Sunday, October 11, 2020

(कथा) राँग नंबर


संध्याकाळचे चार वाजले होते. गीता वेळ घालवायचा म्हणून कुठल्या तरी सिनेनियतकालिकेची पानं पालटत होती, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. तिने मोबाईल उचलला आणि पाहिलं की, कुणाचा तरी अनोन नंबर आहे. फोन उचलायचा की नाही, या विचारात तिने काही क्षण घालवले. पण काही तरी विचार करून फोन उचलला. "हॅलो." पलिकडून एका महिलेचा आवाज आला. 

"हॅलो, आपण कोण?" गीताने विचारलं.

"मी कुणाशी बोलतेय." पलिकडून महिलेने विचारले. 

"फोन तर तुम्ही केला आहे, मग तुम्हालाच माहीत असणार ना..." गीताने उलट विचारलं.

"मी ते..." पलिकडून काहीसा घाबरलेला आवाज आला. 

"सॉरी, राँग नंबर..." म्हणून गीताने मोबाईल कट केला.

दुसऱ्या दिवशी चार वाजता पुन्हा मोबाईल वाजला. गीताने पाहिलं, काल आलेलाच नंबर होता. 'विचित्रच बाई दिसते. आज जरा जोरातच बोलायला हवं', असे म्हणत गीताने फोन उचलला आणि जरा त्रासलेल्या आवाजातच मोठ्याने बोलली. "हॅलो."

"हॅलो, बाळा, फोन कट करू नकोस. मला माहित आहे, राँग नंबर आहे हा. पण मला तुझ्याशी थोडावेळ बोलायचं आहे. माझं मन आज खूप उदास आहे."

पलिकडून त्या महिलेचा बारीक आवाज आलेला पाहून गीता जरा नरम पडली. 

"बोला, काय बोलायचंय." ती थोडी प्रेमानं बोलली. 

"माझं नाव शोभा सरकार आहे. मी इथलयाच 'आश्रय' आश्रमातून बोलतेय. कालपासून मन फार उदास होतं, चुकून तुझा फोन लागला. वाटलं तुझ्याशी थोडावेळ बोलावं. त्यामुळे माझं एकाकीपण कमी होईल."

ती महिला पुढे म्हणाली,"तू काय करते आहेस, मी तुला त्रास तर दिला नाही ना?" 

"नाही, मी यावेळेला फ्रीच असते." गीताने सांगितले. का कुणास ठाऊक पण तिला या आवाजात आपलंत्व वाटलं.त्यामुळं तिला 'नाही' म्हणता आलं नाही. फोनवर गीता आणि शोभा यांचा पहिलाच संवाद होता. पण यानंतर रोज यावेळेला एक नियमच बनून गेला. संध्याकाळचे चार वाजले की,गीताचा फोन वाजायचा आणि मग शोभाबाई बोलायला लागायच्या. त्यांनी गीताला सांगितलं होतं की, ती कोलकात्याच्या जवळच्या कुठल्या तरी गावची आहे. त्यांचा मुलगा इथे एक मोठा अधिकारी आहे. त्याला मोठं घर, नोकर-चाकर, गाडी असं सगळं काही मिळालं आहे.

"मग तुम्ही या वृद्धाश्रमात का राहता?" गीतानं विचारलं.

"ती माझ्या मुलाची मजबुरी आहे.म्हणून..."

"आईला आपल्यासोबत ठेवणं हे मुलाचं कर्तव्य आहे, मजबुरी नाही."

"नाही नाही, माझा मुलगा खूप चांगला आहे. इथे मला कसल्याच प्रकारचा त्रास नाही. त्याने माझ्या सेवा-चाकरीची सगळी व्यवस्था केली आहे. हा मोबाईलदेखील त्यानेच दिला आहे. मला वाटेल तेव्हा, मी त्याच्याशी बोलू शकते. आणि त्याला वेळ मिळेल तेव्हा तो मला भेटायला येतो." शोभांनी आपल्या मुलाचे कौतुक करत सांगितलं.

हा बोलण्याचा सिलसिला असाच पुढे चालू राहिला. पाच मिनिटांपासून आता हळूहळू अर्धा तास, तासपर्यंत त्यांचं बोलणं होत राहिलं. गीतानेदेखील आपल्याविषयी शोभाबाईंना सांगितलं. तिचे पती सुरेश जवळच्याच एका कापड कंपनीत कामाला होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत आणि त्यांना एक चार वर्षांची मुलगी-साक्षीदेखील आहे. आता ते एका भाड्याच्या घरात राहतात,पण गीताची खूप मनापासून इच्छा आहे की, आपलं स्वतःचं एक छोटंसं घर असावं. आता महिना उलटला होता शोभाबाई आणि गीताच्या फोनमैत्रीला! गीताने आपल्या नवऱ्यालाही आपल्या फोनमैत्रिणीची माहिती दिली होती. एक दिवस गीताने शोभाबाईंच्या वृद्धाश्रमाचा पत्ता विचारला आणि पुढचा रविवार गाठून गीता तिचा पती सुरेश आणि मुलगी-साक्षीसोबत त्यांना भेटायलाही गेली. 'आश्रय'च्या एका मोठ्या स्वच्छ-टापटीप अशा खोलीत एक 65-70 वर्षांची सडपातळ महिला बसली होती. याच त्या शोभा सरकार! शोभाबाईंना गीता आणि तिच्या नवऱ्याला भेटून खूप आनंद झाला. साक्षी तर शोभाबाईंच्या मांडीवरून उठायलाच तयार नव्हती. तिला फोनवाल्या आजीकडून खूप काही गोष्टी ऐकायच्या होत्या. 

शोभाबाईंनी गीताला एक दिवस त्यांचे पती एका अपघातात वारल्यानंतर त्यांनी एकटीने मोठ्या कष्टाने  मुलाला शिकवलं,सांभाळ केला आणि नोकरीसाठी दुसऱ्या शहरात पाठवल्याचं सांगितलं. गावाकडे त्यांचं एक जुनं घर आणि थोडी जमीनदेखील आहे. तेच आई आणि मुलाच्या जगण्याचं साधन होतं. शहरात मुलाने एका श्रीमंत बापाच्या शिकल्या-सवरलेल्या मुलीशी विवाह केला. खरे तर त्यांची सून चांगली होती,पण तिला आपली 'गावंढळ' सासू तिच्याजवळ राहायला नको होती. शोभा आपल्या गावाकडे जाऊ इच्छित होत्या,परंतु मुलाने शपथ घालून त्यांना थांबवलं होतं. शोभाबाई फार शिकल्या नव्हत्या,पण त्यांनी वृद्धाश्रमाचा शोध घेतलाच आणि एक दिवस आपण आता 'आश्रय' मध्येच राहणार असल्याचं सांगितलं. यासाठी  आपल्या मुलाला त्यांनी तयार केलं. मुलाने आईच्या संपूर्ण सोयी-सुविधांचा खर्च उचलण्याचे वचन दिले. त्यांना मोबाईल देऊन ते कसे 'चालवायचं' हेही शिकवलं. शोभाबाईंना आपल्या मुलाचं सुख महत्त्वाचं वाटत होतं,त्यामुळे त्या स्वतः च्या मर्जीने 'आश्रय' मध्ये राहत होत्या. 

यथावकाश गीता आणि शोभाबाईंच्या मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालं. फोनवर दोघीही आपापल्या गोष्टी 'शेअर' करायच्या. त्याचबरोबर गीता त्यांच्याकडून स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या रेसिपी शिकून घेत होती. कधीकधी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून 'आश्रय'ला जाऊन देऊन आणि भेटून येत होती. अशाप्रकारे'राँग नंबर' ने झालेली मैत्रीची सुरुवात एका घट्ट कौटुंबिक नात्याच्या दोरीमध्ये बांधली गेली होती. 

दोन दिवसांपासून शोभाबाईंचा फोन आला नाही. गीताचे मन शंका-कुशंकेने भरले. तिसऱ्या दिवशी नवऱ्याला कामाला आणि मुलीला शाळेत पाठवून ती थेट वृद्धाश्रमात शोभाबाईंना भेटायला पोहचली. दोन दिवसांपासून त्यांचा फोनदेखील बंद येत होता. तिथे गेल्यावर कळलं की, अंघोळ करताना बाथरूममध्ये शोभाबाई पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या डोक्याला भारी जखम झाली होती. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्या शुद्धीवर आल्या नाहीत तर कोमामध्ये जाऊ शकतात किंवा आणखी काहीही होऊ शकतं. गीताने आपल्या नवऱ्याला फोनवरून सगळा प्रकार सांगितला आणि ते शोभाबाईंना पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहचले. शोभाबाई आयसीयुमध्ये होत्या. बाहेर त्यांचा मुलगा, सून आणि आणखी काही लोकं थांबली होती. गीता त्यांना लांबूनच पाहून माघारी परतली. दोन-तीन दिवस असेच गेले. गीता रोज चार वाजता फोन आपल्याजवळच ठेवायची-कदाचित फोन येईल म्हणून! 

तिलाही शोभाबाईंमध्ये आपल्या आईची माया दिसायची. 

रविवारी सकाळी वर्तमानपत्र वाचताना मोठ्या अक्षरात एक जाहिरात तिच्या दृष्टीस पडली. तिथे शोभाबाईंचा फोटो आणि खाली श्रद्धांजली वाहणाऱ्या त्यांचा मुलगा, सून आणि इतर काही लोकांची नावं होती.ती जाहिरात पाहून गीताला रडूच कोसळलं. काय झालंय म्हणून तिच्या नवऱ्याने वर्तमानपत्र घेऊन वाचलं, त्याला ती जाहिरात पाहिल्यावर गीताच्या रडण्याचे कारण कळले. त्याने गीताला समजावून सांगितलं," जे घडणार आहे,त्याला कोण रोखू शकतं. एक हवेचा झोका होता तो-गेला. आता स्वतःला सावर."

एक महिना उलटून गेला. सकाळची वेळ होती. सुरेश कंपनीत जायची तयारी करत होता. गीता मुलीला स्कुल बसमध्ये बसवून नुकतीच आली होती. तेवढ्यात एका व्यक्तीने गीताचे नाव घेऊन दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला.

"तुम्हीच गीता आहात का?"

"हो, पण तुम्ही?"

"मी वकील परेश चक्रधर यांच्याकडून आलो आहे. त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे." ती व्यक्ती म्हणाली.

"पण ते आम्हाला कसे ओळखतात? आणि आमच्याकडे काय काम आहे?" गीताच्या नवऱ्याने गोंधळून विचारलं.

"त्यांना शोभा सरकार यांनी पत्ता दिला होता."

संध्याकाळी दोघे नवरा-बायको जरा काळजीत आणि भीतभीतच परेश चक्रधरांच्या ऑफिसमध्ये पोहचले. वकील साहेबांनी खुणेनेच दोघांना बसायला सांगितलं. 

"तुम्ही शोभाबाईंना कसे ओळखता?"

गीताने वर्षभरातील आपली मैत्री वकिलांपुढे कथन केली. 

"काय झालं? आमच्याकडून काही चूक झालीय का?" गीताच्या नवऱ्यानं विचारलं. 

"नाही...नाही...तसं काही नाही. दोन महिन्यांपूर्वी शोभा सरकार यांनी आपलं मृत्यूपत्र लिहून घेतलं होतं. यातील ही  चिठ्ठी तुमच्या नावाने आहे. " गीताने घाबरतच ती चिठ्ठी घेतली आणि उघडून वाचू लागली. त्यात लिहिलं होतं-बाळा, मी तुला माझी मुलगी म्हणू शकते ना? तू माझ्यावर विश्वास ठेवून माझा एकटेपणा वाटून घेतलास. काही ओळख-पाळख नसताना मला स्वीकारलंस. मी तुझे उपकार कधीच फेडू शकत नाही, पण एक भेट तुला देऊ इच्छिते. आईची माया समजून त्याचा स्वीकार कर. माझ्या गावकडचं घर आणि जमीन तुझ्या नावावर केलं आहे. ते विकून तू तुझं एक स्वतःचं घर खरेदी कर. मी याबाबतीत सगळं काही माझ्या मुलाला आणि सुनेला सांगितलं आहे. त्यांना काही अडचण नाही. माझ्या इच्छेचा मान जरूर राख. -शोभा सरकार.

खाली शोभाबाईंची सही आणि तारीख लिहिलेली होती.

हिंदी कथा-मिनू उषा किरण

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment