Friday, December 1, 2017

स्मार्टफोनचे धोके

     कॅन्सर हा भयानक रोग आपल्या बदलत्या जीवनशैलीची देण आहे. आपल्या देशाला वाढती लोकसंख्या ही मोठी किड आहे. या लोकसंख्येची वाढती भूक भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. हरितक्रांतीने आपल्याला अन्नधान्यात स्वयंपूर्णता दिली असली तरी (30 टक्के लोकांपर्यंत अन्न पोहचत नाही,हा भाग वेगळा)तिने अनेक आजारही दिले आहे. देशी वाणांना दूर सारत आपण हायब्रीड वाणाला कवटाळले आहे. त्यामुळे पोट भरत आहे,पण सकसता त्यातली संपली आहे.त्यातच आधुनिक यंत्रे,यंत्रणा आणि साधने यामुळे कष्टाची कामे कमी झाली आहेत. मात्र मानसिक धावपळ वाढली आहे. त्यामुळे आपले शरीर एक वेगळीच जीवनशैली जगत आहे. यातून आंतरबाह्य शरीराची जोपासना हलक्यापरी घेतली जात आहे. पैसा मिळवण्याच्या नादात शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. असे असताना स्मार्टफोनसारख्या वस्तू आपल्या नित्याच्या गरजा भागवताना त्यांनी आपले संपूर्ण विश्वच व्यापून टाकले आहे. किराणा माल ते मोठ्या वस्तूंची खरेदी-विक्रीपासून ते नोकरी,व्यवसायातले छोटे-मोठे प्रकल्प आज आपण मोबाईलवर पूर्णत्वाकडे नेत आहोत. साहजिकच स्मार्टफोनचा वापर अनिवार्य झाला आहे. पण ही अनिवार्यता आपल्याला धोक्यात घालत आहे, याकडेही आता लक्ष देण्याची गरज आहे. खास करून मुलांपासून स्मार्टफोन जितका दूर ठेवता येईल,तितका तो दूर ठेवला तर बरे होईल, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

     स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांना मेंदूचा कर्करोग होण्याचे प्रमाण 400 टक्क्यांनी वाढला असल्याचा निष्कर्ष मुंबईतल्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थेतील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-आयाअयटी)चे प्राध्यापक गिरीशकुमार यांनी दिला आहे.अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सेलफोनमधील किरणोत्सर्गाचा धोका या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी स्मार्टफोनचे छुपे धोके स्पष्ट केले आहेत. हे सांगताना त्यांनी दररोज 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ स्मार्टफोनचा वापर करू नका, अशी विनंतीही आपल्याला केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणार्या गंभीर परिणामांविषयी केंद्रसरकारलाही एक अहवाल सादर केला आहे व सरकारी पातळीवरही याबाबत जनजागृती आणि अन्य मार्गाद्वारा उपाय योजन्याची विनंती केली आहे.
     आजची तरुणी पिढी तर या स्मार्टफोनशिवाय जगूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्या अतिवापरामुळे काहींना मोबाईल फोबिया झाला असल्याची उदाहरणे आहेत. काहींनी मोबाईलसाठी आत्महत्या केल्या आहेत. मोबाईलवर अतिप्रमाणात गेम्स खेळल्या गेल्याने मुले चिडचिडी बनली असल्याचे किंवा बनत असल्याचे निष्कर्ष आपण ऐकत आलो आहोत. तरीही याकडे केला जाणारा कानाडोळा भविष्यात आपल्याला जबर किंमत मोजायला लावणारा आहे,हेही ध्यानात घ्यायला हवे. पालकांनी तर आपल्या मुलांना आवर घालायलाच हवा,पण शाळा-कॉलेज आणि वृत्तपत्रे,दूरचित्रवाहिन्या आणि शासकीय स्तरावरदेखील याबाबतीत मोठी जनजागृती होण्याची गरज आहे.
     सततच्या स्मार्टफोनच्या वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मेंदूचा कर्करोग होण्याचे प्रमाण 400 टक्क्यांनी वाढले आहे. शिवाय मोबाईलमधील किरणोत्सर्गामुळे युवकांमधील डीएनए वर घातक परिणाम होऊ शकतो, तसेच निद्रानाशाचा आजार, मेंदूत बिघाड झाल्यामुळे स्मृतिभ्रंश व कंपवातासारखे आजार उद्भवू शकतात, असेही गिरीशकुमार यांनी सांगितले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे घातक घटक मानवी शरीरात प्रवेश करतात. यामुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेलाही धोका उत्पन्न होऊ शकतो. मुलांच्या आरोग्याला अधिक धोका असल्याकडे श्री. गिरीशकुमार यांनी अधिक लक्ष वेधले आहे. कारण लहान मुलांची कवटी नाजूक असते आणि त्यातून हे किरणोत्सर्ग सहजपणे आत जाऊ शकतात. मोबाईलमधील किरणोत्सर्गाचा जनावरे आणि झाडांच्या आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो. अर्थात आधुनिक यंत्रणा आज आपल्या अगदी जवळची झाली आहे. त्यांच्या वापराशिवाय आपल्याकडे काही वेळेला पर्याय राहिला नाही. ही बाब आता खरी असली तरी काही गोष्टींचे भान ठेवावेच लागणार आहेत. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो,हेही आपल्याला माहित आहे. आज दूरसंचार क्षेत्राने जग जवळ आले आहे. यात फार मोठी प्रगती झाली आहे. अजूनही हे तंत्रज्ञान विकसित व्हायचे बाकी आहे,त्यामुळे त्याचा लाभ मानवालाच होणार आहे,पण तरीही यापासून उत्पन्न होणार्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
     स्मार्टफोन हातात आल्यामुळे जग आपल्या मुठीत आले आहे.हे तंत्रज्ञान आपल्याला अजून कोठे नेऊन ठेवेल,याची काही कल्पनाच नाही. वीस वर्षांपूर्वी आपण कोठून कोठेही संवाद साधू शकतो, यावर कोणी विश्वास टाकला नसता,मात्र आज आपण फक्त बोलूच शकत नाही, नव्हे तर आता एकमेकांना पाहूही शकत आहोत. ही प्रगती माणसाला आणखी कोणत्या स्तराला नेईल, याची आताच कल्पना करता येणार नाही.पण आपण जिथे कुठे असू तेथून आपलीही कामेही उरकली जात आहेत. त्यामुळे आपल्याला आता ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागणार नाही, अशी परिस्थिती आहे.त्यामुळे त्याची अनिवार्यता जितकी जास्त आहे, तितकेच किंबहुना त्याहून जास्त त्याचे धोके आहेत.त्याकडे लक्ष देऊन ते कसे कमी करता येतील, यावर आता अभ्यास होण्याची गरज आहे. वायफाय परिसरात वावणार्या लोकांनाही त्याचे धोके असल्याचे सांगण्यात येत आहे. ॅक्टिव्ह स्मोकिंगपेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग जसे अधिक धोकादायक आहे, तसेच धोके नेट, फोनचे किरण यांचे धोके आहेत. एकाद्या गोष्टीच्या फायद्याचा अधिक विचार केला जातो,परंतु त्यांच्या धोक्यांकडेकडेही तितक्याच गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment