Saturday, December 23, 2017

(बालकथा) प्राामाणिकपणाचे फळ

     रशियातल्या साकुत्सक नावाच्या एका लहानशा खेड्यात एक गरीब मुलगी राहत होती-व्हेरा. ती अनाथ होती. जंगलात जाऊन लाकूडफाटा गोळा करायची आणि बाजारात नेऊन विकायची. यावरच तिची गुजराण सुरू होती. व्हेरा फार सुंदर होती. तितकीच ती प्रामाणिक आणि धाडसी होती. त्यामुळेच ती एकटीच अगदी बेधडक जंगलात वावरायची.
     स्वेतलाना,व्हेराची एकुलती एक शेजारीण आणि खास मैत्रीण. पण दोघांच्या वयात कमालीचे अंतर.स्वेतलाना प्रौढ स्त्री होती तर व्हेरा नवयुवती. मात्र दुर्दैवी गरिबीने त्यांना एकत्र आणले होते. एकमेकांच्या सुख-दु:खात त्या सहभागी व्हायच्या.
     स्वेतलानाला एक दहा वर्षांचा मुलगा होता. तो सारखा आजारीच असायचा. हातावर पोट असलेल्या स्वेतलानाकडे त्याला चांगल्या वैद्याकडे नेऊन उपचार करण्याएवढे रुबल्स नव्हते. तिच्या हातून जेवढे जमेल, तेवढे ती त्याच्यासाठी करत होती. पण त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती.

     एक दिवस गावात दवंडी पिटवली गेली. किर्गीस्तानचा राजपुत्र विवाहहेतू नवयुवतीच्या शोधात आहे. यानिमित्ताने राजधानीमध्ये भव्य असा समारंभ आयोजित केला आहे. यात विवाहैच्छूक युवतींना आमंत्रित करण्यात आले होते. समारंभाला उपस्थित राहणार्या हजारो  युवतींमधून तो एका सुंदर आणि हुशार मुलीची आपली जीवनसंगिनी म्हणून निवड करणार होता. विवाहैच्छूक मुलींनी राजधानीकडे प्रस्थान करण्याची घोषणा करण्यात आली होती.
     ही वार्ता जंगलातल्या वणव्यासारखी राज्यभर पसरली. नवयुवतींमध्ये तर भलता गोंधळ उडाला. काही करू आणि काय नाही, अशी विचित्र अवस्था त्यांची झाली. सगळ्या स्वत:ला सुंदर बनवण्याच्या खटपटीला लागल्या. देशी-विदेशी सौंदर्य प्रसाधनांचा मारा चेहरा, शरीरावर सुरू झाला.महागडा पेहराव, चपला, दागदागिने यांच्या खरेदीची रेलचेल सुरू झाली. नव्या फॅशनचा आग्रह होऊ लागला. शिंपी,सोनार,चांभार यांना तर उसंतच मिळेना! त्यांचा धंदा भरभराटीला आला. युवतींनी आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न समजून हा विषय भलताच मनावर घेतला.
     व्हेराच्याही मनात आनंदाची लहर उसळली. श्रावणातल्या पहिल्या पावसाने कोमजलेल्या वनस्पतींमध्ये जसा जीव येतो,तसे तिला झाले. राजपुत्राशी विवाह करण्याच्या कल्पनेने तिच्या मनातली बाग हिरवीगार बनली. तिचे अंग अंग शहारले. मन हर्षोल्हासित झाले. तिला माहित होतं की, समारंभाला जाण्याच्या तयारीसाठी रुबल्सची आवश्यकता आहे. तिच्याकडे थोडीफार पुंजी होती. मात्र त्याने काही भागणार नव्हते. तिने निश्चय केला की, अधिक काम करायचे. दिवसात तीनतीनदा जंगलात जायचे. अधिक  लाकूडफाटा गोळा करायचा.
ती सकाळीच जंगलात गेली. ती वोल्गा नदीकाठालाच ला़कूडफाटा गोळा करत होती. इतक्यात तेथून मासेविक्याची गाडी गेली. गाडीच्या मागच्या टपात मासे होते. जिवंत होते. गाडी वेगात होती. एका खड्ड्यातून उसळली मारत गेली, त्यातला मोठा मासा खाली पडला. तिने हाक मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो घाईगडबडीत होता. त्यामुळे त्याने तिला मासा भेट दिल्याचे सांगून वेगाने निघून गेला.
मासा जिवंत होता.मोठा होता. या माशाचे काय करायचे,तिच्यापुढे प्रश्न पडला. तिने तो पटकन उचलला आणि नदीच्या दिशेने धावत निघाली. नदीजवळ गेल्यावर तिने तो पाण्यात सोडला. आणि काय आश्चर्य! मोठासा गडगडणारा आवाज झाला. पाण्यातून मोठी लाट उसळली. समोर जलपरी प्रकट झाली. ती म्हणाली, तू मला जीवनदान दिलंस. तुला हवं ते माग.
     ॠगळे काही अचानक घडले. त्यामुळे ती हडबडून गेली. काय मागावे,तिला सुधरेना. तिने एक दिवसाची मुदत मागितली. ती घरी आली. तिची मैत्रीण स्वेतलानाशी चर्चा केली. तिने खूप सारे धनदौलत, दागदागिने, महागड्या वस्तू,वस्त्रे,चपला मागायला सांगितल्या.जेणेकरून त्याचा उपयोग राजपुत्राच्या समारंभासाठी उपयोगाला येतील. गरिबी हटेल. व्हेराला उपाय आवडला. यातून तिच्या दोन्ही मनोकामना पूर्ण होताना दिसत होत्या. पण तिच्या नशीबात वेगळेच लिहिले होते. अचानक त्या रात्री स्वेतलानाच्या मुलाची तब्येत बिघडली. त्याला मूर्च्छा आली. आता त्याचा खेळ खल्लास होणार, अशीच त्याची एकूण अवस्था दिसत होती. स्वेतलाना धावत धावत व्हेराकडे आली. तिने व्हेराचे पाय धरले. मुलगाच तिचा सर्वस्व होता. त्याच्या जीवाची भीक ती व्हेराकडे मागू लागली.जलपरीकडून त्याच्या दीर्घायुष्याची याचना करू लागली.
     व्हेरा एका आईची याचना धुडकावू शकत नव्हती.तिचे मन द्रवले.ती धावतच नदी किनारी गेली.तिथे तिने जलपरीकडे स्वेतलानाच्या मुलाच्या दीर्घायुष्याचा वर मागितला.
     जलपरी म्हणाली, व्हेरा, परोपकार आणि प्रामाणिकपणा याचे उच्च असे शिखर तू गाठले आहेस. तू असामान्य युवती आहेस. तुला हवं तर धनदौलत,गाडी-घोडा,नोकर-चाकर असं काहीही मागता आलं असतं.पण तू तुझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या प्राणाचे रक्षण मागितलेस. तुझे हे पाऊल फक्त प्रसंशनीयच नाही तर अनुकरणीय आहे. ईश्वर तुझ्यासारख्या मैत्रिणी सार्यांच देवो. तथास्तू म्हणून ती पाण्यात विलीन झाली.
योगायोगाने जंगलात शिकारीसाठी आलेल्या किर्गीस्तानच्या राजपुत्राने हे सगळे पाहिले. प्रामाणिक व्हेराचा मोहक चेहरा आणि उज्ज्वल चरित्र यावर राजपुत्र मुग्ध झाला.त्याने तिथेच व्हेराला लग्नाची मागणी घातली. व्हेरा तर तयारच होती. तिने त्याचा सहर्ष स्वीकार केला. पुढे काही दिवसांनी त्यांचा धुमधडाक्यात शाही विवाह पार पडला आणि अगदी आनंदात दोघेही किर्गीस्तानमध्ये राहू लागले.
                                                                   

No comments:

Post a Comment