हरियाणाच्या सोनीपतची
मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर ती मोठी सेलिब्रिटी बनली आहे. ती अशा राज्यातून आली आहे की,
जिथे मुलींच्याबाबतीत अजूनही पारंपारिक विचारांना थारा दिला जातो.
तिथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे
साहजिकच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या बरीच कमी आहे. मात्र
मुलींना संधी मिळाली तर त्या आपले घरदार, समाजच नव्हे तर गाव,शहर, प्रदेश आणि आपल्या देशाचेही नाव संपूर्ण जगात रोशन
करू शकतात. 21 वर्षांची मानुषी सोनीपतच्या भगतफूल सिंह महिला
मेडिकल कॉलेजची तिसर्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. ती मूळची झज्जर जिल्ह्यातल्या बामडोली गावची राहणारी आहे. तिचे वडील मित्रवसु आणि आई नीलम दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. मानुषीने मे 2017 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता.
आता ती 118 देशांमधल्या सौंदर्यवतींना मागे टाकून
मिस वर्ल्डचा किताब पटकवला आहे. पहिल्यांदा ती टॉप 40
मध्ये आली.मग टॉप 15. त्यानंतर
टॉप 10 आणि 5. पुढे टॉप तीनमध्ये आली आणि
मिस वर्ल्ड बनली. भारताचे नाव संपूर्ण जगात केले.
मिस वर्ल्डच्या
शेवटच्या फेरीत तिला विचारलेल्या प्रश्नाला तिने दिलेले आईचा महिमा गाणारे उत्तर ऐकून संयोजकांनी तिला
हा ताज बहाल केला. तिच्या उत्तराने तिने स्वत:ला आणि आई या जगण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुझ्या दृष्टीने सगळ्यात अधिक पगार मिळवणारा व्यवसाय कोणता आहे? त्यावर ती म्हणाली होती की, जगात एक आई आपल्या कुटुंबासाठी
जी सेवा देते, त्यापेक्षा आणखी कोणता दुसरा व्यवसाय नाही.
त्यामुळे आईच जगात सगळ्यात अधिक पगार मिळवण्यासाठी सक्षम आहे. मात्र हा पगार तिला पैशाच्या स्वरुपात
नव्हे तर प्रेम आणि सन्मानाच्या स्वरुपात मिळायला हवा. या तिच्या
उत्तराने तिला अन्य मिस वर्ल्ड स्पर्धकांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
मनुषीने लहानपणापासूनच
मिस वर्ल्ड बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते साकार करून भारताला 17 वर्षानंतर हा गौरव मिळवून दिला
आहे. या स्पर्धेसाठी तिने जीव तोडून मेहनत केली होती.
तंदरुस्तीबाबत ती फारच सावध होती. कुचिपुडी या
शास्त्रीय नृत्यात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ती चांगली नर्तक
आहे. जो माणूस आत्मविश्वासाने सांगतो की,
तो सुंदर आहे. सुंदर आहे तर आहेच. त्यामुळे प्रत्येक माणसांत पहिल्यांदा आत्मविश्वास येणं
महत्त्वाचं आहे. तिने नववीला असतानाच डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा
करण्याचा निर्णय घेतला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी तिने डॉक्टरी
शिक्षणात ब्रेक घेतला होता.पण आता तिला राहिलेले शिक्षण पूर्ण
करायचे आहे. बॉलीवूडमध्ये जाण्याचा आपला इरादा नसला तरी मि.
परपेक्शनिस्ट अमिर खानसोबत आपल्याला आवडेल, असे
तिने अलिकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे.
मिस वर्ल्ड ही
स्पर्धा चेहर्याच्या सुंदरतेची
असल्याचे मानले जात असले तरी यात मनाची सुंदरता महत्त्वाची आहे. इथे मनाच्या सौंदर्याला प्राधान्य दिले जाते.कुचिपुडी
नर्तक असलेल्या मनुषीने या स्पर्धेत बॉलीवूड स्टाईल नगारा नृत्य सादर केला होता.यात आपल्या देशाचे क्लचर आणि मॉडर्न स्टाईलची ओळख करून देण्यात ती यशस्वी झाली
होती. हे नृत्य पसंद केले गेले. मनुषी छिल्लर
शक्ती प्रोजेक्ट नावाचे एक अभियान चालवत आहे. महिलांना मासिक
पाळी दरम्यान स्वच्छतेच्याबाबतीत जागरूक करण्याचे काम ही संस्था करते. हा प्रोजेक्ट तिच्या मनाच्या अगदी जवळचा आहे.या माध्यमातून
तिने आतापर्यंत पाच हजाराहून अधिक महिलांच्या आयुष्यात परिवर्तन आणले आहे. आता मिस वर्ल्डसारखी संस्था या प्रोजेक्टशी जोडली गेली तर या क्षेत्रात भरीव
असे काम होण्यास मदत होणार असल्याचे तिचे म्हणणे आहे.
आता ती मिस वर्ल्डसंबंधीत
सामाजिक कार्याच्या निमित्ताने वर्षभर आणि जगभर फिरावे लागणार आहे. सहा महाद्विपांच्या प्रवासासाठी
तिला निघाचे आहे. त्यानंतर डॉक्टरी शिक्षण पूर्ण करणार आहे.
मात्र यापूर्वीच्या मिस वर्ल्ड, मिस युनिवर्ससारखे
किताब पटकावलेल्या सौंदर्यवतींनी बॉलीवूडचा मार्ग पत्करला. बॉलीवूडचा
झगमगाट त्यांना आकर्षित करतो. मनुषीने अमिरखानसोबत सिनेमा करण्याची
इच्छा व्यक्त केली आहे. अमिरलाही नव्या कलाकारांची गरज असतेच,
त्यामुळे पुढच्या त्याच्या चित्रपटात तिला संधी मिळूनही जाईल.
मात्र त्यानंतरचे या सौंदर्यवतीचे जीवन कसे असणार आहे, हे मात्र आपल्याला पाहावे लागणार आहे. बॉलीवूडचा झगमगाट
भल्याभल्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो.
No comments:
Post a Comment