे मला फार फार वाईट वाटतंय. तुला तर गरुडराज म्हणतात.तू ज्या झाडावर राहतोस,त्या झाडावर तुझ्या छत्रछायेखाली अनेक पक्षी येऊन राहतात. घरटी बनवतात. गुण्यागोविंदाने राहतात. मग तूच का नाही माझ्या फांद्यांवर येऊन राहत?’

    गरुडाला झाडाची दया आली. त्याने आपले घर त्या झाडाच्या फांदीवर बनवले. पराक्रमी गरुडाचे घर पाहून खुपशा पक्षांनी त्या झाडावर येऊन आपली घरटी बांधली. तिथे गरुड राहत असल्या कारणाने गिधाड,घार अशा कुणाचीच भिती किंवा धोका तिथल्या पक्ष्यांना नव्हता. सगळे पक्षी पराक्रमी गरुडाचे म्हणणे ऐकत होते. त्यानुसार वागत होते.
    एक दिवस गरुड झाडाला म्हणाला, ‘मित्रा, आता तुझ्या फांद्यांवर खुपशी घरटी बांधली गेली आहेत. मला माझ्या मित्रांना भेटून खूप दिवस झाले. आता त्यांना भेटायची इच्छा होते आहे, तेव्हा मला तिकडे जावे लागेल.’
गरुड आपल्या मित्रांना भेटायला निघून गेला. त्याच्या दुसर्यादिवशीची गोष्टएका सुतार पक्ष्याचे पिल्लू उडायला शिकत होते.ते उडता उडता झाडाखाली कोसळले.तिथे त्याला लहान लहान कीटकांची एक रांग दिसली. ते तो अगदी लक्ष देऊन पाहू लागला. ते कीटक झाडाच्या एका फांदीला छिद्र पाडण्याच्या कामाला लागले होते. पिल्ल्याने आपल्या आईला बोलावून सांगितले, ‘आई... आई... ते बघ किडे, आपल्या झाडाला काय करताहेत ते?’
    ती म्हणाली, ‘ते जे काही करतात ना, ते त्यांना करू दे. तू लवकरात लवकर उडायला शिक.’
    ‘पण आई, ते तर आपल्या झाडाला पोखरताहेत’, पिल्लू हट्ट करत म्हणाले.
आईने पिलाला एक चापट मारली आणि त्याला घेऊन ती उडाली. इकडे झाडाला आपल्या फांदीमध्ये त्रास व्हायला लागला. त्याला दुखायला लागले.त्या फांदीवर हिरवे पोपट राहत होते. झाड त्याला म्हणाले, ‘अरे बघ रे! माझ्या फांदीला काय होतंय ते? मला फार त्रास व्हायला लागलाय रे!’
     हिरवे पोपट खाली उतरले. त्यांनी तिथे खुपशा वाळव्यांना पाहिलंते पोपट शाकाहारी होते. त्यांच्या चोची खालच्या बाजूने  वाकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्या वाळव्यांना काही करता येत नव्हते. त्यांना हाकलून देता येत नव्हते. त्यांनी शेजारच्या फांदीवर बसलेल्या चिमणीला विनंती केली.
     ‘दीदी, आमच्या फांदीवर वाळवींनी हल्ला चढवला आहे.तू तुझ्या तीक्ष्ण चोचीने त्यांना तिथून पिटाळून लाव.’
चिमणी म्हणाली, ‘मला काय त्याचे! ते तुमच्या फांदीला लागले आहेत. माझ्या तर नाही नामग  मी का बरं कष्ट घ्यावेत?’
सात- आठ दिवसांत फांदी सुखून गेली.पानेही वाळून गेली. पोपटांची पानांआड लपलेली घरटी उजाड झाली. ती आता उघड उघड दिसायला लागली. आता पोपटांना भिती वाटायला लागली की, आपल्या छोट्या छोट्या पिल्लांवर हल्ला होऊ शकतो. पण झाडाच्या दुसर्या फांदींवरील पक्षी मात्र निश्चिंत होते. त्यांनी जाणून घ्यायची तसदीही घेतली नाही की, झाडाची फांदी का सुकली ते?
     
वाळवींनी आतल्या आत झाडाला पार पोखरून काढले. दुसर्या फांद्यांवरही हल्ला सुरू केला. आता पूर्णच्या पूर्ण झाडच सुखायला लागले. आता सगळ्या पक्ष्यांना समजून चुकल्यावर सगळे त्या वाळवींना मारायला धावले. पण आता खूप उशीर झाला होता. त्यांनी पूर्ण झाड गिळंकृत करून टाकले होते.त्यांनी झाडाच्या आतमध्ये प्रवेश केला होता. आता त्या वाळवींना नष्ट करणे अशक्य होते.
काही दिवसांतच पूर्ण झाड सुखून गेले. आता त्याचा फक्त सांगाडा उरला. पोपट म्हणाले,‘तुमच्या सर्वांच्या बेफिकीरीमुळे, दुर्लक्षामुळे हा अनर्थ घडला आहे.जर सुतार पक्षी, मैना किंवा चिमणीने मदत केली असती तर आज आपल्यावर अशी परिस्थिती ओढवली नसती. त्या वाळवींचा आपण प्रारंभीच नायनाट करू शकलो असतो. पण तुम्ही फक्त आमचीच म्हणजे पोपटांचीच समस्या आहे, असे समजून दुर्लक्ष केलंत. त्यामुळे शत्रूला आपल्या घरात शिरण्याची संधी मिळाली. खरेच! आपल्यात एकता आणि बंधुभाव असता तर आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते.’ हे बोलताना हिरव्या पोपटांचा कंठ दाटून आला होता.
     खरेच! एकाद्या छोट्या समस्येकडे कानाडोळा केला तर ती नंतर एक मोठी समस्या होऊन बसते. ही गोष्ट आता सगळ्याच पक्ष्यांना कळून चुकली होती. पण आता काय करू शकणार होते? कारण वेळ तर निघून गेली होती. त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे त्यांचे घर-दार  उजाड बनले होते.

Monday, December 25, 2017

यशस्वी व्यक्ती झोपण्यापूर्वी काय करतात?

     आपण श्रीमंत नसलो किंवा यशस्वी नसलो तरी जे काही सेलिब्रिटी लोक दिवसभर आणि झोपण्यापूर्वी काय करतात, याची उत्सुकता आपल्याला असते. त्यांच्या यशामागे काय काय दडले आहे, हे जाणून घ्यायला काही जणांना आवडते. आज खरे तर लोकांना दिवस-रात्र पुरेनासा झाला आहे. इतकी कामे लोकांपुढे पडलेली असतात. झोपायला लोकांना सवड मिळत नाही, अशी आजच्या काही यशस्वी, सेलिब्रिटी लोकांची आवस्था आहे. मग काही लोक गाडीत झोपतात. सभेत झोपतात. जिथे कुठे संधी मिळते, तिथे झोपेला जवळ करतात. आपल्या झोपेशी समझोता करतात. खरे तर 35 ते 60 वर्षे वयाच्या लोकांना रोज किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पण इतकी झोप ही मंडळी घेतात का असा प्रश्न आहे. जी माणसे स्ट्रगल करत असतात, त्यांची तर झोपच उडालेली असते. अभ्यास करणारे कॉलेज युवक रात्रभर अभ्यास करत असतात. मात्र ती सकाळी आठ-दहा वाजेपर्यंत झोपतात. म्हणजे आज झोपेचे निसर्ग नियम बदलले आहेत. अभ्यास,कामाचे गणित बदलले आहे. तरीही काही यशस्वी लोकांनी झोपण्यापूर्वी स्वत:साठी काही नियम ठरवून घेतले आहेत. त्यासाठी ते हमखास वेळ काढतात. कुणी पुस्तकं वाचतं, तर कुणी काय तर कुणी काय करतं. थोडं जाणून घेऊया यशस्वी लोकांविषयी!

     जगातल्या सर्वात यशस्वी एंटरप्रेन्योर्समध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांचे नाव घेतले जाते. ते झोपण्यापूर्वी वाचन करण्यासाठी आवश्य वेळ काढतात. झोपायला जाण्यापूर्वी ते रोज रात्री एक तास वाचन करतात. त्यांनी अशा पुस्तकांची एक यादीसुद्धा केली आहे, जी त्यांना वाचावयाची आहेत. फेसबूकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ करतात,कारण त्यांना झोपेत रात्री कुणाचा डिस्टर्ब नको असतो. द हफिंग्टन पोस्ट मिडिया ग्रुपच्या एडिटर इन चीफ एरियाना हफिग्टन 7 ते 9 तासांची झोप आवश्य घेतात.झोपी जाण्यापूर्वी त्या आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस बंद करून टाकतात. हॉट बाथ घेतात आणि पुस्तक वाचतात.
     बिझनेस वुमन म्हणून नावारुपाला आलेल्या अभिनेत्री,प्रोड्युसर आणि टॉक शोच्या होस्ट ओपरा विनफ्रे दिवसातून दोन वेळा मेडिटेशनसाठी आवश्य वेळ काढतात. यातली एक वेळ ही रात्री झोपण्यापूर्वीची असते. त्यांचा स्वत:चा मेडिटेशन अॅपदेखील आहे. हॉरर आणि सायन्स फिक्शन रायटर स्टिफन किंग रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी ब्रश करतात आणि आपले हात स्वच्छ धुतात. अमेरिकेच 44 वे राष्ट्रपती म्हणून आपली कारकीर्द घालवलेले बराक ओबामा रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतात. शिवाय बातम्यांच्या टॉप हेडलाइन्स नक्की बघतात. झोपण्यापूर्वी स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकन एक्सप्रेसचे सीईओ आणि चेअरमन केनेथ चेनॉल्ट रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी दुसर्या दिवसासाठी टु-डू-लिस्ट तयार करतात. यात ते महत्त्वाच्या तीन गोष्टी लिहितात, ज्या दुसर्यादिवशी अग्रक्रमाने कराव्या लागणार असतात.
   
 दृपेस एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क पूर्वी रोज डाइट कोकचे 8 कॅग्स आणि दोन कप कॉफी घ्यायचे,पण त्यात भरपूर प्रमाणात कॅफिन असायचे. त्यामुळे त्यांनी तो बेत रद्द करून आता रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी सहा तास अगोदर कॅफिनसंबंधीत वस्तू घ्यायचे टाळतात. प्रसिद्ध अभिनेत्री आणि लाइफस्टाइल वेबसाइट ग्रुपच्या संस्थापिका ग्वाइनेथ पॅल्ट्रो चांगली झोप मिळावी,म्हणून खास काळजी घेतात. रात्री त्या मसाज घेतात.
     प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार यशस्वी व्यक्ती झोप चांगली यावी किंवा मिळावी,यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या शरीर प्रकृतीनुसार काही गोष्टींचा अंगिकार करतात. त्यांना झोपेची आवश्यकता आहे.कारण त्यांना दुसर्यादिवशी पुन्हा स्वत:ला कामाला जुंपायचे असते,मात्र त्यावेळी त्यांच्यात उत्साह असला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुसर्यादिवशी कामाला पुन्हा उत्साह येण्यासाठी आपल्याला आवडेल,रुचेल अशा पद्धतीने काही गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. शेवटी आपले शरीर तंदुरुस्त असेल तरच सर्वकाही आहे,अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे!

Sunday, December 24, 2017

क्रोधाला टाळा लावा

     आपले आयुष्य फारच लहान आहे,याचा विचार केला तर आपण अगदी हसत-खेळत दिवस घालवले पाहिजेत.हे दिवस आपण वैर आणि चुका करत घालवलो तर या मनुष्य जीवनातून काय साध्य करणार आहोत. वैर आणि चुका या क्रोधातून उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा रागावर आवर घालता आले पाहिजे. आपले आरोग्य बिघडवायचे असेल, जगात आपले शत्रू निर्माण करायचे असतील तर फार काही करावे लागत नाही.तुम्ही रागाला मोकळी वाट करून दिल्यास तो आपले काम आपोआप करून टाकतो.

     तुमच्या रक्तात विष पसरवण्याची मोठी ताकद या क्रोधात आहे. क्रोधामुळे तुमचे संपूर्ण रक्त विषारी बनते.वाणी विखारी बनते.तुमचे हाव-भाव विकारी बनतात. शेवटी एक दिवस असा येतो की, तुम्हाला स्वतःलाच संपूर्ण जीवनाच विखारी वाटायला लागते. त्यामुळे रागावर जो नियंत्रण मिळवू शकतो, तोच या जगात तरतो. यासाठी खरे तर प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण राग,क्रोध मनुष्य धर्म आहे. माणसातले विकार परिस्थिती निर्माण होईल, तसे तोंड वर काढतातच. त्याला दाबण्याचे काम आपले स्थिर चित्त महत्त्वाची भूमिका साकारते.त्यामुळे नेहमी चित्त स्थीर ठेवा. 
     महान तत्त्वज्ञ कंफ्यूशियस सांगतात की, ज्यावेळेस राग येतो,त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या परिणामांचा विचार करा. रागावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल मौन हे त्यावर जालिम औषध आहे,असे महात्मा गांधी यांनी सांगितले आहे. क्रोधाची सुरुवात  मुर्खतेपासून होते आणि पश्चातापावर संपते. पश्चाताप करून घ्यायचा नसेल तर शांत राहणं कधीही चांगलं. मूर्ख माणूस क्रोधाला जोरजोराने प्रकट करतो, पण त्याच्या जागी  बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो शांत राहून क्रोधाला आपल्या वशमध्ये करतो.
     स्वामी विवेकानंद सांगतात की, क्रोध सिंहासनस्थित असेल तर बुद्धी तिथून सटकते.ती तिथे थांबतच नाही. आपण रागावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो असलो तरी समोरची व्यक्ती राग प्रकट करून आपल्याला उकसावत असते. अशा वेळेला आपण त्याला विरोध न करता तिथून निघून जाण्यातच भलाई आहे.थोड्या वेळाने त्याचा राग आपोआप शांत झाल्याचे तुमच्या लक्षात येईल,तेव्हा त्याला पुन्हा भेटायला जा. आपले काम शांतपणे त्याला समजावून सांगा. नसेल तर नंतर भेट घ्या. संतप्त व्यक्तीवर मात करण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे.
     कुणी तरी म्हटले आहे, रागाचा फक्त एक क्षण आपण सहन करू शकलो,तर दुःखाच्या अगणित दिवसांपासून आपला बचाव होऊ शकतो. मात्र तोच रागाचा क्षण आपण सहन करू शकलो नाही तर तो आपले सर्वस्व संपवून टाकतो. राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या काही गोष्टीही आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याला राग का आला आहे.त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला ओळखता आला पाहिजे. संतप्त व्यक्ती रागाच्या भरात खरे बोलत नाही.तो तेव्हा फक्त आणि फक्त दुसऱ्याचे मन दुखवीत असतो. असे म्हटले जाते की, तुमच्या मनात आलेला राग तुम्ही एक क्षण थांबवू शकलात, तर तुम्ही तुमच्यावर कोसळणाऱ्या दु:खालाही अडवले असे समजा. 
     सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यामुळे तुम्ही जितके थकत नाही,तितके रागाच्या किंवा चिंतेच्या एका तासात थकता, असा संशोधकांचा अहवाल सांगतो. त्यामुळे रागाला किती महत्त्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे. शेवटी एक महत्त्वाचे आहे, आपल्याला मनुष्य जीवन मिळाले आहे.त्याचा सदुपयोग करून चांगले नाव,कीर्ती मिळवून या जगाचा निरोप घेतला पाहिजे. मात्र चांगला माणूस म्हणून आपले नाव मागे राहिले पाहिजे. हे  आपल्यात उत्पन्न होणाऱ्या रागाला कुलूप ठोकल्याशिवाय शक्य नाही.

Saturday, December 23, 2017

(बालकथा) प्राामाणिकपणाचे फळ

     रशियातल्या साकुत्सक नावाच्या एका लहानशा खेड्यात एक गरीब मुलगी राहत होती-व्हेरा. ती अनाथ होती. जंगलात जाऊन लाकूडफाटा गोळा करायची आणि बाजारात नेऊन विकायची. यावरच तिची गुजराण सुरू होती. व्हेरा फार सुंदर होती. तितकीच ती प्रामाणिक आणि धाडसी होती. त्यामुळेच ती एकटीच अगदी बेधडक जंगलात वावरायची.
     स्वेतलाना,व्हेराची एकुलती एक शेजारीण आणि खास मैत्रीण. पण दोघांच्या वयात कमालीचे अंतर.स्वेतलाना प्रौढ स्त्री होती तर व्हेरा नवयुवती. मात्र दुर्दैवी गरिबीने त्यांना एकत्र आणले होते. एकमेकांच्या सुख-दु:खात त्या सहभागी व्हायच्या.
     स्वेतलानाला एक दहा वर्षांचा मुलगा होता. तो सारखा आजारीच असायचा. हातावर पोट असलेल्या स्वेतलानाकडे त्याला चांगल्या वैद्याकडे नेऊन उपचार करण्याएवढे रुबल्स नव्हते. तिच्या हातून जेवढे जमेल, तेवढे ती त्याच्यासाठी करत होती. पण त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती.

     एक दिवस गावात दवंडी पिटवली गेली. किर्गीस्तानचा राजपुत्र विवाहहेतू नवयुवतीच्या शोधात आहे. यानिमित्ताने राजधानीमध्ये भव्य असा समारंभ आयोजित केला आहे. यात विवाहैच्छूक युवतींना आमंत्रित करण्यात आले होते. समारंभाला उपस्थित राहणार्या हजारो  युवतींमधून तो एका सुंदर आणि हुशार मुलीची आपली जीवनसंगिनी म्हणून निवड करणार होता. विवाहैच्छूक मुलींनी राजधानीकडे प्रस्थान करण्याची घोषणा करण्यात आली होती.
     ही वार्ता जंगलातल्या वणव्यासारखी राज्यभर पसरली. नवयुवतींमध्ये तर भलता गोंधळ उडाला. काही करू आणि काय नाही, अशी विचित्र अवस्था त्यांची झाली. सगळ्या स्वत:ला सुंदर बनवण्याच्या खटपटीला लागल्या. देशी-विदेशी सौंदर्य प्रसाधनांचा मारा चेहरा, शरीरावर सुरू झाला.महागडा पेहराव, चपला, दागदागिने यांच्या खरेदीची रेलचेल सुरू झाली. नव्या फॅशनचा आग्रह होऊ लागला. शिंपी,सोनार,चांभार यांना तर उसंतच मिळेना! त्यांचा धंदा भरभराटीला आला. युवतींनी आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न समजून हा विषय भलताच मनावर घेतला.
     व्हेराच्याही मनात आनंदाची लहर उसळली. श्रावणातल्या पहिल्या पावसाने कोमजलेल्या वनस्पतींमध्ये जसा जीव येतो,तसे तिला झाले. राजपुत्राशी विवाह करण्याच्या कल्पनेने तिच्या मनातली बाग हिरवीगार बनली. तिचे अंग अंग शहारले. मन हर्षोल्हासित झाले. तिला माहित होतं की, समारंभाला जाण्याच्या तयारीसाठी रुबल्सची आवश्यकता आहे. तिच्याकडे थोडीफार पुंजी होती. मात्र त्याने काही भागणार नव्हते. तिने निश्चय केला की, अधिक काम करायचे. दिवसात तीनतीनदा जंगलात जायचे. अधिक  लाकूडफाटा गोळा करायचा.
ती सकाळीच जंगलात गेली. ती वोल्गा नदीकाठालाच ला़कूडफाटा गोळा करत होती. इतक्यात तेथून मासेविक्याची गाडी गेली. गाडीच्या मागच्या टपात मासे होते. जिवंत होते. गाडी वेगात होती. एका खड्ड्यातून उसळली मारत गेली, त्यातला मोठा मासा खाली पडला. तिने हाक मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो घाईगडबडीत होता. त्यामुळे त्याने तिला मासा भेट दिल्याचे सांगून वेगाने निघून गेला.
मासा जिवंत होता.मोठा होता. या माशाचे काय करायचे,तिच्यापुढे प्रश्न पडला. तिने तो पटकन उचलला आणि नदीच्या दिशेने धावत निघाली. नदीजवळ गेल्यावर तिने तो पाण्यात सोडला. आणि काय आश्चर्य! मोठासा गडगडणारा आवाज झाला. पाण्यातून मोठी लाट उसळली. समोर जलपरी प्रकट झाली. ती म्हणाली, तू मला जीवनदान दिलंस. तुला हवं ते माग.
     ॠगळे काही अचानक घडले. त्यामुळे ती हडबडून गेली. काय मागावे,तिला सुधरेना. तिने एक दिवसाची मुदत मागितली. ती घरी आली. तिची मैत्रीण स्वेतलानाशी चर्चा केली. तिने खूप सारे धनदौलत, दागदागिने, महागड्या वस्तू,वस्त्रे,चपला मागायला सांगितल्या.जेणेकरून त्याचा उपयोग राजपुत्राच्या समारंभासाठी उपयोगाला येतील. गरिबी हटेल. व्हेराला उपाय आवडला. यातून तिच्या दोन्ही मनोकामना पूर्ण होताना दिसत होत्या. पण तिच्या नशीबात वेगळेच लिहिले होते. अचानक त्या रात्री स्वेतलानाच्या मुलाची तब्येत बिघडली. त्याला मूर्च्छा आली. आता त्याचा खेळ खल्लास होणार, अशीच त्याची एकूण अवस्था दिसत होती. स्वेतलाना धावत धावत व्हेराकडे आली. तिने व्हेराचे पाय धरले. मुलगाच तिचा सर्वस्व होता. त्याच्या जीवाची भीक ती व्हेराकडे मागू लागली.जलपरीकडून त्याच्या दीर्घायुष्याची याचना करू लागली.
     व्हेरा एका आईची याचना धुडकावू शकत नव्हती.तिचे मन द्रवले.ती धावतच नदी किनारी गेली.तिथे तिने जलपरीकडे स्वेतलानाच्या मुलाच्या दीर्घायुष्याचा वर मागितला.
     जलपरी म्हणाली, व्हेरा, परोपकार आणि प्रामाणिकपणा याचे उच्च असे शिखर तू गाठले आहेस. तू असामान्य युवती आहेस. तुला हवं तर धनदौलत,गाडी-घोडा,नोकर-चाकर असं काहीही मागता आलं असतं.पण तू तुझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या प्राणाचे रक्षण मागितलेस. तुझे हे पाऊल फक्त प्रसंशनीयच नाही तर अनुकरणीय आहे. ईश्वर तुझ्यासारख्या मैत्रिणी सार्यांच देवो. तथास्तू म्हणून ती पाण्यात विलीन झाली.
योगायोगाने जंगलात शिकारीसाठी आलेल्या किर्गीस्तानच्या राजपुत्राने हे सगळे पाहिले. प्रामाणिक व्हेराचा मोहक चेहरा आणि उज्ज्वल चरित्र यावर राजपुत्र मुग्ध झाला.त्याने तिथेच व्हेराला लग्नाची मागणी घातली. व्हेरा तर तयारच होती. तिने त्याचा सहर्ष स्वीकार केला. पुढे काही दिवसांनी त्यांचा धुमधडाक्यात शाही विवाह पार पडला आणि अगदी आनंदात दोघेही किर्गीस्तानमध्ये राहू लागले.
                                                                   

(बालकथा) सोनेरी पक्षी

     सुखदेव मोठा श्रीमंत शेतकरी होता. शेतात धनधान्य भरपूर पिकत होते. पुष्कळशा गाई-म्हैशी होत्या. दूध-दुभत्याने त्याचे घर ओसंडून वाहत होते. वाडवडिलांकडून हा सगळा वारसा मिळाला.त्याला फक्त त्याचा सांभाळ करायचा होता. पण तो फार आळशी होता. कामचोर होता. सकाळी उशिरापर्यंत झोपायला त्याला फार आवडायचे.
     त्याच्या आळशीपणामुळे त्याच्या शरीरावर साहजिकच परिणाम होऊ लागला. तो आजारी पडला. त्याचे चालणे-फिरणे बंद झाले. तो अंथरुणाला खिळून राहिला. पलंगावर पडून राहिल्याने त्याचे वजन आणखी वाढले. त्याचा आजार बळावतच गेला.
आता शेतीची आणि दुधाची कामे नोकरांवर विसंबून राहिली. शेवटी नोकर ते नोकरच! मालक जागचा हलत नाही म्हटल्यावर यांनी हपापाचा माल गपापा करायला सुरुवात केली. अप्रामाणिक नोकरांमुळे शेवटी व्हायचे ते झाले. शेती तोट्यात चालली. त्याला काय करावं कळेना. जायचे हालायचे होईना! त्याची चिंता आणखी वाढली. त्याचा आजार आणखी बळावला. आपण आता जगत नाही, असा विश्वास त्याला वाटायला लागला.

     एक दिवस त्याचा जिवलग मित्र सज्जन त्याला भेटायला आला. आजारामुळे आपली काय वाताहत झाली आहे, याची सुखदेवला कल्पना दिली. परंतु, सज्जन समजून चुकला होता की, हा सगळा प्रकार त्याच्या आळशीपणामुळे अंगाशी आला आहे. मित्र हुशार होता. तो म्हणाला, तुझ्या आजारावर माझ्याकडे एक उपाय आहे. पण ते तू करू शकणार नाहीस.कारण यासाठी तुला सकाळी लवकर उठावे लागणार आहे.
     सुखदेव म्हणाला, आजार बरा होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
     मित्र म्हणाला, सकाळी आपल्या गावाच्या पश्चिमेला एक सोनेरी पक्षी येत असतो.त्याला पाहिलास की, तुझा आजार छू मंतर होऊन जाईल.पुन्हा कधीच तुला आजाराची लागण होणार नाही. मात्र त्याला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून गावाबाहेर जायला लागेल.
सुखदेव सकाळी उठायला तयार झाला. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे त्याचे शेत गावाच्या पश्चिमेलाच होते. सोनेरी पक्षी पाहायचे होईल आणि शेताची पाहणीही होईल.
     दुसर्यादिवशी सकाळी उठून सोनेरी पक्षाच्या शोधार्थ निघाला. जाता जाता तो शेतातून निघाला. तिथे त्याला एक नोकर डोक्यावर ज्वारीचे टिके घेऊन जाताना दिसला. त्याने त्याला हटकले. नोकर घाबरला. तो ज्वारी चोरून नेत होता. सुखदेवने त्याला चांगलेच झापले.पुन्हा असा प्रकार घडला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.
     तो आता पुरता थकला होता.पण सोनेरी पक्षी काही दिसला नाही. माघारी परतला. दुसर्यादिवशीही तो भल्या सकाळी घराबाहेर पडला. शेतावरून जाताना त्याला नोकर दुधात पाणी घालत असल्याचे दिसले. त्याने लपून सगळा प्रकार पाहिला. त्याला काहीही न बोलता तो तेथून निघून गेला. त्यादिवशीही त्याला पक्षी दिसला नाही. पण तो थेट गावात गेला. डेअरीत जाऊन चौकशी केली. त्याचा नोकर रोज 500 लिटर दूध घालत असल्याचे आणि दुधात पाणी घालत असल्याचे कळले. प्रत्यक्षात रोज 200 लिटर दूध होत असल्याचा हिशोब नोकर त्याला देत होता.
     दुसर्या दिवशी सुखदेवने नोकराला रंगेहात पकडले. नोकराने माफी मागितली. सगळा हिशोब चोख सांगितला. यापुढे असा प्रकार होणार नसल्याची त्याने हमी दिली. आता सुखदेव हळूहळू शेतात लक्ष देऊ लागला. मालक रोज फिरायला येत असल्याने नोकरदेखील काम अगदी चोख करू लागले. बेईमानी पुरती थांबली.
     सुखदेव आता रोज शेतावर जाऊ लागला. त्याला सोनेरी पक्षी दिसला नाही,पण हिंडण्या-फिरण्यामुळे त्याची तब्येत बरी झाली. तो आता चांगला हिंडू-फिरू लागला. शेतात छोटी छोटी कामे करू लागला.
     एक दिवस त्याचा मित्र सज्जन पुन्हा त्याला भेटायला आला. सोनेरी पक्षी दिसला नसल्याची त्याने तक्रार केली. सज्जन म्हणाला, तुझी मेहनत म्हणजेच सोनेरी पक्षी. तू ज्यावेळेपासून शेतात जायला लागलास, त्यावेळेपासून चोरी थांबली. तू हिंडायला-फिरायला लागलास आणि आपोआप तुझी तब्येत बरी झाली. शरीराला कष्टाची आवश्यकता असते. त्याला कष्ट दिलेस की, ते अजिबात कुरकूर करत नाही. कष्ट आपल्या कामात भरभरून यश देते.

     सुखदेवने सज्जनचे हातात हात घेऊन आभार मानले.                  

सेलिब्रिटींची कमाई

     आपल्या भारतीयांना दुसर्यांच्या गोष्टीत फार इंटरेस्ट असतो. त्यातल्या त्यात सेलिब्रिटींविषयी जाम उत्सुकता असते. सेलिब्रिटी काय खातात,काय पितात, काय नेसतात, कुठे जातात, त्यांचे कुणाशी लफडे आहे, कुणाशी भांडण आहे, अशा सार्या गोष्टी जाणून घ्यायला फार फार आवडतात. इतकेच काय या मंडळींना साधी शिंक आली तरी त्याची बातमी होते. फक्त त्याच्या मेहनतीकडे मात्र आपले भारतीय दुर्लक्ष करतात. खरे तर सेलिब्रिटींच्या मेहनत,जिद्द, चिकाटी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच ही मंडळी आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. सेलिब्रिटी बनतात.
     आपल्या देशात सिनेकलाकारांना अधिक पसंदी दिली जाते. त्यांचे अनुकरण करण्यात आजची पिढी धन्यता मानते. अलिकडे क्रिकेटपटूंचाही यात समावेश झाला आहे. त्यामुळे ही मंडळी सिनेमा, क्रिकेट यातून तर कमाई करत आहेतच, शिवाय जाहिरातीतूनही मोठी कमाई त्यांची सुरू आहे. कोट्यवधी बनण्याची स्वप्ने पाहणार्या युवकांनी त्यांच्या मेहनतीचा आदर्श घ्यायला हवा. मेहनत कधी वाया जात नाही. पाठोपाठ जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कुठल्या कुठे पोहचू शकतो. आपल्या चित्रपट कलाकारांचेच घ्या. वास्तविक हे क्षेत्र फारच धोकादायक आहे. मात्र मेहनती माणसांना इथे संघर्षातूनही यश मिळत राहते. नायकाचा चेहरा नसला तरी नाना पाटेकर, नवाजुद्दिन सिद्दिकी, जॉनी लिव्हर, राजपाल यादवसारखे कलाकार यशस्वी होतात. आज हे कलाकार सुरुवातीला कफल्लक असूनही आज कोट्यवधीचे मालक आहेत. नुकतीच फोर्ब्सने 2017 साठी भारतातल्या सर्वाधिक कमाई करणार्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे. यात 233 कोटी मिळवून सलमान खान आघाडीवर आहे. अलिकडे त्याचा ट्युबलाइट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यातून त्याला फारशी कमाई झाली नसली तरी तो आज टॉपवर आहेया यादीत अमिताभ बच्चन यांना 20 वे स्थान मिळाले आहे. या ज्येष्ठ कलाकाराची वार्षिक कमाई 40 कोटी रुपये आहे.
   
  सलमान खानचे आजचे वय 51 आहे. तो अजून नायकाचीच भूमिका करतो आहे. शिवाय होम प्रोडॉक्शन कंपनी आहे. या माध्यमातून तो चित्रपटांची निर्मिती करून पैसा कमावतो आहे. खरे तर सलमान-शाहरुख आणि अमिर ही खान तिकडी बॉलीवूडवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवत आली आहे. या तगड्या कलाकारांची आपली आपली एक इमेज आहे. सलमान खान याने या सगळ्यात अधिक चित्रपट केले आहेत. आणि यशदेखील त्याच्याच परष्यात अधिक पडले आहे, असे असले तरी शाहरुखला बॉलीवूडचा बादशहा का म्हणतात, कळायला मार्ग नाही. फोर्ब्सच्या यादीत हाच शाहरुख दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 2017 मध्ये 170.50 कोटी कमावले आहेत. अलिकडच्या काळात त्याच्या यशालाही उतरती कळा लागली आहे,मात्र त्याने होम प्रोडॉक्शनची निर्मिती करून आपला व्यवसाय तेजीत ठेवला आहे. त्यामुळे सलमान असो किंवा शाहरुख खान त्यांचे चित्रपट चालले नाही तरी त्यांच्या कमाईवर काही फरक पडत नाही. शाहरुखचे आजचे वय 52 आहे. तो आणखी किती काळ नायक म्हणून पडद्यावर येत राहील, हे सांगता येणार नाही.पण त्याच्या संपत्तीत मात्र दिवसेंदिवस वाढ होत राहणार हे नक्की!परफेक्शननिस्ट अमिर खान या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. वर्षा-दोन वर्षातून एकच चित्रपट करणार्या अमिरने पाणी पौंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा हा अत्यंत उपयोगी असा कार्यक्रम राबवला आहे. 52 वर्षाच्या अमिरखानची वार्षिक कमाई 69 कोटी रुअपए इतकी आहे.
     तिसर्या क्रमांकावर चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 101 कोटी रुपये कमवून सिनेकलाकारांच्या यादीत आपले नाव वरच्या क्रमांकावर कोरले आहे.  विराटचे वय अवघे 29 आहे. अगदी कमी वयाचा तो सेलिब्रिटी आहे. परवाच त्याचा आणि अनुष्काचा विवाह इटलीत पार पडला. सध्या हे दोघेही दिल्ली,मुंबई असे करत आपल्या लग्नाच्या पार्ट्या देत सुटले आहेत. सध्या त्याचा क्रिकेटमधला फार्म जबरदस्त आहे. त्यामुळे आणखी काही वर्षे तो सहज भारतीय क्रिकेट संघाकडून खेळू शकतो. त्यामुळे त्याच्या कोटीचा ग्राफ आणखी वाढत जाणार आहे.सध्याच्या घडीला त्याने कमाईत कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन पाचव्या क्रमांकावर आहे. 44 वर्षे वयाच्या सचिनची कमाई 82.50 कोटी आहे. त्याने क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी त्याच्या कमाईत फरक पडला नाही, हे विशेष! महेंद्रसिंह धोनी या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्याचे उत्पन्न 64 कोटी आहे. 36 वर्षे वय असलेल्या धोनीने अन्य व्यवसायातही आपले पाय रोवले आहेत. त्याला जाहिराती मिळाल्या नाहीत तरी चालतील, अशा प्रकारची व्यवस्था त्याने करून ठेवली आहे.

     शेतकर्यांच्या आत्महत्येविषयी अधिक संवेदनशील असलेला अक्षय कुमार चौथ्या क्रमांकावर आहे. हॉटेलमध्ये वेटर ते मार्शल आर्ट असा प्रवास करत बॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या अक्षय कुमारने या क्षेत्रात आपले एक स्वतंत्र अस्तित्व आणि प्रेक्षक जमा केला आहे. स्टंट,कॉमेडी, सामाजिक प्रश्न घेऊन पडद्यावर येणारा अक्षय प्रेक्षकांना आपला वाटतो. पहिल्या दहामध्ये एकमेव महिला सेलिब्रिटी आहे, ती म्हणजे प्रियांका चोप्रा.तिचे आज 35 वय आहे आणि उत्पन्न आहे. 68 कोटीचे! सुपरमनच्या भूमिकेत नावाजला गेलेला ऋत्विक रोशन नव्या क्रमांकावर आहे.43 वर्षे वयाच्या या अभिनेत्याला आपल्या पत्नीशी घटस्फोट घेताना बराच खर्च करावा, असला तरी त्याचे उत्पन्न 63 कोटीचे आहे. 10 व्या क्रमांकावर 32 वर्षाचा रणवीरसिंह आहे. त्याचे उत्पन्न 62.63 कोटी रुपये इतके आहे. आपल्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अजूनही सर्वच प्रकारात दुय्यम स्थान आहे. नायकाची भूमिका साकारणार्या कलाकारापेक्षा किती तरी पटीने कमी मानधन मिळते. चित्रपटात दमदार भूमिकेपेक्षा शोपीस म्हणूनच त्यांचा वावर अधिक असतो. पैसा वसूल फॉर्म्युला वापरून चित्रपट निर्माते त्यांना फक्त सौंदर्यवती म्हणूनच चित्रपटभर मिरवतात. क्वचितच काही चित्रपट नायिकाप्रधान असतात. मात्र असे असले तरी त्यांच्या मेहनतीला कमी लेखून चालणार नाही. कित्येक अभिनेत्री आपल्या स्वत:च्या हिमतीवर चित्रपट तारून नेले आहेत. पण ही संख्या फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपच आहे.
     या सेलिब्रिटींचे उत्पन्नाचे आकडे पाहिल्यावर त्यांनी अल्पावधीत इतके यश मिळवले, असा प्रश्न पडतो. पण त्यांच्या या मेहनतीला दाद आपणच देतो,म्हणूनच ते सेलिब्रिटी होऊ शकतात. आपल्याला त्यांचे काम, त्यांचा खेळ आवडतो. त्यांना टाळ्या वाजतो. आजचे युग मार्केटिंगचे आहे. आपण या कलाकारांना महत्त्व देतो,म्हणून कंपन्या त्यांना महत्त्व देतात. त्यांना आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरातीमध्ये घेतात. आपण आपल्या नायकाला ती वस्तू आवडते,म्हणून आपणही ती वस्तू खरेदी करतो. पण हा त्यांचा व्यवसाय आहे, याचे भान अनेकांना नसते. आपण त्यांचे मनभरून कौतुक करतो. याचा फायदा कलाकार आणि कंपन्या घेत असतात. आपण त्यांच्या नेसण्या,घालण्याच्या वस्तूंकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या कष्टाला महत्त्व द्यायला हवे.तरच आपल्यालाही त्यांचे इतरबाबतीत अनुकरण करतो, तसे न करता कष्टाच्याबाबतीतही आदर्श घेता येतील.

Friday, December 22, 2017

विजेशिवाय डिझिटल शाळा कशा?

     महाराष्ट्र सरकार राज्यातल्या शाळा डिझिटल असल्याचा गवागवा करत आहे, मात्र प्रत्यक्षात हा फुगा चक्क शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 13 हजार 848 शाळांपैकी तब्बल 5 हजार 280 शाळांमध्ये वीज नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विधानसभेत मंत्री तावडे यांनी लेखी उत्तरात हा खुलासा केला आहे. गेल्या चार-पाच वर्षात महावितरण कंपनीने शाळांना व्यावसायिक वीज दर लागू केल्याने वीज बिल कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याने शाळांनी बिले भरलीच नाहीत,त्यामुळे महावितरण कंपनीने या  शाळांची वीज तोडून टाकली आहे. व्यावसायिक बिल आकारणीमुळे महिन्याला एक हजार रुपयांच्यावर बिल येते. रोज तास-दोन तास शाळेत संगणक चालणार, त्यातही ग्रामीण भागात विजेचा पत्ताच नसतो, असे असताना विनाकरण इतके भले मोठे बिल भरायचे आणि तेही कोठून भारायचे? सरकारकडे शिक्षकांनी आणि त्यांच्या संघटनांनी शिमगा करूनही शाळांचे वीज बिल घरगुती स्वरुपात आकारणी करण्यात त्यांना अपयश आले आहे. आता सरकारने वीज जोडणी करायला आदेश दिल्याचे शिक्षणमंत्री तावडे सांगतात. पण त्यांचे ऐकणार कोण? वीज बिलाची तरतूद केल्याशिवाय महावितरण वीज जोडणी करणार नाही, हे उघड आहे.

     आधुनिक आणि बदलत्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याची आज गरज असताना त्यासाठी लागणारे नवीन तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी वीज महत्त्वाची गरज आहे. याच गोष्टी नसतील तर सरकारी शाळांमध्ये मुले तरी कसे येतील. आता खासगी कंपन्यांना शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या शाळा अप टू डेट असणार आहेत. ते त्यांच्या पद्धतीने शाळा चालवताना स्वत:चा फायदाही बघणार! सरकार ना नफा ना तोटाची भाषा करीत असली तरी कोणत्याही कंपन्या खिशाला खार लावून शिक्षण संस्था चालवणार नाहीत. पाच-दहा हजार देऊन शिक्षक नेमतील, त्यांच्याकडून राबराब राबवून घेतील. पालकांकडून भरमसाठ फी वसूल करतील. त्यामुळे त्यांचा आणखी एक उद्योग भरभराटीला येईल. मात्र सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याच्या आणि खासगी शाळा सुरू करण्याच्या या नव्या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या मुलांचे शिक्षण थांबणार आहे. याला जबाबदार कोण? सगळीकडून सरकारी शाळांची आणि तिथे राबणार्या शिक्षकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
     आधीच सतराशे साठ शाळाबाह्य कामे शिक्षकांच्या माथी मारून शिक्षकांना विद्यार्थ्यांपुढे जाऊच द्यायचे नाही, अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. मग सरकारी शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढणार? ऑनलाईन कामांमुळे तर शिक्षक पुरता बेजार झाला आहे. कित्येक शिक्षकांना संगणक ज्ञान नाही. ते बाहेरील इंटरनेट कॅफेवर अवलंबून राहत आहेत. यासाठी शिक्षकांना पदरमोड करावी लागत आहे. बाहेरचे लोक कसेही पैसे मागून त्यांची कोंडी करत आहेत, यातून शिक्षक पार वैतागून गेले आहेत. सरकारी शाळा मोडीत काढण्याचा पद्धतशीर मार्ग सरकारने अवलंबला आहे.
     युडायस (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन) या अहवालाद्वारा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5 हजार 280 शाळा अंधारात असल्याचे उघड झाले आहे. राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या 82 हजार 860 आहे. प्राथमिक शाळांमध्ये एक कोटी 59 लाख 85 हजार 712 विद्यार्थी आहेत. यात बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या शाळांचीच  वाताहत सुरू आहे. सरकार मात्र जाहिरातीच्या माध्यमातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या माध्यमातून शाळा डिझिटल आणि प्रगत झाल्या असल्याचा गवगवा करत आहे. मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, हे खुद्द शिक्षणमंत्री तावडे यांनीच कबूल केले आहे.
शाळांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हायला हव्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान शाळांमध्ये पोहचायला हवे. वीज पोहचली तरी इंटरनेटची व्यवस्था शाळांमध्ये नाही. साधी मोबाईल रेंज न येणार्या गावांची आणि शाळांची संख्या मोठी आहे. एक तर मोबाईल कंपन्या 4 जीच्या नावावर 2 जी सेवा देऊन जनतेला लुबाडत आहे. त्यात सरकार विजेशिवाय आणि इंटरनेटशिवाय डिझिटल झाल्या असल्याचा गवगवा करत स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेत आहे. या सगळ्या प्रकरणामुळे शिक्षण मात्र जिथल्या तिथे स्तब्ध आहे. मग कसा होणार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र?

लाच खाणारा मुर्दाड सरकारी बाबू

     सरकारी बाबू आणि लाचप्रकरण असे काही एकमेकाला चिकटले आहेत की, ते फेव्हिकॉलचे जोड आहेत, तुटता तुटत नाहीत. तुटणार तर कसे सांगा. एक तर ही सरकारी बाबूमंडळी फार चलाख. पैसे आपण लाच म्हणून घेतच नाही, असा ते पवित्रा घेतात. आणि लाचप्रकरणात जरी ते अडकले तरी त्यांना शिक्षा होत नाही. त्यामुळे त्यांचे काहीच वाकडे होत नाही. मग ते घाबरतील कशाला? मुर्दाडपणा त्यांच्या अंगात इतका भिनला आहे की, समोरचा व्यक्तीच लाजून चूर होतो. मात्र त्यांना पैसे ना मागताना लाज वाटते, ना घेताना! लाचप्रकरणात अडकून बदनामी झाली तरी त्याचा परिणाम आपल्या मुलां-बायकोवर काय परिणाम होईल. समाज काय म्हणेल, याची अजिबात फिकीर त्यांना नसते. उलट त्याच्या घरातील लोकही त्याच्या सवयीचे गुलाम झालेले असतात. त्यांनाही वाटते की, सारे जगच करपटेड आहे. मग माझ्या बापाने किंवा माझ्या नवर्याने पैसे खाल्ले म्हणून बिघडले कुठे? असा हा सारा मामला आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात म्हणा किंवा राज्यात लाचप्रकरणात अडकलेल्या सरकारी बाबूंना शिक्षा कुठे फारशी होते. त्यामुळेच तर सरकारी बाबू अशा टेबलाखालच्या पैशांना चटावला आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सरकार काही करणार आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो. तसे काही करायचे नसेल तर भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे, असे जाहीर तरी करायला हवे, म्हणजे याविषयी बोलायचे तरी बंद होईल.

     लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने नुकतेच काही आकडे प्रसिद्ध झाले आहेत. यात नऊ वर्षांत फक्त 1 हजार 836 आरोपींनाच शिक्षा झाली आहे आणि तब्बल 6 हजार 452 जण निर्दोष सुटले असल्याचे सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचार करणार्या आरोपींना जर शिक्षाच होत नसेल तर तो थांबणार कसा? रोज वर्तमानपत्रात आपण वाचतो. अनेकजण शासकीय कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकतात. त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला चालतो. पण शिक्षा मात्र काही थोडक्या लोकांनाच होते. 2008 ते 2017 पर्यंत राज्यात विशेष न्यायालयाने एक हजार 836 लाचखोरांना शिक्षा सुनावली; तर सहा हजार 452 जण निर्दोष सुटले, अशी आकदेवारी सांगतेवर्ग अधिकार्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचार्यांपर्यंत अनेक सरकारी कर्मचारी तसेच लोकसेवक हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकतात; मात्र शिक्षा होणार्यांचे प्रमाण कमी असल्याने या लाचखोरांवर अद्यापही हवी तशी जरब बसलेली नाही. हे खरे तर तपास यंत्रणेचे फार मोठे अपयश आहे.
लाचेच्या प्रकरणात अनेक सरकारी कर्मचार्यांना शिक्षा, निलंबनाला सामोरे जावे लागलेले असले, तरी अजूनही सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सापळ्यात अडकत आहेत. राज्यात 2016 मध्ये एक हजार 16 जण लाच घेताना पकडले गेले. एक जानेवारी ते 18 डिसेंबर 2017 दरम्यान 889 जण लाच घेताना अडकले. ही माणसे मुर्दाड बनल्याचेच द्योतक आहे.
     सध्या राज्यातील विशेष न्यायालयाच्या आकडेवारीचा विचार केला; तर लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण 22 ते 23 टक्के आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यालये आहेत. सर्वच भागांमध्ये शिक्षा सुनावण्याचे प्रमाण जवळपास सारखेच म्हणजे कमी प्रमाणात आहे.
     शिक्षेच्या तुलनेत निर्दोष सुटण्याचे प्रमाण हे 77 टक्के आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कशा पद्धतीने तपास करून, किती मजबूत दोषारोपत्र दाखल केले, यावर खटला चालतो. 2017 मध्ये निर्दोष सुटलेल्यांचा विचार केला, तर ही संख्या 316 आहे. त्या तुलनेत शिक्षा झालेल्यांची संख्या ही फक्त 55 आहे. या लाचलुचपत यंत्रणेत तावडीत सापडलेल्या सरकारी कर्मचार्यांना तातडीने शिक्षा होण्याची आवश्यकता आहे. शिवाय पोलिसांनी आणि या संबंधित विभागाने भक्कम पुरावे उभा करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लाचप्रकरणात अधिक प्रमाणात अडकण्यात पोलिस खातेदेखील अगदी वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही माणसे अशा आरोपींकडे सहानुभूतीने पाहतात का, असा प्रश्न निर्माण होतो. आरोपींना जबर शिक्षा बसल्याशिवाय या लाचप्रकरणाला आळा बसणार नाही. पुढच्याला ठेच मागचा शहाणा... अशा उक्तीनुसार मागचा सरकारी बाबू मागे हटायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. कारण दरवर्षी लाचप्रकरणात अडकणार्यांच्या संख्येत वाढतच होत आहे. सरकारी पातळीवर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याशिवाय ही कीड थांबणार नाही. मात्र इतकी वर्षे झाली तरी सरकार याबाबत काहीच पावले उचलायला तयार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा, ना खाने दुंगा... चा नारा देत सत्ता मिळवली,पण त्यांचा हा नारा हवेत विरला आहे.