उद्याचा निकोप, समृद्ध आणि बलशाली समाज उभारणीचे आधारवड म्हणून ज्या हातांकडे पाहिले जाते
तेच हात जर गुन्हेगारीच्या विघातक पाशात गुरफटले असतील तर ही बाब समाजासाठी अत्यंत
धोकादायक म्हणावी लागेल. एनसीआरबी या नुकत्याच प्रकाशित झालेल्या
अहवालातून समोर आलेली वाढत्या बालगुन्हेगारीची आकडेवारी समाजमन हादरवणारी आहे.
बालगुन्हेगारी ही केवळ गरीब घरांपर्यंतच मर्यादित राहिलेली नसून ती मध्यमवर्गीयांचे
फ्लॅट आणि श्रीमंतांच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेली आहे. देशभरात
बालगुन्हेगारीचे 35 हजार 849 गुन्हे दाखल
झाले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्यप्रदेशात एकूण 7 हजार 369 गुन्हे
दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो.
राज्यात 6 हजार 606 गुन्ह्यांची
नोंद झाली आहे. वाढती बालगुन्हेगारी ही केवळ चिंता करून दुर्लक्षित
करण्यासारखी गोष्ट नसून त्यावर गांभीर्याने विचार करून वेळीच उपाययोजनाची गरज निर्माण
झाली आहे.
बालगुन्हेगारांकडून
झालेल्या हत्येचा आकडा 130 वर पोहचला आहे. तर
अल्पवयीन मुलांकडून 258 जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. या आरोपींमध्ये बारा वर्षांखालील
मुलांचाही समावेश आहे. आतापर्यंत 7 हजार
717 बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे.
ही गुन्हेगारी मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने घडली आहे. आज विविध वाहिन्यांवर दाखवण्यात येत असलेल्या गुन्हेगारीला प्रवृत्त करायला
लावणार्या मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये
आपल्याला सगळ्या सुविधा मिळायला हव्यात ही मानसिकता, पालकांचे
मुलांवर नसलेले नियंत्रण आदी गोष्टींमुळे मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्हेगारीत वापर करून
घेत आहेत. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती
तसेच चुकीच्या मित्रांशी संगतसुद्धा मुलांना बालगुन्हेगारीकडे नेत आहे. केवळ पैशांसाठीच नाहीत तर काही विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले
गुन्हेगारीकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच
पालकांनीही याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
निकोप, निर्धोक
समाज उभारणीसाठी आणि एकूणच बलशाली सार्मथ्यवान राष्ट्रनिर्मितीसाठी नवी पिढी अधिक सक्षम,
अधिक समंजस तसेच सामाजिक जाणिवा व जबाबदारीचे भान असणारी असावी,
ही अपेक्षा आहे. परंतु या सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीला
तिलांजली देत लहान मुले जेव्हा मोठया प्रमाणात गुन्हेगारीकडे वळतात तेव्हा मात्र या
अपेक्षेला टाचणी लागते आणि सामाजिक चिंतेत भर पडते. या अनुषंगाने
’क्राईम इन महाराष्ट्र’ या अहवालातील आकडेवारी
नुसती मन सुन्न करणारीच नाही तर समाज हादरवून टाकणारी आहे. राज्यातील
बालगुन्हेगारांची संख्या वाढत असल्याची चिंताजनक बाब या अहवालातून समोर आली आहे.
2014 मध्ये अल्पवयीन मुलांकडून झालेल्या विविध गुन्ह्यांपेक्षा
2015 च्या पहिल्या दहा महिन्यांतच ही गुन्हेगारी दुप्पट झाली आहे.
राज्यभरात 2014 मध्ये पोलीस ठाण्यांमध्ये बालगुन्हेगारीचे
5175 गुन्हे नोंदवण्यात आले होते, परंतु
2015 च्या पहिल्या दहा महिन्यांतच ही संख्या 5428 वर गेली. 2016 मध्ये 6 हजार
606 झाली आहे. यात आणखी वाढ होऊन ती संख्या राज्यभरात
बालगुन्हेगारीमध्ये मुंबईचा प्रथम क्रमांक आहे. महाराष्ट्रातील
एकूणच बालगुन्हेगारीचे प्रमाण गेल्या 10 वर्षांत तब्बल
71 टक्क्यांनी वाढावे, ही बाब समाजमन अस्वस्थ करणारी
आणि भयभीत करणारी आहे. सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्येही
बालगुन्हेगारांचा सहभाग असावा हे अतिशय धक्कादायक आहे.मुंबई,
नागपूरसारख्या शहरांमध्ये अशा गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या
मते 12 ते 14 वर्षांपर्यंतचे
मूल कोणतेही कृत्य समजून उमजून, मुद्दाम करत नाही. अनेकदा त्यांना परिणामांची जाणीवही नसते. संतापाच्या
भावनेच्या भरात त्यांच्या हातून अनेक कृत्य घडतात. आईवडिलांशी
तुटलेला संवाद किंवा घरातील इतर अनेक गुंतेही त्यासाठी कारणीभूत ठरतात. अनेक मुलांना जगण्यासाठीच्या किमान गोष्टीच नाकारल्या जात असतील आणि त्यांना
गुन्हेगारीच्या दलदलीतच आयुष्य कंठावे लागले तर त्यांची जडणघडण होणार तरी कशी?
मग त्यांच्यातून गुन्हेगार जन्माला येणार नाहीत तर काय होणार?
त्या मुलांची उठबसच जर गुन्हेगारांच्या संगतीत होणार असेल तर ते गुन्हेगार
घडणार नाहीत तर कोण घडणार? मुंबईच्या रस्त्यांवर सुमारे
37 हजारांहून अधिक मुले राहतात. यापैकी
35 टक्के मुले मोलमजुरी वा काहीतरी धंदा करून आपली उपजीविका करतात.
त्यातील 20 टक्के मुले व्यसनांच्या विळख्यात अडकलेली
आढळतात. अशा या दुष्ट चक्रात अडकलेली मुले बहुतांश समाजाच्या
मुख्य प्रवाहात कधी येतच नाहीत. रस्त्यावरचे गुन्हेगारीचे जीवन
वा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर जेलमधील जीवन इतकेच त्यांच्या हाती उरते. पाकीटमारी, हाणामार्या अशा छोट्या गुन्ह्यांतून या मुलांची
भीड चेपून ते मोठे गुन्हे करायला धजावतात. त्यामुळेच या पहिल्याच
पायरीवर त्यांना समुपदेशन, सुरक्षित वातावरण आणि शिक्षणाची ओळख
मिळाली तर गंभीर गुन्हेगार म्हणून त्यांची वाटचाल थांबवणो शक्य आहे. मात्र त्यासाठी पोलीस, समाज, प्रशासन,
सामाजिक संस्था, सरकार, बालकल्याण
समिती या सार्यांनी हातात हात घालून समुपदेशनाचे कार्य केल्यास अशा कारणांनी फोफावत
चाललेल्या बालगुन्हेगारीला आळा घालता येईल.
मुलांच्या जडणघडणीच्या
काळात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेली ही मुले शाळेच्या पायरींवर आणि सुरक्षित घरट्यात
जर नसतील तर त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि विधायकता वाढीस तरी कशी लागणार?
भटक्या विमुक्तांची मुले तर शिक्षणापासून वंचित आहेत. राज्याच्या डोंगरकपारीत, वाड्या-वस्त्यांवर, खेडोपाडी आजही हजारो कुटुंब आपल्या मूलभूत
सोयीसुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे पालक आपल्याबरोबर लहान
वयातच मुलांना कामाला जुंपतात. काम करता करता त्यांच्या हातात
पैसा येतो. त्यामुळे ती मुले शाळा आणि शिक्षणाची वाट धरण्याऐवजी
व्यसन आणि गुन्हेगारीची वाट धरतात आणि तिथेच त्यांच्या उमलत्या आयुष्याला घरघर लागते.
आर्थिक कारणांमुळे खेड्यात आणि शहरात असंख्य मुले बालकामगार म्हणून काम
करत आहेत. अशा या दुष्टचक्रातून लहान मुलांना सोडवले जाणार नसेल
तर गुन्हेगार समाज होण्यास वेळ तो कितीसा लागणार?
No comments:
Post a Comment