आपल्या देशात दरवर्षी
विद्यापीठातून पदवी घेऊन लाखो पदवीधर बाहेर पडतात. मात्र त्यांच्या हातात फक्त पदवीची भेंडोळी असते. कोणत्याही प्रकारचे कौशल्य त्यांच्या अंगी नसल्या कारणाने त्यांना रोजगाराच्या
बाजारात काडीचीही किंमत नसते. त्यांना नोकरी मिळत नाही.त्यामुळे अशा युवकांच्या रोजगाराचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.नोकर्या मिळण्याच्या
कठीण काळात फक्त पदवीची भेंडोळी हातात असून चालत नाही तर त्याच्या अंगी कोणत्या ना
कोणत्या कौशल्याचे हत्यार आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थी पदवीचे
शिक्षण घेत असताना त्यांना विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवला जाण्याची आवश्यकता आहे.
कौशल्यांमध्ये हातखंडा मिळवित असतानाच कोणत्या ना कोणत्या कंपनींशी संपर्क
साधून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. खरे तर
कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते.त्यामुळे विद्यापीठांच्या
पुढाकारातून अशी व्यवस्था शाळा-महाविद्यालयांमधून उपलब्ध व्हायला
हवी आहे. शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थापक
आणि शासन यांच्या अर्थसहाय्यातून या कौशल्याधारित अभ्यासक्रमाला चालना देण्याची आवश्यकता
आहे.
व्यवसाय शिक्षणात
विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये इंटरशिप ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी कला,वाणिज्य आणि शास्त्र शाखेतून महाविद्यालयीन
शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठीही काही ना काही कौशल्य शिक्षण
देण्याची आवश्यकता आहे. आज टीव्ही रियालॅटी शोंमधून नृत्य,गायन, अजब कला यांना मोठी संधी आहे. खेळाकडेही ओढा वाढला आहे. याचे बेसिक नॉलेज महाविद्यालयांमध्ये
मिळायला हवे. त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हायला हवे. हातकाम, चित्रकला, संगणक,मोबाईल ज्ञान,त्याची दुरुस्ती,टीव्ही-मिक्सर दुरुस्ती अशा किती तरी छोट्या-मोठ्या व्यावसायिक
गोष्टींची कौशल्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना शिकवता येतात.त्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना
स्वयंरोजगाराची सवय लावण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे वयाची
पंचविशी ओलांडली तरी युवक आपकमाई न खाता बापकमाईवरच जगत असतो.परदेशात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. उच्च माध्यमिक
शिक्षण घेत असतानाच मुले स्वकमाईसाठी बाहेर पडतात.त्यामुळे त्यांना
कामाची,कष्टाची सवय लागते आणि महत्त्वाचे म्हणजे कोणताही व्यवसाय
वाईट नाही, याची मूल्ये त्याच्यात रुजतात. आपल्याकडे मात्र कित्येक कामांच्याबाबतीत मुले,युवक कमीपणा
मानतात.त्यामुळेच युवकांची संख्या आपल्या देशात अधिक असूनही ही
पिढी बापकमाईवर पोसली जात आहे.
बापकमाईवर दुचाकी
वाहने उडवणे, पोरींभोवती
चकरा मारणं, गुरगुरत दादागिरी करणं अशी संस्कृती आपल्याकडे वाढत
चालली आहे. आज शेती हा चांगला व्यवसाय आणि चांगली उपलब्ध असताना
युवक मात्र त्यात लक्ष द्यायला तयार नाही. घरचे त्याला शेतकरी
बनवण्यास तयार नाहीत. आणि मुलांना त्यात रस नाही.त्यामुळे काही वर्षांनी नेस्तनाबूत होतेय की काय, अशी
भीती निर्माण झाली आहे. शालेय शिक्षणात शेतीचा समावेश नसल्यानेही
याचा मोठा तोटा होत आहे. आपल्याकडे कमवा व शिका ही चांगली योजना
आहे,मात्र अशा योजना फक्त कर्मवीर पाटील यांच्या शिक्षण संस्थांपुरत्याच
सिमीत राहिल्या आहेत. त्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये
राबवल्या जायला हव्यात. आज कित्येक युवक कंपन्यांमधील मोठ्या
मोठ्या हुद्द्यावरच्या आणि मोठ्या पगाराच्या नोकर्या सोडून जिद्दीने
आणि अभ्यास-संशोधनाने शेती करून कंपन्यांमधील पगारापेक्षाही मोठे
उत्पन्न मिळवीत आहेत. अशा युवकांच्या यशाच्या कथा शाळा-कॉलेजमध्ये सांगितल्या जायला हव्यात. अनेक उद्योग-व्यवसायात कष्टाच्या,जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर
मोठी भरभराट करता येते,याकडे मुलांचे लक्ष वेधले जायला हवे.
प्रशासनात अधिकारी व्हायला उत्सुक युवक जितकी मेहनत घेत आहेत,त्याहीपेक्षा थोडी कमी मेहनत केली तरी व्यवसाय-उद्योगात
ते यशस्वी होऊ शकतात. अधिकारी म्हणून काही मोजक्याच युवकांना
संधी मिळते,मात्र अन्य क्षेत्रात मेहनत केल्यास प्रत्येकालाच
संधी आहे,याचेही भान विद्यार्थ्यांमध्ये यायला हवे.
आज डिझिटल इंडियाचा
बोलबाला आहे.तंत्रज्ञानाचा
वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र यातली दुसरी बाजू अजूनही
दुर्लक्षित आहे, ती म्हणजे या क्षेत्रातील फसवणूक.सायबर गुन्ह्यांचे वाढते गुन्हे चिंताजनक आहेत. आर्थिक
व्यवहार आता या तंत्रज्ञानावर विसंबून असताना या क्षेत्रातील गुन्हेगारी बळावत चालली
आहे.मात्र याला आळा घालण्यासाठी किंवा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी
फारसे प्रयत्न होत नाहीत,याला कारण म्हणजे शासन स्तरावर याकडे
म्हणावे असे लक्ष गेले नाही. अन्यथा अशा अभ्यासक्रमाला देणे अपेक्षित
होते. सायबर सिक्युरिटी या विषयाबाबत जास्तीत जास्त जागृती महत्त्वाची
आहे.
युवकांना आकर्षित
करण्यासाठी शाळा-महाविद्यालय, शहरातल्या राजकीय सत्ता मोफत वाय-फायचा फंडा वापरत आहेत. या सुविधा मिळत असल्या तरी त्या
सुरक्षित आहेत का याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फुकट मिळते
ते सगळेच सुरक्षित नसते,यानुसार त्याची खात्री करून घ्यायला नको
का? या गोष्टींकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये
लक्ष दिल्यास अथवा या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवा अभ्यासक्रम हाती घेतल्यास युवकांचा
फायदा होणार आहेच. शिवाय देशाचेही होणारे नुकसान टळणार आहे.
काही विकृत मनोवृत्तीची माणसे सायबर हल्ले करून पैसा कमवत असतात.
आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा-कौशल्याचा ते अशा
प्रकारे वापर करून देशाशी गद्दारी करीत असतात. अशा लोकांना आळा
घालण्यासाठी आपल्याकडे तशी यंत्रणा आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षित
युवकांची गरज आहे. मुलांना फक्त पदवी मिळवण्यापुरते ज्ञान देण्यापेक्षा
त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा,यासाठी
त्यांना कौशल्य शिक्षण अपेक्षित आहे. यासाठी संस्थाचलक,
विद्यापीठे आणि शासन यांच्या संयुक्त पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.
No comments:
Post a Comment