Wednesday, December 6, 2017

साहित्य, सिनेमा आणि समाज

     खरे तर साहित्याचे चिंतक, लेखक आणि टीकाकार सिनेमाला साहित्याचा भाग मानायला तयार नाहीत.पण त्यांना सिनेमाचा प्रारंभ साहित्यातूनच होतो,हे माहित असूनही त्यांचं मन कचरतं. साहित्य आणि सिनेमा कुठे ना कुठे नेहमीच एकमेकाच्या विस्ताराला सहाय्यभूतच ठरले आहेत. म्हणजेच साहित्य आणि सिनेमा खरे तर एकमेकांना पूरक आहेत.भारतात बनलेला पहिला सिनेमादेखील आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या हरिश्चंद्र नाटकावर आधारित होता. सुरुवातीपासूनच हिंदी सिनेमात लिखित अथवा अलिखित साहित्याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

     आज भारतातल्या फिल्म उद्योगाने शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.आहे. भारतासारख्या बहुभाषिक आणि बहु-सांस्कृतिक परंपरावादी देशात याच्या व्यापक विस्तारामुळे याला लोकांनी मनोरंजनाचा सर्वाधिक लोकप्रिय माध्यम म्हणून मान्यता दिली आहे.यात अन्य प्रादेशिक भाषेबरोबरच हिंदीचेही व्यापक असे योगदान आहे.1931 मध्ये पहिला बोलपट आलमआरा ते आजपर्यंत सर्वाधिक सिनेमे हिंदी भाषेत बनले आहेत. अशा प्रकारे हिंदी भारतच नव्हे तर भारताच्या मुख्य सिनेमाचीही भाषा आहे. जगात हिंदी सिनेमाच भारतीय सिनेमाचे नेतृत्व करतो.
     नेहमीच ज्यावेळेला आपण हिंदी सिनेमामध्ये साहित्याच्या योगदानाच्या गोष्टी करतो, त्यावेळेला याला लिखित साहित्याशी जोडतो. पण साहित्य लिखित असेल अथवा अलिखित ते नेहमीच समाजाला प्रभावित करत आले आहे. सुरुवातीला बोलपटाच्या प्रारंभीच्यादरम्यान पारसी थिएटरचा पगडा होता. त्यात अतिनाटकीपणा आणि गीत-संगीत यांचा अधिक समावेश होता. पहिल्यांदा हिंदी सिनेमामध्ये स्थापित लेखकाच्या रुपाने कथा-सम्राट मुन्शी प्रेमचंद यांचा प्रवेश झाला.1933 मध्ये हिंदीचे सर्वाधिक लोकप्रिय साहित्यकार प्रेमचंद यांच्या कथेवर मोहन भावनानी दिगदर्शित मिल मजदूर हा सिनेमा बनला. दिग्दर्शकाने मूळ कथेत काही बदल केला, जो प्रेमचंद यांना आवडला नाही. 1934 मध्ये प्रेमचंद यांच्याच साहित्यावर नवजीवन आणि सेवासदन सिनेमे बनले पण दोन्हीही चित्रपट फ्लॉप ठरले. पण जी सुरुवात झाली होती, ती तशीच सुरू राहिली, निरंतर राहिली.भगवतीचरण वर्मा,पांडेय बेचन शर्मा, फणीश्वरनाथ रेणू, अमृतलाल नागर, चतुरसेन शास्त्रीसारख्या साहित्यकारांच्या रचनांवरदेखील सिनेमे बनले.
     हिंदी सिनेमात हिंदी साहित्यकारांचा सोनेरी काळ खर्या अर्थाने सातव्या दशकात आला, असे म्हणायला हरकत नाही. यात कादंबरीकार कमलेश्वर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.उपेंद्रनाथ अश्क आणि अमृतलाल नागर नंतर कमलेश्वरच असे साहित्यकार होते,ज्यांनी सिनेमाची भाषा आणि त्याची आवश्यकता अगदी योग्य प्रकारे जाणली होती. गुलजार यांनी कमलेश्वर यांच्या साहित्यावर आंधी आणि मौसम हे चित्रपट बनवले आणि दोन्हीही सिनेमे मैलाचा दगड ठरले.सातव्या दशकात हिंदी कथा-साहित्यामध्ये बदल घडून येत होते, तसेच तिथे हिंदी भाषिक फिल्मकारांची सख्यादेखील वाढत होती.फिल्मकार बासु चटर्जी बांगला भाषिक होते, तरीही त्यांनी हिंदी साहित्याचा गहन अभ्यास केला होता.त्यांनी मन्नू भंडारी यांच्या कथेवर रजनीगंधा हा सिनेमा बनवला, तो फारच यशस्वी ठरला.हिंदी सिनेमाच्या  या नव्या प्रवाहाला समांतर सिनेमा असेही म्हटले गेले.या दरम्यान हिंदी साहित्याला सर्वात अधिक महत्त्व फिल्मकार मणि कौल यांनी दिला.
मणि कौल यांनी नंतर मोहन राकेश, विजयदान देथा,मुक्तीबोध आणि विनोदकुमार शुक्ल यांच्या रचनांवर सिनेमे बनवले.कुमार शहानी यांनी निर्मल वर्मा यांची साहित्यकृती माया दर्पण यावर सिनेमा बनवला.याशिवाय दामुल, परिणती, पतंग, कोखसारखे सिनेमेदेखील साहित्यिक रचनांवर बनवले गेले. साहित्य आणि सिनेमा यांना जोडून ठेवण्यात दूरदर्शनची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. यात तमस, चंद्रकांता, राग दरबारी, कब तक पुकारूं, मुझे चांद चाहिए, कक्काजी की कहानीसारख्या मालिका लोकप्रिय ठरल्या.
     हिंदी सिनेमांचा सध्याचा प्रवाह फारच बदलला आहे. यापूर्वीही सिनेमामध्ये हिंदी साहित्यावर आधारित बहुतांश चित्रपटांचा प्रवास फार सोपा राहिला नाही. बहुतांश सिनेमे अपयशी ठरले. त्यामुळेच हिंदीमध्ये साहित्य कृतीवर आधारित फारच कमी यशस्वी सिनेमे बनले. याचे प्रमुख कारण म्हणजे कथेतील कथन समजून घेण्यात हे फिल्मकार लोक अपयशी ठरले. दुसरे एक मोठे कारण म्हणजे सिनेमाला कादंबरीप्रमाणे सादरीकरण करायला हवे होते,मात्र तसे ते झाले नाही. तसे होणेही शक्य नाही. कारण सिनेमा, शब्दांच्या दृश्यांना पडद्यावर रुपांतरित करणे कठीण असते. शिवाय फिल्मकार रचनेला शब्दांच्या पलिकडे नेऊ इच्छितो,तर साहित्य जगत सिनेमामध्येदेखील साहित्य जसेच्या तसे पाहू इच्छितो. एका मर्यादेपर्यंत हे जवळजवळ अशक्यच आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, भारतीय प्रेक्षक हिंदी सिनेमाला त्याची कल्पनाशक्ती, रोमांटिसिज्मच्या कारणांमुळे अधिक पसंद करतो.
     प्रश्न असा आहे की, हिंदी सिनेमा संपूर्ण देशभरात पोहचवायला हिंदी साहित्याबरोबरच  आणखी कोणाकोणाचे योगदान राहिले आहे? राष्ट्रभाषा, जनभाषा ! संपर्क भाषा की राजभाषा? याचे उत्तर सहज आहे, जनभाषा! ॠाहित्य कृतींवर सिनेमे बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे, अपेक्षित आहे. निर्माता-दिग्दर्शक  यांना रचनेच्या मर्मापर्यंत पोहचायला हवे. त्याचबरोबर साहित्यकाराची मानसिक स्थितीही जाणून घ्यायला हवी.बाजारवाद,तंत्रज्ञानाचा विकास,उदारवादाचे व्यापक आणि स्पष्ट प्रभाव हिंदी सिनेमावर पडणे,क्रमप्राप्त आहे. जी हिंदी कधी काळी भारतीय सिनेमाची प्राण तत्त्व मानली जात होती, तिचीच जागा आता खिचडी भाषा किंवा हिंग्लीशने घेतली आहे.
सुरुवातीपासूनच भारतीय समाजामध्ये साहित्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भाषेशिवाय समाजात अन्य कोणाचे कुठले अस्तित्व नसते. भाषेमुळे कोणत्याही व्यक्ती आणि समाजाचे नाते,त्याच्या अस्तित्वाशी गुंतलेले असते. भाषा उन्नत ती आहे,जी समाज उन्नतीच्या वाटेवर नेते. आपण रामायण, महाभारत,पंचतंत्रसारख्या गाथांना मौखिक रुपाने सुरक्षित ठेवले आहे. आजदेखील आपल्या देशात हजारो वर्षांपासूनच्या लोकोक्ति, वाक्प्रचार,म्हणी जिवंत आहेत, कारण आपला देश श्रोतु परंपरेतला आहे. भारतीय सिनेमादेखील याच परंपरांना, किस्से-कहाण्यांना सोबत घेऊन सिनेमे बनवण्याची परंपरा कायम राखली आहे.यासाठी साहित्याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भूमिका सुरुवातीपासूनच राहिली आहे.
     हिंदी सिनेमाला शिखरावर घेऊन जाणार्या साहित्याला पुष्पवित-पल्लवित करण्याची आवश्यकता आहे. आज हिंदी सिनेमे,हिंदी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा लोकदूत बनून जागतिक स्तरावर हिंदीचा पताका फडकतो आहे. अशा परिस्थितीत गरज आहे,ती याची पूनर्व्याख्या करण्याची! तेव्हाच हिंदी सिनेमा काही नकारात्मकतेनंतरसुद्धा आपल्या मजबूत अशा सकारात्मक ताकदीवर आपली गमावलेली प्रतिष्ठा मिळवू शकेल. आणि आपल्या मुळांना खतपाणी घालू शकेल. यासाठी लेखकांनाही आपल्या लेखनीला त्या दिशेने नेण्याची आवश्यकता आहे. समाजातले वास्तव त्यात उमटले पाहिजे. लेखकांना आपली लेखनी पुन्हा त्या ग्रामीण समाजाच्या दिशेने न्यायला हवी. जिथे बहुसंख्य समाज राहतो आहे, तेथील परिस्थिती साहित्यात उतरायला हवी. तेव्हाच हिंदी भाषा आणि साहित्य यांच्या संबंधाने भारतीय सिनेमा नवा आकार घेईल.

No comments:

Post a Comment