'टेकन' हा
दिग्दर्शक पेरी मोरेल यांचा गाजलेला हॉलिवूड सिनेमा. आंतराष्ट्रीय मानवी तस्करी,
देहव्यापारासाठी होणारे मुलींचे अपहरण हा या चित्रपटाचा मूळ गाभा.
एक पिता आपल्या अपहृत अल्पवयीन मुलीला यातून कसं वाचवतो यावर हा चित्रपट बेतला
आहे. पण यासोबतच मानवी तस्करी हा गंभीर विषयही दिग्दर्शकाने खुबीने या चित्रपटात
हाताळला आहे. हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे परवाच हिवाळी अधिवेशनात
खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सहा महिन्यात राज्यातील तब्बल २ हजार ९६५ अल्पवयीन मुली
बेपत्ता असल्याची माहिती एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली. विशेष
म्हणजे गत वर्षी २0१६ मध्ये हे प्रमाण २ हजार ८८१ होते जे
वाढून यंदा २ हजार ९६५ वर पोहोचले आहे. म्हणजे ८४ मुली यात वाढल्या आहेत. पण दोन
वर्षात मिळून ही संख्या ५ हजार ८५६ झाली आहे.
विधानसभेत विरोधकांकडून
राज्यातील १८ वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढलेल्या
प्रमाणाबाबत विचारणा तारांकित प्रश्नातून करण्यात आली. मुंबई शहरात अल्पवयीन
मुलांना, तरुणींना भूलवून पळवणारी टोळी सक्रिय
असून या टोळीमार्फत तरुणींना देहव्यापार, आखाती देशातील
वेश्या व्यवसाय, घरकाम इत्यादींकरिता वापर केला जातो. टोळीवर
कारवाई करण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपकाही यावेळी विरोधकांनी ठेवला.
यावेळी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. हरविलेल्या मुला-मुलींचा
शोध घेण्याकरिता १२ पोलिस घटकांमध्ये विशेष अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची
स्थापना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सोबतच १८ वर्षाखालील
हरवलेल्या मुलांच्या कायदेशीर पालकांकडून तक्रार प्राप्त होताच थेट अपहरणाचा
गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही
मुख्यमंत्र्यांनी या उत्तरात सांगितले.
जिल्हय़ाच्या ठिकाणी तपासासाठी स्वतंत्र
पथकाद्वारे शोध मोहीम, समाजात जनजागृती, हरवलेल्या व्यक्तींची माहिती पोलिस गॅझेटमध्ये प्रसिद्धीकरिता पाठविण्यात
येते. माध्यमांवर माहिती देण्यात येते. केंद्रीय गृहविभागातर्फे जारी संकेतस्थळावर
माहिती नियमितपणे अद्ययावत केली जाते. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी जुलै २0१५ ते जुलै २0१७ या कालावधीत चार ऑपरेशन स्माईल आणि
मुस्कान राबविण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हरविलेल्या बालकांपैकी
एकूण १ हजार ६१३ तर यावर्षी २0१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध
लावण्यात आला आल्याचे सांगण्यात आले. पण यातून गंभीर प्रश्न उपस्थित होतो तो
अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचा. मानवी तस्करी या समस्येने सध्या सबंध जगाला
वेठीस धरले आहे. ही तस्करी दोन प्रकारात मोडते. एक म्हणजे अपहरणातून हत्या करून
शरीरातील अवयव आंतरराष्ट्रीय स्तरावर विकणे आणि दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे
देहव्यापार. यातील दुसर्या प्रकाराला जास्त ग्लॅमर आहे. आजपासूनच नाही तर प्राचीन
काळापासून कुठल्या ना कुठल्या स्वरुपात हा प्रकार सबंध जगात सुरू आहे. द्वितीय
महायुद्धाच्या काळात जपानी मुलींना 'स्लेव' म्हणून जवानांकडून शरीरसुखासाठी वापरण्यात आले होते जे इतिहासात आज 'कंफर्ट वुमेन' म्हणून ओळखले जाते. अरब राष्ट्रातही
महिलांची विक्री नवीन नाही. रोहिंग्या मुस्लीम पोटासाठी कधी या भूमिवर तर कधी त्या
भूमिवर आसर्यासाठी धावत आहेत. या दरम्यान लाखो स्त्रिया गायब झालेल्या आहेत
ज्यांची कुठेच नोंद नाही.
जोपर्यंत देहव्यापार या
प्रकाराला मुळातून आळा बसणार नाही तोपर्यंत मुलींच्या अपहरणाचा प्रकार थांबणार
नाही. आज महाराष्ट्रापुरता जरी याचा विचार केला तरी मुंबईतील तस्करांचे थेट संबंध
हे जागतिक टोळय़ांशी जुळलेले आहे. येथील मुलींची विदेशात मोठय़ा प्रमाणात तस्करी होत
असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने आणखी ठोस पावले उचलण्याची
गरज आहे. कारण 'टेकन' सारखा
एखादा बाप आपल्याकडे निर्माण होण्याची सूतराम शक्यता नाही.
No comments:
Post a Comment