Monday, October 12, 2020

(कथा) शांतता


आज माझा वाढदिवस आहे,हेदेखील मला नर्सने सांगितलं. ती हसून म्हणाली," गुड मॉर्निंग, मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ डे! मे यू हॅव अ लॉंग ,हेल्दी अँड हॅपी लाईफ." ती माझ्यात मी माघारी काय प्रतिक्रिया देतेय याची वाट पाहत राहिली. पण या बिचारीचा काय दोष!हिला जे सांगण्यात आलंय, त्याचं ती फक्त पालन करतेय.

असं काही खास लांब नाहीए सांगली! नातवंडं-परतुंडं, ल्योक-सून, लेक-जावई. इतक्या मोठ्या भरल्या घरात कुणाकडंही वेळ नाही की, एकाद्या दिवशी यावं आणि भेटावं? खरंच त्यांच्याकडं वेळ नाही? आपल्या मित्र -मंडळींना भेटत नाहीत का हे लोक? सिनेमा,रेस्टॉरंटला जात नाहीत का? देश-परदेशात फिरायला जात नाहीत का? पार्टी, पिकनिक, लग्न-बिग्न... सगळ्या ठिकाणी जातात. वेळ नाही ,फक्त या म्हातारीसाठी! ज्या दिवशी मला या वृद्धाश्रमात सोडून गेले आहेत,तेव्हापासून सगळ्यांची सगळी जबाबदारी संपली. कुणी फिरकलंदेखील नाही इकडं. हां, येतात व्हॉटस अपवर मेसेज. मग त्यांचं कर्तव्य संपतं. केक,मेणबत्त्या, फुलांचे हार,फटाके, भेटवस्तूंचा ढीग. आणखी बरंच काही. पण सगळी चित्रं. यात प्रेमाचा ओलावा कुठाय? बस्स, फक्त औपचारिकता.

 आज इथे केक कापला जाईल. माझ्याच वयाचे लोक इथले स्थायी सदस्य आहेत. तेच माझ्या दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतील. शुभेच्छा देतील. जितकं आयुष्य आतापर्यंत जगली आहे, त्याचं ओझं उठता उठवत नाही मग पुढं जगून तरी काय करू? इतकं दीर्घायुष्य मिळालं आहे की, माझी मुलंच मला उबगली. आता आई घरात आहे म्हटल्यावर सगळ्यांना एकत्र कुठे जाता येत नाही. कुणाला तरी एकट्याला घरात थांबावंच लागतं. आजकाल चोऱ्याही फार होताहेत. घराला कुलूप दिसलं की, घर फोडतात म्हणे! आणि आजारी पडणार म्हटल्यावर दवाखान्याला घेऊन जावे लागणार! काही ना काही झंझट, कटकट असणारच! कुठला ना कुठला त्रास सुरू असणारच! आई म्हणजे त्यांच्या घशात अडकलेले 'हडूक'च, ना घशातून काढता येतं, ना आनंदानं अडकवून मिरवता येतं. ज्यावेळेला त्यांना सुट्टी एन्जॉय करायची असते, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो-आईचं काय करायचं? आणि मग सोबत घेऊन गेलं तर यांची कसली सुट्टी एन्जॉय होणार? अरे, बिचारी तुम्हाला कुठे आडकाठी घालते?

एकवेळ तर अशी आली की, मलाच सांगावं लागलं- मला कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडून या. मुलांनीही लगेच सांगितलं,'तिथे समवयस्क असतात. तिथे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. प्रत्येक सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे केले जातात. भोजनदेखील खूप चांगलं मिळतं. दवाखानादेखील असतो. बेल वाजवली की, नर्सदेखील पटकन येते. चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे.'

मी या वृद्धाश्रमात आले. या निष्ठुर एकाकीपणात माझा सेलफोनच माझा सगळ्यात महत्त्वाचा सोबती होता. दुसऱ्या कुणाला वेळ असो अथवा नसो, लहानगी बाळं मात्र माझ्यासाठी हमखास वेळ काढतात. कधी मला आदित्यचे बोबडेबोल ऐकायला मिळतात तर कधी अविनाशचं विश्वासपूर्ण वागणं. आदी सांगतो,"आजी, आई मला खेळायला जाऊ देत नाहीए." तेव्हा मी सुनेला म्हणते,"जरा, या सुप्रीम कोर्टाचा सन्मान तरी ठेवा..." तेव्हा सून हसून आदीला म्हणते," ठीक आहे,जा बाबा!" कधी कधी अविनाश त्याच्या स्वतःविषयीच्या बातम्या सांगतो. 'शाळेतल्या नाटकात हिरोची भूमिका केली आणि खूप मोठं बक्षीस मिळालं. परीक्षेत चांगले गुण मिळालेत. क्रिकेटमध्ये दोन विकेट्स घेतल्या म्हणून त्याची टीम जिंकली. असं बरंच काही. कधी कधी शेजाऱ्यापाजाऱ्यांचे फोन येतात.

पुढे सेलफोनने चांगलीच प्रगती केली आणि त्यावर व्हॉटसअप आला. बोलणं कमी कमी होत होत शेवटी संपलंच. फक्त व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज येऊ लागले. हे करतोय, ते करतोय, याचा बर्थ डे, तिची वेडिंग एनिवर्सरी आहे. मी तर मुलांचा आवाज ऐकायसाठी तळमळत राहिली. माझ्या या एकाकी आयुष्यात फक्त काही आवाज तर होते, आता तेही गेले. आपण या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पुढे जात आहोत की, मागे-हेच कळत नाही. कितीतरी वर्षं अशाच प्रकारे निघून गेली. मग काय !काळाचे सूत्रच हातातून निसटून गेले. काही कळतच नाही हा चाललेला वसंत आहे की पुन्हा आला आहे. मी निरंतर एका विशाल अशा शून्यात जगते आहे. व्हॉटसअपशिवाय काही कळतच नाही-कुठे काय चाललं आहे.

माझ्या नातीचे-किटटूचे लग्न झाले. माझ्याच घरातली माणसं विसरली की, मीदेखील या घरातली एक सदस्य आहे. कुणीच वैयक्तिक येऊन मला निमंत्रण देण्याची तसदी घेतली नाही. कुणाला त्याची गरजही वाटली नाही. माझ्या आशीर्वादाची आवश्यकता कुणालाच नव्हती. कुठे गेला तो काळ, जेव्हा मोठयांचे आशीर्वाद घेऊन  मगच शुभकार्य होत होते. तिच्या लग्नाचे फोटो व्हॉटसअपवर टाकण्यात आले होते. मग काय पुढे हाच क्रम चालू राहिला. सोलापूरची आत्या गेली,ते व्हॉटस अपच्या माध्यमातूनच समजलं. बाहेरच्या जगाशी माझा संबंध फक्त चित्रं आणि फोटोंच्या माध्यमातूनच राहिला. कधी कधी तर मी नीटस पाहूही शकत नव्हते. तेव्हा मग नर्स सांगायची, अमुक अमुक ठिकाणी झालं आहे. तेव्हा मी अंदाज लावायची, 'म्हणजे! ही दुर्घटना तर माझ्या सासरकडे घडली आहे.'

अडचण ही आहे की, आयुष्यदेखील आपल्या हातात नाही. कुणीतरी येतं, आंघोळ घालतं, कपडे बदलतं, औषध देतं, एका अंगाला करतं, डोक्याचे केस सारखे करतं. कोण मनापासून करतं कोण नाईलाज म्हणून. नोकरी आहे तर ती करावीच लागेल.

मला चांगलं आठवतं-ही सगळी कामं जेव्हा मी माझ्या सासूसाठी करायची,तेव्हा ती खूप ओरडायची. मीदेखील तितकंच बोलायची,"एक तर तुमची सगळी कामं करायची, आणि वर तुमच्या शिव्या खायच्या..." पण आता वाटतं की, निदान आमच्यात संवाद तरी होता. नंतर त्यांनी मला बोल लावायचं बंद केलं. माझी धडपड त्यांच्या लक्षात आली. नंतर त्याच म्हणू लागल्या,"तू आहेस म्हणून मी स्वच्छ, व्यवस्थित झोपली आहे, नाहीतर माझ्यात किडे पडले असते." 

सासऱ्याच्याबाबतीतही असंच घडलं. त्यांचीदेखील सेवा केली. ते खूप शांत स्वभावाचे होते. छान बोलायचे. तेव्हा वृद्धलोकांमध्ये असा एकाकीपणा नव्हता.

माझ्या डोक्यात एक विचार आलाय. सगळे मला विसरले आहेत, तर मग आपणही त्यांना का विसरू नये? पण हे खरंच सोप्पं आहे? मला माझ्या मुलांचं बालपण आठवतं. कसे ते माझ्याभोवती पिंगा घालायचे? रात्री माझ्या पुढ्यात येऊन झोपी जायचे. दिवसभर काही ना काही सतत बडबडत राहायचे. पण जेव्हा त्यांनी मला विसरलंच आहे तर मग माझ्याबाबतची कुठलीच माहिती त्यांच्यापर्यंत का पोहोचवायची? म्हणून मग मी हे केले.

काय केलं? हे मी नाही सांगणार? हाच तर या कथेचा परमोत्कर्ष आहे. ते तर तुम्हाला -स्वतःला शोधून काढावं लागेल.

त्यादिवशी जेव्हा माझ्या मुलाने व्हॉटसअप चेक केला, तेव्हा त्यावर खूपसे फोटो होते. आईचे निधन झाले. तिच्या चितेला लागलेल्या भडाग्नीची ती छायाचित्रे होती. डॉक्टरांनी दिलेला मृत्यू-दाखल्याचाही फोटो होता. एक फोटो तिच्या शेवटच्या इच्छेचाही होता.

त्यात आईनं लिहिलं होतं-माझ्या मृत्यूचा सांगावा कुणालाही दिला जाऊ नये. माझ्यावरचे सगळे अंत्यसंस्कार संस्थेच्यावतीने करण्यात यावेत. मी आहे किंवा नाही, हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. हो,पण अंत्यसंस्काराचे फोटो व्हॉटसअपवर टाकले जावेत. सगळ्यांना कळून जाईल. माणसं सूर्याला रोज पाहातात की नाही माहीत नाही,पण व्हॉटस अप मात्र नक्की पाहतात.

मूळ हिंदी कथा- लता शर्मा

अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment