Thursday, October 15, 2020

(बालकथा) टुन्ना आणि फुलपाखरू


टुन्ना एक लहानशी मुलगी होती. अगदी खेळण्यातल्या बाहुलीसारखी. हसायची तेव्हा वाटायचं संगीत वाजतं आहे. टुन्नाची आईवर खूप माया होती. शाळेतून घरी आल्यावर ती तिच्या अवतीभवती घुटमळायची. टुन्नाची आई घरातली कामं आवरायची,तेव्हा टुन्ना तिला काही ना काही मदत करायची. टुन्नाच्या घरासमोर थोडी मोकळी जागा होती.  टुन्नाच्या आईनं त्या जागेवर विविध प्रकारची रोपं लावली होती. टुन्नाची आई त्या रोपांना नियमितपणे पाणी घालत होती. माती खुरप्याने शेखरत होती.

 टुन्नाची आई वाळलेली पानं, भाजीपाला आणि फळांच्या साली कधीच बाहेर फेकून देत नव्हती. ती ते सारं एका खड्ड्यात टाकत होती. काही दिवसांनी त्याचं खत होई. ते ती रोपांजवळच्या मातीत मिसळत होती. यामुळे रोपांचं चांगलं पोषण होई.

चांगल्या पोषणामुळे  टुन्नाच्या बागेतील रोपटी टवटवीत दिसायची. तिच्या बागेत अनेक प्रकारची फुलं फुलत होती. आईप्रमाणेच  टुन्नालादेखील झाडं-रोपं आवडायची. तिनेही कुंड्यांमध्ये फुलांच्या बिया लावल्या होत्या. त्यानंतर ती रोज नेमाने त्यांना पाणी घालत होती. 

रोज सकाळी उठल्यावर टुन्ना कुंड्यांजवळ जायची आणि बघायची की, बियांना अंकुर फुटले आहेत की नाही.शाळेतून आल्यावरही तिचा हा दिनक्रम चालू असायचा.

टुन्नाला फार दिवस वाट पाहावी लागली नाही. काही दिवसांतच तिला छोटी-छोटी रोपं उगवल्याचं दिसलं. ती रोपं पाहून टुन्नाला कमालीचा आनंद झाला. त्या दिवसांमध्ये घरी कोण आलं तर ती त्यांना तिच्या बागेत घेऊन जायची आणि ती रोपं दाखवायची.वर  म्हणायची,' बघा ना, ही रोपं किती सुंदर आहेत. ही मी लावली आहेत. मी यांना रोज पाणी घालते. आता काही दिवसांतच यांना फुलं येतील."

टुन्नाच्या स्नेहभरल्या देखभालीनं रोपं वेगानं वाढत होती. काही दिवसानंतर त्यांच्या फांद्यांमधून कळ्या निघाल्या. मग तर काय! टुन्ना रोपांची आणखीनच अधिक काळजी घेऊ लागली.

आता शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या. टुन्ना जवळपास दिवसभर बागेतच तिच्या रोपांजवळच बसून असायची. तिला भीती होती की, कुणी तरी या कळ्या तोडून घेऊन जातील.

 काही दिवसांनंतर कळ्या खुलल्या आणि फुलांत रूपांतरित झाल्या. तिने बाबांना सांगून या फुलांसोबत फोटो काढून घेतले. टुन्नाच्या बाबांनी ते फोटो फेसबुकवर टाकले. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्या फोटोंना 'लाईक' केले. काहींनी खूपच छान कमेंटस दिल्या. टुन्नाला ते खूप भारी वाटलं. तिला आता अभ्यासातही मजा येऊ लागली.

त्याच काळातळी गोष्ट आहे. टुन्ना कुंड्यांजवळ बसली होती, तेवढ्यात एक फुलपाखरू उडत उडत आलं आणि कुंडीमध्ये फुललेल्या एका फुलावर बसलं. टुन्नाला वाटलं की, फुलपाखरू फुलातला रस शोषून घेऊन ते खराब करून टाकील. टुन्नाने त्या फुलपाखराला पिटाळून लावलं. मग टुन्नाने एक मोठी प्लास्टिक पिशवी घेऊन फुलझाडाची कुंडी अशाप्रकारे झाकली की, कोणतंच फुलपाखरू फुलांवर  बसणार नाही. 

एक दिवस टुन्ना आपल्या कुंड्यांजवळ बसून गोष्टींचं पुस्तक वाचत होती. तेवढ्यात तिला आवाज ऐकू आला- "टुन्ना,तू हे काही योग्य केलं नाहीस. तू फुलांना अशाप्रकारे झाकायला नको होतंस."

टुन्नाने इकडेतिकडे पाहिलं, पण तिला कुणीच काही दिसलं नाही. पुन्हा आवाज आला-"टुन्ना, मी नीलिमा फुलपाखरू बोलतेय."  टुन्नाने तिला पाहिलं. ती जवळच्या एका झाडाच्या फांदीवर बसून आपले निळे पंख फडफडवत होती. 

 "मी तुला माझ्या फुलांचा रस शोषू देणार नाही. मी खूप मेहनत घेऊन ही रोपं लावली आहेत आणि सांभाळली आहेत." टुन्ना म्हणाली.

 "आम्ही तर फुलांचे मित्र आहोत. आमच्याशिवाय फुलांचा पुढे विकासच होणार नाही. आमच्याशिवाय तुझी फुलं किती दुःखी-कष्टी झालीयत, ती बघ तर  खरं! टुन्ना, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर या फुलांना विचार बरं." नीलिमा म्हणाली.

 नीलिमाचे बोलणे ऐकून टुन्नाने फुलांवर झाकलेली पिशवी काढली. टुन्ना काही बोलणार तोच एक फुल म्हणाले,"हो टुन्ना, नीलिमा म्हणतेय ते बरोबरच आहे. फुलपाखरं आमच्याकडून भोजन घेतात. पण त्या बदल्यात आमच्या परागणात मदत करतात. परागणशिवाय फुलांचं बीज होत नाही. बीज बनलं नाहीतर पुढच्या ऋतूमध्ये आणखी रोपं कशी उगवतील?

"अच्छा, म्हणजे असं आहे तर...! माझं चुकलंच. ठीक आहे, ये बस या फुलावर." टुन्ना म्हणाली. आता फुलपाखरं रोज फुलांवर बसू लागली. काही दिवसांनंतर फुलांच्या ठिकाणी छोटी-छोटी फळं दिसू लागली. फळं पिकल्यावर टुन्नाने त्यातल्या बिया काढून ठेवल्या. आता टुन्ना खूप आनंदी होती- कारण या बियांपासून पुढच्या ऋतूमध्ये ती फुलांची आणखी रोपं उगवणार होती.


 हिंदी कथा-विष्णुप्रसाद चतुर्वेदी

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment