Sunday, December 24, 2017

क्रोधाला टाळा लावा

     आपले आयुष्य फारच लहान आहे,याचा विचार केला तर आपण अगदी हसत-खेळत दिवस घालवले पाहिजेत.हे दिवस आपण वैर आणि चुका करत घालवलो तर या मनुष्य जीवनातून काय साध्य करणार आहोत. वैर आणि चुका या क्रोधातून उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा रागावर आवर घालता आले पाहिजे. आपले आरोग्य बिघडवायचे असेल, जगात आपले शत्रू निर्माण करायचे असतील तर फार काही करावे लागत नाही.तुम्ही रागाला मोकळी वाट करून दिल्यास तो आपले काम आपोआप करून टाकतो.

     तुमच्या रक्तात विष पसरवण्याची मोठी ताकद या क्रोधात आहे. क्रोधामुळे तुमचे संपूर्ण रक्त विषारी बनते.वाणी विखारी बनते.तुमचे हाव-भाव विकारी बनतात. शेवटी एक दिवस असा येतो की, तुम्हाला स्वतःलाच संपूर्ण जीवनाच विखारी वाटायला लागते. त्यामुळे रागावर जो नियंत्रण मिळवू शकतो, तोच या जगात तरतो. यासाठी खरे तर प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण राग,क्रोध मनुष्य धर्म आहे. माणसातले विकार परिस्थिती निर्माण होईल, तसे तोंड वर काढतातच. त्याला दाबण्याचे काम आपले स्थिर चित्त महत्त्वाची भूमिका साकारते.त्यामुळे नेहमी चित्त स्थीर ठेवा. 
     महान तत्त्वज्ञ कंफ्यूशियस सांगतात की, ज्यावेळेस राग येतो,त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या परिणामांचा विचार करा. रागावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल मौन हे त्यावर जालिम औषध आहे,असे महात्मा गांधी यांनी सांगितले आहे. क्रोधाची सुरुवात  मुर्खतेपासून होते आणि पश्चातापावर संपते. पश्चाताप करून घ्यायचा नसेल तर शांत राहणं कधीही चांगलं. मूर्ख माणूस क्रोधाला जोरजोराने प्रकट करतो, पण त्याच्या जागी  बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो शांत राहून क्रोधाला आपल्या वशमध्ये करतो.
     स्वामी विवेकानंद सांगतात की, क्रोध सिंहासनस्थित असेल तर बुद्धी तिथून सटकते.ती तिथे थांबतच नाही. आपण रागावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो असलो तरी समोरची व्यक्ती राग प्रकट करून आपल्याला उकसावत असते. अशा वेळेला आपण त्याला विरोध न करता तिथून निघून जाण्यातच भलाई आहे.थोड्या वेळाने त्याचा राग आपोआप शांत झाल्याचे तुमच्या लक्षात येईल,तेव्हा त्याला पुन्हा भेटायला जा. आपले काम शांतपणे त्याला समजावून सांगा. नसेल तर नंतर भेट घ्या. संतप्त व्यक्तीवर मात करण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे.
     कुणी तरी म्हटले आहे, रागाचा फक्त एक क्षण आपण सहन करू शकलो,तर दुःखाच्या अगणित दिवसांपासून आपला बचाव होऊ शकतो. मात्र तोच रागाचा क्षण आपण सहन करू शकलो नाही तर तो आपले सर्वस्व संपवून टाकतो. राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या काही गोष्टीही आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याला राग का आला आहे.त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला ओळखता आला पाहिजे. संतप्त व्यक्ती रागाच्या भरात खरे बोलत नाही.तो तेव्हा फक्त आणि फक्त दुसऱ्याचे मन दुखवीत असतो. असे म्हटले जाते की, तुमच्या मनात आलेला राग तुम्ही एक क्षण थांबवू शकलात, तर तुम्ही तुमच्यावर कोसळणाऱ्या दु:खालाही अडवले असे समजा. 
     सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यामुळे तुम्ही जितके थकत नाही,तितके रागाच्या किंवा चिंतेच्या एका तासात थकता, असा संशोधकांचा अहवाल सांगतो. त्यामुळे रागाला किती महत्त्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे. शेवटी एक महत्त्वाचे आहे, आपल्याला मनुष्य जीवन मिळाले आहे.त्याचा सदुपयोग करून चांगले नाव,कीर्ती मिळवून या जगाचा निरोप घेतला पाहिजे. मात्र चांगला माणूस म्हणून आपले नाव मागे राहिले पाहिजे. हे  आपल्यात उत्पन्न होणाऱ्या रागाला कुलूप ठोकल्याशिवाय शक्य नाही.

1 comment:

  1. तसे पहिले तर राग येणे ही सर्वसामान्य मानवी नैसर्गिक भावना आहे. नापसंती, चिडचिड या रागाचे सौम्य आणि प्राथमिक टप्पे आहेत. कुणी टीका केली, धमकी दिली किंवा नैराश्‍य आले तर त्याची प्रतिक्रिया रागात उमटते. भीती, एकटेपणा, दुःख या भावना तीव्र झाल्यावरदेखील राग येतो. जेंव्हा रागाचा भडका उडतो तेंव्हा माणसाची सारासार बुद्धी, तर्कसंगत विचार भ्रष्ट होतात आणि माणूस काहीही असमंजसपणे, अविवेकी, अवास्तव, असंयुक्तिक बोलू लागतो.

    एखाद्याला जेंव्हा अमर्याद राग येतो तेंव्हा त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्याचे दैनंदिन आयुष्याची चाकोरी बिघडते. त्याच्या कामात चुका होऊ लागतात, एकाग्रता टिकत नाही, वैयक्तिक जीवनात वादळे येतात, कौटुंबिक संबंध विस्कळित होतात. केवळ मानसिक नव्हे तर रागाचे शारीरिक परिणामसुद्धा अनेक असतात. राग आल्यावर छातीचे ठोके वाढतात, कानशिले तप्त होतात, हातपाय थरथरू लागतात, रक्तदाब उसळतो आणि त्याचे परिणाम हृदयावर आणि रक्ताभिसरणावर दिसू लागतात. राग व्यक्त करण्याचे अनेक प्रकार दिसून येतात. खूप मोठ्याने ओरडणे, दात-ओठ खाणे, डोळे वटारून बघणे, भुवया उंचावून आठ्या पडून बघणे, कृद्ध चेहरा करून एखाद्यावर दीर्घ कटाक्ष टाकणे, एखाद्याच्या अंगावर धावून जाणे, शारीरिक हल्ला करणे, हिंसाचार करणे अशा असंख्य तऱ्हा आपण बघत असतो.

    ReplyDelete