अलिकडच्या काही वर्षात रब्बी
आणि खरिप पिकांकडे शेतकरी पाठ फिरवताना दिसत आहे. या पिकांना मिळणारा बेभरवशाचा दर, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा वाढलेला कल,त्यातच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे पारंपारिक पिकांना फटका बसत असून
आणखी काही वर्षे असेच चालू राहिले तर ही पिके कालबाह्य होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पिकांना राजाश्रय मिळण्याची
आवश्यकता आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान
आणि कमी पाण्यावर वाढत असलेली अन्य पिके याचाही या पिकांना फटका बसत आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात
सगळीकडेच अशी अवस्था असून शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या अन्य पिकाच्या
वाणाचा वापर करून भरघोस उत्पादन करण्याचा यशस्वी प्रयत्न करू लागला आहे. यात
शेतकर्यांना यश येऊ लागल्याने एकाचे पाहून दुसरा या शेतीकडे वळू लागला आहे.
साहजिकच याचा मोठा फटका ज्वारी,गहू, हरभरा व अन्य पारंपारिक पिकांना बसू लागला आहे. याचे क्षेत्र दिवसेंदिवस
घटत आहे. सांगली,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात या पिकांची
लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. या भागातील ज्वारी,गहू,हरभरा व इतर कडधान्ये प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर, सांगली
आणि सातारा जिल्ह्यातल्या नदीकाठच्या परिसरात पाण्याची मुबलकता असल्या कारणाने आणि
उसाला मिळत असलेला चांगला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे.
त्यामुळे पारंपारिक पिकांच्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे.
सध्याच्या रब्बीच्या पेर्याचा
विचार केला तर कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र
घटल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील पेरक्षेत्र तर सर्वाधिक कमी झाले असून,
आतापर्यंत केवळ सव्वा लाख हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे.कोल्हापूर
विभागात खरिपाचे क्षेत्र जास्त असले तरी रब्बीचेही कमी नाही. विभागात 5 लाख 24 हजार 750 हेक्टर
रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यातील सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 66 हजार, तर सातारा
जिल्ह्यात 2 लाख 15 हजार हेक्टर
क्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाच्या तुलनेत 25
टक्केही रब्बीचे क्षेत्र नाही. सांगली जिल्ह्यातील बहुतांश, तर
सातारा जिल्ह्यात माण, खटावसह निम्मे तालुके दुष्काळी
असल्याने येथे रब्बीचे क्षेत्र मोठे आहे, पण अलिकडच्या काही
वर्षात बदलत्या कृषी तंत्रज्ञानामुळे पीक पद्धतीतही बदल होत असल्याने पारंपारिक
पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल कमी झाला आहे.
सांगली, सातारा जिल्ह्यांत यंदा पाऊस चांगला झाला आहे. सिंचनाखालील
क्षेत्र वाढल्याने त्याचा थेट परिणाम रब्बी क्षेत्रावर झाला आहे. रब्बीमध्ये
पिकविलेल्या गहू, हरभरा, मका, ज्वारीला निश्चित भाव नसल्याने आपल्यापुरते उत्पादन घेणे, एवढीच शेतकर्यांची मानसिकता आहे. त्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने
रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे. द्राक्षे,डाळिंब,बोर याशिवाय ड्रॅगन फळ यांचे क्षेत्र वाढू लागले आहे. भाजीपाल्याचे
क्षेत्रदेखील वाढत आहे. शेतकर्यांचा कल कमी खर्चात, कमी
पाण्यात जास्त उत्पादन देणारी पिके घेण्याकडेही वाढला आहे. साहजिकच ज्या ठिकाणी
पाणी आहे,तिथे ही पारंपारिक पिके हद्दपार होत आहेत तर
दुष्काळी टप्प्यातही या पिकांकडे शेतकरी पाठ फिरवू लागला आहे.यामुळे अनेक समस्या
निर्माण होत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आधुनिक कृषी
तंत्राच्या वापराचे अनेक चांगले परिणाम असले तरी पारंपारिक पिकाचे क्षेत्र घटत
चालल्याने वैरण टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच याचा फटका
जनावरांना बसत असून बैलजोड्या कमी होऊ लागल्या आहेत. दुधाळ जनावरांची विक्री होऊ
लागली.परिणामी दुधाच्या क्षेत्रातही घट होऊ लागली आहे.
या खेपेला सांगली,कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात
चांगला पाऊस झाला आहे. यामुळे काही ठिकाणी खरिपाची काढणी लांबली. त्यामुळे
रब्बीच्या पेरण्याही पुढे सरकल्या. मात्र रब्बीच्या पेरणीत मोठी घट झाली आहे. या
विभागात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे; पण डिसेंबरच्या
दुसर्या आठवड्यापर्यंत केवळ 70 टक्केच पेरणी झाली आहे.
गव्हाचे क्षेत्र कमालीचे घटले असून, केवळ 26 तर मक्याची 43 टक्केच पेरणी झाली आहे. हरभर्याची
पेरणी 45 टक्के झाली आहे.पारंपारिक पिके हद्दपार झाली तर
मानवी शरीराच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत. जीवनचित्रच यामुळे बदलणार आहे.
आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पारंपारिक
पिकांची शेती टिकली पाहिजे.यासाठी या पिकांना राजाश्रय मिळायला हवा.
No comments:
Post a Comment