Tuesday, October 30, 2012

बालकथा बिच्चारा व्यापारी

     एक व्यापारी होता. एका देशातून दुसर्‍या देशात जाऊन माल खरेदी करायचा आणि विकायचा. महिनोमहिने बाहेर राहून पुष्कळ पैसा गोळा करून आपल्या देशात परतायचा. या त्याच्या भटकंतीत त्याला चित्र-विचित्र माणसे भेटायची, तिथल्या नानाविध तर्‍हा पहायला मिळायच्या.
     एकदा तो अशा एका शहरात पोहचला, तिथले सगळेच लोक श्रीमंत होते. तिथे त्याच्या वस्तूंना दुप्पट-तिप्पट दाम मिळाला. दिवसभर फिरून फिरून त्याची मुबलक अशी कमाई झाली. रात्र होताच तो पार थकून गेला. भूकेने त्याचा जीवही कासाविस झाला. त्याने संपूर्ण शहर पालथे घातले, पण एकही खानावळ त्याला दिसली नाही. मग मात्र त्याची अवस्था खूपच केविलवाणी झाली. बरीच भटकंती आणि विचारपूस केल्यावर त्याला एक खानावळ दिसली. त्यावर लिहिले होतं, 'विचार करून खा भोजनालय.' त्या विचित्र नाव असलेल्या खानावळीतले नियम आणि कायदेही वेगळे होते. तिथे कुठलाही ग्राहक फक्त एकदाच ऑर्डर देऊ शकत होता. आपल्याला लागतील ते आणि लागतील तेवढे पदार्थ एकदाच मागवायचे. शिवाय ताटात एकही पदार्थ ठेवायचा नाही. ताटात शिल्लक ठेवल्यास अथवा पुन्हा मागणी केल्यास एक हजार  मोहरांचा दंड भरावा लागे. व्यापारी नियम, कायदे वाचताच घाबरला, पण भुकेपुढे सारे अशक्य होते. तो घाबरतच आत घुसला.
     खानावळीच्या मालकाने पहिल्यांदाच प्रश्न केला, "आमच्या नियम-अटी वाचल्या आहेत ना?"
त्याने होय म्हटल्यावरच त्याची ऑर्डर स्वीकारण्यात आली. त्यादिवशी फक्त शंकरपाळ्याच उरल्या होत्या. व्यापार्‍याला देश नवा होता. त्यामुळे या पदार्थांविषयी अनभिज्ञ होता. शंकरपाळीचे नाव कधी त्याने ऐकले नव्हते. त्याला कितीची ऑर्डर द्यावी समजेना. शेवटी खूप विचार करून त्याने दहा शंकरपाळ्यांची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने एका सुंदर ताटात चांदीच्या वेष्ठनात दहा शंकरपाळ्या त्याच्यासमोर हजर झाल्या. शंकरपाळ्या पाहिल्यावर तो उडालाच. एवढ्या-एवढ्याशा शंकरपाळ्या त्याच्या एका घासाच्याही नव्हत्या. पण काहीच करू शकत नव्हता. दंड म्हणून शंभर मोहरा भरण्यापेक्षा उपाशी राहिलेले परवडले, असा विचार करून त्याने त्या शंकरपाळ्या खाल्या, पाणी प्याला आणि बिल देऊन मुकाट्याने बाहेर पडला.
     दुसर्‍यादिवशीही त्याचा धंदा जोरात झाला. रात्री पुन्हा तीच अडचण त्याच्यासमोर उभी राहिली. पण आता तो घाबरला नाही. त्याच खानावळीत जाऊन त्याने विचारले, काय तयार आहे?
उत्तर आलं, "शेव!"
     "ठीक आहे"  व्यापारी म्हणाला, "शंभर घेऊन या." आणि मनातल्या मनात म्हणाला, पोट कसे भरत नाही, तेच मी बघतो. कितीही लहान वस्तू असली तरी पोट भरेलच. पण तशाच सुंदर तबकात सोन्याच्या वेष्टनात  बारीक बारीक शेव त्याच्यासमोर ठेवण्यात आले, तेव्हा त्याने डोक्यालाच हात लावला. बेसनच्या पिठाचे बारीक बारीक शेव बनवले होते. मोजून शंभर त्याच्यापुढे ठेवण्यात आले होते. बिच्चारा व्यापारी काय करणार होता, निमुटपणे  तेवढ्यावरच समाधान मानून पोटावरून हात फिरवत बाहेर आला.
     तिसर्‍यादिवशीही त्याला रात्रीच सवड मिळाली. सलग तीन दिवस झाले, त्याच्या पोटाची आग शमली नव्हती. तो खानावळीत आला. आता त्याने मनोमन निर्धार केला होता, आज आपली भूकही भागवायची आणि दंडही भरायचा नाही. खानावळीचा मालक कशी हुशारी करतो, तेच मी बघतो, असा विचार करत त्याने काय बनवले आहे, याची पृच्छा न करताच त्याने ऑर्डर दिली, ''जे काही असेल ते एक हजार घेऊन ये''  
     त्यादिवशी जिलेबी बनवण्यात आली होती. थोड्या वेळातच मोठीशी सुंदर थाळी भरून जिलेबी त्याच्यासमोर ठेवण्यात आली. भुकेने व्याकूळ झालेल्या व्यापार्‍याने त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली. पोट भरून जिलेबी खाल्ली.पण ज्यावेळेला त्याने थाळीकडे पाहिले, तेव्हा भीतीने उडालाच. कारण अजूनही निम्मी थाळीसुद्धा संपलेली नवहती.
     शंभर मोहरांचा दंड त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागला. घाबरून त्याने आणखी खायला बसला. पण जेमतेम आठ-दहा आकडेच खाऊ शकला. पोट तुडुंब भरलेले. त्यात गोड. त्याच्याने  खाववेना. शेवटी एक हजार मोहरांचा दंड भरून रडवेला चेहरा करून बाहेर पडला. दुसर्‍यादिवशी त्याने तिथून  आपला बाडबिस्तरा हलवला. 

Thursday, October 25, 2012

मोबाईल नसता तर...!


मोबाईल फोनवर कोर्टात अपिल करता येईल, रेशन कार्डासह अनेक कामांसाठी ऍप्लिकेशन करता येईल, अशी एक बातमी आली आहे. तुमचा या बातमीवर विश्वास बसणार नाही, परंतु, ही बातमी शंभर टक्के खरी आहे. ३० पेक्षा अधिक सरकारी सेवा आता मोबाईलवर आणण्याची तयारी  सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा या सेवा पश्चिम बंगाल, राजस्थान आणि नागालँडमध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि लवकरच्या त्या देशभर कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे लोकांना आता प्रत्येक कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागणार नाहीत किंवा सरकारी बाबूंची मनधरणी करावी लागणार नाही. भारतातल्या तब्बल एक अब्ज मोबाईलधारकांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाच्या फुलबाज्या उडवणारी आहे.
     आज मोबाईल आपला अविभाज्य घटक बनला आहे. एकवेळ जेवायला नसले तरी चालते, पण मोबाईलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी लोकांकडे पैसा आहे. अगदी हमालापासून ते भाजीवाल्या बाईकडेही मोबाईल दिसतो आहे. फक्त ग्रामीण भागातल्या भिकार्‍यांकडे तेवढा मोबाईल नाही, नाही तर पुण्या-मुंबईसारख्या भिकार्‍यांच्या नेत्यांकडे, त्यांची एजंटगिरी करण्यांकडे मोबाईल आहे. त्यामुळे भिकार्‍यांकडे मोबाईल आल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही, कारण इतका हा मोबाईल माणसाशी फेव्हिकॉलसारखा चिकटला आहे.
     मोबाईल, रिचार्जसाठी पोटच्या पोराला विकल्याची बातमी आपण वाचली आहे. या मोबाईलसाठी घरातली बारकी पोरंही हट्ट धरून बसताहेतत्याच्यासाठी 'लंगर' करताहेत, अशाही बातम्या वाचायल्या मिळाल्या आहेत. या मोबाईल फोनचा वापर मुली पळून जाण्यासाठी करताहेतत्यामुळे त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, असा फतवाही काही फतवेबाजांनी काढला आहे. म्हणजे या छोटाशा मोबाईलने माणसाच्या आंतर्बाह्य क्रिया अगदी ढवळून काढल्या आहेत. इतका हा माणसाच्या जवळ आला आहे. एखाद्या नातेवाईकापेक्षा, मित्रापेक्षाही याचे स्थान आज निकटचे बनले आहे. याचाच फायदा विविध मोबाईल कंपन्या, अन्य वित्तीय अथवा अन्य संस्था-कंपन्या घेऊ लागल्या आहेत. ई-पेमेंट हा प्रकार आता जुना व्हावा अशी परिस्थिती होण्याइतपत विविध क्षेत्रात मोबाईलचा वावर वाढला आहे.
     केवळ संवादासाठी माणसाजवळ आलेला मोबाईल, आता त्याची सगळी कामे बसल्या जागी करू लागला आहे. एक मिनिटही माणूस त्याच्याशिवाय राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पण आता मोबाईलला आणि त्याच्या वेड्यांना वेडे ठरविणार्‍यांनाही त्याच्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या नावाने कुणी 'नाके मुरडत' असेल तर त्यांनी त्याचे अस्तित्व स्वीकारायला हवे.
     सरकारी क्षेत्रात काही योजनांमध्ये मोबाईलचा वापर आधीच सुरू झाला आहे. हवामान अंदाज, बाजारभाव, गॅस मागणी, सातबारा, बँक अपडेट अशा किती तरी गोष्टी मोबाईलद्वारा साध्य करणे सोपे झाले आहे. आता आणखी तीस योजना किंवा सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालय विभाग सध्या त्याच खटपटीला लागलं आहे. कोर्टात अपिल करायचं असेल, रेशन कार्ड बनवायचं असेल अथवा शस्त्र परवाना किंवा नुतनीकरण करायचं असेल तर अथवा मोर्चा, सभा, प्रदर्शनसाठी परवानगी मिळवायची असेल तर आता आपल्याला घरी बसल्या बसल्या करता येणार आहेत. त्यासाठी कुठे जायची गरज भासणार नाही. सूचना आणि प्रसारण विभाग लवकरच देशभरात मोबाईल ई-डिलिव्हरी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. त्यानंतर तीसपेक्षा अधिक सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. आता काही राज्यांमध्ये काही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्यात कोर्टात अपिल करणे, विवाह, जन्म-मृत्यूच्या नोंदी, मतदार यादीत नावाचा समावेश करणे, पाणी किंवा वीज बीलाची नवी जोडणी, रेशन कार्डची मागणी, लाऊडस्पिकरचा परवाना आदींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वृद्धावस्था, विधवा, अपंग पेंशन योजनांसाठी आवेदनसुद्धा आता मोबाईलद्वारा करता येणार आहे. निवडणूक आयोगासाठी नऊ विविध ऍप्लिकेशन्स बनविण्यात आले आहेत. यातल्या एका ऍप्लिकेशनचा वापर आगामी विधानसभा निवडणुकीत केली जाणार असल्याची चर्चा आहे.
     म्हणजे मोबाईल आता लोकांना देवासमान वाटणार आहे. अगोदर माणसे एखाद्या माणसाने सहाय्य केल्यास त्याला धन्यवाद देताना, तुम्ही नसता तर माझं काम झालं नसतं, असे म्हणत होते. आता इथून पुढे 'मोबाईल नसता तर... ' असा हमखास उल्लेख लोक करणार आहेत. लहानपणी शाळेत 'परीक्षा नसती तर...', 'सूर्य उगवलाच नाही तर...' असे निबंध पडत. आता 'मोबाईल नसता तर... ' असा निबंध नक्की पडणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा अद्याप ज्यांनी दिली नाही, त्यांनी या हमखास मार्क देणार्‍या निबंधाची तयारी करायला हरकत नाही.                        

machindra.ainapure


Thursday, October 11, 2012

ग्रामीण भागातल्या वार्ताहरांची आर्थिक कुचंबना

भाग १
     सांगलीतल्या एका मोठ्या वृत्तपत्राच्या आवृत्ती प्रमुखाशी बोलता बोलता विषय निघाला तेव्हा त्यांनी ग्रामीण भागात आम्हाला वार्ताहर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. पण त्यांनी हेही कबूल केले की, आम्ही त्यांना देतो तरी किती? पुढच्या काही वर्षात वृत्तपत्रांना ग्रामीण भागात वार्ताहरच मिळणार नाहीत, असेही ते ठामपणे म्हणाले. मी गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्राशी संबंधीत आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि माझ्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात नवीन वार्ताहर निर्माण झालेले नाहीत. काही वर्षांपर्यंत या क्षेत्राला एक प्रकारचे ग्लॅमर होते. युवकांचा या क्षेत्राकडे येण्यासाठी ओढा होता. पण काही दिवस काम केल्यानंतर त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यांनी आपली वाट बदलली. या क्षेत्रात 'राम' नाही, हे त्यांच्या लक्षात आले. टीव्ही चॅनेलसाठी काम करायला युवक इच्छूक आहेत, पण वृत्तपत्रात काम करायला मात्र तयार नाहीत. ही गोष्ट वाचन संस्कृतीसाठी तर धोकादायक आहेच, पण वृत्तपत्रांच्या मर्यादेबाबतही काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
     ज्यावेळी विविध खासगी वाहिन्या अवतरल्या तेव्हा, वृत्तपत्रे संपली, अशी ओरड सुरू होती. मात्र वृत्तपत्राने समाजातले स्थान आबाधित तर ठेवलेच पण त्यात उत्तरोत्तर प्रगतीही दिसू लागली. वृत्तपत्रांनीही वाचनीयता वाढविण्याच्यादृष्टीने आपल्या रंगरुपात, मांडणीत बरेच बदल केले. विविध विषयांवरच्या पुरवण्या सुरू केल्या. म्हणजे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे चांगल्यात चांगला अंक वाचकांच्या हातात देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करू लागला. शिवाय या क्षेत्रात स्पर्धाही भयंकर वाढली. या स्पर्धेमुळे वाचकांची सोय झाली आणि अत्यंत स्वस्त किंमतीत १६-१६ पानी अंक वाचकांच्या हातात पडू लागला.  खपाच्या शर्यतीत घोडदौड करताना प्रत्यक्षात एक अंक बाहेर काढण्यासाठी पाच ते सात रुपयांना पडणारा अंक दोन किंवा तीन रुपयांना विकावा लागत आहे. काही वृत्तपत्रांनी तर आपला अंक सर्वाधिक वाचकांजवळ जावा म्हणून वाचकांच्या लाभाच्या स्कीम टाकल्या. तरीही ज्याची त्याची धाव तिथल्या तिथेच आहे. ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात तरी अनुभवाला येत आहे. पण धडपड मात्र निरंतर सुरू आहे. कारण नवनव्या वृत्तपत्रांची भर पडत आहे. हिंदी भाषिक दैनिकेही आता आपली मराठी संस्करणे सुरू करत आहेत. मोठ्या प्रकाशन संस्थाही या क्षेत्रात पडत आहेत.त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढत चालली आहे.
     जनमाणसात आपल्या दैनिकाचा ठसा उठविण्यासाठी सतत कोणते ना कोणते वृत्तपत्र आपला खप, आपले वाचक कसे आणि इतर दैनिकाच्या तुलनेत कितीने अधिक आहेत, याची आकडेवारी आपल्या दैनिकात झळकवत असते. विविध संस्थांच्या सर्व्ह्रेक्षणाचे आकडे प्रसिद्ध केले जातात. हा प्रकार तिकडे औरंगाबादपासून पुण्या-कोल्हापूरपर्यंत  तीन- चार महिन्यात सतत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आणखीही काही वृत्तपत्रे येऊ घातली आहेत. हे सगळे चालले असताना वाचकांची चांगली सोय होत असली आणि त्यांना कमी मोबदल्यात जादा बरंच काही मिळत असले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात फिल्डवर काम करणारा वार्ताहर मात्र आर्थिक संपन्न झालेला दिसत नाही. त्याला आर्थिक स्थैर्य मिळालेले नाही. केवळ हा एकमेव व्यवसाय करून पोट भरता येत नाही. त्यामुळे सामाजिक, राजकीय अथवा विकासात्मक पातळीवर जागृतीचे काम करणारा ग्रामीण भागातला शिलेदार मागेच आहे.
     जिल्हा पातळीवर असो अथवा तालुका पातळीवर नवीन वार्ताहर किंवा संपादकीय जबाबदारी सांभाळायला इकडची-तिकडचीच मंडळी पळवावी लागतात. यात तालुका पातळीवरच्या वार्ताहरला फारशी किंमत नाही. तसे त्याला दुय्यम स्थानच आहे. आजकाल वृत्तपत्रे बातमीपेक्षा जाहिरातीला अधिक महत्त्व देताना दिसतात. ग्रामीण भागात जाहिरातीला सोर्स नाही. तरीही त्यांच्या मागे वृत्तपत्रांचा ससेमिरा असतो. अर्थात कमी किंमतीत अंक वाचकांना देताना वृत्तपत्रांची दमछाक होते. या जिवघेण्या स्पर्धेत लहान वृत्तपत्रांची तर फारच केविलवाणी परिस्थिती होताना दिसते. जाहिरात आहे तर वृत्तपत्र आहे, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी सतत धावाधाव सुरू आहे.
     या सगळ्यात फिल्डवर काम करणार्‍या वार्ताहराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्याला  आर्थिक स्थैर्य नाही. बातमीसाठी धावाधाव करावी लागते. फोटो काढावे लागतात. ते ई-मेल,पाकिटाने किंवा फॅक्सने पाठवावे लागते. इतके श्रम घेऊन त्याला मानधन मात्र तुटपुंजेच. कुणाही तालुका प्रतिनिधीला आठ-दहा हजार रुपयांपेक्षा अधिक  कुठले दैनिक मानधन देत नाही. ही माहिती प्रत्यक्ष वार्ताहरांशी बोलूनच काढली आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धडपड करून मिळवलेली बातमी प्रसिद्ध होईल, याची वार्ताहरला खात्रीही नाही. जागेचाही मोठा प्रॉब्लेम वृत्तपत्रांकडे निर्माण होत आहे. ग्रामीण भागात अर्धवेळ काम करणार्‍या पत्रकारांनाही त्यांचा मोबदला मिळत नाही, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. ग्रामीण भागात दुसरा व्यवसाय करत हा पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळावा, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे चांगाला म्हणजे किमान पदवीधर झालेला, मराठी व्याकरणशुद्ध लिहिणारा युवक मिळणे कठीण झाले आहे. मराठी भाषेची अवस्था फार वाईट झाली आहे. पदवी प्राप्त केलेल्या युवकाला नीट आपले नाव लिहायला येत नाही. चार वाक्ये लिहायची तर गोष्टच वेगळी.

Tuesday, October 2, 2012

पड, पड तू पावसा...

     पावसाची आठ नक्षत्रं कोरडी गेल्यानं सगळ्यांच्याच घशाला अक्षरशः कोरड पडली असताना शेवटच्या हस्ता नक्षत्रानं सगळ्यांचीच आशा पल्लवीत केली आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. मात्र एवढ्यावर भागणारं नाही. अजून पावसाची गरज आहे. तेवढं हस्तानं जाता जाता मुक्त हस्तानं द्यावं, हीच भावना सगळ्यांची आहे.
     चार महिन्यात पाऊसच झाला नसल्यानं विहिरी, तळी, बोअर सारं काही आटलं आहे. पिण्यासाठी, धुण्या-भांड्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणून आणून जीव मेटाकुटीला आलेला आहे. पुढं काय आणि कसं, याचा विचार करून लोकांच्या आणि सरकारच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आणि अशा बिकट परिस्थितीत हस्त मदतीला धावून आला आहे, असे वाटते आहे.  पावसाळी नक्षत्राचा नववा व शेवटचा हस्त नक्षत्र पाऊस घेऊन आला आहे. त्यानं चोहोबाजूला बरसायला सुरूवात केल्यानं लोकांच्या जिवाची तगमग जरा कमी झाली आहे. पण याच्याने थोडंच भागणार आहे? पाण्याची पातळी पार रसातळाला गेली आहे. आठशे फुट बोअर मारली तरी पाणी निघेना, त्यात पावसानं दगा दिलेला. पण जाता जाता फुंकर मारून लोकांच्या जिवाची आग विझवण्याचं काम हस्त नक्षत्रानं केलं आहे. पण हस्ताला सगळ्यांची हात जोडून विनंती आहे. जाताना पाणी पाणी करून जा. नाही तर लोकांच्या तोंडचं जायला पाणीही शिल्लक राहणार नाही.
     एक गोष्ट सांगितली जाते. बादशहाने एकदा दरबारी मंडळींना प्रश्न केला. "सत्तावीस वजा नऊ किती?" दरबारातले सगळे सरदार-मनसबदार एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. किती सोपा प्रश्न... आज बादशहाला झालंय तरी काय? कोड्यातलं विचारायचं कठीण प्रश्न सोडून हे लहान पोराला पुसावं तसं आम्हाला सोपं प्रश्न का पुसतोय, याचा त्यांना उलगडा होईना. कारण उत्तर अठरा येणार, हे शाळेतलं शेंबडं पोरगंही सांगतंय. त्यामुळे बादशहाची तब्येत तरी बरी आहे का, म्हणून दरबारी मंडळी बादशहाला रोखून पाहू लागली. पण प्रत्यक्षात कुणी काहीच बोलेना!
सगळेच असे गप गप आपल्या निरखत्यात म्हटल्यावर बादशहा बिरबलला म्हणाला, "अरे बिरबल, तू तरी सांग याचं उत्तर. का तूही यांच्यासारखा मठ्ठ उभारणार आहेस?" बिरबल उठला आणि म्हणाला, " खविंद, सत्तावीस वजा अठरा म्हणजे शून्य!" बादशहा हसला, म्हणाला," बिरबल! तुझं गणित मोठं अजबच आहे. सत्ताविसातून नऊ गेल्यावर शून्य उरतात, हे कसं काय शक्य आहे ते सांग."
     "सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रं गेल्यावर राहिलं काय? पाऊस नसेल तर सगळं शून्यच!" बिरबल म्हणाला. असा हा पाऊस. पाऊस नसेल तर काहीच नाही. सारं जीवनच संपून जाईल. त्यामुळेच बिरबलचं 'शून्य' हे उत्तर अगदी बरोबर म्हणायला हवे. तशी भयंकर अवस्था सध्या दुष्काळी भागाची झाली आहे. सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांची अवस्था पाण्यावाचून खूपच वाईट झाली आहे. पावसाचे चारही महिने असेच गेले. त्यातली पावसाची  आठ नक्षत्रंही कोरडीच गेली. जनावरांचा चारा संपला, प्यायला पाणी मिळेना, हाताला काम नाही, अशा दरिद्री अवस्थेत हस्त नक्षत्राने ऊर्जितावस्था आणली. थोडा पाऊस झाल्याने शेतकरी स्फुरला. त्यानं रब्बीच्या कामाला घाई लावली आहे. पुढे पाऊस पडेल न पडेल पण निदान जनावराला बाटुक तरी येईल, या आशेवर पेरणीची घाई करतो आहे.
     पाऊस पडावा म्हणून माणसाने नाही नाही ते केले. वरुणराजाची नाना तर्‍हेने आळवणी केली. बेडकांची लग्नं लावली, गाढवाची मिरवणूक काढली, यज्ञ-याग केले. त्यासाठी विठ्ठलाला, गणपतीला साकडे घातले. पण परिणाम शून्य! शेवटी सगळे दैवाच्या भरवशावर सोडले... पण हस्त नक्षत्राने आशा दिली आहे. शेवटी जाता जात बरसून  जा, हीच आळवणी जो तो करतो आहे.
     मृग, आर्द्रा,पुनर्वसू,पुष्य,आश्लेषा, मघा,पूर्वा,उत्तरा आणि हस्त ही पावसाची नक्षत्रं. सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो चित्रा नक्षत्रात गेला की, पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. पाऊस म्हणजे जीवन. आपली शेती याच पावसावर फुलते,पिकते. म्हणून एका लोकगीतात एक बहीण म्हणते-
पड पड तू पावसा।
माळा मुरडाच्या झाल्या वाती।
कुनबी आल्यात काकुळती॥
पड पड तू पावसा।
पिकू दे मूगराळा।
बंधु माझा लेकुरवाळा॥
पड पड तू पावसा।
नको बधू तालामाला।
व्हईल दुबळ्या भाजीपाला॥

हेडमास्तरांस लिहिलेले 'ते' प्रसिद्ध पत्र लिंकनचे नव्हेच!

     मला कामाचा, अगदी वाचन्या-लिहिण्याचाही कंटाळा आला की मी जुन्या कात्रणसंग्रहाच्या फाईली चाळत बसतो. त्या चाळत असताना सध्याच्या घडामोडींवर भाष्य करायला संदर्भ मिळून जातात. काही विस्मरणातून गेलेल्या माहितीला,ज्ञानाला उजाळा मिळतो. आज दुपारी असाच कंटाळा आलाय म्हणून कात्रणसंग्रहांच्या फाईली चाळत असताना दहा-बारा वर्षांपूर्वी 'लोकसत्ता'त प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचे कात्रण दिसले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या बातमीचे शिर्षक होते,'हेडमास्तरांस लिहिलेले 'ते' प्रसिद्ध पत्र लिंकनचे नव्हेच!' ती बातमी ज्यावेळी प्रसिद्ध झाली होती त्यावेळेलाही मला जिज्ञासा होती आणि आजही आहे, ती म्हणजे खरेच 'ते' पत्र लिंकनचे नाही का? कारण त्यावेळचा 'लोकसत्ता' मी नियमित वाचत होतो आणि त्याचा नियमित वर्गणीदारही होतो. ( तालुक्याच्या ठिकाणी जे काही दहा-वीस वर्गणीदार होते, त्यातला मी एक) त्यानंतर त्या बातमीचा फॉलोअप काही येईल का? अथवा कुणाचे प्रतिक्रिया देणारे पत्र येईल का? जेणे करून 'ते' मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र लिंकनचे पत्र नव्हे, यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र त्यानंतर काही बातम्या-प्रतिक्रिया आल्या नाहीत. त्यामुळे आजही मी या पत्राबाबत संभ्रमित आहे. कारण आजही शाळा-कॉलेजांमध्ये हे पत्र मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांच्या केबिनमध्ये दिमाखात लटकलेलं असतं. त्या पत्राचे संदर्भ आजही दिले जातात, तेव्हा अब्राहम लिंकनचा उल्लेख आवर्जून होतो.
     'लोकसत्ते'त पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या बातमीची फारशी कुणी घेतली नाही, असे मला आजही वाटते आहे. मात्र बातमीदार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्या बातमीत अनेक जिज्ञासू अभ्यासकांचा संदर्भ दिला आहे. यात त्यांनी ते पत्र लिंकनचे नव्हेच, हे ठामपणे सांगितले आहे. 'प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात. नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेदेखील शिकवा-जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही...' अशी सुरुवात असलेले हे पत्र अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरांस उद्देशून कधी लिहिलेच नव्हते तर मग ते पत्र नेमके कुणाचे? आणि ते पत्र शाळांमध्ये लिंकनच्या नावावर का खपवायचे? असा प्रश्न मला आजही सतावतो आहे. त्या पत्रातील गर्भितार्थ कितीही समुचित आणि प्रभावी असला तरी ते पत्र असे कुणाच्याही नावावर खपविण्यात अर्थ नाही. हे पत्र भारतात विशेषतः महाराष्ट्रात फारच प्रसिद्ध आहे. त्याचा नेमकेपणाने छडा लागण्याची आवश्यकता आहे.
     मध्यंतरी मी लोकसत्तेत फोन लावला होता आणि चंद्रशेखर कुलकर्णी यांच्याबाबत विचारपूस केली होती. ते 'मटा' त गेल्याचे सांगण्यात आले. पण त्यांच्या आजपावेतो संपर्क झाला नाही. मला त्यांच्याकडून बातमीवर आलेल्या प्रतिक्रियांबाबत विचारायचे होते. ते राहून गेले. पण माझ्या मते त्यांनी दिलेल्या संदर्भीय पुराव्यावरून राज्य शासनाने तरी किमान याबाबत 'ऍक्शन' घ्यायला हवी होती आणि शाळांमधील ही पत्रे उतरवायला सांगायला हवी होती. पण तसे काहीच झाले नाही. हे मला थोडे दुर्दैवी वाटते.  हे पत्र असंख्य प्रतींद्वारे प्रसार आणि प्रचाराद्वारे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादीत झाले आहे. आणि हे पत्र लिंकन यांनीच लिहिल्याची लाखो भारतीयांची धारणा झालेली आहे. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मात्र हे पत्र कित्येक वर्षांनी या धारणेला सत्याचा आणि ऐतिहासिक साधनांचा आधार नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. हे पत्र नेमके कोणी लिहिले आहे, हे जरी स्पष्ट झाले नसले तरी ते लिंकनचे खचितच नाही, याबाबत आता तिळमात्र संदेह उरलेला नाही. पत्राच्या प्रसाराप्रमाणेच हे मूळ इंग्रजी पत्र कोठे आहे, या कुतुहलापोटी केल्या गेलेल्या प्रयत्नांची कहाणीही विलक्षण असल्याचे त्यांनी आपल्या बातमीत म्हटले होते.  
     लोकव्यवहाराचे ज्ञान देतानाच मानवी जीवनातील शाश्वत मूल्ये आपल्या मुलाच्या मनावर बिंबवण्याची, त्याची दीक्षा त्याला देण्याची विनंती करणारे 'ते' पत्र भारतात अजरामर झाले आहे. अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा समावेशही झाला आहे. हजारोंना ते मुखोदगत आहे. शाळा-कॉलेजांच्या भिंतीवर रेखाटलेले आहे. ते पत्र प्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी मराठीत अनुवादीत करून आणले आहे. बातमीदारानेही या पत्राच्या मुळाशी जाताना प्रत्यक्ष वसंत बापट यांच्याशी साधलेला संवाद बातमीत जशाच्या तसा दिला आहे. बापट यांनी सांगितले आहे की, मी काही रॉयल्टीसाठी हा अनुवाद केलेला नाही. मूळ इंग्रजीवरूनच अनुवाद केला आहे. मात्र ते इंग्रजी पत्र कोठे प्रकाशित झाले होते, याची त्यांना माहिती नव्हती. त्यांनी ते एकनाथजी रानडे यांनी काढलेल्या कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या एका स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पत्राचा अनुवाद केला होता.
     यापुढील माहितीसाठी श्री. कुलकर्णी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे तत्कालिन प्रमुख वासुदेव घारपुरे तथा जी वासुदेव यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांनी आठवड्याभरात सर्व स्मरणिका चाळून नेमकेपणाने सांगेन, असे म्हटले होते (मात्र बातमीदाराने त्याची प्रतीक्षा केली नाही) मात्र जी. वासुदेव यांनी हे पत्र इंग्रजीत दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये पाहावयास मिळते, असे म्हटले होते. विशेष म्हणजे काही जिज्ञासू अभ्यासकांनी लिंकन यांचे सर्व साहित्यिक लेखन चाळून पाहिले, पण त्यात त्यांना ते पत्र अजिबात आढलून आले नाही.
     श्री. कुलकर्णी यांनी आपल्या बातमीत मेधा तासकर यांनी थेट अमेरिकेतल्या राजधानीतल्या 'लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'शी ई-मेलने संपर्क साधल्याचा उल्लेख केला आहे, यातील धक्कादायक बाब त्यांनी उघड केली आहे. ते पत्र अमेरिकेतही प्रसिद्ध असणार, सर्वज्ञात असणार अशी श्रीमती तासकर यांची धारणा होती. पण त्यांना 'कुठले पत्र?' अशीच उलटपक्षी पृच्छा करण्यात आली. कारण असे कोणतेही पत्र या संस्थेला लिंकन यांच्या प्रकाशित साहित्यात आढळून आले नाही.  
     त्यामुळे 'त्या'  पत्राबाबतची अभ्यासकांची जिज्ञासा आणखी वाढली. श्रीमती तासकर यांनी तर एवढ्या उत्तरावर समाधान मानता त्याचा पाठपुरावा लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'कडे चालू ठेवला. शिवाय आपल्याकडील भित्तीपत्राची छायाप्रतही त्यांना पाठवून दिली. कालांतराने तिथल्या ब्रॅडली गर्नाड या ज्येष्ठ पुराभिलेखकाने श्रीमती तासकर यांना पत्र पाथवले. त्यात ते म्हणतात, 'लिंकन यांना एडी, रॉबर्ट,टॅड आणि विल्यम अशी चार मुले होती. त्यापैकी तिघांच्या शालेय जीवनाच्या संदर्भात लिंकन यांनी लिहिलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. परंतु, आपणास हवे असलेले 'ते' पत्र नेमके कुणाला उद्देशून लिहिलेले आहे., हे कळले तर पुढील शोध घेणे सोपे होईल.' शिवाय या पत्राशी साधर्म्य सांगणारे पत्रदेखील उपलब्ध नाही. या उत्तरानंतरही पाठपुरावा सुरूच राहिला आणि अखेरीस लिंकन यांनी असे कोणतेही पत्र कधी लिहिलेच नव्हते, असे सत्य अमेरिकेतूनच उजेडात आले, असे श्री. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील अब्राहम लिंकन व त्यांचे साहित्य या संदर्भातले विशेषज्ज्ञ असलेल्या डॉ> जॉन सेलर्स यांच्या मतानुसार ते पत्र कालविपर्यस्त आहे. शिवाय त्यातील सूर लिंकन यांच्या लिखाणाशी जुळणारा नाही. त्यामुळे गफलतीने अथवा लबाडीने लिंकन यांच्या नावे हे पत्र खपविण्यात आले आहे, असा त्यांचा दावा आहे.
     या सगळ्याचा विचार करता व या बातमीनंतर कुणाची प्रतिक्रिया न आल्याने या ठामपणाला कुणाचाच अक्षेप नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि अक्षेप नसेल तर ते मान्य करून त्या पत्राला जी प्रतिष्ठा दिली गेली आहे, अथवा त्याला लिंकनच्या नावाशी जोडले गेले आहे, त्याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. कोणीही, काहीही कुणाच्याही नावावर टाकत, खपवत असेल तर ते खपवून घेता कामा नये, जिज्ञासू अभ्यासकांमुळे असे प्रश्न बाहेर येतात, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण त्यांच्या संशोधनाला राजमान्यता, समाजमान्यताही मिळण्याची गरज आहे. राज्य शासन आनि केंद्र शासनाने या पत्राच्या आणखी मुळाशी जाऊन त्यातील वास्तवता जगापुढे आणली गेली पाहिजे, असे मला वाटते. म्हणून हा पत्रप्रपंच!