सुखदेव मोठा श्रीमंत
शेतकरी होता. शेतात धनधान्य
भरपूर पिकत होते. पुष्कळशा गाई-म्हैशी होत्या.
दूध-दुभत्याने त्याचे घर ओसंडून वाहत होते.
वाडवडिलांकडून हा सगळा वारसा मिळाला.त्याला फक्त
त्याचा सांभाळ करायचा होता. पण तो फार आळशी होता. कामचोर होता. सकाळी उशिरापर्यंत झोपायला त्याला फार आवडायचे.
त्याच्या आळशीपणामुळे
त्याच्या शरीरावर साहजिकच परिणाम होऊ लागला. तो आजारी पडला. त्याचे चालणे-फिरणे बंद झाले. तो अंथरुणाला खिळून राहिला. पलंगावर पडून राहिल्याने त्याचे वजन आणखी वाढले. त्याचा
आजार बळावतच गेला.
आता शेतीची आणि
दुधाची कामे नोकरांवर विसंबून राहिली. शेवटी नोकर ते नोकरच! मालक जागचा हलत नाही
म्हटल्यावर यांनी हपापाचा माल गपापा करायला सुरुवात केली. अप्रामाणिक
नोकरांमुळे शेवटी व्हायचे ते झाले. शेती तोट्यात चालली.
त्याला काय करावं कळेना. जायचे हालायचे होईना!
त्याची चिंता आणखी वाढली. त्याचा आजार आणखी बळावला.
आपण आता जगत नाही, असा विश्वास त्याला वाटायला लागला.
एक दिवस त्याचा
जिवलग मित्र सज्जन त्याला भेटायला आला. आजारामुळे आपली काय वाताहत झाली आहे, याची
सुखदेवला कल्पना दिली. परंतु, सज्जन समजून
चुकला होता की, हा सगळा प्रकार त्याच्या आळशीपणामुळे अंगाशी आला
आहे. मित्र हुशार होता. तो म्हणाला,
तुझ्या आजारावर माझ्याकडे एक उपाय आहे. पण ते तू
करू शकणार नाहीस.कारण यासाठी तुला सकाळी लवकर उठावे लागणार आहे.
सुखदेव म्हणाला, आजार बरा होण्यासाठी मी काहीही
करायला तयार आहे.
मित्र म्हणाला, सकाळी आपल्या गावाच्या पश्चिमेला एक सोनेरी पक्षी येत असतो.त्याला पाहिलास की,
तुझा आजार छू मंतर होऊन जाईल.पुन्हा कधीच तुला
आजाराची लागण होणार नाही. मात्र त्याला पाहण्यासाठी सकाळी लवकर
उठून गावाबाहेर जायला लागेल.
सुखदेव सकाळी उठायला
तयार झाला. आणखी एक महत्त्वाचे
म्हणजे त्याचे शेत गावाच्या पश्चिमेलाच होते. सोनेरी पक्षी पाहायचे होईल आणि शेताची पाहणीही होईल.
दुसर्यादिवशी सकाळी उठून सोनेरी पक्षाच्या
शोधार्थ निघाला. जाता जाता तो शेतातून निघाला. तिथे त्याला एक नोकर डोक्यावर ज्वारीचे टिके घेऊन जाताना दिसला. त्याने त्याला हटकले. नोकर घाबरला. तो ज्वारी चोरून नेत होता. सुखदेवने त्याला चांगलेच झापले.पुन्हा असा प्रकार घडला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.
तो आता पुरता थकला
होता.पण सोनेरी पक्षी काही दिसला नाही.
माघारी परतला. दुसर्यादिवशीही
तो भल्या सकाळी घराबाहेर पडला. शेतावरून जाताना त्याला नोकर दुधात
पाणी घालत असल्याचे दिसले. त्याने लपून सगळा प्रकार पाहिला.
त्याला काहीही न बोलता तो तेथून निघून गेला. त्यादिवशीही
त्याला पक्षी दिसला नाही. पण तो थेट गावात गेला. डेअरीत जाऊन चौकशी केली. त्याचा नोकर रोज 500
लिटर दूध घालत असल्याचे आणि दुधात पाणी घालत असल्याचे कळले. प्रत्यक्षात रोज 200 लिटर दूध होत असल्याचा हिशोब नोकर
त्याला देत होता.
दुसर्या दिवशी सुखदेवने नोकराला रंगेहात
पकडले. नोकराने माफी मागितली. सगळा हिशोब
चोख सांगितला. यापुढे असा प्रकार होणार नसल्याची त्याने हमी दिली.
आता सुखदेव हळूहळू शेतात लक्ष देऊ लागला. मालक
रोज फिरायला येत असल्याने नोकरदेखील काम अगदी चोख करू लागले. बेईमानी पुरती थांबली.
सुखदेव आता रोज
शेतावर जाऊ लागला. त्याला सोनेरी पक्षी दिसला नाही,पण हिंडण्या-फिरण्यामुळे त्याची तब्येत बरी झाली. तो आता चांगला हिंडू-फिरू लागला. शेतात छोटी छोटी कामे करू लागला.
एक दिवस त्याचा
मित्र सज्जन पुन्हा त्याला भेटायला आला. सोनेरी पक्षी दिसला नसल्याची त्याने तक्रार केली. सज्जन म्हणाला, तुझी मेहनत म्हणजेच सोनेरी पक्षी.
तू ज्यावेळेपासून शेतात जायला लागलास, त्यावेळेपासून
चोरी थांबली. तू हिंडायला-फिरायला लागलास
आणि आपोआप तुझी तब्येत बरी झाली. शरीराला कष्टाची आवश्यकता असते.
त्याला कष्ट दिलेस की, ते अजिबात कुरकूर करत नाही.
कष्ट आपल्या कामात भरभरून यश देते.
सुखदेवने सज्जनचे
हातात हात घेऊन आभार मानले.
No comments:
Post a Comment