Saturday, October 31, 2020

ई- मतदान प्रक्रियेचा विचार का होत नाही?


सध्या कोरोना संसर्गाचा काळ आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण देऊन जात आहे. कोरोना महामारीमुळे फक्त आपल्या देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला मोठा आर्थिक फटका आणि झटका देऊन गेला आहे. आठ महिने उलटून गेले पण अद्याप जग यातून सावरलेले नाही. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे अजूनही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या देशात बिहार राज्यात विधानसभेची पंचवार्षिक  निवडणूक सुरू आहे, तर मध्य प्रदेशामध्ये पोटनिवडणुका होत आहेत. याशिवाय जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काळात चक्क उमेदवार असलेल्या आणि सध्याच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाला. तरीही या निवडणुका मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सावधगिरी बाळगून होत आहे, पण तरीही पूर्ण मतदान होईपर्यंत रिस्क ही आहेच. अशा अडचणीच्या काळात मतदानाची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने घेण्याचा पर्याय होता, आहे, पण निवडणूक आयोगाने याचा फार विचार केलेला दिसत नाही. मागे  मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी देशात २0१४ च्या निवडणुकीत 'ई- मतदान' पद्धत अमलात आणण्याचा  विचार पुढे आला होता. पण नंतर त्यावर विचार झालाच नाही. पण यापुढे तरी मतदान प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी आणि मतदान वाढावे,यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. परवा बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात फक्त 55 टक्के मतदान झाले आहे. मतदार कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडले नाहीत, हेच यातून दिसून येते. 

 लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया महत्त्वाची आणि अनिवार्य आहे. इथे बहुमताला प्राधान्य आहे. मतदार मतदानाचे आपले कर्तव्य बजावताना त्याला येणार्‍या अडचणीचा, समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे. मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी कमालीची अनास्था आहे. अर्थात त्याला अनेक कारणे असली तरी  मतदान प्रक्रियेत सुलभता आल्यास कोणताही मतदार यापासून वंचित राहणार नाही. मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभारून मतदान करण्यापेक्षा घरी बसून अथवा जिथे कोठे असेल तेथून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येत असेल, तर ती मतदाराला नक्कीच सोयीची ठरू शकेल. किंबहुना यासारखी आणखी दुसरी कुठली सोय असणार नाही. त्यामुळे ई-मतदान प्रक्रियेचा आगामी काळात अंतर्भाव करायला हवा. 

 वास्तविक आपल्याकडे मतदानाबाबत अजूनही कमालीची उदासीनता आहे. 50- 55 टक्के हे काही मतदान नव्हे आणि खंबीर लोकशाहीची लक्षणेही नव्हेत. त्यामुळे कमी मतदानावर मात करताना टक्केवारी   वाढविण्यासाठी 'ई- मतदान' हा चांगला पर्याय होऊ शकेल, यात अजिबात शंका नाही. कारण  या पद्धतीचा वापर केल्याने मतदारांना घरी बसून मोबाईल किंवा संगणकावरून मतदान करता येईल. सुशिक्षित मतदार कुठूनही आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकेल. अलीकडच्या काही वर्षात विविध क्षेत्रात मोबाईल आणि संगणक यांचा वापर वाढला आहे. आर्थिक देवांना-घेवणीसाठी मोबाईलवरील अनेक अँप उपयोगाला येत असून त्यामुळे घरात बसून लोक वस्तू खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत. पैशांचा व्यवहार डिझिजल तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी परदेशी गुंतवणूकदेखील आपल्या देशात वाढली आहे. त्यामुळे मतदानदेखील मोबाईलच्या माध्यमातून सुटसुटीत आणि सहजसुलभ शक्य आहे. त्यामुळे ई-मतदानाचा विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे सोपे झाले आहे. फक्त निवडणूक आयोगाने डोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि कोरोनासारख्या संसर्गापासून बचावदेखील होईल. 

 अर्थात या ई-मतदान पद्धतीत काही धोकेही आहेत. आणि हे लोकशाही घटनेसाठी घातक आहेत. हे मान्य असले तरी ते दूर केले जाऊ शकतात. कारण उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रलोभने दाखवू शकतात आणि  तेथेच समक्ष मतदान करून घेऊ शकतात  किंवा दहशत निर्माण करूनही  ते मतदारांकडून बाहेरच्या बाहेर मतदान करून घेऊ शकतात. या 'ई- मतदान' प्रक्रियेत उमेदवारांकडून येणारे प्रलोभन, दडपण हे प्रकार कसे टाळता येतील, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  माहिती- तंत्रज्ञान विभाग, त्यातले तज्ज्ञ यांच्या विचारातून यावर उपाय शोधला जाऊ शकतो. 

 सुरुवातीला वृद्धाश्रमातील वृद्ध, अपंग, रुग्णालयातील रुग्ण व निवडणुकीच्या कामात असलेल्या विविध विभागांच्या कर्मचार्‍यांसाठी या पद्धतीचा वापर करता येईल. सुधारलेल्या तंत्रज्ञान काळात  'ई-वोटिंग' ची नवी आवृत्ती विकसित होणे क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारच्या 'ई- वोटिंग' चा वापर परदेशात अगोदरच काही देशांमध्ये सुरू आहे. आपल्या देशात तूर्तास शहरी, निम्न शहरी भागात ई-मतदान प्रक्रिया  राबवायला काहीच अडचण नाही. अर्थात काही समस्या उद्भवणार आहेत, त्याचे निराकरण होत राहिल. यंत्रणा राबविल्याशिवाय त्यातल्या त्रुटी अथवा दोष समजून येत नाहीत. त्यामुळे ई-मतदान प्रक्रियेचे स्वागत करायला काहीच हरकत नाही.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाचा निवडणूक व्यवस्थेवरील खर्च कमी होण्यास मदतच होणार आहे आणि हेही नसे थोडके!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली          

Monday, October 26, 2020

सावधान! मुलांच्या डाटांची चोरी होत आहे


मुलांसाठीच्या तीन अॅपना गुगल प्ले स्टोरने बाहेरचा रस्ता दाखवून एक चांगलं काम केलं आहे. हे तीनही अॅप्स जवळपास दोन कोटी मोबाईल किंवा मुलांपर्यंत पोहचले होते आणि हे अॅप्स मुलांसंबंधीत असलेला डाटा फक्त आपल्याजवळ संग्रहच करून ठेवत नव्हते तर हा डाटा व्यावसायिक इराद्याने वापरलासुद्धा जात होता, असा आरोप केला जात आहे. मुलांसंबंधीत असलेल्या या डाटाची विक्री केली जात होती, असा संशय आहे. डाटा संग्रहाच्या नियमांचे उल्लंघन करताना हे अॅप वापरकर्त्यांच्या एंड्रॉयड आयडी आणि एंड्रॉयड जाहिरात आयडी नंबरांचा उपयोग करत असल्याचाही संशय आहे. मुलं जेव्हा एकाद्या अॅपचा वापर करतात, तेव्हा ते सावधानता बाळगत नाहीत आणि बरीचशी माहिती ते गेम खेळताना अॅप कंपन्यांपर्यंत पोहोचवतात. विशेष म्हणजे आजच्या मुलांकडे खूप काही माहिती उपलब्ध असते शिवाय आपल्या आई- वडिलांसंबंधीत माहितीची परिपूर्णताही असते. गेमची सुविधा देणाऱ्या अशा अॅपसाठी खेळता खेळता खूप काही माहिती चोरता येणं सहज शक्य आहे. खरे तर ही पांढरपेशी गुन्हेगारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त गुगल प्ले स्टोरमधून या तिन्ही अॅपना बाहेर काढल्याने सगळं काही व्यवस्थित झालं,असं काही होत नाही. फक्त गुगल प्ले स्टोरवरून तीन अॅप हटवल्याने काय होणार आहे? अन्य प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ये अॅप पहिल्यासारखे कायम असणार आहेत आणि सक्रियही असणार आहेत. वास्तविक, अशा अॅप आणि त्यांच्या मालक कंपनींवर विशेषत्त्वाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा कित्येक कंपन्या आहेत, जे एकापेक्षा अधिक अॅप बाजारात चालवत आहेत आणि या  अॅपच्या वापरकर्त्यांना हे शोध लावणं कठीण आहे की,  ते आपल्या कोणत्या अॅपच्या माध्यमातून डाटा संग्रह करत आहेत. खरं सांगायचं तर कोणत्याही सामान्य प्रकारच्या  अॅपना कोणत्याही फोनमध्ये असलेल्या काँटेक्ट नंबर, इमेज गॅलरी, मेसेज बॉक्सपर्यंत जायची काय गरज आहे? त्यांनी सरळसोठ आपली सेवा द्यावी.पण असं होताना दिसत नाही. कारण यावर फारसं कुणी विचार करत नाही.  त्यामुळे अशा  अॅपची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचं फावतं. आता याचा फार गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.  आज कित्येक मोबाईल वापरकर्ते फक्त मोबाईल वापरतात. हवे असल्यास हव्या त्या अॅपचा जेवढा माहीत आहे,तेवढा कामापूरता वापर करतात. आज आपल्या लोकांना कितीतरी वेळा सांगूनही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा नंबर विचारणाऱ्याला सांगून फसवणूक करून घेतात. तिथे या  अॅपवाल्यांचे काय घेऊन बसलाय, असे म्हणायची वेळ आली आहे.या कंपन्या त्यांची माहिती देण्यासाठी का आग्रही राहतात?  ग्राहकांना का विवश केलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी स्वतः प्ले स्टोर चालवणारी कंपनी जबाबदार नाही का?

या खेपेला धोका खरंच वाढला आहे. ही बाब मोठी गंभीर आहे. मुलांच्या गेमिंग अॅपच्या माध्यमातून डाटा संग्रह केली जात असल्याची तक्रार आली आहे, म्हणून कारवाई केली जात आहे. पण गुगल किंवा अँपल कंपनीचं एवढ्यावरच काम थांबणार आहे का?  सध्याच्या घडीला मोठी माणसेदेखील अजून अॅपचे पूर्ण शास्त्र आणि व्यावसायिक उपयोग योग्य प्रकारे समजून घेऊ शकले नाहीत तर तिथे लहान मुलांचे काय? लक्ष वेधून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंटरनेशनल डिजिटल अकाउंटेबिलिटी कौंसिलला आढळून आलं आहे की, हे तीनही अॅप मुलांच्या डाटांचा संग्रह करत होते. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. फक्त हे तीन अॅपच  अशाप्रकारचे कृत्य करीत होते का? या कौंसिलने अगदी कडकपणे या प्रकरणाची चौकशी करायला हवी आणि कोणकोणत्या अॅपच्या माध्यमातून हेरगिरी किंवा डाटा चोरी केली जात आहे, याचा काटेकोरपणे तपास केला गेला पाहिजे. दुसऱ्या बाजूला-गुगल किंवा अँपलसारख्या कंपन्यांचीदेखील जबाबदारी मोठी आहे. त्यांना काहीतरी गडबड दिसल्यावरच ते अशा अॅपना बाहेरचा रस्ता दाखवतात, पण मग एवढंच पुरेसं आहे का? चोरी करणारे अॅप किंवा त्यांच्या कंपन्यांसाठी कुठल्या दंडाची व्यवस्था नाही का? जर अशा गोष्टींना आळा घालायचा असेल तर चूक करणाऱ्या कंपन्यांना शिक्षा नको का व्हायला? गुगल प्ले स्टोरमधून आतापर्यंत 36 अॅप काढून टाकण्यात आले आहेत. प्ले स्टोरवर आजच्या घडीला 28 लाखांपेक्षा अधिक अॅप उपलब्ध आहेत. या सगळ्या अॅपना देखरेखीखाली आणून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाण्याची गरज आहे. चूक किंवा गुन्हा करणारे फक्त 36 च अॅप आहेत का? हा खरे तर आता संशोधनाचा विषय आहे. प्रिंसेस सॅलून, नंबर कलरिंग और कॅट्स ऐंड कॉसप्लेसारख्या अॅपवर  आज जेवढी सतर्कता दाखवण्यात आली ती अशीच कायमस्वरूपी ठेवायला हवी आहे. याला कायद्याच्या चौकटीत आणायला हवे. पालकांनीदेखील यासंबंधाचा आता डिझिटल साक्षर होतानाच मुलांच्या मोबाईलकडे आणि त्यातल्या अॅपकडे अधिक चौकसपणे नजर ठेवायला हवी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday, October 25, 2020

गुन्हेगारीचा फास आपल्याला कुठे नेणार?


असं वाटतं की, गुन्हेगारीच्या अजगराने आपल्याला त्याच्या विळख्यात चांगलंच करकचून आवळलं आहे. मग ती राजकीय असेल, सामाजिक व्यवस्था असेल, शैक्षणिक संस्था असतील, धार्मिक संस्था असतील किंवा मग आर्थिक व्यवस्था असेल. सर्वच क्षेत्रात गुन्हेगारीचे स्तोम माजले आहे. वडिलांकडून आपल्याच कुटुंबातील आपल्या बायको आणि पोरांचा खून करण्याच्या किंवा अल्पवयीन मुलाकडूनच  आपल्याच आईचा चाकूने वार करून मारून टाकण्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. या घटनांच्या मागे कसलीच मोठी कारणं नसतात. नेहमीच्या त्याच त्या छोट्या छोट्या अवांछित घटना असतात. कुटुंब म्हणजे आपल्या जीवनाचा पाया असतो, जीवनाचा आधार असतो. तिथेच असल्या गुन्हेगारीच्या घटना घडतात तेव्हा कुटुंबांमध्ये कसली शांतता असेल,याचा अंदाज येतो. नवरा आणि बायको यांच्यात वादविवाद, भांडणं होतात आणि शेवटी त्याचं पर्यावसान खून करण्यात होतं. भाऊ बहिणीचा खून करतो,कारण तिने तिच्या मर्जीने कुणाशी तरी लग्न केलेलं असतं.

अशा अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. आपण ऐकतो, पाहतो, वाचतो आणि एक 'बातमी' म्हणून सोडून देतो. पण ही नाती, संस्कार, भावना, मूल्ये आणि श्रद्धांच्या कोसळणाऱ्या इमारती आहेत,हे लक्षात घ्यायला हवं. आजच्या काळातील वाढती हतबलता, सहनशीलतेचा अभाव याशिवाय वैश्विक होत असलेली संस्कृती आणि बाजारीकरणाव्यतिरिक्त काही दुसरी कारणंदेखील आहेत. डिझिटलची आभासी दुनिया, मीडिया आणि चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी हिंसा हीदेखील कारणं यामागे आहेत. याने मुलं, तरुण वर्ग प्रभावित झाला आहेच,पण मोठी समजूतदार माणसंदेखील प्रभावित होताना दिसत आहेत.

एक माणूस एक चित्रपट पाहून त्याच्या बायकोला कसं मारायचं, याची आयडिया शिकून घेतो आणि पत्नीचा खून करतो. कोर्टात तो त्याचा स्वीकारही करतो. प्रत्येकजण हा एकसारखा नसतो. त्याची प्रतिक्रियादेखील 'त्याची' अशी आणि 'वेगळी' असते. उतावळे आणि प्रतिक्रियाशील लोक लगेच आवेशात येतात आणि चुकीचे पाऊल उचलतात.त्यावेळेला त्यांना समोरच्या व्यक्तीशी आपले नाते काय आहे किंवा याचा काय परिणाम होणार आहे, याचा कसलाच थांगपत्ता नसतो.आज आपल्या सभोवताली असाच मोहोल तयार झाला आहे.

आज अशी परिस्थिती आहे की, आश्रमासारख्या ठिकाणीदेखील गुन्हे, अत्याचार घडत आहेत. खरे तर याची कल्पना करणंदेखील कठीण आहे.लैंगिक अत्याचारापासून ते आर्थिक शोषण, सामाजिक गैरवर्तन,बालशोषण आणि छळापर्यंत गुन्हे घडत आहेत. आश्रमांच्या महाराजांवरील  गैरवर्तन,लबाडी आणि अपराधिक गुन्हे सिद्ध होत आहेत. ही मंडळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आपण सगळे जाणतो आहोत की, आश्रमांमध्ये काय चाललं आहे. तरीही सामान्य माणसं अजूनही स्वता: वरच्या अविश्वास आणि अनिष्ठा याकारणाने किंवा दुःखी आयुष्याला कंटाळून तिथे जात आहेत. आणि मग तिथे त्यांची फसवणूक होते. ज्यावेळेला त्यांना कळतं की, आपल्यासोबत काय घडलं आहे, तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते. त्यामुळे तो पूर्णपणे मोडून पडतो. 

पण काही ठिकाणी चांगलंही पाहायला आणि अनुभवायला मिळतं. काही सामाजिक संस्था, काही स्वयंसेवी संघटना, ज्यांना अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत मिळते. या संघटना खरोखरच माणसाच्या साहाय्यासाठी, विकासासाठी काहीतरी करीत असतात.  त्यांचा उद्देश सामाजिक हिताचा असतो. त्यांचा हेतू समाजसेवेचा असतो. काही स्तरांवर अशा संस्था कार्यरत आहेत. पण गुन्हेगारी आणि शोषण इथेही आपली जागा निश्चित करताना दिसतात. शिक्षण संस्था देशाची उद्याची पिढी जिथे घडवली जाते आणि अशा संस्थांची जबाबदारी असते की, भावी पिढी चांगली, सुसंस्कारित करणं, त्यांना शिकवणं-प्रशिक्षित करणं, अशा ठिकाणीही गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या अंधाराचा विळखा घालताना दिसत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

राजकारण तर गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे. आकडेवारी सांगते की 30 टक्के खासदार-आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीतील आहेत, जे कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकलेले आहेत. हे राजकारणी एकाद्या प्रकरणात अडकले तरी आपल्या राजकीय प्रभाव आणि दबावामुळे सुरक्षित होऊन बाहेर पडतात. वृत्तपत्रे, साहित्य, मीडिया ही क्षेत्रेदेखील गुन्हेगारीने काळवंडली आहेत. पण यांचं कुणी काही करू शकत नाही.परंतु सामान्य माणूस मात्र लहानशा चोरीमुळे अनेक वर्षे तुरुंगात सडतो. असं वाटतंय की, आमची जीवनमूल्ये आपण गमावत आहोत. पण का? आपली सांस्कृतिक-सामाजिक चेतना परंपरा,परमात्मा, धर्म , सांस्कृतिक मूल्यांमध्ये दाट विश्वास आणि निष्ठेची आहे. आपण कौटुंबिक आणि सामाजिक जीव आहोत. इथे आपल्या अस्तित्वाचा आधारदेखील आहे.आज बाजारीकरण आणि भौतिक सुख-सुविधा यांच्याविषयी वाढलेली आसक्ती आपल्याला आपण 'असण्या'पासून किंवा अस्तित्वापासून लांब चाललो आहोत.त्यामुळे अगदी छोटीशी हतबलता खून किंवा आत्महत्या कडे घेऊन जाते.

या अंधारातून बाहेर येण्याचा एकादा कुठला रस्ता आहे का? आपल्याला परत जावं लागेल-कुटुंबातल्या नात्यांमध्ये, आपल्या परस्पर संबंधांमध्ये! कुटुंब हे एक असे ठिकाण आहे, जिथे भावी पिढयांचं जीवन मूल्य बनते. आपल्या परंपरा, आपले सण, पर्व, उत्सव धर्म, परस्परांतील आनंद,होळी, दिवाळी या सगळ्या गोष्टी माणसाला माणसाशी जोडतात. त्यांच्यातील दुरावा मिटवतात. सण जरी वर्षातून एकदाच येत असले, तरी पण त्यांचा गोडवा, सुगंध वर्षभर प्रतीक्षा करायला भाग पाडतो. -पुढच्या वेळी येणाऱ्या दिवसाचा. पण इथेही चिंता आहेच,  सण-उत्सव, पर्व यांच्या बाजारीकरणाची. दिसायला, ज्यात भावनांपेक्षा भौतिक दिखावा जास्त असतो.पण असे असले तरी या पलीकडे जाऊन आतल्या संवेदनशीलतेशी परस्पर संबंध जोडायला हवेत. तरच नकारात्मकता आणि हिंसात्मक प्रवृतींपासून सुटका मिळू शकेल.तरच गुन्हेगारीच्या आवळत चाललेल्या अजगरी विळख्यापासून सुटका मिळेल. आणि तरच मानवाचा मानवासोबतचा मानवी संबंध बनू शकतो. जर का एकदा का असे घडले तर मग गुन्हेगारीच्या अंधारातून आपली मुक्तता होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


विल्मा रुडोल्फचा प्रेरणादायी जीवनप्रवास


अख्खं जग चालताना आणि फिरताना दिसत होतं, पण त्या विल्मा नावाच्या मुलीला साधं उभं राहणंही अवघड होतं. ती सगळं निमूटपणे पाहत राहायची. ज्याला कुठं जायचं आहे,तो तिकडे जात होता,येत होता,परंतु ती मात्र अंथरुणावर खिळून होती. तिला वाटायचं, सगळे निघून जातील आणि  बस्स फक्त आपल्याला एकटीला  इथे मागे राहावं लागेल. एकटी,असहाय्य, अंथरुणावर खिळलेली. कसला पर्यायच नाही, डॉक्टरांनी देखील सांगून टाकलं होतं-आता ही मुलगी नाहीच चालू शकणार. एक तर तिचा जन्मच मुळी दिवस पूर्ण होण्याआधी झालेला होता, त्यात वजनही कमी होतं. कसं तरी दोन किलो भरत होतं. जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसे तिच्या कमकुवत शरीराकडून एकेका आजारांना निमंत्रणे धाडली जाऊ लागली. तिला वेगवेगळ्या प्रकारचा ताप यायचा. निमोनिया झाला, कांजिण्या झाला आणि अखेर अडचणींचा महापूर आला,जेव्हा पोलिओ व्हायरसने तिच्यावर हल्ला चढवला. पोलिओ काबूत येइपर्यंत डावा पाय संवेदनाहीन झाला होता.ताकद गमावलेला पाय असा काही वाकडा झाला होता की, तो सरळ होण्याची शक्यता  डॉक्टरांनीही गमावली होती. आई डॉक्टरांचा चेहरा वाचायची,पण त्यावर निराशेच्या छटाच दिसून यायच्या. डॉक्टरांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट झाली होती की, यावर कसलं औषध नाही.

विल्मा पुरती हतबल झाली होती. तिला काहीच कळत नव्हतं. परंतु एक दिवस आईने विल्माला धीर देत मोठ्या प्रेमानं म्हटलं,"बाळा, सगळं काही ठीक होईल.तू अजिबात काळजी करू नकोस.तू नक्की उठशील आणि चालू लागशील." विल्माचा त्यावर विश्वास बसला नाही, आई  माझ्या उदास मनाला  बरं वाटावं म्हणून असं म्हणते आहे. डॉक्टरांनी तर हात टेकले होते. पण तरीही आई म्हणत होती, तू उठशील आणि चालू लागशील. पण तरीही आईचं हे बोलणं मनाला आधार देऊन जायचं. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार.अशा मुलांना आईबाप टाकूनच देतात,पण आईने तिला उलट बळ दिलं. तिच्यात विश्वास निर्माण केला.  तिच्या मनातला अंध:कार दूर केला. आईनं हार मानली नाही. डॉक्टरांचा पिच्छा सोडला नाही. डॉक्टरांशी बोलता बोलता एक विश्वास तिच्यात मनात पक्का बसला की, मालिश केल्याने तिचे पाय बरे होतील. जवळपास दोन वर्षे आई विल्माला आपल्या पुढ्यात घेऊन तिकडे कुठे लांब असलेल्या दवाखान्याला घेऊन जायची. डॉक्टरांना अपेक्षा नव्हती, पण आईने विल्माच्या मनात जी अपेक्षांची बाग फुलवली होती, त्या बागेत फुलं उमलत होती. मनात आई गुंजन करायची- एक दिवस तू खात्रीने चालायला लागशील.
कधी कधी विल्माला वाटायचं- खरंच! आईनं अगोदरच आपल्याकडे लक्ष दिलं असतं तर... पण  ती तर लोकांची, घरची कामं करण्यात अडकून पडलेली असायची आणि मी सातत्याने येणाऱ्या आजारांमध्ये! अगोदर आईला कुठे वेळ होता, आपल्याकडे बघायला. घरात 22 लहानगी मुलं. बापाची दोन लग्नं झालेली.  इतक्या मोठ्या कुटुंबात मुलीने सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं ते डॉक्टरांनी ,आता ही मुलगी कधीच चालू शकणार नाही म्हटल्यावर! आता फक्त या मुलीचा सांभाळ करण्यापलीकडे काही करता येणार नाही,असं डॉक्टरांनी सरळसरळ सांगून टाकलं. विल्माचे पाय  बाहेरून मालिश करून आणता आणता आईच मालिश करायला शिकली आणि घरातल्या मोठ्या मुलींनाही मालिश करायला शिकवलं. आईनं सगळ्यांना सांगून टाकलं होतं-'विल्माच्या पायात पुन्हा जीव आणायचा आहे. उजवा जरा बराय, पण हा डावा पायच ताप देतोय. आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे. संधी मिळेल, तेव्हा या बेजान पायाला मालिश करत राहायचं.' आई, मोठी बहीण या सगळ्याच मालिश करण्यासाठी हात धुवून मागं लागल्या. काही दिवसांतच विल्मा डाव्या पायावर थोडा थोडा जोर देऊ लागली. आई, बहिणींची अपेक्षा आणखी दुणावली. आठव्या वर्षी विल्मा अंथरूण सोडून लेग ब्रेस घालायला लागली. चालू लागली. एक दिवस असाही आला-जेव्हा आईने विल्माला बास्केटबॉल खेळताना पाहिलं. तेव्हा विल्माचं वय होतं 11 वर्षे. ती फक्त धावत नव्हती तर उड्या मारून बॉल बास्केटमध्येही टाकू लागली होती. लवकरच ब्रेसपासून मुक्तता मिळाली आणि संधी मिळेल तेव्हा धावू लागली. या सातत्यामुळे तिच्या धावण्याचा वेग वाढू लागला. पुढे विल्मा रुडोल्फ (1940-1994) एक प्रसिद्ध धावपटू आणि खेळाडू बनली. 16 व्या वर्षी तिची तिच्या देशाकडून मेलबर्न ऑलम्पिकसाठी निवड झाली. 100 x4 रिले स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या टीमची ती भागीदार ठरली. त्यानंतर चार वर्षांनी ती रोम ऑलम्पिकमध्ये विक्रम करत तीन -तीन सुवर्णपदकं जिंकण्यात यशस्वी झाली. ज्या मुलीला डॉक्टरांनी कायमचं अपंगत्व बहाल केलं होतं, त्याच मुलीने जगातल्या सर्वश्रेष्ठ धावपटूंमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कायमचं कोरलं. तिला जगातील सर्वात वेगवान महिला, असं संबोधलं जाऊ लागलं. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ती जुन्या आठवणी काढताना म्हणाली की, माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, मी पुन्हा कधी चालू शकणार नाही. माझी आई म्हणायची, तू चालू शकशील. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला' निसर्गाचा चमत्कार बघा- आईचं निधन झाल्यानंतर काही दिवसांतच विल्माला गंभीर आजार झाला आणि तिनेही या जगाचा निरोप घेतला. आई आणि मुलगी कदाचित एक दुसऱ्यांसाठीच जन्मल्या होत्या. पण अमेरिकेतील टेनेसी प्रांतातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या विल्मा रुडोल्फने  या जगात 'अशक्य काहीच नाही' हे दाखवून दिलं. सकारात्मक स्वभावाच्या तिच्या आईची तिला खंबीर साथ मिळाली. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

Wednesday, October 21, 2020

एका दृष्टीक्षेपात बिहार निवडणूक


बिहार विधानसभा 243 सदस्य संख्येची आहे. नोव्हेंबरच्या 29 तारखेला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे. येथील निवडणूक तीन टप्प्यात होत असून मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर तर दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होत आहे. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 18 लाख मतदार आहेत. त्यात 3 कोटी 79 लाख पुरुष मतदार, तर 3 कोटी 39 लाख महिला मतदार आहेत. सत्तेवर येण्यासाठी राजकीय पक्षांना 122 चा आकडा पार करावा लागणार आहे.

1990 नंतरच्या भारतीय राजकीय प्रक्रियेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आघाडी राजकारण (युती किंवा संयुक्त आघाडी) ही संकल्पना पुढे आली. बहुपक्षीय स्पर्धेतून केंद्रामध्ये आणि काही घटकराज्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेनासे झाले आणि राजकीय अपरिहार्यतेतून निवडणूकपूर्व किंवा निवडणुकोत्तर आघाड्या अस्तित्वात येऊ लागल्या.  1990 मध्ये बिहारमध्ये काँग्रेस, जनता दल आणि भाजप यांच्यातील स्पर्धा आकारास आली. मंडलच्या मुद्द्यावर लालू प्रसाद यादव, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नीतिश कुमार आणि रामविलास पासवान या नेतृत्वाने ओबीसी-दलित-मुस्लीम आघाडीची मोट बांधत काँग्रेसला पराभूत केले.परंतु ओबीसी नेतृत्वाच्या सत्तास्पर्धेतून जनता दलाचे विभाजन झाले आणि बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव आणि नीतिश कुमार या दोन ओबीसी नेतृत्वांभोवती फिरू लागले.

1990पासून (आणि विशेषतः 2000पासून) बिहारमधील पक्षीय स्पर्धा तीव्र होताना दिसते. 1990नंतर बिहारमध्ये काँग्रेस पुन्हा कधीही सत्तेवर आली नाही आणि इतर पक्षांनाही स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. 1990 ते 2015 यांदरम्यान झालेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांना प्राप्त जागांच्या प्रमाणावरून आणि मतांच्या टक्केवारीवरून बिहारच्या राजकारणात आघाडी आकाराला आली.

1990, 1995 आणि 2000 या तिन्ही विधानसभा निवडणुकांत लालू प्रसाद यादवांना चांगल्या जागा मिळाल्या,पण बहुमतासाठी छोटे पक्ष, डावे पक्ष, बहुजन समाज पार्टी (बसपा), अपक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागला. 1995 मध्ये लालूंच्या नेतृत्वाखालील जनता दल आघाडीत माकप, भाकप व झारखंड मोर्चा हे पक्ष सहभागी होते. तर समता पक्षासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष - मा. ले.  (भाकप-माले)  हा पक्ष होता. 1997 मध्ये जदमधून बाहेर पडून लालूंनी राजदची स्थापना केली. तेव्हा अल्पमतातील राबडी देवी सरकारला काँग्रेसचा आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला.  

फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदसोबत भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व राष्ट्रवादी काँग्रेस तर ऑक्टोबर 2005 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकप हे पक्ष होते. 2005मध्ये स्पष्ट बहुमताअभावी राजकीय अस्थिरता निर्माण होऊन नऊ महिन्यांत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. 2005 मध्ये आणि 2010 मध्ये नीतिश कुमारांनी भाजपच्या सोबत सरकार तयार केले. पण भाजपशी मतभेद झाल्याने 2013 मध्ये नीतिश कुमारांनी भाजपची साथ सोडली. 2015 च्या निवडणूकीत त्यांंनी लालूंशी युती केली. राजद, जद(यू) आणि काँग्रेस आघाडी यांनी स्पष्ट बहुमत मिळवले व सरकार स्थापन केले परंतु 20 महिन्यांतच राजदशी युती तोडून नीतिश कुमारांनी पुन्हा भाजपशी युती केली. राजद आणि जद(यू) यांच्यातील जागांचा आणि मतांचा विचार केला तर 2005 पासून राजदच्या जागा आणि मतांची टक्केवारी कमी होताना तर जद(यू)च्या जागा व मते वाढताना दिसतात. त्यामुळे 2005 पासून आणि 2020 मध्येही मुख्य स्पर्धा राजद व जद(यू) यांच्यामध्ये दिसून येते. राजद व जद(यू) यांच्या सत्तासंघर्षात राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस आणि भाजप हे राज्यात दुय्यम भूमिका घेताना दिसतात. 1995 पासून काँग्रेस अस्तित्व टिकवण्याच्या तर भाजप विस्ताराच्या प्रयत्नात दिसतात. 1990 पासून काँग्रेसच्या जागा व मते कमी होताना तर भाजपच्या जागा व मते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. बिहारमधील राजकीय पक्षांना मिळणारा सामाजिक पाठिंबा पाहिला तर आघाड्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता स्पष्ट होते. 

याठिकाणी नेतृत्वाच्या सत्तास्पर्धेतून ज्याप्रमाणे नेतृत्व विविध पक्षांत विभाजित होत गेले तशी जातींची मतेही विभाजित होत गेली. मात्र जातिअस्मितेचा मुद्दा आग्रही झाला. 1990 मधल्या व 1995 मधल्या निवडणुकांत जनता दलासोबत असलेला ओबीसी समाज नंतर राजद व जद(यू) यांच्यात आणि इतर छोट्या पक्षांत विभागला गेला. राजदमागे यादव व मुस्लीम तर जद(यू) यांच्यामागे कुर्मी व कोयरी आणि लोजपा व हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम) यांच्यामागे दलित समाज उभा राहिलेला दिसतो. सवर्ण समाज भाजपमागे एकवटलेला दिसतो.

2015 मध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जद (यू) ने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलसोबत निवडणूक लढवली होती. तेव्हा जद(यू), राजद, काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्ष यांचे महागठबंधन आकाराला आले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री बनले तर लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले. 2017 मध्ये नितीशकुमार यांनी राजदपासून गठबंधन तोडले आणि भाजपला सोबत सरकार बनवले.तेव्हा भाजपचे 53 आमदार होते. काँग्रेसने मागील निवडणूक राजद,जद(यू) आणि अन्य राजकीय पक्षांच्या महागठबंधनच्या माध्यमातून लढवली होती. यावेळी त्यांना 27 जागा मिळाल्या होत्या.भाजपाच्या सहयोगी लोकजनशक्ती पार्टीने 2 जागा जिंकल्या होत्या.

2020 मधली बिहारची विधानसभा निवडणूक प्रमुख दोन आघाड्यांदरम्यान होत आहे. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनमध्ये राजदसोबत काँग्रेस, माकप, भाकप, माकप माले, झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष आहेत तर जद(यू)सोबत भाजप आणि जीतनराम मांझी यांचा हम पक्ष नीतिश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये समाविष्ट आहेत.एनडीएचा घटकपक्ष असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी हा पक्ष या वेळी जागावाटपामुळे आणि नीतिश कुमारांच्या भूमिकांमुळे आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरला आहे. या दोन प्रमुख आघाड्यांशिवाय उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली आरएलएसपी, बसपा, एमआयएम, जनवादी पार्टी यांनी एकत्रित आघाडी बांधली आहे.

सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणारा राजद मागील निवडणुकीत महागठबंधनमध्ये सामील होता. या महागठबंधनमध्ये राजदसोबत डाव्या आघाडीचे पक्ष देखील सामील झाले आहेत. काँग्रेस आधीपासूनच सोबत आहे. या महागठबंधन मध्ये राजद 144 जागांवर, काँगेस 70 जागा आणि डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवत आहेत. एनडीए आघाडीमध्ये भाजप, जद(यू) व्यतिरिक्त व्हीआयपीचे मुकेश साहनी, हमचे जितन राम मांझीदेखील सामील आहेत. रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले, त्यांची लोजपा याखेपेला एनडीएमध्ये सामील झाली नाही. या आघाडीतून जद (यू) 122 जागांवर तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढवत आहेत. जद (यू) ने आपल्या खात्यातील सात जागा जितन राम मांझी यांच्या हम पार्टीला दिल्या आहेत. भाजपनेही आपल्या खात्यातल्या 11 जागा मुकेश साहनी यांच्या व्हीआयपीला देऊन टाकल्या आहेत. याशिवाय रालोसपाचे उपेंद्र कुशवाह, बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावती, एआयएमएआयएमचे असदुद्दीन ओवैसी, जनवादी पार्टी (समाजवादी)चे संजय चौहान आणि सोहेलदेव भारतीय समाज पार्टी या सगळ्यांनी मिळून तिसरी आघाडी साधली आहे. त्याचबरोबर

जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी प्रगतीशील लोकतांत्रिक आघाडी म्हणजेच पीडीए बनवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये चंद्रशेखर आजाद  अध्यक्ष असलेली आजाद समाज पार्टी, एमके फैजी यांच्या नेतृत्वाखालील सोशल डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडिया म्हणजेच एसडीपीआय आणि  बीपीएल मातंगची बहुजन मुक्ति पार्टी सामील आहे.  इंडियन यूनियन मुसलिम लीग आता या आघाडीचा हिस्सा राहिलेली नाही. 

महागठबंधनच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले  तेजस्वी यादव राघोपुर येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे मोठे बंधू तेज प्रताप हसनपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांचा पारंपरिक महुआ हा मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. 

एनडीए नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. जद (यू) च्या उमेदवारांमध्ये लालूप्रसाद यांचे व्याही आणि त्यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांची चर्चा जोरात आहे. जद (यू) ने मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणापासून चर्चेत आलेल्या मंजू वर्मा यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी हा आणखी एक चेहरा चर्चेत आहे. स्वतःला बिहारच्या मुख्यमंत्री उमेदवार असल्याचे सांगणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी या पाटणातील बांकीपूर आणि मधूबनीच्या बिस्फि विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि येथे येऊन त्यांनी प्लूरल्स नावाचा पक्ष स्थापन केला आहे.- निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या, उमेदवारांच्या सभांना गर्दी होऊ लागली आहे. साहजिकच येथे कोरोनाची भीती दिसून येत नाही. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Tuesday, October 20, 2020

देह व्यापार करणाऱ्या महिला आणि कोविड-19


जगातल्या अनेक मोठ्या देशांचे नेते आर्थिक मंदीवर भाष्य करताना दिसत आहेत. देशातल्या सर्वच घटकांना या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे आणि जगभरातील सरकारे आपल्या नागरिकांना यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात देत आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी आर्थिक मदत करण्यापासून ते रेशन उपलब्ध करून देण्यापर्यंत प्रयत्न केले जात आहेत. पण भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशांमधला एक वर्ग मात्र यापासून वंचित आहे. त्यांना कसल्याच प्रकारची सहानुभूती मिळताना दिसत नाही. त्यांची सर्वात मोठी अडचण अशी की, त्यांची ओळख सांगणारा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नाही. मानवाधिकाराची चर्चा करणारेदेखील त्यांचं नाव घ्यायला कचरत आहेत. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची होणारी अवहेलना, उपासमार जाणली. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश दिले आहेत की, ओळखपत्रांचा अट्टाहास न करता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिन्याचे रेशन वितरित करावे ,त्याचबरोबर रोख रक्कमदेखील दिली जावी. न्यायालयाने हा आदेश एका जनहित याचिकेवर दिला आहे- ज्यामध्ये कोरोना संकटामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची वास्तव परिस्थिती न्यायालयापुढे आणण्यात आली.

आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यांमध्ये 1.2 लाख वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले होते, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली असून कोरोना संकटामुळे  96 टक्के महिलांनी आपला रोजगार गमावला आहे. मोठ्या संख्येने असलेल्या वेश्यांकडे आधार आणि रेशनकार्डसारखी ओळखपत्रे नसल्याने या महिला सरकारी मदत कार्यापासून वंचित राहिल्या आहेत. यांना ओळख दस्तावेज देण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. खरे तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सर्वच घटकांपासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणबाबत चौकशी करणाऱ्या 2011 मध्ये गठीत केलेल्या समितीने काही शिफारशी सादर केल्या होत्या. यानुसार न्यायालयाने या महिलांसाठी रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र तसेच बँक खाते या त्यांची ओळख सांगणाऱ्या गोष्टींची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण समितीच्या अंदाजानुसार देशात जवळपास नऊ लाख वेश्या आहेत. या व्यवसायात आलेल्या महिला आर्थिक ओढाताणीमुळे या दलदलीत खेचल्या गेल्या आहेत. वास्तविक त्यांच्या अडचणी समजून न घेता समाज त्यांनाच दोष देतो. अचंब्याची गोष्ट अशी की, ज्या व्यवसायाकडे इतक्या वाईट नजरेने पाहिले जाते, तो व्यवसाय बंद करण्यासाठीचा प्रयत्न मात्र शून्य आहे.कारण यात वेश्यांपेक्षा कितीतरी अधिक लाभ अशा लोकांना होतो, जे मानवी तस्करीचे ठेकेदार आहेत.

देह व्यापाराचे हे जाळे इतके खोल रुतले आहे की, याचे पाळेमुळे खणून काढणे कठीण आहे. मानवी तस्करी करून महिलांना या धंद्यात ढकणारे गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने समाजात वावरत असतात, मात्र या क्षेत्रात ढकलेल्या महिलांना मात्र नरकयातना भोगाव्या लागतात. कलंक आणि तिरस्कारादरम्यान जगणाऱ्या या महिलांना त्यांच्या जीवनमुक्तीचा मार्ग इच्छा असूनही  सापडत नाही. या महिला सामान्य महिलांसारख्या आपल्या अधिकारासाठी संघर्षही करू शकत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये अशी भीती लागून राहिलेली असते की, त्यांची खरी ओळख जाहीर होऊ नये. देह व्यापार वाढला-फुलला याला समाजाच्या नैतिकतेचा ऱ्हास कारणीभूत नाही काय? अशी परिस्थिती फक्त भारतातच नाहीतर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्येही आहे. अमेरिकेत आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना मदत मिळावी म्हणून अनेक योजना आहेत. तिथे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना कर्ज मिळते. मात्र कथित सभ्य समाज ज्यांना वेश्या  समजतो,त्या महिलांचा अशा योजनांमध्ये समावेश नाही. या महिलांना अमेरिका सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. ब्रिटनमध्ये या वेश्यांनी आर्थिक मदत करण्याची मागणी सरकारकडे केली. कारण या महिला  आईदेखील भूमिका बजावत आहेत. आर्थिक मंदीच्या काळात फक्त त्यांचाच प्रश्न नाहीत तर त्यांच्या मुलांच्या जीवनाचाही आहे. लंडनमधल्या 'इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टिट्यूट'ने हजारो वेश्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याची मागणी केली आहे. पण हे खरेच शक्य आहे का? देह व्यापाराची समस्या जगभरात सर्वत्र एकच आहे. बांगला देशात या व्यवसायाला कायद्याने मान्यता आहे,परंतु तिथल्याही वेश्यांची अवस्था वाईट आहे.  'द गार्डियन' मध्ये मागे काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले होते की, लॉकडाऊनमुळे बांगला देशातील एक लाखहून अधिक महिला बेघर झाल्या आहेत आणि त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तिथल्या सरकारने यासाठी योजना बनवली आहे,पण वास्तव असे की, ती योजना या महिलांपर्यंत पोहोचत नाही. प्रश्न असा की, या महिला आपल्या दुनियेतल्या नाहीत का? देह व्यापारात उतरल्यानंतर त्यांचे मानवीय हक्क हिरावून घेणं, हाच सभ्य समाजाचा अधिकार आहे का?

2010 मध्ये वेश्यांची परिस्थिती सुधारण्यासंबंधात एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अनैतिक व्यापार निवारण अधिनियम 1976 मध्ये संशोधनाची शिफारस करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती, कारण त्यामुळे वेश्यांना संविधानाच्या कलम 21 च्या प्रावधनानुसार चांगल्याप्रकारे जीवन जगता येईल. पण असे काही घडलं नाही. या निराशाजनक वातावरणात एक समाधानाची बाब अशी की, मुंबईतल्या कामाठीपुरा इलाख्यात राहणाऱ्या वेश्यांचे बिकट जीवन फक्त जाणून घेतलं गेलं नाहीतर मानवीय दृष्टिकोनातून महिला आणि बाल विकास विभागाने जुलै 2020 मध्ये एक पत्र लिहून या महिलांना कोविड-19 काळात आवश्यक सेवा पुरवल्या जाव्यात, असं सांगितलं. या पत्रात असाही उल्लेख करण्यात आला होता की, लॉकडाऊमुळे त्यांना कामदेखील मिळत नाही-ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं आहे. त्यांच्यासाठी जिवंत राहणंदेखील अवघड झालं आहे. या पत्राला यासाठी वेगळं  म्हणायला हवं की, कदाचित पहिल्यांदा कुणीतरी त्यांच्या कामाला मान्यता दिली आहे आणि त्यांच्याविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवला आहे.

आश्चर्याची गोष्ट अशी की, ‘मॉडलिंग द इफेक्ट आफ इंस्टीट्यूट क्लोजर आफ रेड लाइट एरियाज आन कोविड-19 ट्रांसमिशन इन इंडिया’ या अभ्यासात  असे सूचित करण्यात आले की, 'राष्ट्रव्यापी बंद'नंतरही जर रेड लाइट एरिया बंद ठेवला जातो, तर भारतीयांमध्ये कोरोना व्हायरस कमी होण्यास मदतच केली आहे, पण तरीही कुठल्याच संस्थेने याकडे लक्ष दिले नाही. या क्षेत्रातल्या महिला कशाप्रकारचे आयुष्य जगत आहेत, असे कुणालाच का वाटले नाही? देह व्यापार ही एक सामाजिक व्याधी आहे, आणि याचा सगळा दोष या देह व्यापार करणाऱ्या महिलांचा आहे, असे म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. ही क्रय और विक्रयाची अशी प्रक्रिया आहे,ज्यात पुरुषांचीदेखील समान भूमिका असते. मग हा तिरस्कार फक्त या महिलांच्याच वाट्याला का? जर आपली ही सामाजिक व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला जीविकोपार्जनाची संसाधने उपलब्ध करण्यात यशस्वी झाला असता तर का महिला आपल्या देहाचा व्यापार मांडेल? पण समाजाची सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, तो सगळ्या समस्यांना जबाबदार त्याला ठरवतो- जे सगळ्यात कमकुवत असतो आणि कमकुवताची विवशता ही की, ते इच्छा असूनही प्रतिकार करू शकत नाहीत. कारण पितृसत्ताक समाज त्याच्याकडून त्याचे जीवन जगण्याचा अधिकारही हिरावून घेऊ शकतात. मानवीय दृष्टिकोन ठेवणाऱ्या प्रत्येक सरकारची प्रथम जबाबदारी असते की, ते समाजातील सगळ्यात तिरस्कृत वर्गाला आश्रय देणे आणि सन्मानाने जीवनाच्या मार्गावर परतण्याची वाट विस्तृत करणे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

महिलांवर होणारे सोशल मीडियावरील आभासी अत्याचार


देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या उद्विग्न करणाऱ्या, धक्कादायक घटना मोठ्या संख्येने वाढत आहेत तर दुसरीकडे त्याचे राजकारण केले जात आहे. यामुळे देशातला प्रत्येक नागरिक पार गोंधळून गेला आहे. काय चाललं आहे आपल्या देशात असा त्याला प्रश्न पडला आहे. आणि जो तो विचारतो आहे, शेवटी या घटना थांबणार तर कधी? मुलगी कुणाचीही असली तरी शेवटी ती या भारत मातेचीच आहे.या देशाची पुत्री आहे, मग यावर राजकारण का होत आहे? संयुक्त राष्ट्रच्या एका अहवालानुसार संपूर्ण जगभरात जवळपास पस्तीस टक्के महिला कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडत आहेत. प्रत्यक्ष शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना तोंड द्यावे लागत आहेच, शिवाय दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियाचा वापर आता अनिवार्य झाला आहे,पण याबाबतची  धक्कादायक गोष्ट अशी की, ज्या सोशल  मीडियाचा सर्वाधिक वापर केला जातो, त्यावरच जगातील साठ टक्के महिलांसोबत विविध प्रकारच्या अत्याचार करणारे व्यवहार पाहायला मिळत आहेत. जरी हे अत्याचार शारीरिक नसले तरी या ऑनलाईन दुर्व्यवहाराला,अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची मानसिक अवस्था शारीरिक अत्याचारास बळी पडलेल्या महिलांसारखीच होऊन जाते.  या अत्याचाराला कंटाळून सोशल मीडियावरील अत्याचारास बळी पडलेल्या सुमारे वीस टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी आपले सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करून टाकले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व्हेक्षण भारतासह 22 देशांतील चौदा हजारापेक्षा अधिक महिलांमध्ये करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणानुसार 39 टक्के महिलांसोबत ऑनलाईन अत्याचाराच्या घटना फेसबुकवर होतात. इंस्टाग्रामवर अत्याचारास बळी पडलेल्या महिलांची संख्या 23 टक्के आहे. चौदा टक्के महिलांसोबत व्हॉटसअपच्या माध्यमातून अत्याचार केले जातात. स्नॅपचॅटवर दहा टक्के,ट्विटर वर नऊ टक्के आणि सहा टक्के अन्य ऍपच्या माध्यमातून महिलांना अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. याच वर्षी दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये केल्या गेलेल्या एका सर्व्हेक्षणामधून कळलं आहे की, इंटरनेटवर महिलांसोबत अत्याचाराच्या घटना 36 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर या ऑनलाईन अत्याचाराच्या बाबतीत शिक्षेचे प्रमाण मात्र चाळीस टक्क्यांवरून घटून 25 टक्क्यांवर आले आहे. याचा सरळ अर्थ असा की, या माध्यमातून स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यामुळेच त्यांचे धाडस आणखी वाढलं आहे. ऑनलाईन अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांची मानसिक स्थिती वास्तव आयुष्यात अत्याचारास बळी ठरलेल्या महिलांपेक्षा अधिक वाईट होते. अत्याचार जर कुठल्या वर्चुअल प्लॅटफॉर्मवर होत असेल तर ती वास्तव जीवनात होणाऱ्या अत्याचारापेक्षा अधिक भयंकर असते. सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मचा खरा हेतू  तर लोकांना जवळ आणण्याचा आहे. पण आता याला वेगळेच वळण मिळत आहे. ऑनलाइन अत्याचार आणि छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे आता जवळपास 69 टक्के महिला आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवण्यास पसंद करत आहेत. महिलांच्याबाबतीत असुरक्षा आणि भेदभावसारखी परिस्थिती वास्तव जीवनात तर आहेच पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी दुनियेवरही प्रभाव टाकत आहे. म्हणजे एकंदरीत महिलांसोबत छेडछाडीसारख्या घटनांना आता घराच्या बाहेर नाहीतर सोशल मीडियावरदेखील घरबसल्या ( जिथे आहे तिथे) तोंड द्यावे लागत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्यावेळेला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मला सुरुवात झाली,त्यावेळेला सांगितलं जात होतं की, या आभासी दुनियेत सगळ्यांना समसमान संधी मिळेल, इथे महिला आणि पुरुष असा कुठला भेदभाव असणार नाही. पण आजची एकूण परिस्थिती पाहिल्यावर असे दिसते की, सोशल मिडीयाच आता समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांसोबत भेदभाव करणारे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. भविष्य काळाबाबत विचार केला गेला होता की, डिझिटल दुनियेत तरी महिलांना सन्मान मिळेल,पण दुर्दैव हे की, डिझिटल दुनियेतही महिलांविरोधात होणारे अत्याचार आणि त्यांचा होणारा अपमान आता सगळ्या मर्यादा ओलांडत आहे. याविरोधात पीडित महिलांनी आवश्य आवाज उठवण्याची गरज आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दाद मागता येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे यासाठी सायबर समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या समित्या अन्य काही राज्यातही स्थापन झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीडित  महिलांनी अत्याचार सहन करत बसू नये किंवा त्यापासून पळून जाऊ नये. कायद्याच्या आधारावर त्याला तोंड द्यायला हवे आणि अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायला हवी, तरच महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबणार आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, October 19, 2020

डिझिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा


भारताने डिझिटल अर्थव्यवस्थेच्या विश्वात प्रवेश केला असला तरी अजूनही अर्थव्यवस्थेचा हा नवा अवतार अपेक्षेप्रमाणे गती पकडू शकला नाही. याचं मोठं कारण म्हणजे डिझिटल अर्थव्यवस्थेला वेग देताना वाटेत येणारे अडथळे! जोपर्यंत हे अडथळे दूर केले जाणार नाहीत, तोपर्यंत डिझिटल अर्थव्यवस्था भारतीय पूर्णपणे आत्मसात करणं शक्य नाही.यासाठी पहिला आणि महत्त्वपूर्ण उपाय आहे तो म्हणजे ग्रामीण भाग डिझिटल स्वरूपात साक्षर बनवणं. त्याचबरोबर 'डिझिटलकरण'साठी आवश्यक पायाभूत सुविधांचं जाळं विणावं लागणार आहे. साहजिकच यासाठी सर्वात पहिल्यांदा ग्रामीण क्षेत्रात पुरेसा वीजपुरवठा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत देशातल्या गावागावांमध्ये वीज सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत इंटरनेटचा वापर कसा शक्य आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिझिटल अर्थव्यवस्थेसाठी एप्रिल ते जुलैदरम्यान 16.26 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक भारतात आली. खास करून अमेरिकी कंपन्या भारतात आरोग्य, शिक्षण, कृषी आणि किरकोळ क्षेत्रातील ई-व्यवसायाच्या बाजाराची प्रबळ शक्यता पाहूनच गुंतवणूकीसाठी पुढे आल्या आहेत.

डिझिटल क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.टाळेबंदी काळात वाढलेले ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होमची वाढलेली संस्कृती यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची वाढलेली संख्या,डिझिटल इंडिया अंतर्गत सरकारी सेवा डिझिटल होऊ लागल्या आहेत. जनधन खात्यांमार्फत लाभार्थ्यांच्या थेट हातात मिळालेला पैसा, प्रत्येक व्यक्ती करत असलेला डेटा वापर आणि मोबाईल ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येच्याबाबतीतही भारत वेगाने पुढे सरकला. डिजिटल अर्थव्यवस्थेअंतर्गत डिझिटल आर्थिक व्यवहार उद्योग, ई-कॉमर्स आणि डिझिटल मार्केटिंगसारखे क्षेत्रही वेगाने पुढे आले.
जर आपण डिजिटल देय-उद्योगाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, नोटबंदी काळातदेखील डिझिटल आर्थिक व्यवहार जितका वाढला नव्हता, तितका कोरोना संकट काळात एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान वाढला. देशात डिझिटल आर्थिक व्यवहार स्वीकारण्याची मानसिकता वाढू लागली आहे. अर्थव्यवस्थेतेत रोख आर्थिक व्यवहारांपेक्षा अन्य दुसऱ्या माध्यमांतून देण्या-घेण्याचा व्यवहार वाढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांचा परिणाम जाणवू लागला आहे. देशात जो डिझिटल आर्थिक व्यवहार कोरोना पूर्वी जानेवारी 2020 मध्ये जवळपास 2.2 लाख कोटी रुपये होता, तो जून 2020 मध्ये 2.60 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. टाळेबंदीमुळे लोकांनी घरातच राहून ई-कॉमर्स आणि डिझिटल मार्केटिंगला एक प्रकारे आपल्या जीवनाचा अंग बनवले आहे. आता टाळेबंदी पूर्णपणे उठवण्यात आली असली तरी लोक गर्दीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत. बर्नस्टीन रिसर्च अहवालानुसार भारतात कोरोनाकाळात लोकांनी ज्या वेगाने डिझिटल क्षेत्राचा वापर वाढवला आहे, त्याचा भारतासाठी आर्थिक स्वरूपात चांगला उपयोग झाला आहे.  2027-28 पर्यंत भारतात ई-कॉमर्सचा कारोबार दोनशे अब्ज डॉलर ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ई-कॉमर्स आणि डिझिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचा मोठा फायदा डिझिटल सेवा कर (डीएसटी) सरकारी उत्पन्नाचा नवा स्रोत बनत चालला आहे. जसजशी डिझिटल अर्थव्यवस्था गती घेईल, तशी डीएसटीमध्येही वाढ होत जाईल.
भारतात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक कारोबर करणाऱ्या विदेशी डिझिटल कंपन्यांचा व्यापार आणि सेवांवर दोन टक्के डिझिटल कर लावण्यात आला आहे. या कराच्या कक्षेत भारतात काम करणाऱ्या जगातल्या सर्व देशांच्या ई-कॉमर्सचे काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. डिजिटल कर लावण्याचे हक्क भारताकडे सुरक्षित आहे. डिझिटल कर जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे उल्लंघन नाही.
आता जसजशी वैश्विक अर्थव्यवस्था डिझिटल होत राहील, तसतशी देश आणि जगातील रोजगार बाजाराची परीदृश्यं बदलत जातील. सध्या ती बदलत आहेत. भविष्यात काही रोजगार असे असतील की, ज्यांची नावंदेखील आपण आतापर्यंत ऐकली नसतील. काही शोध संघटनांच्या म्हणण्यानुसार 'डिझिटलकरण'मुळे भारतात रोजगाराच्या नव्या संधी वेगाने वाढत आहेत. यात जगभरात ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या वापरामुळे जिथे काही क्षेत्रात रोजगार कमी होत आहेत,तिथे डिजिटल अर्थव्यवस्थेत रोजगार वाढत आहेत.जागतिक बँकेनेदेखील आपल्या वैश्विक रोजगरासंबंधीत अहवालात म्हटले आहे की, पाच ते दहा वर्षांत जिथे जगात कुशल मनुष्यबळाचे संकट असेल,तिथे भारताजवळ कुशल मनुष्यबळाची अतिरिक्त संख्या असेल. अशा परिस्थितीत भारत जगातल्या काही विकसित आणि काही विकसनशील देशांमध्ये मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ पाठवून लाभ उठवू शकतो.
देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही डिझिटल बँकिंगच्यादृष्टीने मागे आहे. यासाठी त्याला डिजिटल बँकिंगच्या दिशेने खेचून घ्यावे लागणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येमध्ये लोकांजवळ डिझिटल आर्थिक व्यवहारासाठी बँक-खाती, इंटरनेटची सुविधा असणारा मोबाईल फोन किंवा क्रेडिट-डेबिट कार्डांची सुविधा नाही.त्यामुळे अशी सुविधा वाढवण्यासाठी तत्परतेने अभियान राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर वित्तीय व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्रामीण लोकांना डिझिटल व्यवहार तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रेरित करायला लागणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिझिटल व्यवहार करताना ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत असलेल्या मोठ्या घटनांमुळे ऑनलाईन व्यवहारासंबंधी ग्रामीण लोकांमध्ये अविश्वास दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी सरकारला सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. 'डिझिटलकरण'ला उत्तेजन देण्यासाठी मोबाईल ब्रॉडबँड स्पीडच्याबाबतीत अजून बरंच काही करणं बाकी आहे. यावर्षी एप्रिलमध्ये मोबाईल ब्रॉडबँड गतीच्याबाबतीत 139 देशांच्या यादीत भारत 132 व्या स्थानावर आहे. एप्रिलमध्ये भारताचे सरासरी मोबाईल ब्रॉडबँड डाऊनलोड स्पीड 9.81 एमबीपीएस आणि सरासरी अपलोड स्पीड 3.98 एमबीपीएस होते. मोबाईल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत दक्षिण कोरिया, कतार, चीन,यूएई, नेदरलँड, नार्वेसारखे देश भारताच्या कितीतरी पुढे आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तान आणि नेपाळसारख्या छोट्या आणि मागास देशांनीही भारताला याबाबतीत मागे टाकले आहे. वास्तविक भारताला डिझिटल अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्यासाठी मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा.
आता जगातल्या सर्वाधिक युवावर्ग असलेल्या भारताला मोठ्या संख्येने युवकांना डिझिटल काळाच्या दिशेने नेट नव्या तंत्रज्ञान रोजगार योग्यतेच्या दृष्टिकोनातून सज्ज करण्याची आवश्यकता आहे. डिझिटल विश्वात भविष्य बनवण्यासाठी डिझिटल अर्थव्यवस्थेच्या विशेषतेसह उत्तम इंग्रजी, कॉम्प्युटर शिक्षण,संवाद प्राविण्य, जनसंपर्क आणि विज्ञान क्षेत्राशी निगडित कौशल्य आत्मसात केल्यास युवकांना त्याचा अधिक लाभ होईल.याशिवाय तंत्रज्ञान कौशल्यतेसंदर्भात वेब डिझाईन, सोशल मीडिया, वेब संबंधित सॉफ्टवेअरचे उत्तम ज्ञान, विश्लेषणात्मक कौशल्य आणि संशोधन कौशल्य असणंही जरुरीचं आहे.
डिझिटल अर्थव्यवस्थेदरम्यान देशातल्या नव्या पिढीसाठी रोजगाराच्या मोठ्या शक्यता दिसून येत आहेत. त्याचा लाभ उठवण्याची गरज आहे. चांगले ऑनलाईन शिक्षण आज काळाची गरज बनली आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेज कंपनीज (नॅशकॉम) नुसार भारत डिझिटल अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे फायदा घेण्याच्या परिस्थितीत आहे. पण कोरोना संकटानंतर  डिझिटल क्षेत्राला ओहोटी लागण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात याचा वापर वाढला पाहिजे,यासाठी सरकारनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात याचा अंतर्भाव करण्यात आला असला तरी त्यात वेगाने वाढ अपेक्षित आहे. देशातल्या सरकारी शाळा डिजिटल करताना वीज, इंटरनेट या सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्याची गरज आहे. वर म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागात वीज, इंटरनेट सुविधा, डिझिटल साक्षर याबाबतीत गती घेतली जायला हवी आहे. नवीन पिढी डिझिटल अर्थव्यवस्थेमध्ये लपलेल्या संधी शोधतील आणि देश- विश्वाच्या नव्या गरजांनुसार स्वतःला तयार करतील, अशा शिक्षणाचा अंतर्भाव नव्या शैक्षणिक धोरणात करायला हवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday, October 15, 2020

(बालकथा) टुन्ना आणि फुलपाखरू


टुन्ना एक लहानशी मुलगी होती. अगदी खेळण्यातल्या बाहुलीसारखी. हसायची तेव्हा वाटायचं संगीत वाजतं आहे. टुन्नाची आईवर खूप माया होती. शाळेतून घरी आल्यावर ती तिच्या अवतीभवती घुटमळायची. टुन्नाची आई घरातली कामं आवरायची,तेव्हा टुन्ना तिला काही ना काही मदत करायची. टुन्नाच्या घरासमोर थोडी मोकळी जागा होती.  टुन्नाच्या आईनं त्या जागेवर विविध प्रकारची रोपं लावली होती. टुन्नाची आई त्या रोपांना नियमितपणे पाणी घालत होती. माती खुरप्याने शेखरत होती.

 टुन्नाची आई वाळलेली पानं, भाजीपाला आणि फळांच्या साली कधीच बाहेर फेकून देत नव्हती. ती ते सारं एका खड्ड्यात टाकत होती. काही दिवसांनी त्याचं खत होई. ते ती रोपांजवळच्या मातीत मिसळत होती. यामुळे रोपांचं चांगलं पोषण होई.

चांगल्या पोषणामुळे  टुन्नाच्या बागेतील रोपटी टवटवीत दिसायची. तिच्या बागेत अनेक प्रकारची फुलं फुलत होती. आईप्रमाणेच  टुन्नालादेखील झाडं-रोपं आवडायची. तिनेही कुंड्यांमध्ये फुलांच्या बिया लावल्या होत्या. त्यानंतर ती रोज नेमाने त्यांना पाणी घालत होती. 

रोज सकाळी उठल्यावर टुन्ना कुंड्यांजवळ जायची आणि बघायची की, बियांना अंकुर फुटले आहेत की नाही.शाळेतून आल्यावरही तिचा हा दिनक्रम चालू असायचा.

टुन्नाला फार दिवस वाट पाहावी लागली नाही. काही दिवसांतच तिला छोटी-छोटी रोपं उगवल्याचं दिसलं. ती रोपं पाहून टुन्नाला कमालीचा आनंद झाला. त्या दिवसांमध्ये घरी कोण आलं तर ती त्यांना तिच्या बागेत घेऊन जायची आणि ती रोपं दाखवायची.वर  म्हणायची,' बघा ना, ही रोपं किती सुंदर आहेत. ही मी लावली आहेत. मी यांना रोज पाणी घालते. आता काही दिवसांतच यांना फुलं येतील."

टुन्नाच्या स्नेहभरल्या देखभालीनं रोपं वेगानं वाढत होती. काही दिवसानंतर त्यांच्या फांद्यांमधून कळ्या निघाल्या. मग तर काय! टुन्ना रोपांची आणखीनच अधिक काळजी घेऊ लागली.

आता शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या. टुन्ना जवळपास दिवसभर बागेतच तिच्या रोपांजवळच बसून असायची. तिला भीती होती की, कुणी तरी या कळ्या तोडून घेऊन जातील.

 काही दिवसांनंतर कळ्या खुलल्या आणि फुलांत रूपांतरित झाल्या. तिने बाबांना सांगून या फुलांसोबत फोटो काढून घेतले. टुन्नाच्या बाबांनी ते फोटो फेसबुकवर टाकले. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्या फोटोंना 'लाईक' केले. काहींनी खूपच छान कमेंटस दिल्या. टुन्नाला ते खूप भारी वाटलं. तिला आता अभ्यासातही मजा येऊ लागली.

त्याच काळातळी गोष्ट आहे. टुन्ना कुंड्यांजवळ बसली होती, तेवढ्यात एक फुलपाखरू उडत उडत आलं आणि कुंडीमध्ये फुललेल्या एका फुलावर बसलं. टुन्नाला वाटलं की, फुलपाखरू फुलातला रस शोषून घेऊन ते खराब करून टाकील. टुन्नाने त्या फुलपाखराला पिटाळून लावलं. मग टुन्नाने एक मोठी प्लास्टिक पिशवी घेऊन फुलझाडाची कुंडी अशाप्रकारे झाकली की, कोणतंच फुलपाखरू फुलांवर  बसणार नाही. 

एक दिवस टुन्ना आपल्या कुंड्यांजवळ बसून गोष्टींचं पुस्तक वाचत होती. तेवढ्यात तिला आवाज ऐकू आला- "टुन्ना,तू हे काही योग्य केलं नाहीस. तू फुलांना अशाप्रकारे झाकायला नको होतंस."

टुन्नाने इकडेतिकडे पाहिलं, पण तिला कुणीच काही दिसलं नाही. पुन्हा आवाज आला-"टुन्ना, मी नीलिमा फुलपाखरू बोलतेय."  टुन्नाने तिला पाहिलं. ती जवळच्या एका झाडाच्या फांदीवर बसून आपले निळे पंख फडफडवत होती. 

 "मी तुला माझ्या फुलांचा रस शोषू देणार नाही. मी खूप मेहनत घेऊन ही रोपं लावली आहेत आणि सांभाळली आहेत." टुन्ना म्हणाली.

 "आम्ही तर फुलांचे मित्र आहोत. आमच्याशिवाय फुलांचा पुढे विकासच होणार नाही. आमच्याशिवाय तुझी फुलं किती दुःखी-कष्टी झालीयत, ती बघ तर  खरं! टुन्ना, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर या फुलांना विचार बरं." नीलिमा म्हणाली.

 नीलिमाचे बोलणे ऐकून टुन्नाने फुलांवर झाकलेली पिशवी काढली. टुन्ना काही बोलणार तोच एक फुल म्हणाले,"हो टुन्ना, नीलिमा म्हणतेय ते बरोबरच आहे. फुलपाखरं आमच्याकडून भोजन घेतात. पण त्या बदल्यात आमच्या परागणात मदत करतात. परागणशिवाय फुलांचं बीज होत नाही. बीज बनलं नाहीतर पुढच्या ऋतूमध्ये आणखी रोपं कशी उगवतील?

"अच्छा, म्हणजे असं आहे तर...! माझं चुकलंच. ठीक आहे, ये बस या फुलावर." टुन्ना म्हणाली. आता फुलपाखरं रोज फुलांवर बसू लागली. काही दिवसांनंतर फुलांच्या ठिकाणी छोटी-छोटी फळं दिसू लागली. फळं पिकल्यावर टुन्नाने त्यातल्या बिया काढून ठेवल्या. आता टुन्ना खूप आनंदी होती- कारण या बियांपासून पुढच्या ऋतूमध्ये ती फुलांची आणखी रोपं उगवणार होती.


 हिंदी कथा-विष्णुप्रसाद चतुर्वेदी

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

Monday, October 12, 2020

(कथा) शांतता


आज माझा वाढदिवस आहे,हेदेखील मला नर्सने सांगितलं. ती हसून म्हणाली," गुड मॉर्निंग, मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ डे! मे यू हॅव अ लॉंग ,हेल्दी अँड हॅपी लाईफ." ती माझ्यात मी माघारी काय प्रतिक्रिया देतेय याची वाट पाहत राहिली. पण या बिचारीचा काय दोष!हिला जे सांगण्यात आलंय, त्याचं ती फक्त पालन करतेय.

असं काही खास लांब नाहीए सांगली! नातवंडं-परतुंडं, ल्योक-सून, लेक-जावई. इतक्या मोठ्या भरल्या घरात कुणाकडंही वेळ नाही की, एकाद्या दिवशी यावं आणि भेटावं? खरंच त्यांच्याकडं वेळ नाही? आपल्या मित्र -मंडळींना भेटत नाहीत का हे लोक? सिनेमा,रेस्टॉरंटला जात नाहीत का? देश-परदेशात फिरायला जात नाहीत का? पार्टी, पिकनिक, लग्न-बिग्न... सगळ्या ठिकाणी जातात. वेळ नाही ,फक्त या म्हातारीसाठी! ज्या दिवशी मला या वृद्धाश्रमात सोडून गेले आहेत,तेव्हापासून सगळ्यांची सगळी जबाबदारी संपली. कुणी फिरकलंदेखील नाही इकडं. हां, येतात व्हॉटस अपवर मेसेज. मग त्यांचं कर्तव्य संपतं. केक,मेणबत्त्या, फुलांचे हार,फटाके, भेटवस्तूंचा ढीग. आणखी बरंच काही. पण सगळी चित्रं. यात प्रेमाचा ओलावा कुठाय? बस्स, फक्त औपचारिकता.

 आज इथे केक कापला जाईल. माझ्याच वयाचे लोक इथले स्थायी सदस्य आहेत. तेच माझ्या दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतील. शुभेच्छा देतील. जितकं आयुष्य आतापर्यंत जगली आहे, त्याचं ओझं उठता उठवत नाही मग पुढं जगून तरी काय करू? इतकं दीर्घायुष्य मिळालं आहे की, माझी मुलंच मला उबगली. आता आई घरात आहे म्हटल्यावर सगळ्यांना एकत्र कुठे जाता येत नाही. कुणाला तरी एकट्याला घरात थांबावंच लागतं. आजकाल चोऱ्याही फार होताहेत. घराला कुलूप दिसलं की, घर फोडतात म्हणे! आणि आजारी पडणार म्हटल्यावर दवाखान्याला घेऊन जावे लागणार! काही ना काही झंझट, कटकट असणारच! कुठला ना कुठला त्रास सुरू असणारच! आई म्हणजे त्यांच्या घशात अडकलेले 'हडूक'च, ना घशातून काढता येतं, ना आनंदानं अडकवून मिरवता येतं. ज्यावेळेला त्यांना सुट्टी एन्जॉय करायची असते, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो-आईचं काय करायचं? आणि मग सोबत घेऊन गेलं तर यांची कसली सुट्टी एन्जॉय होणार? अरे, बिचारी तुम्हाला कुठे आडकाठी घालते?

एकवेळ तर अशी आली की, मलाच सांगावं लागलं- मला कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडून या. मुलांनीही लगेच सांगितलं,'तिथे समवयस्क असतात. तिथे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. प्रत्येक सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे केले जातात. भोजनदेखील खूप चांगलं मिळतं. दवाखानादेखील असतो. बेल वाजवली की, नर्सदेखील पटकन येते. चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे.'

मी या वृद्धाश्रमात आले. या निष्ठुर एकाकीपणात माझा सेलफोनच माझा सगळ्यात महत्त्वाचा सोबती होता. दुसऱ्या कुणाला वेळ असो अथवा नसो, लहानगी बाळं मात्र माझ्यासाठी हमखास वेळ काढतात. कधी मला आदित्यचे बोबडेबोल ऐकायला मिळतात तर कधी अविनाशचं विश्वासपूर्ण वागणं. आदी सांगतो,"आजी, आई मला खेळायला जाऊ देत नाहीए." तेव्हा मी सुनेला म्हणते,"जरा, या सुप्रीम कोर्टाचा सन्मान तरी ठेवा..." तेव्हा सून हसून आदीला म्हणते," ठीक आहे,जा बाबा!" कधी कधी अविनाश त्याच्या स्वतःविषयीच्या बातम्या सांगतो. 'शाळेतल्या नाटकात हिरोची भूमिका केली आणि खूप मोठं बक्षीस मिळालं. परीक्षेत चांगले गुण मिळालेत. क्रिकेटमध्ये दोन विकेट्स घेतल्या म्हणून त्याची टीम जिंकली. असं बरंच काही. कधी कधी शेजाऱ्यापाजाऱ्यांचे फोन येतात.

पुढे सेलफोनने चांगलीच प्रगती केली आणि त्यावर व्हॉटसअप आला. बोलणं कमी कमी होत होत शेवटी संपलंच. फक्त व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज येऊ लागले. हे करतोय, ते करतोय, याचा बर्थ डे, तिची वेडिंग एनिवर्सरी आहे. मी तर मुलांचा आवाज ऐकायसाठी तळमळत राहिली. माझ्या या एकाकी आयुष्यात फक्त काही आवाज तर होते, आता तेही गेले. आपण या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पुढे जात आहोत की, मागे-हेच कळत नाही. कितीतरी वर्षं अशाच प्रकारे निघून गेली. मग काय !काळाचे सूत्रच हातातून निसटून गेले. काही कळतच नाही हा चाललेला वसंत आहे की पुन्हा आला आहे. मी निरंतर एका विशाल अशा शून्यात जगते आहे. व्हॉटसअपशिवाय काही कळतच नाही-कुठे काय चाललं आहे.

माझ्या नातीचे-किटटूचे लग्न झाले. माझ्याच घरातली माणसं विसरली की, मीदेखील या घरातली एक सदस्य आहे. कुणीच वैयक्तिक येऊन मला निमंत्रण देण्याची तसदी घेतली नाही. कुणाला त्याची गरजही वाटली नाही. माझ्या आशीर्वादाची आवश्यकता कुणालाच नव्हती. कुठे गेला तो काळ, जेव्हा मोठयांचे आशीर्वाद घेऊन  मगच शुभकार्य होत होते. तिच्या लग्नाचे फोटो व्हॉटसअपवर टाकण्यात आले होते. मग काय पुढे हाच क्रम चालू राहिला. सोलापूरची आत्या गेली,ते व्हॉटस अपच्या माध्यमातूनच समजलं. बाहेरच्या जगाशी माझा संबंध फक्त चित्रं आणि फोटोंच्या माध्यमातूनच राहिला. कधी कधी तर मी नीटस पाहूही शकत नव्हते. तेव्हा मग नर्स सांगायची, अमुक अमुक ठिकाणी झालं आहे. तेव्हा मी अंदाज लावायची, 'म्हणजे! ही दुर्घटना तर माझ्या सासरकडे घडली आहे.'

अडचण ही आहे की, आयुष्यदेखील आपल्या हातात नाही. कुणीतरी येतं, आंघोळ घालतं, कपडे बदलतं, औषध देतं, एका अंगाला करतं, डोक्याचे केस सारखे करतं. कोण मनापासून करतं कोण नाईलाज म्हणून. नोकरी आहे तर ती करावीच लागेल.

मला चांगलं आठवतं-ही सगळी कामं जेव्हा मी माझ्या सासूसाठी करायची,तेव्हा ती खूप ओरडायची. मीदेखील तितकंच बोलायची,"एक तर तुमची सगळी कामं करायची, आणि वर तुमच्या शिव्या खायच्या..." पण आता वाटतं की, निदान आमच्यात संवाद तरी होता. नंतर त्यांनी मला बोल लावायचं बंद केलं. माझी धडपड त्यांच्या लक्षात आली. नंतर त्याच म्हणू लागल्या,"तू आहेस म्हणून मी स्वच्छ, व्यवस्थित झोपली आहे, नाहीतर माझ्यात किडे पडले असते." 

सासऱ्याच्याबाबतीतही असंच घडलं. त्यांचीदेखील सेवा केली. ते खूप शांत स्वभावाचे होते. छान बोलायचे. तेव्हा वृद्धलोकांमध्ये असा एकाकीपणा नव्हता.

माझ्या डोक्यात एक विचार आलाय. सगळे मला विसरले आहेत, तर मग आपणही त्यांना का विसरू नये? पण हे खरंच सोप्पं आहे? मला माझ्या मुलांचं बालपण आठवतं. कसे ते माझ्याभोवती पिंगा घालायचे? रात्री माझ्या पुढ्यात येऊन झोपी जायचे. दिवसभर काही ना काही सतत बडबडत राहायचे. पण जेव्हा त्यांनी मला विसरलंच आहे तर मग माझ्याबाबतची कुठलीच माहिती त्यांच्यापर्यंत का पोहोचवायची? म्हणून मग मी हे केले.

काय केलं? हे मी नाही सांगणार? हाच तर या कथेचा परमोत्कर्ष आहे. ते तर तुम्हाला -स्वतःला शोधून काढावं लागेल.

त्यादिवशी जेव्हा माझ्या मुलाने व्हॉटसअप चेक केला, तेव्हा त्यावर खूपसे फोटो होते. आईचे निधन झाले. तिच्या चितेला लागलेल्या भडाग्नीची ती छायाचित्रे होती. डॉक्टरांनी दिलेला मृत्यू-दाखल्याचाही फोटो होता. एक फोटो तिच्या शेवटच्या इच्छेचाही होता.

त्यात आईनं लिहिलं होतं-माझ्या मृत्यूचा सांगावा कुणालाही दिला जाऊ नये. माझ्यावरचे सगळे अंत्यसंस्कार संस्थेच्यावतीने करण्यात यावेत. मी आहे किंवा नाही, हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. हो,पण अंत्यसंस्काराचे फोटो व्हॉटसअपवर टाकले जावेत. सगळ्यांना कळून जाईल. माणसं सूर्याला रोज पाहातात की नाही माहीत नाही,पण व्हॉटस अप मात्र नक्की पाहतात.

मूळ हिंदी कथा- लता शर्मा

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

Sunday, October 11, 2020

(कथा) राँग नंबर


संध्याकाळचे चार वाजले होते. गीता वेळ घालवायचा म्हणून कुठल्या तरी सिनेनियतकालिकेची पानं पालटत होती, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. तिने मोबाईल उचलला आणि पाहिलं की, कुणाचा तरी अनोन नंबर आहे. फोन उचलायचा की नाही, या विचारात तिने काही क्षण घालवले. पण काही तरी विचार करून फोन उचलला. "हॅलो." पलिकडून एका महिलेचा आवाज आला. 

"हॅलो, आपण कोण?" गीताने विचारलं.

"मी कुणाशी बोलतेय." पलिकडून महिलेने विचारले. 

"फोन तर तुम्ही केला आहे, मग तुम्हालाच माहीत असणार ना..." गीताने उलट विचारलं.

"मी ते..." पलिकडून काहीसा घाबरलेला आवाज आला. 

"सॉरी, राँग नंबर..." म्हणून गीताने मोबाईल कट केला.

दुसऱ्या दिवशी चार वाजता पुन्हा मोबाईल वाजला. गीताने पाहिलं, काल आलेलाच नंबर होता. 'विचित्रच बाई दिसते. आज जरा जोरातच बोलायला हवं', असे म्हणत गीताने फोन उचलला आणि जरा त्रासलेल्या आवाजातच मोठ्याने बोलली. "हॅलो."

"हॅलो, बाळा, फोन कट करू नकोस. मला माहित आहे, राँग नंबर आहे हा. पण मला तुझ्याशी थोडावेळ बोलायचं आहे. माझं मन आज खूप उदास आहे."

पलिकडून त्या महिलेचा बारीक आवाज आलेला पाहून गीता जरा नरम पडली. 

"बोला, काय बोलायचंय." ती थोडी प्रेमानं बोलली. 

"माझं नाव शोभा सरकार आहे. मी इथलयाच 'आश्रय' आश्रमातून बोलतेय. कालपासून मन फार उदास होतं, चुकून तुझा फोन लागला. वाटलं तुझ्याशी थोडावेळ बोलावं. त्यामुळे माझं एकाकीपण कमी होईल."

ती महिला पुढे म्हणाली,"तू काय करते आहेस, मी तुला त्रास तर दिला नाही ना?" 

"नाही, मी यावेळेला फ्रीच असते." गीताने सांगितले. का कुणास ठाऊक पण तिला या आवाजात आपलंत्व वाटलं.त्यामुळं तिला 'नाही' म्हणता आलं नाही. फोनवर गीता आणि शोभा यांचा पहिलाच संवाद होता. पण यानंतर रोज यावेळेला एक नियमच बनून गेला. संध्याकाळचे चार वाजले की,गीताचा फोन वाजायचा आणि मग शोभाबाई बोलायला लागायच्या. त्यांनी गीताला सांगितलं होतं की, ती कोलकात्याच्या जवळच्या कुठल्या तरी गावची आहे. त्यांचा मुलगा इथे एक मोठा अधिकारी आहे. त्याला मोठं घर, नोकर-चाकर, गाडी असं सगळं काही मिळालं आहे.

"मग तुम्ही या वृद्धाश्रमात का राहता?" गीतानं विचारलं.

"ती माझ्या मुलाची मजबुरी आहे.म्हणून..."

"आईला आपल्यासोबत ठेवणं हे मुलाचं कर्तव्य आहे, मजबुरी नाही."

"नाही नाही, माझा मुलगा खूप चांगला आहे. इथे मला कसल्याच प्रकारचा त्रास नाही. त्याने माझ्या सेवा-चाकरीची सगळी व्यवस्था केली आहे. हा मोबाईलदेखील त्यानेच दिला आहे. मला वाटेल तेव्हा, मी त्याच्याशी बोलू शकते. आणि त्याला वेळ मिळेल तेव्हा तो मला भेटायला येतो." शोभांनी आपल्या मुलाचे कौतुक करत सांगितलं.

हा बोलण्याचा सिलसिला असाच पुढे चालू राहिला. पाच मिनिटांपासून आता हळूहळू अर्धा तास, तासपर्यंत त्यांचं बोलणं होत राहिलं. गीतानेदेखील आपल्याविषयी शोभाबाईंना सांगितलं. तिचे पती सुरेश जवळच्याच एका कापड कंपनीत कामाला होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत आणि त्यांना एक चार वर्षांची मुलगी-साक्षीदेखील आहे. आता ते एका भाड्याच्या घरात राहतात,पण गीताची खूप मनापासून इच्छा आहे की, आपलं स्वतःचं एक छोटंसं घर असावं. आता महिना उलटला होता शोभाबाई आणि गीताच्या फोनमैत्रीला! गीताने आपल्या नवऱ्यालाही आपल्या फोनमैत्रिणीची माहिती दिली होती. एक दिवस गीताने शोभाबाईंच्या वृद्धाश्रमाचा पत्ता विचारला आणि पुढचा रविवार गाठून गीता तिचा पती सुरेश आणि मुलगी-साक्षीसोबत त्यांना भेटायलाही गेली. 'आश्रय'च्या एका मोठ्या स्वच्छ-टापटीप अशा खोलीत एक 65-70 वर्षांची सडपातळ महिला बसली होती. याच त्या शोभा सरकार! शोभाबाईंना गीता आणि तिच्या नवऱ्याला भेटून खूप आनंद झाला. साक्षी तर शोभाबाईंच्या मांडीवरून उठायलाच तयार नव्हती. तिला फोनवाल्या आजीकडून खूप काही गोष्टी ऐकायच्या होत्या. 

शोभाबाईंनी गीताला एक दिवस त्यांचे पती एका अपघातात वारल्यानंतर त्यांनी एकटीने मोठ्या कष्टाने  मुलाला शिकवलं,सांभाळ केला आणि नोकरीसाठी दुसऱ्या शहरात पाठवल्याचं सांगितलं. गावाकडे त्यांचं एक जुनं घर आणि थोडी जमीनदेखील आहे. तेच आई आणि मुलाच्या जगण्याचं साधन होतं. शहरात मुलाने एका श्रीमंत बापाच्या शिकल्या-सवरलेल्या मुलीशी विवाह केला. खरे तर त्यांची सून चांगली होती,पण तिला आपली 'गावंढळ' सासू तिच्याजवळ राहायला नको होती. शोभा आपल्या गावाकडे जाऊ इच्छित होत्या,परंतु मुलाने शपथ घालून त्यांना थांबवलं होतं. शोभाबाई फार शिकल्या नव्हत्या,पण त्यांनी वृद्धाश्रमाचा शोध घेतलाच आणि एक दिवस आपण आता 'आश्रय' मध्येच राहणार असल्याचं सांगितलं. यासाठी  आपल्या मुलाला त्यांनी तयार केलं. मुलाने आईच्या संपूर्ण सोयी-सुविधांचा खर्च उचलण्याचे वचन दिले. त्यांना मोबाईल देऊन ते कसे 'चालवायचं' हेही शिकवलं. शोभाबाईंना आपल्या मुलाचं सुख महत्त्वाचं वाटत होतं,त्यामुळे त्या स्वतः च्या मर्जीने 'आश्रय' मध्ये राहत होत्या. 

यथावकाश गीता आणि शोभाबाईंच्या मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालं. फोनवर दोघीही आपापल्या गोष्टी 'शेअर' करायच्या. त्याचबरोबर गीता त्यांच्याकडून स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या रेसिपी शिकून घेत होती. कधीकधी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून 'आश्रय'ला जाऊन देऊन आणि भेटून येत होती. अशाप्रकारे'राँग नंबर' ने झालेली मैत्रीची सुरुवात एका घट्ट कौटुंबिक नात्याच्या दोरीमध्ये बांधली गेली होती. 

दोन दिवसांपासून शोभाबाईंचा फोन आला नाही. गीताचे मन शंका-कुशंकेने भरले. तिसऱ्या दिवशी नवऱ्याला कामाला आणि मुलीला शाळेत पाठवून ती थेट वृद्धाश्रमात शोभाबाईंना भेटायला पोहचली. दोन दिवसांपासून त्यांचा फोनदेखील बंद येत होता. तिथे गेल्यावर कळलं की, अंघोळ करताना बाथरूममध्ये शोभाबाई पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या डोक्याला भारी जखम झाली होती. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्या शुद्धीवर आल्या नाहीत तर कोमामध्ये जाऊ शकतात किंवा आणखी काहीही होऊ शकतं. गीताने आपल्या नवऱ्याला फोनवरून सगळा प्रकार सांगितला आणि ते शोभाबाईंना पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहचले. शोभाबाई आयसीयुमध्ये होत्या. बाहेर त्यांचा मुलगा, सून आणि आणखी काही लोकं थांबली होती. गीता त्यांना लांबूनच पाहून माघारी परतली. दोन-तीन दिवस असेच गेले. गीता रोज चार वाजता फोन आपल्याजवळच ठेवायची-कदाचित फोन येईल म्हणून! 

तिलाही शोभाबाईंमध्ये आपल्या आईची माया दिसायची. 

रविवारी सकाळी वर्तमानपत्र वाचताना मोठ्या अक्षरात एक जाहिरात तिच्या दृष्टीस पडली. तिथे शोभाबाईंचा फोटो आणि खाली श्रद्धांजली वाहणाऱ्या त्यांचा मुलगा, सून आणि इतर काही लोकांची नावं होती.ती जाहिरात पाहून गीताला रडूच कोसळलं. काय झालंय म्हणून तिच्या नवऱ्याने वर्तमानपत्र घेऊन वाचलं, त्याला ती जाहिरात पाहिल्यावर गीताच्या रडण्याचे कारण कळले. त्याने गीताला समजावून सांगितलं," जे घडणार आहे,त्याला कोण रोखू शकतं. एक हवेचा झोका होता तो-गेला. आता स्वतःला सावर."

एक महिना उलटून गेला. सकाळची वेळ होती. सुरेश कंपनीत जायची तयारी करत होता. गीता मुलीला स्कुल बसमध्ये बसवून नुकतीच आली होती. तेवढ्यात एका व्यक्तीने गीताचे नाव घेऊन दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला.

"तुम्हीच गीता आहात का?"

"हो, पण तुम्ही?"

"मी वकील परेश चक्रधर यांच्याकडून आलो आहे. त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे." ती व्यक्ती म्हणाली.

"पण ते आम्हाला कसे ओळखतात? आणि आमच्याकडे काय काम आहे?" गीताच्या नवऱ्याने गोंधळून विचारलं.

"त्यांना शोभा सरकार यांनी पत्ता दिला होता."

संध्याकाळी दोघे नवरा-बायको जरा काळजीत आणि भीतभीतच परेश चक्रधरांच्या ऑफिसमध्ये पोहचले. वकील साहेबांनी खुणेनेच दोघांना बसायला सांगितलं. 

"तुम्ही शोभाबाईंना कसे ओळखता?"

गीताने वर्षभरातील आपली मैत्री वकिलांपुढे कथन केली. 

"काय झालं? आमच्याकडून काही चूक झालीय का?" गीताच्या नवऱ्यानं विचारलं. 

"नाही...नाही...तसं काही नाही. दोन महिन्यांपूर्वी शोभा सरकार यांनी आपलं मृत्यूपत्र लिहून घेतलं होतं. यातील ही  चिठ्ठी तुमच्या नावाने आहे. " गीताने घाबरतच ती चिठ्ठी घेतली आणि उघडून वाचू लागली. त्यात लिहिलं होतं-बाळा, मी तुला माझी मुलगी म्हणू शकते ना? तू माझ्यावर विश्वास ठेवून माझा एकटेपणा वाटून घेतलास. काही ओळख-पाळख नसताना मला स्वीकारलंस. मी तुझे उपकार कधीच फेडू शकत नाही, पण एक भेट तुला देऊ इच्छिते. आईची माया समजून त्याचा स्वीकार कर. माझ्या गावकडचं घर आणि जमीन तुझ्या नावावर केलं आहे. ते विकून तू तुझं एक स्वतःचं घर खरेदी कर. मी याबाबतीत सगळं काही माझ्या मुलाला आणि सुनेला सांगितलं आहे. त्यांना काही अडचण नाही. माझ्या इच्छेचा मान जरूर राख. -शोभा सरकार.

खाली शोभाबाईंची सही आणि तारीख लिहिलेली होती.

हिंदी कथा-मिनू उषा किरण

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे