Wednesday, December 13, 2017

बाजारातले सीएनजी किट किती सुरक्षित?

     बाजारात मिळणारे सीएनजी किट कंपनी फिटेड सीएनजीपेक्षा स्वस्तात पडते.त्यामुळे वाहनमालक बाहेर बाजारात मिळणारे सीएनजी किटच आपल्या गाडीला लावतात. पण हे किट सुरक्षित आणि सक्षम असतात का, असा प्रश्न आहे. कंपनी फिटेड सीएनजी किट थोडे महाग पडत असले तरी सर्वच दृष्टीने तेच योग्य आहे. मात्र वाहनमालक स्वस्तात मिळणार्या या सीएनजी किटचा वापर करून आपले आयुष्य धोक्यात घालतात.

     आपल्या देशात वाढत्या प्रदूषणामुळे सगळेच बेजार झाले आहेत. या प्रदूषणामुळे आपल्या आयुष्यात घट होत आहे, असा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून निघाला आहे. मुंबई,दिल्ली, आग्रा,कोलकाता,लखनौसारखी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यामुळे लोकांचा जीव अक्षरश: गुदमरून गेला आहे. शासन आता प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आता कडक नियम लादत आहे. सीएनजीवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अशा वाहनांना मागणी वाढली आहे. मात्र वाहनमालक कंपनी फिटेड सीएनजी किट लावण्यापेक्षा स्वतातले बाजारात उपलब्ध असलेले किट वापरताना सर्रास दिसत आहे. पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता आणि इलेक्ट्रिक वाहनांवर मर्यादा असल्याने अलिकडच्या काही वर्षात सीएनजी किट वापरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मात्र ऑटो एक्सपर्ट सांगतात की, बाहेर बाजारात मिळणारे सीएनजी किट फारच धोकादायक सिद्ध होऊ शकतात. हा कुठल्याही परिस्थितीत योग्य पर्याय नव्हे. जर तुम्हाला सीएनजी गाडी घ्यायची असेल तर कंपनी फिटेड सीएनजी किटच निवडायला हवे.
      बाजारात मिळणारे किट लावल्याने फक्त तुमच्या वाहनालाच धोका उत्पन्न होऊ शकतो, असे नाही तर तुम्हालाही ते नुकसान पोहचवू शकते. लोकल किट वापरल्याने कंपनी गाडीची वारंटीही संपुष्टात आणते. अशावेळेला गाडीमध्ये आग लागल्यास किंवा कुठल्याही अपघातामुळे गाडीचे नुकसान झाल्यास विमा कंपन्या क्लेमही करू शकत नाहीतयाशिवाय अशा प्रकारच्या सीएनजी किटमध्ये वापरण्यात आलेले वायरिंग किंवा अन्य सामग्री अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले असते.यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर चायनीज किट गाडीच्या इंजिनवर अधिक दबाव टाकते. साहजिकच यामुळे गाडीच्या इंजिनचे आयुष्य कमी होते. बाजारात मिळणारे सीएनजी किट आपल्या वाहनाला लावल्याने आरटीओ कार्यालयाकडून आपल्याला रजिस्ट्रेशन रजिस्टरवर त्यांची नोंद करून घ्यावी लागते. काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, आरटीओ कार्यालयाकडे चकरा मारण्याच्या झंझटीपेक्षा लोक तशीच गाडी दामटतात. गाडी पकडली गेल्यावर मात्र त्यांना दंड भरावा लागतो. कदाचित त्याही पुढच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
     कंपनीकडून मिळणारे सीएनजी किट वापरल्याने कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर सीएनजीची नोंद करून देते. शिवाय कसल्याही नुकसानीशिवाय बिनघोरी वाहन चालवता येते. गाडीचे काही नुकसान झाल्यास विमा कंपन्या क्लेम करण्याबाबत आडेवेडे घेऊ शकत नाहीत. कंपनी फिटेड सीएनजी किट लावल्याने गाडीच्या नुकसानीला कंपनी जबाबदार असते. त्यामुळे कंपनी फिटेड सीएनजी किट कधीही फायदेशीर ठरते.

No comments:

Post a Comment