Tuesday, December 26, 2017

(बालकथा) झाडाची व्यथा

     जंगलात एक हिरवंगार झाड होतं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपकत होते. झाडाचे अश्रू पाहून आकाशातून उडत निघालेला एक गरुड खाली आला. त्यानं झाडाला विचारलं, ‘अरे दोस्ता, तू असा रडतोयस का? मी काही मदत करू शकतो का तुला?’
     झाड म्हणाले, ‘मित्रा गरुड! आपल्या जंगलातल्या सगळ्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत,तिथे त्यांचा किलबिलाट चालतो. ती झाडं किती गजबलेली दिसतात, पण माझ्या फांद्यांवर मात्र एकदेखील घरटे नाही. त्यामुळे मला फार फार वाईट वाटतंय. तुला तर गरुडराज म्हणतात.तू ज्या झाडावर राहतोस,त्या झाडावर तुझ्या छत्रछायेखाली अनेक पक्षी येऊन राहतात. घरटी बनवतात. गुण्यागोविंदाने राहतात. मग तूच का नाही माझ्या फांद्यांवर येऊन राहत?’

    गरुडाला झाडाची दया आली. त्याने आपले घर त्या झाडाच्या फांदीवर बनवले. पराक्रमी गरुडाचे घर पाहून खुपशा पक्षांनी त्या झाडावर येऊन आपली घरटी बांधली. तिथे गरुड राहत असल्या कारणाने गिधाड,घार अशा कुणाचीच भिती किंवा धोका तिथल्या पक्ष्यांना नव्हता. सगळे पक्षी पराक्रमी गरुडाचे म्हणणे ऐकत होते. त्यानुसार वागत होते.
    एक दिवस गरुड झाडाला म्हणाला, ‘मित्रा, आता तुझ्या फांद्यांवर खुपशी घरटी बांधली गेली आहेत. मला माझ्या मित्रांना भेटून खूप दिवस झाले. आता त्यांना भेटायची इच्छा होते आहे, तेव्हा मला तिकडे जावे लागेल.’
गरुड आपल्या मित्रांना भेटायला निघून गेला. त्याच्या दुसर्यादिवशीची गोष्टएका सुतार पक्ष्याचे पिल्लू उडायला शिकत होते.ते उडता उडता झाडाखाली कोसळले.तिथे त्याला लहान लहान कीटकांची एक रांग दिसली. ते तो अगदी लक्ष देऊन पाहू लागला. ते कीटक झाडाच्या एका फांदीला छिद्र पाडण्याच्या कामाला लागले होते. पिल्ल्याने आपल्या आईला बोलावून सांगितले, ‘आई... आई... ते बघ किडे, आपल्या झाडाला काय करताहेत ते?’
    ती म्हणाली, ‘ते जे काही करतात ना, ते त्यांना करू दे. तू लवकरात लवकर उडायला शिक.’
    ‘पण आई, ते तर आपल्या झाडाला पोखरताहेत’, पिल्लू हट्ट करत म्हणाले.
आईने पिलाला एक चापट मारली आणि त्याला घेऊन ती उडाली. इकडे झाडाला आपल्या फांदीमध्ये त्रास व्हायला लागला. त्याला दुखायला लागले.त्या फांदीवर हिरवे पोपट राहत होते. झाड त्याला म्हणाले, ‘अरे बघ रे! माझ्या फांदीला काय होतंय ते? मला फार त्रास व्हायला लागलाय रे!’
     हिरवे पोपट खाली उतरले. त्यांनी तिथे खुपशा वाळव्यांना पाहिलंते पोपट शाकाहारी होते. त्यांच्या चोची खालच्या बाजूने  वाकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्या वाळव्यांना काही करता येत नव्हते. त्यांना हाकलून देता येत नव्हते. त्यांनी शेजारच्या फांदीवर बसलेल्या चिमणीला विनंती केली.
     ‘दीदी, आमच्या फांदीवर वाळवींनी हल्ला चढवला आहे.तू तुझ्या तीक्ष्ण चोचीने त्यांना तिथून पिटाळून लाव.’
चिमणी म्हणाली, ‘मला काय त्याचे! ते तुमच्या फांदीला लागले आहेत. माझ्या तर नाही नामग  मी का बरं कष्ट घ्यावेत?’
सात- आठ दिवसांत फांदी सुखून गेली.पानेही वाळून गेली. पोपटांची पानांआड लपलेली घरटी उजाड झाली. ती आता उघड उघड दिसायला लागली. आता पोपटांना भिती वाटायला लागली की, आपल्या छोट्या छोट्या पिल्लांवर हल्ला होऊ शकतो. पण झाडाच्या दुसर्या फांदींवरील पक्षी मात्र निश्चिंत होते. त्यांनी जाणून घ्यायची तसदीही घेतली नाही की, झाडाची फांदी का सुकली ते?
     
वाळवींनी आतल्या आत झाडाला पार पोखरून काढले. दुसर्या फांद्यांवरही हल्ला सुरू केला. आता पूर्णच्या पूर्ण झाडच सुखायला लागले. आता सगळ्या पक्ष्यांना समजून चुकल्यावर सगळे त्या वाळवींना मारायला धावले. पण आता खूप उशीर झाला होता. त्यांनी पूर्ण झाड गिळंकृत करून टाकले होते.त्यांनी झाडाच्या आतमध्ये प्रवेश केला होता. आता त्या वाळवींना नष्ट करणे अशक्य होते.
काही दिवसांतच पूर्ण झाड सुखून गेले. आता त्याचा फक्त सांगाडा उरला. पोपट म्हणाले,‘तुमच्या सर्वांच्या बेफिकीरीमुळे, दुर्लक्षामुळे हा अनर्थ घडला आहे.जर सुतार पक्षी, मैना किंवा चिमणीने मदत केली असती तर आज आपल्यावर अशी परिस्थिती ओढवली नसती. त्या वाळवींचा आपण प्रारंभीच नायनाट करू शकलो असतो. पण तुम्ही फक्त आमचीच म्हणजे पोपटांचीच समस्या आहे, असे समजून दुर्लक्ष केलंत. त्यामुळे शत्रूला आपल्या घरात शिरण्याची संधी मिळाली. खरेच! आपल्यात एकता आणि बंधुभाव असता तर आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते.’ हे बोलताना हिरव्या पोपटांचा कंठ दाटून आला होता.
     खरेच! एकाद्या छोट्या समस्येकडे कानाडोळा केला तर ती नंतर एक मोठी समस्या होऊन बसते. ही गोष्ट आता सगळ्याच पक्ष्यांना कळून चुकली होती. पण आता काय करू शकणार होते? कारण वेळ तर निघून गेली होती. त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे त्यांचे घर-दार  उजाड बनले होते.

No comments:

Post a Comment