Saturday, December 23, 2017

सेलिब्रिटींची कमाई

     आपल्या भारतीयांना दुसर्यांच्या गोष्टीत फार इंटरेस्ट असतो. त्यातल्या त्यात सेलिब्रिटींविषयी जाम उत्सुकता असते. सेलिब्रिटी काय खातात,काय पितात, काय नेसतात, कुठे जातात, त्यांचे कुणाशी लफडे आहे, कुणाशी भांडण आहे, अशा सार्या गोष्टी जाणून घ्यायला फार फार आवडतात. इतकेच काय या मंडळींना साधी शिंक आली तरी त्याची बातमी होते. फक्त त्याच्या मेहनतीकडे मात्र आपले भारतीय दुर्लक्ष करतात. खरे तर सेलिब्रिटींच्या मेहनत,जिद्द, चिकाटी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच ही मंडळी आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. सेलिब्रिटी बनतात.
     आपल्या देशात सिनेकलाकारांना अधिक पसंदी दिली जाते. त्यांचे अनुकरण करण्यात आजची पिढी धन्यता मानते. अलिकडे क्रिकेटपटूंचाही यात समावेश झाला आहे. त्यामुळे ही मंडळी सिनेमा, क्रिकेट यातून तर कमाई करत आहेतच, शिवाय जाहिरातीतूनही मोठी कमाई त्यांची सुरू आहे. कोट्यवधी बनण्याची स्वप्ने पाहणार्या युवकांनी त्यांच्या मेहनतीचा आदर्श घ्यायला हवा. मेहनत कधी वाया जात नाही. पाठोपाठ जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कुठल्या कुठे पोहचू शकतो. आपल्या चित्रपट कलाकारांचेच घ्या. वास्तविक हे क्षेत्र फारच धोकादायक आहे. मात्र मेहनती माणसांना इथे संघर्षातूनही यश मिळत राहते. नायकाचा चेहरा नसला तरी नाना पाटेकर, नवाजुद्दिन सिद्दिकी, जॉनी लिव्हर, राजपाल यादवसारखे कलाकार यशस्वी होतात. आज हे कलाकार सुरुवातीला कफल्लक असूनही आज कोट्यवधीचे मालक आहेत. नुकतीच फोर्ब्सने 2017 साठी भारतातल्या सर्वाधिक कमाई करणार्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे. यात 233 कोटी मिळवून सलमान खान आघाडीवर आहे. अलिकडे त्याचा ट्युबलाइट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यातून त्याला फारशी कमाई झाली नसली तरी तो आज टॉपवर आहेया यादीत अमिताभ बच्चन यांना 20 वे स्थान मिळाले आहे. या ज्येष्ठ कलाकाराची वार्षिक कमाई 40 कोटी रुपये आहे.
   
  सलमान खानचे आजचे वय 51 आहे. तो अजून नायकाचीच भूमिका करतो आहे. शिवाय होम प्रोडॉक्शन कंपनी आहे. या माध्यमातून तो चित्रपटांची निर्मिती करून पैसा कमावतो आहे. खरे तर सलमान-शाहरुख आणि अमिर ही खान तिकडी बॉलीवूडवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवत आली आहे. या तगड्या कलाकारांची आपली आपली एक इमेज आहे. सलमान खान याने या सगळ्यात अधिक चित्रपट केले आहेत. आणि यशदेखील त्याच्याच परष्यात अधिक पडले आहे, असे असले तरी शाहरुखला बॉलीवूडचा बादशहा का म्हणतात, कळायला मार्ग नाही. फोर्ब्सच्या यादीत हाच शाहरुख दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 2017 मध्ये 170.50 कोटी कमावले आहेत. अलिकडच्या काळात त्याच्या यशालाही उतरती कळा लागली आहे,मात्र त्याने होम प्रोडॉक्शनची निर्मिती करून आपला व्यवसाय तेजीत ठेवला आहे. त्यामुळे सलमान असो किंवा शाहरुख खान त्यांचे चित्रपट चालले नाही तरी त्यांच्या कमाईवर काही फरक पडत नाही. शाहरुखचे आजचे वय 52 आहे. तो आणखी किती काळ नायक म्हणून पडद्यावर येत राहील, हे सांगता येणार नाही.पण त्याच्या संपत्तीत मात्र दिवसेंदिवस वाढ होत राहणार हे नक्की!परफेक्शननिस्ट अमिर खान या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. वर्षा-दोन वर्षातून एकच चित्रपट करणार्या अमिरने पाणी पौंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा हा अत्यंत उपयोगी असा कार्यक्रम राबवला आहे. 52 वर्षाच्या अमिरखानची वार्षिक कमाई 69 कोटी रुअपए इतकी आहे.
     तिसर्या क्रमांकावर चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 101 कोटी रुपये कमवून सिनेकलाकारांच्या यादीत आपले नाव वरच्या क्रमांकावर कोरले आहे.  विराटचे वय अवघे 29 आहे. अगदी कमी वयाचा तो सेलिब्रिटी आहे. परवाच त्याचा आणि अनुष्काचा विवाह इटलीत पार पडला. सध्या हे दोघेही दिल्ली,मुंबई असे करत आपल्या लग्नाच्या पार्ट्या देत सुटले आहेत. सध्या त्याचा क्रिकेटमधला फार्म जबरदस्त आहे. त्यामुळे आणखी काही वर्षे तो सहज भारतीय क्रिकेट संघाकडून खेळू शकतो. त्यामुळे त्याच्या कोटीचा ग्राफ आणखी वाढत जाणार आहे.सध्याच्या घडीला त्याने कमाईत कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन पाचव्या क्रमांकावर आहे. 44 वर्षे वयाच्या सचिनची कमाई 82.50 कोटी आहे. त्याने क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी त्याच्या कमाईत फरक पडला नाही, हे विशेष! महेंद्रसिंह धोनी या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्याचे उत्पन्न 64 कोटी आहे. 36 वर्षे वय असलेल्या धोनीने अन्य व्यवसायातही आपले पाय रोवले आहेत. त्याला जाहिराती मिळाल्या नाहीत तरी चालतील, अशा प्रकारची व्यवस्था त्याने करून ठेवली आहे.

     शेतकर्यांच्या आत्महत्येविषयी अधिक संवेदनशील असलेला अक्षय कुमार चौथ्या क्रमांकावर आहे. हॉटेलमध्ये वेटर ते मार्शल आर्ट असा प्रवास करत बॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या अक्षय कुमारने या क्षेत्रात आपले एक स्वतंत्र अस्तित्व आणि प्रेक्षक जमा केला आहे. स्टंट,कॉमेडी, सामाजिक प्रश्न घेऊन पडद्यावर येणारा अक्षय प्रेक्षकांना आपला वाटतो. पहिल्या दहामध्ये एकमेव महिला सेलिब्रिटी आहे, ती म्हणजे प्रियांका चोप्रा.तिचे आज 35 वय आहे आणि उत्पन्न आहे. 68 कोटीचे! सुपरमनच्या भूमिकेत नावाजला गेलेला ऋत्विक रोशन नव्या क्रमांकावर आहे.43 वर्षे वयाच्या या अभिनेत्याला आपल्या पत्नीशी घटस्फोट घेताना बराच खर्च करावा, असला तरी त्याचे उत्पन्न 63 कोटीचे आहे. 10 व्या क्रमांकावर 32 वर्षाचा रणवीरसिंह आहे. त्याचे उत्पन्न 62.63 कोटी रुपये इतके आहे. आपल्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अजूनही सर्वच प्रकारात दुय्यम स्थान आहे. नायकाची भूमिका साकारणार्या कलाकारापेक्षा किती तरी पटीने कमी मानधन मिळते. चित्रपटात दमदार भूमिकेपेक्षा शोपीस म्हणूनच त्यांचा वावर अधिक असतो. पैसा वसूल फॉर्म्युला वापरून चित्रपट निर्माते त्यांना फक्त सौंदर्यवती म्हणूनच चित्रपटभर मिरवतात. क्वचितच काही चित्रपट नायिकाप्रधान असतात. मात्र असे असले तरी त्यांच्या मेहनतीला कमी लेखून चालणार नाही. कित्येक अभिनेत्री आपल्या स्वत:च्या हिमतीवर चित्रपट तारून नेले आहेत. पण ही संख्या फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपच आहे.
     या सेलिब्रिटींचे उत्पन्नाचे आकडे पाहिल्यावर त्यांनी अल्पावधीत इतके यश मिळवले, असा प्रश्न पडतो. पण त्यांच्या या मेहनतीला दाद आपणच देतो,म्हणूनच ते सेलिब्रिटी होऊ शकतात. आपल्याला त्यांचे काम, त्यांचा खेळ आवडतो. त्यांना टाळ्या वाजतो. आजचे युग मार्केटिंगचे आहे. आपण या कलाकारांना महत्त्व देतो,म्हणून कंपन्या त्यांना महत्त्व देतात. त्यांना आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरातीमध्ये घेतात. आपण आपल्या नायकाला ती वस्तू आवडते,म्हणून आपणही ती वस्तू खरेदी करतो. पण हा त्यांचा व्यवसाय आहे, याचे भान अनेकांना नसते. आपण त्यांचे मनभरून कौतुक करतो. याचा फायदा कलाकार आणि कंपन्या घेत असतात. आपण त्यांच्या नेसण्या,घालण्याच्या वस्तूंकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या कष्टाला महत्त्व द्यायला हवे.तरच आपल्यालाही त्यांचे इतरबाबतीत अनुकरण करतो, तसे न करता कष्टाच्याबाबतीतही आदर्श घेता येतील.

No comments:

Post a Comment