Sunday, October 25, 2020

गुन्हेगारीचा फास आपल्याला कुठे नेणार?


असं वाटतं की, गुन्हेगारीच्या अजगराने आपल्याला त्याच्या विळख्यात चांगलंच करकचून आवळलं आहे. मग ती राजकीय असेल, सामाजिक व्यवस्था असेल, शैक्षणिक संस्था असतील, धार्मिक संस्था असतील किंवा मग आर्थिक व्यवस्था असेल. सर्वच क्षेत्रात गुन्हेगारीचे स्तोम माजले आहे. वडिलांकडून आपल्याच कुटुंबातील आपल्या बायको आणि पोरांचा खून करण्याच्या किंवा अल्पवयीन मुलाकडूनच  आपल्याच आईचा चाकूने वार करून मारून टाकण्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. या घटनांच्या मागे कसलीच मोठी कारणं नसतात. नेहमीच्या त्याच त्या छोट्या छोट्या अवांछित घटना असतात. कुटुंब म्हणजे आपल्या जीवनाचा पाया असतो, जीवनाचा आधार असतो. तिथेच असल्या गुन्हेगारीच्या घटना घडतात तेव्हा कुटुंबांमध्ये कसली शांतता असेल,याचा अंदाज येतो. नवरा आणि बायको यांच्यात वादविवाद, भांडणं होतात आणि शेवटी त्याचं पर्यावसान खून करण्यात होतं. भाऊ बहिणीचा खून करतो,कारण तिने तिच्या मर्जीने कुणाशी तरी लग्न केलेलं असतं.

अशा अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. आपण ऐकतो, पाहतो, वाचतो आणि एक 'बातमी' म्हणून सोडून देतो. पण ही नाती, संस्कार, भावना, मूल्ये आणि श्रद्धांच्या कोसळणाऱ्या इमारती आहेत,हे लक्षात घ्यायला हवं. आजच्या काळातील वाढती हतबलता, सहनशीलतेचा अभाव याशिवाय वैश्विक होत असलेली संस्कृती आणि बाजारीकरणाव्यतिरिक्त काही दुसरी कारणंदेखील आहेत. डिझिटलची आभासी दुनिया, मीडिया आणि चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी हिंसा हीदेखील कारणं यामागे आहेत. याने मुलं, तरुण वर्ग प्रभावित झाला आहेच,पण मोठी समजूतदार माणसंदेखील प्रभावित होताना दिसत आहेत.

एक माणूस एक चित्रपट पाहून त्याच्या बायकोला कसं मारायचं, याची आयडिया शिकून घेतो आणि पत्नीचा खून करतो. कोर्टात तो त्याचा स्वीकारही करतो. प्रत्येकजण हा एकसारखा नसतो. त्याची प्रतिक्रियादेखील 'त्याची' अशी आणि 'वेगळी' असते. उतावळे आणि प्रतिक्रियाशील लोक लगेच आवेशात येतात आणि चुकीचे पाऊल उचलतात.त्यावेळेला त्यांना समोरच्या व्यक्तीशी आपले नाते काय आहे किंवा याचा काय परिणाम होणार आहे, याचा कसलाच थांगपत्ता नसतो.आज आपल्या सभोवताली असाच मोहोल तयार झाला आहे.

आज अशी परिस्थिती आहे की, आश्रमासारख्या ठिकाणीदेखील गुन्हे, अत्याचार घडत आहेत. खरे तर याची कल्पना करणंदेखील कठीण आहे.लैंगिक अत्याचारापासून ते आर्थिक शोषण, सामाजिक गैरवर्तन,बालशोषण आणि छळापर्यंत गुन्हे घडत आहेत. आश्रमांच्या महाराजांवरील  गैरवर्तन,लबाडी आणि अपराधिक गुन्हे सिद्ध होत आहेत. ही मंडळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आपण सगळे जाणतो आहोत की, आश्रमांमध्ये काय चाललं आहे. तरीही सामान्य माणसं अजूनही स्वता: वरच्या अविश्वास आणि अनिष्ठा याकारणाने किंवा दुःखी आयुष्याला कंटाळून तिथे जात आहेत. आणि मग तिथे त्यांची फसवणूक होते. ज्यावेळेला त्यांना कळतं की, आपल्यासोबत काय घडलं आहे, तोपर्यंत वेळ टळून गेलेली असते. त्यामुळे तो पूर्णपणे मोडून पडतो. 

पण काही ठिकाणी चांगलंही पाहायला आणि अनुभवायला मिळतं. काही सामाजिक संस्था, काही स्वयंसेवी संघटना, ज्यांना अनेक ठिकाणांहून आर्थिक मदत मिळते. या संघटना खरोखरच माणसाच्या साहाय्यासाठी, विकासासाठी काहीतरी करीत असतात.  त्यांचा उद्देश सामाजिक हिताचा असतो. त्यांचा हेतू समाजसेवेचा असतो. काही स्तरांवर अशा संस्था कार्यरत आहेत. पण गुन्हेगारी आणि शोषण इथेही आपली जागा निश्चित करताना दिसतात. शिक्षण संस्था देशाची उद्याची पिढी जिथे घडवली जाते आणि अशा संस्थांची जबाबदारी असते की, भावी पिढी चांगली, सुसंस्कारित करणं, त्यांना शिकवणं-प्रशिक्षित करणं, अशा ठिकाणीही गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या अंधाराचा विळखा घालताना दिसत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

राजकारण तर गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे. आकडेवारी सांगते की 30 टक्के खासदार-आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीतील आहेत, जे कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकलेले आहेत. हे राजकारणी एकाद्या प्रकरणात अडकले तरी आपल्या राजकीय प्रभाव आणि दबावामुळे सुरक्षित होऊन बाहेर पडतात. वृत्तपत्रे, साहित्य, मीडिया ही क्षेत्रेदेखील गुन्हेगारीने काळवंडली आहेत. पण यांचं कुणी काही करू शकत नाही.परंतु सामान्य माणूस मात्र लहानशा चोरीमुळे अनेक वर्षे तुरुंगात सडतो. असं वाटतंय की, आमची जीवनमूल्ये आपण गमावत आहोत. पण का? आपली सांस्कृतिक-सामाजिक चेतना परंपरा,परमात्मा, धर्म , सांस्कृतिक मूल्यांमध्ये दाट विश्वास आणि निष्ठेची आहे. आपण कौटुंबिक आणि सामाजिक जीव आहोत. इथे आपल्या अस्तित्वाचा आधारदेखील आहे.आज बाजारीकरण आणि भौतिक सुख-सुविधा यांच्याविषयी वाढलेली आसक्ती आपल्याला आपण 'असण्या'पासून किंवा अस्तित्वापासून लांब चाललो आहोत.त्यामुळे अगदी छोटीशी हतबलता खून किंवा आत्महत्या कडे घेऊन जाते.

या अंधारातून बाहेर येण्याचा एकादा कुठला रस्ता आहे का? आपल्याला परत जावं लागेल-कुटुंबातल्या नात्यांमध्ये, आपल्या परस्पर संबंधांमध्ये! कुटुंब हे एक असे ठिकाण आहे, जिथे भावी पिढयांचं जीवन मूल्य बनते. आपल्या परंपरा, आपले सण, पर्व, उत्सव धर्म, परस्परांतील आनंद,होळी, दिवाळी या सगळ्या गोष्टी माणसाला माणसाशी जोडतात. त्यांच्यातील दुरावा मिटवतात. सण जरी वर्षातून एकदाच येत असले, तरी पण त्यांचा गोडवा, सुगंध वर्षभर प्रतीक्षा करायला भाग पाडतो. -पुढच्या वेळी येणाऱ्या दिवसाचा. पण इथेही चिंता आहेच,  सण-उत्सव, पर्व यांच्या बाजारीकरणाची. दिसायला, ज्यात भावनांपेक्षा भौतिक दिखावा जास्त असतो.पण असे असले तरी या पलीकडे जाऊन आतल्या संवेदनशीलतेशी परस्पर संबंध जोडायला हवेत. तरच नकारात्मकता आणि हिंसात्मक प्रवृतींपासून सुटका मिळू शकेल.तरच गुन्हेगारीच्या आवळत चाललेल्या अजगरी विळख्यापासून सुटका मिळेल. आणि तरच मानवाचा मानवासोबतचा मानवी संबंध बनू शकतो. जर का एकदा का असे घडले तर मग गुन्हेगारीच्या अंधारातून आपली मुक्तता होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment