Monday, October 26, 2020

सावधान! मुलांच्या डाटांची चोरी होत आहे


मुलांसाठीच्या तीन अॅपना गुगल प्ले स्टोरने बाहेरचा रस्ता दाखवून एक चांगलं काम केलं आहे. हे तीनही अॅप्स जवळपास दोन कोटी मोबाईल किंवा मुलांपर्यंत पोहचले होते आणि हे अॅप्स मुलांसंबंधीत असलेला डाटा फक्त आपल्याजवळ संग्रहच करून ठेवत नव्हते तर हा डाटा व्यावसायिक इराद्याने वापरलासुद्धा जात होता, असा आरोप केला जात आहे. मुलांसंबंधीत असलेल्या या डाटाची विक्री केली जात होती, असा संशय आहे. डाटा संग्रहाच्या नियमांचे उल्लंघन करताना हे अॅप वापरकर्त्यांच्या एंड्रॉयड आयडी आणि एंड्रॉयड जाहिरात आयडी नंबरांचा उपयोग करत असल्याचाही संशय आहे. मुलं जेव्हा एकाद्या अॅपचा वापर करतात, तेव्हा ते सावधानता बाळगत नाहीत आणि बरीचशी माहिती ते गेम खेळताना अॅप कंपन्यांपर्यंत पोहोचवतात. विशेष म्हणजे आजच्या मुलांकडे खूप काही माहिती उपलब्ध असते शिवाय आपल्या आई- वडिलांसंबंधीत माहितीची परिपूर्णताही असते. गेमची सुविधा देणाऱ्या अशा अॅपसाठी खेळता खेळता खूप काही माहिती चोरता येणं सहज शक्य आहे. खरे तर ही पांढरपेशी गुन्हेगारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त गुगल प्ले स्टोरमधून या तिन्ही अॅपना बाहेर काढल्याने सगळं काही व्यवस्थित झालं,असं काही होत नाही. फक्त गुगल प्ले स्टोरवरून तीन अॅप हटवल्याने काय होणार आहे? अन्य प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ये अॅप पहिल्यासारखे कायम असणार आहेत आणि सक्रियही असणार आहेत. वास्तविक, अशा अॅप आणि त्यांच्या मालक कंपनींवर विशेषत्त्वाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा कित्येक कंपन्या आहेत, जे एकापेक्षा अधिक अॅप बाजारात चालवत आहेत आणि या  अॅपच्या वापरकर्त्यांना हे शोध लावणं कठीण आहे की,  ते आपल्या कोणत्या अॅपच्या माध्यमातून डाटा संग्रह करत आहेत. खरं सांगायचं तर कोणत्याही सामान्य प्रकारच्या  अॅपना कोणत्याही फोनमध्ये असलेल्या काँटेक्ट नंबर, इमेज गॅलरी, मेसेज बॉक्सपर्यंत जायची काय गरज आहे? त्यांनी सरळसोठ आपली सेवा द्यावी.पण असं होताना दिसत नाही. कारण यावर फारसं कुणी विचार करत नाही.  त्यामुळे अशा  अॅपची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचं फावतं. आता याचा फार गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.  आज कित्येक मोबाईल वापरकर्ते फक्त मोबाईल वापरतात. हवे असल्यास हव्या त्या अॅपचा जेवढा माहीत आहे,तेवढा कामापूरता वापर करतात. आज आपल्या लोकांना कितीतरी वेळा सांगूनही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा नंबर विचारणाऱ्याला सांगून फसवणूक करून घेतात. तिथे या  अॅपवाल्यांचे काय घेऊन बसलाय, असे म्हणायची वेळ आली आहे.या कंपन्या त्यांची माहिती देण्यासाठी का आग्रही राहतात?  ग्राहकांना का विवश केलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी स्वतः प्ले स्टोर चालवणारी कंपनी जबाबदार नाही का?

या खेपेला धोका खरंच वाढला आहे. ही बाब मोठी गंभीर आहे. मुलांच्या गेमिंग अॅपच्या माध्यमातून डाटा संग्रह केली जात असल्याची तक्रार आली आहे, म्हणून कारवाई केली जात आहे. पण गुगल किंवा अँपल कंपनीचं एवढ्यावरच काम थांबणार आहे का?  सध्याच्या घडीला मोठी माणसेदेखील अजून अॅपचे पूर्ण शास्त्र आणि व्यावसायिक उपयोग योग्य प्रकारे समजून घेऊ शकले नाहीत तर तिथे लहान मुलांचे काय? लक्ष वेधून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंटरनेशनल डिजिटल अकाउंटेबिलिटी कौंसिलला आढळून आलं आहे की, हे तीनही अॅप मुलांच्या डाटांचा संग्रह करत होते. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. फक्त हे तीन अॅपच  अशाप्रकारचे कृत्य करीत होते का? या कौंसिलने अगदी कडकपणे या प्रकरणाची चौकशी करायला हवी आणि कोणकोणत्या अॅपच्या माध्यमातून हेरगिरी किंवा डाटा चोरी केली जात आहे, याचा काटेकोरपणे तपास केला गेला पाहिजे. दुसऱ्या बाजूला-गुगल किंवा अँपलसारख्या कंपन्यांचीदेखील जबाबदारी मोठी आहे. त्यांना काहीतरी गडबड दिसल्यावरच ते अशा अॅपना बाहेरचा रस्ता दाखवतात, पण मग एवढंच पुरेसं आहे का? चोरी करणारे अॅप किंवा त्यांच्या कंपन्यांसाठी कुठल्या दंडाची व्यवस्था नाही का? जर अशा गोष्टींना आळा घालायचा असेल तर चूक करणाऱ्या कंपन्यांना शिक्षा नको का व्हायला? गुगल प्ले स्टोरमधून आतापर्यंत 36 अॅप काढून टाकण्यात आले आहेत. प्ले स्टोरवर आजच्या घडीला 28 लाखांपेक्षा अधिक अॅप उपलब्ध आहेत. या सगळ्या अॅपना देखरेखीखाली आणून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाण्याची गरज आहे. चूक किंवा गुन्हा करणारे फक्त 36 च अॅप आहेत का? हा खरे तर आता संशोधनाचा विषय आहे. प्रिंसेस सॅलून, नंबर कलरिंग और कॅट्स ऐंड कॉसप्लेसारख्या अॅपवर  आज जेवढी सतर्कता दाखवण्यात आली ती अशीच कायमस्वरूपी ठेवायला हवी आहे. याला कायद्याच्या चौकटीत आणायला हवे. पालकांनीदेखील यासंबंधाचा आता डिझिटल साक्षर होतानाच मुलांच्या मोबाईलकडे आणि त्यातल्या अॅपकडे अधिक चौकसपणे नजर ठेवायला हवी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment