Sunday, October 25, 2020

विल्मा रुडोल्फचा प्रेरणादायी जीवनप्रवास


अख्खं जग चालताना आणि फिरताना दिसत होतं, पण त्या विल्मा नावाच्या मुलीला साधं उभं राहणंही अवघड होतं. ती सगळं निमूटपणे पाहत राहायची. ज्याला कुठं जायचं आहे,तो तिकडे जात होता,येत होता,परंतु ती मात्र अंथरुणावर खिळून होती. तिला वाटायचं, सगळे निघून जातील आणि  बस्स फक्त आपल्याला एकटीला  इथे मागे राहावं लागेल. एकटी,असहाय्य, अंथरुणावर खिळलेली. कसला पर्यायच नाही, डॉक्टरांनी देखील सांगून टाकलं होतं-आता ही मुलगी नाहीच चालू शकणार. एक तर तिचा जन्मच मुळी दिवस पूर्ण होण्याआधी झालेला होता, त्यात वजनही कमी होतं. कसं तरी दोन किलो भरत होतं. जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसे तिच्या कमकुवत शरीराकडून एकेका आजारांना निमंत्रणे धाडली जाऊ लागली. तिला वेगवेगळ्या प्रकारचा ताप यायचा. निमोनिया झाला, कांजिण्या झाला आणि अखेर अडचणींचा महापूर आला,जेव्हा पोलिओ व्हायरसने तिच्यावर हल्ला चढवला. पोलिओ काबूत येइपर्यंत डावा पाय संवेदनाहीन झाला होता.ताकद गमावलेला पाय असा काही वाकडा झाला होता की, तो सरळ होण्याची शक्यता  डॉक्टरांनीही गमावली होती. आई डॉक्टरांचा चेहरा वाचायची,पण त्यावर निराशेच्या छटाच दिसून यायच्या. डॉक्टरांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट झाली होती की, यावर कसलं औषध नाही.

विल्मा पुरती हतबल झाली होती. तिला काहीच कळत नव्हतं. परंतु एक दिवस आईने विल्माला धीर देत मोठ्या प्रेमानं म्हटलं,"बाळा, सगळं काही ठीक होईल.तू अजिबात काळजी करू नकोस.तू नक्की उठशील आणि चालू लागशील." विल्माचा त्यावर विश्वास बसला नाही, आई  माझ्या उदास मनाला  बरं वाटावं म्हणून असं म्हणते आहे. डॉक्टरांनी तर हात टेकले होते. पण तरीही आई म्हणत होती, तू उठशील आणि चालू लागशील. पण तरीही आईचं हे बोलणं मनाला आधार देऊन जायचं. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार.अशा मुलांना आईबाप टाकूनच देतात,पण आईने तिला उलट बळ दिलं. तिच्यात विश्वास निर्माण केला.  तिच्या मनातला अंध:कार दूर केला. आईनं हार मानली नाही. डॉक्टरांचा पिच्छा सोडला नाही. डॉक्टरांशी बोलता बोलता एक विश्वास तिच्यात मनात पक्का बसला की, मालिश केल्याने तिचे पाय बरे होतील. जवळपास दोन वर्षे आई विल्माला आपल्या पुढ्यात घेऊन तिकडे कुठे लांब असलेल्या दवाखान्याला घेऊन जायची. डॉक्टरांना अपेक्षा नव्हती, पण आईने विल्माच्या मनात जी अपेक्षांची बाग फुलवली होती, त्या बागेत फुलं उमलत होती. मनात आई गुंजन करायची- एक दिवस तू खात्रीने चालायला लागशील.
कधी कधी विल्माला वाटायचं- खरंच! आईनं अगोदरच आपल्याकडे लक्ष दिलं असतं तर... पण  ती तर लोकांची, घरची कामं करण्यात अडकून पडलेली असायची आणि मी सातत्याने येणाऱ्या आजारांमध्ये! अगोदर आईला कुठे वेळ होता, आपल्याकडे बघायला. घरात 22 लहानगी मुलं. बापाची दोन लग्नं झालेली.  इतक्या मोठ्या कुटुंबात मुलीने सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं ते डॉक्टरांनी ,आता ही मुलगी कधीच चालू शकणार नाही म्हटल्यावर! आता फक्त या मुलीचा सांभाळ करण्यापलीकडे काही करता येणार नाही,असं डॉक्टरांनी सरळसरळ सांगून टाकलं. विल्माचे पाय  बाहेरून मालिश करून आणता आणता आईच मालिश करायला शिकली आणि घरातल्या मोठ्या मुलींनाही मालिश करायला शिकवलं. आईनं सगळ्यांना सांगून टाकलं होतं-'विल्माच्या पायात पुन्हा जीव आणायचा आहे. उजवा जरा बराय, पण हा डावा पायच ताप देतोय. आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे. संधी मिळेल, तेव्हा या बेजान पायाला मालिश करत राहायचं.' आई, मोठी बहीण या सगळ्याच मालिश करण्यासाठी हात धुवून मागं लागल्या. काही दिवसांतच विल्मा डाव्या पायावर थोडा थोडा जोर देऊ लागली. आई, बहिणींची अपेक्षा आणखी दुणावली. आठव्या वर्षी विल्मा अंथरूण सोडून लेग ब्रेस घालायला लागली. चालू लागली. एक दिवस असाही आला-जेव्हा आईने विल्माला बास्केटबॉल खेळताना पाहिलं. तेव्हा विल्माचं वय होतं 11 वर्षे. ती फक्त धावत नव्हती तर उड्या मारून बॉल बास्केटमध्येही टाकू लागली होती. लवकरच ब्रेसपासून मुक्तता मिळाली आणि संधी मिळेल तेव्हा धावू लागली. या सातत्यामुळे तिच्या धावण्याचा वेग वाढू लागला. पुढे विल्मा रुडोल्फ (1940-1994) एक प्रसिद्ध धावपटू आणि खेळाडू बनली. 16 व्या वर्षी तिची तिच्या देशाकडून मेलबर्न ऑलम्पिकसाठी निवड झाली. 100 x4 रिले स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या टीमची ती भागीदार ठरली. त्यानंतर चार वर्षांनी ती रोम ऑलम्पिकमध्ये विक्रम करत तीन -तीन सुवर्णपदकं जिंकण्यात यशस्वी झाली. ज्या मुलीला डॉक्टरांनी कायमचं अपंगत्व बहाल केलं होतं, त्याच मुलीने जगातल्या सर्वश्रेष्ठ धावपटूंमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कायमचं कोरलं. तिला जगातील सर्वात वेगवान महिला, असं संबोधलं जाऊ लागलं. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ती जुन्या आठवणी काढताना म्हणाली की, माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, मी पुन्हा कधी चालू शकणार नाही. माझी आई म्हणायची, तू चालू शकशील. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला' निसर्गाचा चमत्कार बघा- आईचं निधन झाल्यानंतर काही दिवसांतच विल्माला गंभीर आजार झाला आणि तिनेही या जगाचा निरोप घेतला. आई आणि मुलगी कदाचित एक दुसऱ्यांसाठीच जन्मल्या होत्या. पण अमेरिकेतील टेनेसी प्रांतातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या विल्मा रुडोल्फने  या जगात 'अशक्य काहीच नाही' हे दाखवून दिलं. सकारात्मक स्वभावाच्या तिच्या आईची तिला खंबीर साथ मिळाली. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

No comments:

Post a Comment